मे २६ २०१३

हिडिंबा आणि मेनका !

       घरात मी व सौ.सुमती दोघेच असताना घराची घंटी वाजली. मुले असताना घरातील सर्व खोल्यात वावर असल्यामुळे कोणीतरी दार उघडे पण आता आम्ही दोघेच असल्यावर मोठ्या घरात दार उघडणे हे एक कामच असते.इतर वेळी सौ.घरातील कामात मग्न असल्यावर मीच दार उघडणे अपेक्षित असते पण आज मी पुस्तकाचे काम करीत होतो त्यामुळे मध्येच उठावे लागू नये म्हणून  सौ. ने दार उघडले व मला आत येऊन सांगू लागली " कोणी तरी बाई तुमच्याकडे आली आहे"
    बहुतेक माझ्या सर्व उपक्रमात अपेक्षित प्रतिसाद देणारी सुमती या बाबतीत मात्र संशयकल्लोळमधील रेवतीसारखे का वागते हे मला न उमगलेले कोडे.खर तर मी अगदी नाकासमोर पाहून चालणारा आणि समोरून बाई आली तर कितीही वळसा पडला तरी तिला टाळून जाणारा.आता माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे त्यांना माझ्याशी संभाषण करावेसे वाटते त्याला माझा काय बरे इलाज?सुमतीच्या मते तसे काही नाही, मीच त्यांच्याकडे काहीतरी निमित्त काढून गप्पा मारायला जातो. आणि तिच्या मते कोणतीही स्त्री आणि पुरुष एकत्र येणे म्हणजे लोणी आणि विस्तव एकत्र येणे आणि त्यांना दूर ठेवणेच योग्य. त्यामुळे माझ्याकडे बाई आली हे सांगताना तिच्या स्वरातील मार्दव पूर्णपणे नष्ट झाले होते.जणु काही ती बाई माझ्याकडे आली हा मोठा अपराधच माझ्याकडून झाला होता.
"माझ्याकडे ?  मी जरा हबकूनच विचारले "माझ्याकडे कश्याला कोण बाई येतेय .तुझ्याकडेच आली असेल, नीट विचार तिला. " बाईला भेटण्यात मला स्वारस्य नव्हते असे नाही.पण तसे दाखवणे धोक्याचे होते .
" माझ्याकडे आली असती तर तुम्हाला कश्याला बोलवायला आले असते ?" फणकाऱ्याने ती म्हणाली "सरांना भेटायच आहे तिला, असं म्हणतेय. मग भेटायच आहे का तिला ? की सर नाहीत घरी ,म्हणून सांगू ?"
"तस कशाला बघतो की मी .कॉलेजविषयी काही काम असेल तर समजायला नको का?’
असे म्हणत मी गेलो शिवाय तिच्यासमोरच भेट घडत असल्याने तिचा काही गैरसमज होण्याची भीती बाळगण्याचे कारण नव्हते. तिच्याबरोबर बाहेर येऊन पहातो तर एक अगदी अपरिचित स्री समोर दिसली. चाळिशीतली असावी. अंगावरील कपड्यावरून जरा गांवढळ दिसत होती
" नमस्कार सर, मी गुंडाप्पाची आई." तिने करून दिलेल्या स्वपरिचयावरून ती कोणत्या तरी विद्यार्थ्याची आई असावी एवढा अंदाज मला करता आला .पण गुंडाप्पा कोण हे माझ्या ध्यानात येईना म्हणून मी विचारले
"कोण गुंडाप्पा ?"
