मुंबैच्या संगे आम्ही (बि)घडलो - एक अतर्क्य घडण

 मुंबैच्या संगे आम्ही (बि)घडलो हे डॉ. सुधाकर प्रभू यांचे आत्मचरित्र. त्यांच्या स्वतःसोबत मुंबईतील बदलांचेही चरित्र.
मी मुंबईकर नव्हे. पण गिरण्यांच्या संपाच्या आधीच्या दशकातली मुंबई मी कळत्या वयात अनुभवलेली आहे. गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमा, गोरेगावकरांच्या चाळी,  वीरकरांची मटनाची खानावळ (तिथे तळलेला अख्खा कांदा मिळे), परळच्या लक्ष्मी कॉटेजमधली मालवणी भाषेतली गजबज आणि बोंबील भाजल्याचा वास, सकाळी व्हीटीहून खाली येताना आणि संध्याकाळी वर व्हीटीला जाताना लख्ख रिकाम्या असलेल्या लोकल्स, गिरण्याच्या चिमण्यांमधून निघणारा धूर, या आठवणी अजूनही मनाच्या वळचणीला तग धरून आहेत.
डॉ. प्रभूंचे पुस्तक अपघातानेच हाती लागले. पण हा घातक अपघात नसून 'सेरेंडिपिटी' श्रेणीतला अपघात होता हे लगेचच जाणवले.
प्रभूंची लिखाणाची शैली बरीचशी साधी आहे. त्यांचे संस्कृतचे वाचन, इंग्रजी वाचन आणि अभिजात संगीताचा व्यासंग हे दांडगे आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेस अवतरणे, उपमा आदी गोष्टी मूळ ऐवजावर वरचढ होतात. पण हे सगळ्या पुस्तकभरच आहे. त्याची एकदा सवय झाली की मग मजा आहे.
लालबागच्या गल्ल्या-गटारांतून भटकत वाढलेला 'सुदा' खूप शिकून (बी एस्सी, एम एस्सी आणि मग एम बी बी एस) डॉक्टर झाला, आणि प्रकृती-विकृतीच्या गरारा फिरणार्‍या भिरभिर्‍यासंगे भरकटत गेला. आणि परतही आला. त्या भिरंगटण्याचा आलेख म्हणजे हे आत्मचरित्र.
त्यांच्याच शब्दांत "हे आत्मचरित्र नाही. यात आदर्शवादाचा अभिनिवेश नाही, समाजप्रबोधनाचा अट्टहास नाही, प्रेषिताची भूमिका तर नाहीच नाही. असलाच तर मन:पूत भटकणार्‍याचा स्वैरपणा, क्वचित वेडपटपणाकडे झुकणारा मनस्वीपणा आहे". खरेच आहे हे. पण त्यांच्यासोबत जे मुंबईचे वेगळे दृश्य दिसते ते अगदीच अनवट आहे. मध्यमवर्गीय चाळकरी मुंबैकरांची नाडी पेंडशांनी जशी 'लव्हाळी'मध्ये अलगद पकडली तशी निम्न-मध्यमवर्गीय अब्राह्मणी मालवणी मंडळींचे आयुष्य प्रभूंनी इथे रेखाटले आहे.
त्यातल्या मुंबईबद्दलच्या गोष्टी एवढेच जरी वाचत गेलो तरी करमणूक आणि मुंबईचा सांस्कृतिक-सामाजिक-भौगोलिक इतिहास असे दुहेरी पुण्य मिळते.
नारायण आश्रम असे सोज्वळ नाव धारण करणार्‍या (आणि नावाखेरीज काहीच सोज्वळ नसणार्‍या) चाळीत प्रभूंचे बालपण गेले. तिथली एकंदर परिस्थिती बघता प्रभूंना त्यांचे आत्मचरित्र म्हणजे विद्रोहाचा झेंडा घेऊन लढायला निघालेल्या शूरवीराचे चरित्र असा नामदेवी आव सहज आणता आला असता. गेलाबाजार निम्नस्तरीय जीवनाचे मध्यमवर्गाच्या अंगावर येईलसे वर्णन करून प्रसिद्धीझोत स्वतःवर वळवून घेण्याचा विजयपंथ त्यांना सहज अंगिकारता आला असता. आजूबाजूचे वातावरण सोडा, खुद्द प्रभूंच्या जीवनात आणि कुटुंबात अशा काही घटना घडत होत्या की प्रभू जर का त्या मतलबी पंथात गेले असतेच तर आघाडीचे वीरच झाले असते. पण प्रभूंनी तो मोह टाळला, आणि बर्‍याच वेळेस कंटाळा आणणार्‍या संस्कृत-संगीत उपमा आणि इंग्रजी साहित्याचे संदर्भ यांनी सजवलेली बोजड (पण कोंकणी तिरकसपणा जपणारी) भाषाशैलीच अंगिकारली. त्यामुळे ती जास्ती भिडते.
