नाटाचे अभंग... भाग २७

२६. होतों तें चिंतित मानसीं । नवस फळलें नवसीं ।
 जोडी ते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१।
 धरिलें जीवें न सोडी पाय । आलें या जीवित्वाचें काय ।
 कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥धृ॥
 मज तो पडिली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली ।
 होती मृगजळें गोवी केली । दृष्टि उघडली बरवें झालें ॥३॥
 आतां हा सिद्धी पावो भाव । मध्यें चांचल्य न व्हावा जीव ।
 ऐसी तुम्हां भाकीतसे कींव । कृपाळुवा जगदानिया ॥४॥   
 कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडे कधीं ।
 येवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥५॥
 कृपा केली या संतजनीं । माझी अळंकारिली वाणी ।
 प्रीती हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥६॥
 
 साधकाच्या जीवनामध्ये परमार्थमार्ग आक्रमित असताना अंतःकरणाच्या विविध छटा तुकोबारायांनी साधकांना मार्गदर्शक ठराव्यात, यासाठी येथे प्रकट केल्या आहेत. जीवन सामान्यपणे कंठीत असताना आलेले प्रसंग, त्यातून मिळालेले अनुभव आदीविषयी सदसद्विवेक बुद्धीचा आसरा घेऊन साधकाने आपल्या चुका मोकळ्या मनाने उपास्यापुढे वा संतांपुढे व्यक्त केल्या, तर त्या स्पष्टोक्तीमुळे उपास्य, संत यांच्या ठिकाणी असलेला निद्रिस्त कारुण्यभाव जागृत होतो. पश्चात्ताप व्यक्त करणे, हे पापक्षालन ठरत असते. आपल्यातील शुद्धाशुद्धभाव व्यक्त केल्याने एक वेळ परमेश्वर साक्षीभावाने तटस्थ राहील, परंतु संतांचे कृपाळुत्व जागृत झाल्याशिवाय राहत नाही. माऊली म्हणतात, ‘अहो तान्हयाची लागे झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे...’ या न्यायाने तुकोबाराय आपले अंतरंग स्वच्छंदपणे प्रकट करतात. आपल्याला अनेक उतार-चढावानंतर, नानाविध अंतरायाने लिप्त असतानादेखील आलेली प्रचिती ही आपल्या कर्तृत्त्वाची फलनिष्पत्ती नव्हे, तर केवळ संतांच्या कृपेमुळेच ती प्राप्त झाली असल्याचे ते कृतज्ञतेने निवेदन करतात. बीज-वृक्ष न्यायाने संचिताचा प्रभाव म्हणून साधकाच्या अंतःकरणात असलेला सुप्त भाव फलित होत असत्तो, हे तुकोबाराय अधोरेखित करतात. तुकोबारायांच्या निवेदनात कुठेही स्वकर्तृत्वाचा अभिनिवेश दिसत नाही, हेही इथे लक्षात येते.
 पहिल्या चरणात तुकोबाराय ‘नवस’ आणि ‘नवसीं’ असे दोन शब्द योजतात. येथे ‘नवसी’ या शब्दाने ज्याला नवस केला जातो, ते दैवत असा अर्थ घेता येतो. तुकोबारायांचे आराध्य दैवत विठ्ठल आहे. नवस तेव्हाच केला जातो, जेव्हा मानवी प्रयत्न कुचकामी ठरतात. दुसरी गोष्ट अशी की, प्राप्त परिस्थितीतून सोडवणारी केवळ दैवी शक्तीच आहे, अन्य पर्याय नाही, असा मनाचा निर्णय झाला पाहिजे. आणखिन्, ईश्वरी शक्तीचे सहाय्यासाठी ज्या दैवताकडे धाव घ्यायची, त्या दैवतावर ठाम विश्वास हवा. हा विश्वास बर्‍याचदा दुसर्‍यांच्या अनुभूती ऐकून-पाहून निर्माण झालेला असण्याची शक्यता असते. प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्याची