रंगलो-तरंगलो

रंगलो-तरंगलो

परवा म्हणजे ३० ऑगष्ट ते १ सप्टे. ला ऑफिसचे शिबिर कोलाडला होते.   यात व्यायाम व चर्चात्मक कार्यक्रम होते. सध्या सर्व प्रकारचे ताणतणावाचे प्रकार बंद असल्याने (चालणे सुद्धा) जावे का न जावे ह्या संभ्रमात होतो पण रोजच्या रहाटगाडग्या पेक्षा वेगळे म्हणून जायचे असे ठरले.   तेथे सकाळी थोडा व्यायाम करवून घेतला (जेव्हढे जमेल तेव्हडे केले) व नंतर कुंडलिका नदीमध्ये नौकावहन (रिव्हर राफ्टींग? )  करावयाचे होते.   मला पोहता येत होते पण सराव नव्हता. १९७८-८६ नंतर वेळेअभावी पोहण्यास जाणे जमले नाही.   तेथे मदतनिसाने सर्व माहिती अन नियम वगैरे सांगितले, सुरक्षाकवच अन शिरस्त्राण चढवून नदीमध्ये हवा भरलेली रबरी नाव लोटली. पुढे जाण्यासाठी मागे अन मागे जाण्यासाठी पुढे असे वल्हवायचे होते.   मला वाटले की नावेमध्ये बसावयाचे आहे पण तसे नसून नावेच्या काठावर बसून पाय खालील रबरी भागात खोचून तोल सांभाळतं वल्हवायचे.   माझी धाकधूक वाढली पण हळूहळू सर्व जमू लागले अन मजा येऊ लागली.   जसे जसे नदीच्या पात्रात पाण्याचे चढ उतार येऊ लागले तशी नाव हिंदकळू लागली अन जोराने खालीवर होऊ लागली. आम्ही चिंब भिजून गेलो.   नावेस नियंत्रित करण्यास खूपं कसब लागत होते.   पुढे हे सर्व साहसी टप्पे पार पडले अन नाव संथ पात्रात आली एकुणं १४ कि. मि. अन आम्ही पाण्यात उड्या घेतल्या अन पोहण्यास सुरुवात केली.   शेवटचा टप्पा १ कि. मि. चा होता. या आधी पुण्यात शाहू तलाव व स. प. च्या तलावाशिवाय कोठेही पोहलो नव्हतो त्यामुळे नदीमध्ये पोहण्याची हि पहिलीच वेळ.   आमच्या कंपूमध्ये सर्वात वयाने मोठा मी होतो (५७) बाकी सारी तरुण मंडळी होती पण सर्वांबरोबर उत्साहाने नाव वल्हवणे, शर्यतीत भाग घेणे हे सर्व केले. खूप मजा आली.   तसे पाहता मला सुरवातीला पुण्यात आलो तेव्हा कोठे पोहता येत होते पण भाचा व त्यांचे मित्र यांबरोबर शाहू तलावात पोहण्यास जायला सुरुवात केली अन लवकरच सर्व गोष्टी आत्मसात केल्या.   खोल पाण्यात, झुलत्या फळीवरून उड्या मारणे, सुर मारणे, पाण्याखालून पोहणे, उलटे पोहणे, तरंगत पडून राहणे, पाण्यात नाणे टाकून ते हुडकून वर आणणे या सर्व गोष्टींना नदीत पोहताना उजाळा मिळाला... असो... आठवणी.

हे असेच चालयचे दुवा क्र. १

राजेंद्र देवी