"अहो अस काय करता सर, त्यादिवशी आपण भेटलो नाही का? जी.एस.कुंदगोळ रो तुमचा विद्यार्थी आठवतो ना? त्याला घेऊन मी आले होते बघा. "मला आठवण करून देत ती म्हणाली. कुंदगोळ नाव ऐकल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला.कारण असे नाव असणारा तो एकमेव प्राणी माझ्या क्लासमध्ये होता. तसा तो बुद्धिमत्तेने मध्यम होता पण अतिशय मेहनती होता त्यामुळे परीक्षेत बरे गुण मिळवायचा. पण एक दिवस महाविद्यालयात तो आपल्या आईला घेऊन आला व ती आपला मुलगा माझा किती भक्त आहे व मी किती मेहनतीने त्या वर्गात शिकवतो अशी  माझी खूप स्तुती करून शेवटी आपल्या मुलाकडे जरा अधिक लक्ष देण्याचा प्रेमळ आग्रह करून गेली, हे सगळे तिने आठवण करून दिल्यावर एकदम मला आठवले.
"अच्छा अच्छा तुम्ही कुंदगोळच्या मातु:श्री तर, बसा ,बसा, काय काम काढलत ?" प्राध्यापकाच्या पेशास शोभेल असे तिचे स्वागत करत मी म्हणालो. "काही नाही सर,आमच्या शेतातली ताजी भाजी थोडीशी आणली आहे."पिशवी माझ्यासमोर रिकामी करत ती म्हणाली.
" अहो याची काय जरुरी आहे ? तुमच्या लेकाला शिकवण्याचे माझे कामच आहे आणि त्याबद्दल शासनाकडून मला पगार मिळतो.त्यामुळे याची  आवश्यकता नाही " म्हणून मी तिला ती परत घेऊन जाण्यास सांगितले पण माझे काही न ऐकता तिने
" आमच्या गुंडाकडे जरा लक्ष असू द्या.खूप अभ्यास करतो त्याला पहिला वर्ग मिळायला पाहिजे" असे जणु ती माझीच जबाबदारी असल्यासारखे तिने मला बजावले.
       त्यावेळी कसेतरी तिला वाटेस लावले.पण त्यानंतर ती गेल्यावर, सुमतीने मोठे डोळे करत माझ्याकडे पाहिले आणि ती म्हणाली,"एवढे नाटक करायची काय आवश्यकता होती ?ती तुम्हाला भेटली होती ना एकदा ,मग तसे कबूल करायला काय अडचण होती ?"
" अग,  अशी कधीतरी भेटणारी माणसं सगळी मी ध्यानात ठेवतो अस तुला वाटते का ? आत्ता एकादी गोष्ट कुठे ठेवली हे शोधायला सुद्धा मला तुझी मदत लागते आणि ही केव्हांतरी भेटलेली नगण्य बाई माझ्या लक्षात कशी रहाणार ?"
"नगण्य कश्याला, चांगली लक्षात राहील अशी दिसते बाई ती."
"तुला काय म्हणायचय ?" मी वैतागून विचारले.
"काहीनाही,तुम्हाला चांगलं माहीत आहे मला काय म्हणायचे आहे ते "असे झटक्यात म्हणून तिने विषय तेथेच थांबवला. 
    गुंडाप्पाच्या आईने माझा चांगलाच पिच्छा पुरवायचे ठरवलेले दिसले. पण तिने गनिमी कावा वापरण्याचे ठरवल्यामुळे नेहमी मला अगोदर सावध रहाणे जमत नसे.एक दिवस मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो व आल्यावर पहातो तो सुमती  चेहरा हुप्प करून बसली होती.
"काय झाले अशी का बसली आहेस ?"
" तुमची ती आली होती " चेहरा आणखीच भकास करत ती म्हणाली .
"ती कोण, ती  ?" माझ्या लक्षात आले होते तरी मी विचारले.
"अहो असं काय करता तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याची आई ,आल ना लक्षात ?"
"अग ती माझ्याकडे येते त्याला आता मी काय करू.तिला तूच सांग असं घरी येत जाऊ नका म्हणून.मग तर झाल ? आणि हे बघ तुझ्यासारखी सुंदर बायको घरात असताना मला तिच्याकडे बघावं तरी वाटेल का ?"तिची स्तुती केल्यावर तरी ती प्रसन्न होईल असा माझा अंदाज होता.
