सप्टेंबर २०१३

२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन

'मनोगत दीपावली २०१३' ह्या यंदाच्या प्रस्तावित दिवाळी अंकासाठी मनोगतींकडून लेखन मागवण्यात येत आहे.   या वर्षीचा अंक "अनुवाद विशेषांक" काढण्याचे ठरले आहे. कुठल्याही भाषेतील अनुवादित साहित्य अंकासाठी चालेल. अनुवादासाठीचे मूळ साहित्य जालावर उपलब्ध असल्यास त्याचा दुवा द्यावा. नसल्यास लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, प्रकाशक आणि वर्ष इत्यादी माहिती साहित्यासोबत द्यावी.

अंकासाठीच्या अनुवादित साहित्याचे विभाग ढोबळमानाने खालीलप्रमाणे असतील:
 1. कथा
  (कथा/गोष्ट या सदरात मोडणारे सर्व काही. )
 2. लेख
  (वैचारिक/विनोदी/सामाजिक/ललित/विज्ञान-तंत्रज्ञान विषयक लेख. )
 3. अनुभव
  (अनुभव, प्रवासवर्णने,  एखाद्या घटनेचे वर्णन इ. लेखनप्रकार)
 4. पद्य विभाग
  (यात पद्य या प्रकारात मोडणारे सर्व काही, उदा.   कविता, गझला, विडंबने, चारोळ्या, वात्रटिका, मुक्तके, मुक्तछंद इ. इ.)

सर्व साहित्य अनुवादित असावे याची नोंद घ्यावी.

लेखकांना विनंती व सूचना:

 • लेखन स्वलिखित (म्हणजे स्वतः अनुवाद केलेले) व अप्रकाशित असावे. (ह्या संदर्भात छापील, आंतरजालावरील, ध्वनिमुद्रित, ध्वनिचित्रमुद्रित इ. कोणत्याही प्रकारचे प्रसारण हे प्रकाशन मानले जाईल. )    
 • लेखन शक्यतो  ५ ऑक्टोबर २०१३च्या आत पाठवावे. त्यानंतर पाठवलेले लेखन अंकसमितीला उपलब्ध वेळेनुसार स्वीकारले वा नाकारले जाईल.
 • लेखन नॉन-प्रोप्रायटरी युनिकोड फॉन्ट वापरून टेक्स्ट फायलीच्या स्वरूपात (.txt) ह्या  विपत्त्यावर जोडणी म्हणून पाठवावे.  लेखनात चित्रे घालायची असल्यास तीही विरोपास जोडून पाठवावी. टेक्स्ट फाइल बनवण्यात अडचणी आल्यास लिखाण.doc फाइल किंवा गूगल विरोपात थेट मराठीत लिहून पाठवले तरी चालेल.   तुमच्या संगणकावर नॉन-प्रोप्रायटरी युनिकोड फॉन्ट नसल्यास मनोगतचा टेक्स्ट एडिटर (अथवा बरहा किंवा गमभन) वापरून त्याच्या टेक्स्ट बॉक्समध्ये लेखन करावे व ते नोटपॅडमध्ये अथवा थेट विरोपात कॉपी-पेस्ट करावे. कृपया प्रोप्रायटरी फॉन्ट वापरून लेखन पाठवू नये, तसेच .txt वा.doc  व्यतिरिक्त  इतर कोणत्याही  (उदाहरणार्थ PDF) फॉरमॅटमधील फाइली पाठवू नयेत.
 • साहित्य विरोपाने पाठवताना 'Subject : मनोगत दिवाळी अंक: कथा/कविता/लेख (जो आपल्या लिखाणाचा लेखनप्रकार असेल तो): "[लेखाचे/कवितेचे शीर्षक]"' अशा विषयाने विरोप पाठवावा जेणेकरून लेखनाचे वर्गीकरण करणे सोपे जाईल.
 • तांत्रिक अडचणींमुळे लेखन विरोपाने पाठवणे शक्य नसले तरच ते 'दिवाळीमनोगत २०१३' ह्या मनोगत खात्यावर व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावे. व्य. नि.  ने पाठवलेल्या लेखनात संपर्कासाठी आपल्या (मनोगताव्यतिरिक्त) विरोप-पत्त्याचा ठळकपणे उल्लेख करावा.  
 • लेखन मनोगताच्या भाषाविषयक धोरणांशी सुसंगत असावे. पूर्णतया बोली भाषेत नसलेले लेखन, व संवादेतर लेखन शुद्धलेखनाच्या  नियमांनुसार असावे. लेखन पाठविण्यापूर्वी शक्यतो मनोगत शुद्धिचिकित्सकाचा वापर करून लेखन शुद्ध करून पाठवावे. परभाषिक शब्द एकूण लेखनाच्या दहा टक्क्यांहून अधिक नसावे. (परभाषिक शब्दांसाठी सुटसुटीत व रोजच्या वापरातील शब्द उपलब्ध असल्यास ते संपादन करताना बदलण्यात येतील. )
 • भावमुद्रांचा वापर शक्यतो टाळावा.  
 • या वर्षीचा अंक "अनुवाद विशेषांक" असल्याने मूळ लेखनाचे शीर्षक, मूळ लेखकाचे नाव, व मूळ लेखनाचा (ते आंतरजालावर उपलब्ध असल्यास) दुवा द्यावा. 
 • आलेल्या लेखनाची गरजेनुसार शुद्धलेखन तपासणी व दुरुस्ती, अंकातील उपलब्ध जागेनुसार मांडणीत (लेखनाच्या आशयास धक्का न लावता) माफक बदल इ. करण्यास लेखकाची संमती गृहीत धरलेली आहे.
 • महत्त्वाच्या बदलांची/पुनर्लेखनाची आवश्यकता भासल्यास लेखकाशी विरोपाद्वारे चर्चा करण्यात येईल.
 • अंक-समितीशी संपर्क साधायच्या असल्यास ह्या ह्या पत्त्यावर विरोप पाठवावा. ते शक्य नसल्यास(च) 'दिवाळीमनोगत २०१३' ह्या मनोगत खात्याला व्य.  नि. पाठवावा. प्रशासकांना अथवा अंकसमितीच्या सदस्यांना त्यांच्या नावांनी असलेल्या मनोगत खात्यांवर अथवा त्यांच्या वैयक्तिक विपत्त्यांवर दिवाळी अंकासंबंधित व्य. नि. /विरोप पाठवू नये ही विनंती.
 • लेखन अंक-समितीकडे पोहोचल्यावर त्याची पोच शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. मात्र पोच म्हणजे स्वीकृती नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी.


Post to Feedव्य. नि. नको
कवितांच्या अनुवादाबद्दल धोरण
अनुवादाबद्दल
मुलाखतीबद्दल...

Typing help hide