तीव्र तळमळ आणि दैवतावरचा ठाम विश्वास या दोहोंचा मिलाफ जेव्हा होतो, तेव्हाच मनात चिंतिलेला नवस नवसीकडून पुरा केला जातो. खरे सांगायचे तर, आपल्या मनाची सकारात्मक धारणाच यश देणारी असते. नवस हे सकारात्मक धारणा बलवान् करण्याचे एक साधन मात्र आहे. ‘नवस फळला’ असे जे आपण म्हणतो, त्यामागे सारे श्रेय दैवताला देणे, म्हणजेच ‘कर्मयोग’ अजाणतेपणे आचरणे ठरते. या पहिल्या चरणात तुकोबाराय त्यांच्या मनाला जो ध्यास लागला होता, त्याबाबत सांगतात. अतिशय क्लेष देणार्‍या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांना कोणत्याही लौकिक प्राप्तीची इच्छा नव्हती. त्यांनी ज्याचे चिंतन केले होते, त्यामागे त्यांचे सखोल विचार होते. तेच तेच जीवन जगताना या संसाराला जीव विटतो. ज्याचा कधीही वीट येणार नाही, असे जे आहे ते तुकोबारायांना हवे आहे. ‘दिसे ते नासे’... त्यांना जे हवे होते, ते शाश्वत असायला हवे. त्याचा नाशही नसावा ना विनाश. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’... मात्र अमृतत्वाची प्राप्ती त्यांना हवी होती, असे म्हणता येते. त्यांनी सखोल तात्विक विचारांती हे निश्चित केले होते की परब्रह्मस्वरूप नारायणच, जे या जगताचे आदिकारण आहे, तेच अविट आहे, त्याचाच नाश होत नाही आणि ज्याची प्राप्ती करून घेणे हीच मनुष्यजीवनाची इतिकर्तव्यता आहे, तो नारायणच जोडला जावयास हवा. म्हणून जीवाच्या आकांताने त्यांनी उपास्याला वारंवार नवस केले. इथे हे लक्षात घ्यावयास हवे की, नवस करणे या क्रियेत इच्छिताच्या प्राप्तीसाठी नवसीला काहीतरी अर्पण करण्याची प्रतिज्ञा अंतर्भूत असते. तुकोबाराय परमोच्च त्याग करावयास तयार आहेत... त्यांनी आपला जीव पणाला लावला आहे. त्यांचे नवस त्यांच्या उपास्याकडून फलित केले गेले, असे कृतज्ञतापूर्वक ते निवेदन करीत आहेत. हे जे घडले, त्याचे मुख्य कारण ते पुढील चरणात सांगतात.
 जी धारणा चित्तात दृढ झाली, त्यासाठी त्यांनी प्राणपणाने उपास्याची आराधना केल्याचे तुकोबाराय सांगतात... ‘धरिलें जीवें’. जे जीवित्व लाभले आहे, त्याची त्यांना फिकीर नव्हती. नारायणाशिवाय या जीवित्वाला काहीही अर्थ नाही, ही धारणा पक्की झाली होती. ‘नारायण’ तत्त्वरूप, अक्षर पुरुष असल्याचे शास्त्रात सांगितलेले आहे. ते आराध्य दैवताचे मूळ स्वरूप आहे. तो नारायण कसा लाभेल ( - कैं हे पाविजेती ठाय), हाच एक घोर त्यांच्या चित्ताला लागलेला होता. ही स्थिती आली असताना संचित, अर्थात् पूर्वपुण्याई कामाला आली आणि तिने ‘सोय’ लावली. इथे ‘सोय लावली’ म्हणजे उपास्याच्या ठिकाणी चित्तचतुष्टय दृढ बांधून ठेवले गेले. चित्त एकाग्र झाल्याने आराध्याच्या कृपेने ‘इच्छा तेथे मार्ग’ या न्यायाने उपयोगी मार्ग उपलब्ध होत गेले. यात संतांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संग लाभणे, हेही अंतर्भूत आहेच. यातूनच जे चिंतिले होते ते तुकोबारायांना लाभले...त्यांनी केलेले सारे नवस फळाला आले. 