"त्याचं काही सांगू नका,द्रौपदीसारखी सुंदर स्त्री असताना भीमाला हिडिंबा आवडलीच होती ना ?" तिच्यासमोर माझा कसलाही युक्तिवाद चालत नाही हे मात्र खरे
    त्यानंतर गुंडाप्पाच्या आईने माझा पि़च्छाच पुरवण्याचे ठरवले की काय कोण जाणे.एक दिवस तर तिने घरी फोन केला व त्यावेळी फोन नुकताच आलेला असल्याने मी लगेचच घेतला,  
 "आहात का घरी सर,मी राधिका बोलतेय, जरा तुम्हाला भेटायचे आहे."
"राधिका कोण राधिका ?"  गोंधळून जात मी विचारले.
असं काय करता सर,मी राधिका कुंदगोळ,तुमच्या विद्यार्थ्याची आई."
" गुंडाच्या आई, " खर तर मला माझे आईच म्हणायचे होते,पण तस म्हणणं योग्य दिसले नसते. आणि राधिका म्हटले असते तर माझ्या राधिकेने फोन माझ्या हातून हिसकावून घेऊन माझ्या टाळक्यात घातला असता. 
" अहो, माझे तुमच्या मुलाकडे लक्ष आहे आणि त्याचा अभ्यास चांगला चालू आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका "असे म्हणून तिची ब्याद टाळण्याचा मी प्रयत्न केला पण तरी तिने येण्याचा हेका कायम ठेवला व माझ्या भिडस्त स्वभावामुळे मला तिला एकदम तोडून बोलणे जमले नाही. शेवटी ती आलीच व बराच वेळ बडबड करत आपल्या मुलाकडे लक्ष देण्याचा विनंतीवजा हुकूम करून गेली.
     त्यानंतर शहाणा होऊन मी फोन घेण्याचे काम सौ.वरच सोपवले व तिचा फोन आल्यास मी घरात नाही असे सांगण्यास मी तिला बजावले त्यामुळे तिचा घरी येण्याचा उपक्रम बंद झाला तरी शिवाजी महाराजांनी शाइस्तेखानावर अचानक हल्ला केला तसा फोन न करता तिने एकदोनदा माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण मी घरात नसल्याने तिच्या तावडीतून बचावलो.त्यामुळे एकदोनदा तिने महाविद्यालयातच मला भेटण्याचा प्रयत्न केला.पण आवारात ती दिसताच मी  कॅन्टीनमध्ये पळ काढत असे.
    त्याच वेळी आमच्या महाविद्यालयात तात्पुरत्या व्याख्यात्यांच्या नेमणुका झाल्या आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स विभागात एकजात पोरींचाच भरणा झाला. माझ्याकडे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग होता आणि मला सहाय्यक म्हणून त्यातील सुजाताला नेमण्यात आले. नव्याने नियुक्त झालेल्या या मुली आमच्या महाविद्यालयाच्याच विद्यार्थिनी होत्या त्यामुळे सुजाताही माझी विद्यार्थिनी नसली तरी तिच्या विद्यार्थीदशेतल्या सवयीमुळे मला सरच म्हणे.त्यामुळे मोकळा वेळ असला तर कधी कधी गप्पा मारत बसे.
     एकदा मी कॅन्टीनमधून परत येताना कार्यशाळेच्या आवारात गुंडाप्पाची आई  मला दिसली. मी तिची नजर चुकवून दुसऱ्या प्रयोगशाळेत शिरलो ती नेमकी इलेक्ट्रॉनिक्सचीच निघाली आणि सुजाता विद्यार्थ्याना प्रयोग समजावून  खुर्चीवर बसली होती. ती मला पाहून उठून "अहो सर इकडे कसे काय तुम्ही ? काही काम होतं का,मग मला बोलवायचं होतं मीच आले असते "म्हणत माझ्यासाठी खुर्ची आणायला तिन गड्याला सांगितलं.