एक वानवळा: कोंबड्या कापणार्‍या या दोन नोकरांची नावेही अन्वर्थक होती. एकाला म्हणत अकर्‍या, दुसर्‍याला बार्‍या. कारण त्यापैकी प्रत्येकाच्या दोन्ही हातांना मिळून अनुक्रमे अकरा आणि बारा बोटे होती. हात मात्र प्रत्येकी दोनच होते. कोंबड्या कापताकापता त्यांना माणसांना कापायची चटक लागली. नंतर काही दिवसांनी नारायण आश्रम नंबर सात मधल्या एकाने त्यांनाच कापले. पुढे त्याचाही कोथळा दुसर्‍या कुणीतरी बाहेर काढला म्हणतात.
अजून एकः त्यामुळे त्या शिंप्याला उद्योगधंदा असा फारसा नसे. त्याला महत्त्वाचे असे दोनच उद्योग असत. एक विड्या फुंकणे आणि दुसरा म्हणजे कमरेचे आणि जांघेतले गजकर्ण खाजवणे. या दोन्ही उद्योगांतून दिवसाचा बराचसा वेळ उरत असे. त्याचा विनियोग तो एका वेगळ्याच सत्कार्यासाठी करीत असे. स्वतःच्या पत्नीला यथास्थित बदडून काढणे. या ताडणप्रक्रियेची कारणमीमांसा शोधण्याच्या फंदात कुणी पडल्याचे ऐकिवात नाही. तशी आवश्यकता कुणालाही भासली नव्हती. त्या काळी लालबागात समाजवादी आणि साम्यवादी पुढार्‍यांची भाऊगर्दी होती. पण स्त्रीमुक्तीचे लोण नारायण आश्रमापर्यंत पोहोचले नव्हते - निदान पहिल्या मजल्यापर्यंत तरी नव्हते. अस्मादिकाबद्दल तर काय बोलायलाच नको. नारायण आश्रमात पहिल्या मजल्यावर राहणार्‍या बारातेरा वर्षाच्या मुलाने ही 'स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी' पाहून व्यथित होणे हे कोंबड्या कापताना बसनाक मास्तरच्या हॉटेलातल्या अकर्‍या आणि बार्‍या यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर लोटण्याएवढे अशक्य होते.
अजून एकः कुणातरी व्यक्तीची सोबत असल्याशिवाय माझी आई मला कुठे बाहेर पाठवीत नसे. मग ती व्यक्ती बलराम असो किंवा सुदामा असो. नगास नग असला म्हणजे झाले. घरापासून शाळेपर्यंतच्या आणि परतीच्या प्रवासात संरक्षक कवच म्हणून शेजारीच रहाणार्‍या बाबा नावाच्या मुलाची योजना केली गेली. माझ्याहून चांगला सात-आठ वर्षांनी मोठा असलेला हा मुलगा सरस्वती हायस्कूलमध्ये फक्त तीन वर्षांनी माझ्यापुढे होता. इंग्रजी चौथ्या इयत्तेत शिकत होता.'शिकत होता' हे शब्द वापरायला संकोच वाटतो. कारण शालेय अभ्यासक्रमापेक्षा त्याला एका वेगळ्याच विषयात अतोनात रस होता. तो म्हणजे स्त्रीपुरुषांतील लिंगभेद आणि स्त्रीदेहाची रचना. या विषयातील बाबांचे प्रावीण्य वात्स्यायन-कल्याणमल्लाना किंवा व्हॅनदव्हेल्डऱ्हॅवलॉक एलिसना लाजविणारे होते. विद्यार्जनाबरोबरीनेच या बाबाची विद्यादानाची लालसादेखील दुर्दम्य होती. शाळेत जातायेताना नित्यनियमाने हे स्त्रीदेह वर्णनाचे धडे तो मला देऊ लागला. मीही मोठ्या उत्साहाने ते धडे गिरवू लागलो. राणी मैनावतीच्या राज्यात रमलेल्या गुरुवर्य मत्स्येंद्रनाथांना परत आणण्यासाठी गेलेला गोरक्षनाथ तिथल्या स्त्रीप्रलोभनाला बळी पडला नव्हता. मी मात्र या कल्पनेतल्या