 तुकोबाराय पुढील चरणात त्यांच्या गत आयुष्याबाबतची निःसंकोच कबुली देतात. प्रपंचात ते एव्ह्ढे रंगून गेले होते की, खरे सुख कश्यात आहे, हे उमगत नव्हते. त्यांना सत्यासत्याविषयी भुरळ पडली होती. भ्रमापोटी हित-अहित, कर्तव्य आणि अकर्तव्य यांचा विसर पडला होता, किंवा, नको तेच आचरले जात होते ( - चित्ताची अपसव्य चाली). असे होण्याचे कारण सांगताना तुकोबाराय स्पष्ट करतात की, भासमान असलेल्या मृगजळामागे रणरणत्या उन्हात होरपळ करून घेणार्‍या हरिणाप्रमाणे त्यांची उरफोड करून घेणे चालू होते. सत्यात नसलेले जळ तहानलेल्या मृगाला प्राणांतीदेखील मिळणे शक्य नसते, तद्वत्, प्रपंचामध्ये शाश्वत नसलेले सुख कितीही कष्ट केले, तरी लाभणे शक्य नसते. भ्रामक सुखाच्या गुंत्यात जीव अडकून राहतो. स्वप्रात मिळणार्‍या सुख-दुःखाच्या अनुभूती या जागे झाल्यावर नाहीशा होतात. किंवा, चकवा लागलेल्या मनुष्याला जोपर्यंत कुणी भेटत नाही, तोपर्यंत, चालणारा जरी जागा असला तरी, त्याचे एकाच जागी भ्रमत राहणे संपत नाही. दैववशात योग्य मार्गदर्शक लाभल्यास प्रापंचिक गुंत्यात अडकलेला मनुष्य आपली सोडवणूक करून घेऊ शकतो. असा मार्गदर्शक तुकोबारायांना लाभला. त्यांना निद्रेतून बाहेर आणणारा त्यांचा हितैशी संतांच्या रूपाने त्यांना लाभला. तुकोबारायांना यामुळे अतिशय समाधान मिळाले (- दृष्टी उघडली बरवें झालें). त्यांचा सदसद्विवेक जागृत झाला.
 सदसद्विवेक जागृत झाल्यामुळे तुकोबारायांच्या चित्तातील संभ्रम निमाले. जो सद्‍भाव जागृत झाला, त्यामुळे त्यांना अपूर्व शांतीचा लाभ झाला. आता पारमार्थिक वाटचाल करणे अवघड राहिले नाही, असा विश्वास त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला. आता हा भाव नारायणाची प्राप्ती होईपर्यंत (- सिद्धी पावो) कायम राहावा, ही त्यांची आंतरिक इच्छा आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा अंतराय येऊ नये, असे त्यांना वाटते. बुद्धीच्या चंचलतेमुळे होणारी परवड त्यांनी पूर्वी अनुभवलेली आहे. तसे आता घडू नये, यासाठी तुकोबाराय त्यांच्या उपास्याला साकडे घालतात आणि त्याच्या करूणेची याचना करतात. ते त्यांच्या उपास्याला ‘कृपाळू जगदानी’ असे संयुक्त संबोधन योजतात. (‘जगदानी’ याचा पदाचा अर्थ उदार, उद्धार करणारा’ असा आहे.) त्यांच्या संचिताने सोय लावल्याने त्यांच्या मनात सद्‍भावाची जागृती झाली आहे. हाच भाव त्यांना इच्छित प्राप्ती अर्थात् शाश्वत सुखाचा लाभ करून देणारा आहे आणि शाश्वत लाभ म्हणजेच ‘नारायणाची जोड’. हे लक्ष्य साध्य झाले की काही मागणे शिल्लकच राहणार नाही, हे त्यांना उमगलेले आहे. म्हणून ते त्यांच्या उपास्याला कळकळीने विनवितात की, जो भाव अंतःकरणात निर्माण झाला आहे, तो सदैव तसाच राहू दे... अज्ञ जीवांचा उद्धार करणारा तूच एकमात्र आहेस... तुझ्या कृपेशिवाय हे शक्य होणारे नाही.