     तेवढ्यात गुंडाची आई गेल्याचे पाहून मी बाहेर पडलो व माझ्या केबिनमध्ये येऊन कामाला लागलो. गुंडाच्या आईवर लक्ष केंद्रित झाल्यामुळे सुजाताकडे माझे इतके दुर्लक्ष झाले की ती समोर आल्याचेही मी विसरून गेलो. पण सुजाताला ही गोष्ट चांगलीच लक्षात राहिली त्यामुळे नंतर काही कामासाठी माझ्याकडे आल्यावर तिने    " अहो सर,काल तुम्ही आमच्या प्रयोगशाळेत आलात आणि मी बसा, म्हणेपर्यंत निघूनही गेलात."
"अरेच्चा अस झाल काय तू समोर होतीस हे माझ्या ध्यानातच आल नाही." मी जरा ओशाळूनच म्हणालो.
" पण तुमच लक्ष तरी कुठं होतं ? तुम्ही आमच्या विभागात आलात एक मिनिट उभे राहिलात आणि लगेचच निघून गेलात ?"
तिला काहीतरी थातुरमातुर सांगून कटवायच माझ्या मनात असल तरी ते जमले नसते त्यामुळे सरळ सगळा प्रकार सांगावा व तिलाच त्यावर काही उपाय करायला सांगावा असं माझ्या मनात आल म्हणून मी गुंडाच्या आईची कहाणी तिला सांगितली.
"अहो सर,ती सगळ्याच सरांना भेटून असेच बोअर करत असते, त्यात इतके घाबरायचे काय कारण आहे ?" ती मला धीर देत म्हणाली.
 गुंडाच्या आईला मी घाबरतोच पण त्यापेक्षा तिच्यामुळे आमच्या घरात निर्माण होणाऱ्या  संशयकल्लोळाला मी जास्त घाबरतो हे तिला मी कसे सांगणार म्हणून मी तिलाच म्हणालो,
"तुझ्याकडे काही उपाय आहे का याच्यावर ?"
" तुमची इच्छा असली तर बघते प्रयत्न करून " मला धीर देत ती म्हणाली.
सुजाताने त्यानंतर काय कळ फिरवली कुणास ठाउक पण त्या दिवसानंतर गुंडाची आई माझ्याकडे महाविद्यालयात आणि घरीही काही फिरकली नाही.त्यामुळे मी आपल्या घरातच दहशतीच्या वातावरणात बसण्याचे माझे नष्टचर्य संपले.कॉलेजात तर ती दिसली तरी मला टाळून दुसरीकडेच गेली.त्यामुळे सुजाता नंतर भेटल्यावर मी तिला विचारले,
"अगं तू अशी काय कळ फिरवलीस की गुंडाची आई परत माझ्याकडे फिरकलीच नाही आणि दिसली तरी मला टाळते."पण सुजाताचा चेहरा एकदम गोंधळात पडल्यासारखा वाटला,"मी ? मी काहीच नाही केल सर"
"मग काय झाले काही कळत नाही पण आज गुंडाप्पाची आई मला पाहून पालीला पाहून पळणाऱ्या विंचवासारखी पळाली एवढे मात्र खरे.
" पण सर तुम्हीच जरा तिला दमात घेतल असतं तरी काम झाल असतं.पण जाऊदे आता तुमच्या मागची कटकट मिटली ना.तेच महत्वाचं "
"   हे  मला करता आले असते हे खरं, " मी विचार करत म्हणालो," पण तुला सांगू का सुजाता, मला अशी भीती होती की ती विचित्र बाई माझ्यावरच काहीतरी उलट  कुभांड आणायची , आणि कायदे सगळे असे विचित्र की तिकडे सरळ सरळ बलात्कार करणारे मोकळे सुटतात आणि आमच्या सारख्याना  मात्र पकडायला वेळ लागत नाही म्हणून  मी गप्प बसलो "
" अहो सर, आजच दुसऱ्याच कामासाठी  मी तुमच्या घरीही आले होते त्यावेळी काकूंनाच काहीतरी करा म्हणून सुचवले मी, पण काकूना काही माझे येणे आवडले नसावे."