स्त्रीराज्यात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने रममाण होऊ लागलो. शाळेतल्यापेक्षा शाळेत जाण्याऱ्येण्याच्या मार्गावर अधिक ज्ञान माझ्या पदरी पडू लागले. शिष्योत्तमाच्या ज्ञानपिपासेने उत्तेजित झालेले हे गुरुवर्य इतर वेळीही हे शिक्षण मला देऊ लागले. शेजारीच राहत असल्यामुळे हा विद्यादानाचा मार्ग सुलभ झाला होता. क्षण दोन क्षणांसाठी भेट झाली तरी 'अथा तो लिंगजिज्ञासा' म्हणून आमचे हे लिंगपुराण सुरू होई. आईसाहेबांच्या कडक नैतिकतेमुळे साहजिकच हे विद्याधन भर्तुहरीच्या उक्तीप्रमाणे 'प्रच्छन्न गुप्तं धनम|' या स्वरूपातच राहिले. ते काहीही असो माझ्या शारीरिक संरक्षणाबरोबरीने माझे बौद्धिक आणि नैतिक संवर्धन या बाबानामेकरून दादोजी कोंडदेवांच्या देखरेखीखाली सुरळीत चालू झाले. जिजाऊआईसाहेब निर्धास्त झाल्या.
यातल्या एखाद्या घटनेवर बंदी घालता येईल (आणि मग पुरोगामी मंडळींच्या सह्यांचे पत्रक निघेल) अशा लायकीचे एखादे नाटक तरी निश्चित पाडता आले असते.
या आणि अशाच सरळसोट शैलीत प्रभू मुंबई, मालवण-वेंगुर्ला या प्रदेशांचे आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडणार्‍या अकल्पित घटनांचे वर्णन करीत जातात. त्यात स्वातंत्र्य मिळायच्या आधीच्या काळातल्या चले जाव चळवळ, हिंदू-मुस्लिम दंगे आदि गोष्टी जश्या आहेत तशा त्यांच्या मे़डिकल कॉलेजातल्या गमतीजमती, कामगार वस्तीतली गूढ भाषा ('मलम' म्हणजे च्यवनप्राश वा शार्काफेरॉलसदृश वस्तू; आणि औषधांमधले मलम म्हणजे टूप (ट्यूब))  यांच्या गोष्टीही आहेत.
लिखाणाची एकंदर पद्धत जुन्या धाटणीची असल्याने प्रकरणाच्या शेवटी "मुंबईला माझ्यासाठी काय वाढून ठेवले होते याची मला तेव्हा कल्पना नव्हती" असे शेवटचे वाक्य टाकून पुढच्या प्रकरणाकडे जाण्याची निकड वाढविण्याच्या उद्योगही काही ठिकाणी केला आहे. लोभसवाणा आहे.
'आमच्यावेळी असे नव्हते' असा वेळी-अवेळी गळा काढणार्‍यांचा पंथ प्रभूंनी निष्ठेने नाकारलेला आहे. उलट त्याहीवेळेस भ्रष्टाचार कसा चालत होता याची रोखठोक उदाहरणे त्यांनी सविस्तर दिलेली आहेत. मग अठ्ठेचाळीस सालातला फुटलेला शालांत परीक्षेचा पेपर असो, साठ सालातला कामगार राज्य विमा योजनेचा बट्ट्याबोळ असो वा साठ सालातलीच डॉक्टर लोकांनी चालवलेली रुग्णांची भरमसाट फसवणूक असो. आपण शहाजोगपणे करायचे ते(च) करून, राजकारणापासून अंडरवर्ल्डपर्यंत सगळ्यांचे बूट चाटून मग 'वैद्यकीय पेशातील अधःपात' यावर आरोळ्या मारत बसण्याचा कोडगेपणा प्रभूंच्यात नाही.
आणि त्यामुळेच बोजड भाषेच्या आणि जुन्या धाटणीच्या वर्णनाच्या बेड्या वागवीत असूनही हे तीनशेचाळीस पानांचे पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय अशा दोन्ही याद्यांमध्ये पुढे घुसून बसते.
मुंबैच्या संगे आम्ही (बि)घडलो
लेखक - डॉ. सुधाकर प्रभू
प्रकाशक - सुविद्या प्रकाशन, सोलापूर
प्रथम आवृत्ती - १५ ऑगस्ट २०१०
मूल्य - ३०० रु.