 चित्तात झालेली भावजागृती पुरेशी नाही, असा तुकोबारायांचा विचार पुढे ते उपास्याला निवेदन करतात. मनात भक्ती रुजली आहे. ज्याचा आश्रय घेतला आहे, तो आधार अखंड राहावा, यासाठी ते जीव पणाला लावून प्रयत्न करणार आहेत. तथापि, त्यांना हेही माहित आहे की, भक्तीशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय परमेश्वर (स्वरूप) प्राप्ती नाही. चित्तातील भाव सिद्धीस जावा, परमेश्वराची ओळख व्हावी यासाठी कोरडे ज्ञान निरूपयोगी आहे. आपल्याच बुद्धीने हे ज्ञान यथार्थपणे प्राप्त होईल, असे कधीच घडत नाही. परमभक्त नामदेवांना म्हणूनच विठोबांनी स्वरूप ज्ञान लाभावे, यासाठी विसोबा खेचर यांच्याकडे पाठविले होते. सर्व सिद्धी प्राप्त असलेल्या चांगदेवांना माऊलींची भेट होण्यासाठी दीर्घ प्रतिक्षा करावी लागली होती. त्यांच्यापुढे वयाने लहान बालकाप्रमाणे असलेल्या मुक्ताबाईंकडून त्यांना खरे ज्ञान प्राप्त झाले. तुकोबारायांना हे सारे ज्ञात आहे. म्हणूनच ते म्हणतात, ‘कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडे कधीं ।’ केवळ समर्थ जाणकाराकडून परमेश्वराचे स्वरूपज्ञान प्राप्त होत असते. अप्रत्यक्षरित्या तुकोबाराय येथे ‘असा सद्‍गुरू मला लाभो’, अशी त्यांच्या उपास्याला प्रार्थना करीत आहेत. सदसद्विवेक जागृत झाला. त्यातून चित्तात सद्भाव जागृत झाला. तो भाव लक्ष्य साध्य होईपर्यंत ईशकृपेने अविचल झाला. भक्ती रुजली. तुकोबाराय पुढे स्पष्ट करतात की, स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी स्वतःची अपरिपक्व बुद्धी तोकडी पडते. याला असलेले मुख्य कारण हे की, प्रापंचिक व्यवहार सांभाळताना अनेक आघात होत राहतात. त्यामुळे बुद्धी स्थिर राहू शकत नाही. ज्ञानार्जनाच्या मार्गात आड येणारे दुसरे कारण म्हणजे संकोच. संकोचाची दोन कारणे तुकोबाराय सांगतात. ही कारणे आहेत, लज्जा आणि रिद्धी (समृद्धी). एक तर दैन्यापोटी असणारी हतबलता संकोचाला कारण होते किंवा संपन्नतेपोटी रुजलेला वृथा अभिमान संकोचाचे कारण ठरते. ज्ञानप्राप्तीत येणारे हे अडथळे बुद्धीचे सामर्थ्य निष्प्रभ करीत असतात. तुकोबारायांनी या स्थितीचा अनुभव घेतलेला आहे. असा संकोच नसावा, ही त्यांची भावना आहे.
 नारायणाची जोड साधण्यासाठी म्हणजेच स्वरूपाविषयीचे ज्ञान मिळविण्यासाठी आड येणारा संकोच कसा दूर झाला, याचे स्पष्टीकरण तुकोबाराय अभंगाचा समारोप करताना निवेदन करतात. ‘समान शीले सख्यम्’ या न्यायाने त्यांना संतभेटी घडत राहिली. इथे हे लक्षात घ्यायचे की, आलेल्या अडथळ्यांनी हतोत्साह न होता साधकाने असा विश्वास मनात पक्का बांधावा की, प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे, हस्ते परहस्ते, ईश्वर तसेच संत त्याला मुक्कामापर्यंत पोहोचवितात. तुकोबारायांनी अन्यत्र संतांविषयीचा विश्वास प्रकट केला आहे की, ते ‘भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियानें जोडे सर्वसुख ॥’ तुकोबाराय असा विचार करतात की, अकारण करुणावंत असलेला भगवंत प्रत्यक्षात जरी अनुभूतीस आला नाही, तरीदेखील तो संतरूपाने येऊन साधकास कृतार्थ करीत असतो. अशी विशेष कृपा त्यांच्या अनुभूतीस आली. संतांनी त्यांच्यावर विशेष कृपा केली आणि त्यांच्या वाणीला प्रसादरूपत्व प्राप्त करून दिले (- अळंकारिली वाणी). बाह्यांगाने संतांनी एव्हढेच केलेले नसून तुकोबारायांच्या अंतःकरणात भगवंताचे गुण गाण्यासाठी प्रेमदान दिले, आवड निर्माण केली. भगवन्नाम संकीर्तन करीत असताना तुकोबारायांना अंतर्बाह्य स्वरूपात आत्यंतिक समाधान प्राप्त झाल्यामुळे तुकोबाराय संतांचे उपकार स्मरून त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित करतात. या संतांच्या कृपेनेच त्यांना स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होणार आहे. 
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)