" का बरं अस का वाटत तुला ? ती कदाचित काहीतरी महत्त्वाच्या कामात असेल त्यामुळे तुझ्याशी फार बोलली नसेल"
" असेल असेल "
   एका प्रश्नाची तड लागली म्हणून जरा आनंदात घरी आलो तर दारातच सुमतीने आकाश कोसळल्यासारखा चेहरा करत स्वागत केले. मी शांतपणे बूट काढीत घरात शिरलो,
"आज ती आली होती !" सुमतीने सुरवात केली.
"आता ती कशाला येईल तिचा बंदोबस्त केलाय मी " मी मोठ्या ऐटीत म्हणालो
" ती, तुमची नेहमीची नाही आणि तिचा बंदोबस्त तुम्ही नाही, मी केला आहे."
 " काय केलेस तरी काय असं,कौतुकच करायला पाहिजे तुझं माझी त्या हिडिंबेच्या तावडीतून मुक्तता केल्याबद्दल !"
" मनात असलं ना की सगळं जमतं,"सुमतीन आपला ठेवणीतील स्वर काढला.
" काल ती दारात दिसल्यावरच तिला असा सज्जड दम भरला की विचारू नका.मी म्हटल, सर तुझ्या गप्पांना भुलतील पण मी जर त्याना सांगितलं, तर मात्र तुझ्या पोराला नापास केल्याशिवाय रहाणार नाहीत आणि फक्त यावर्षीच नाही तर कायमची त्याला या कॉलेजातच ठेवायला लावीन,आता काय बिशाद आहे तिची तुमच्या पुढे येण्याची" त्याचा अनुभव मी घेतलाच होता.
"पण आज दुसरीच कुणीतरी सुजाता की फिजाता आली होती."
"अग ती माझी असिस्टंट ,काही तरी काम असेल म्हणून आली असेल."
"असेल असेल आम्हाला काय कळणार त्यातलं "
"आता मात्र कमाल आहे तुझी ,सुजाता तरी मला म्हणालीच काकूंना मी आलेलं आवडलं नसावं"
"शहाणी आहे "
" पण तू इतकं काय मनावर घेतेस ?ती केवढी मी केवढा,ती आपल्या मुलीसारखी आणि तू असा विचार करतेस कमाल आहे "
"काही सांगू नका त्याच,विश्वामित्र केवढे आणि मेनका केवढी पण विश्वामित्र चळलेच ना ?"
"पण माझ्यासारखा सभ्य ----" संतापाने माझ्या तोंडातून शब्द फुटेना
"खर आहे,तुम्ही सभ्य आहात यात काही वादच नाही आणि माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे,विश्वामित्र काय सभ्य नव्ह्ते ?अगदी सर्व संग परित्याग करून तपालाच बसले होते ना ? आणि मला सांगा बिल क्लिन्टन तर अमेरिकेसारख्या देशाचा प्रेसिडेंट तो काय सभ्य नव्हता ? आणि त्याची बायको काय कमी सुंदर आहे.?"
" अग ते अमेरिकेतलं, तिथं असंच चालतं."
"आणि आपल्याकडं काय चालतं? तो श्रीनिवास की कोण तो काही सभ्य नव्हता का ? मला एकच माहीत आहे 'साप म्हणू नये धाकला आणि नवरा म्हणू नये आपला' "सुमतीने समारोप करत म्हटले.त्यावर गप्प रहाणे एवढे एकच उत्तर होते.

Post to Feedमस्त लेख
मस्त मस्त
धन्यवाद !
सह्ही...
लेखनशैली आणि मांडणी आवडली
झकास
संजय जी--
छानच...

Typing help hide