'माझा आल्बम' - प्रवीण महाजन उवाच

'माझा आल्बम' हे प्रवीण महाजन यांचे आत्मवृत्त. असली पुस्तके म्हणजे फारच उथळ आणि चमचमीत असतात. किमान तसे मानण्याचा प्रघात असतो आणि तो मी आजतोवर पाळत आलो होतो. पण हे पुस्तक समोर आले नि का कुणास ठाऊक, उचलले.
प्रमोद महाजनांची हत्या ही सात वर्षांपूर्वीची एक खळबळजनक घटना. पण त्यावेळेस तरी बहुतेक सगळ्या वृत्तपत्रांनी त्या खुनामागच्या कारणांसंबंधी वाचातप पाळले. प्रवीण महाजनांच्या एकंदर जीवनशैलीसंबंधीही फारसे काही वाचल्याचे स्मरत नाही.
प्रमोद महाजनांबद्दल जी काही माहिती २००६ पर्यंत होती त्यानुसार 'कोण होतास तू काय झालास तू' असे म्हणावेसे वाटण्यासारखे त्यांचे चरित्र होते.
आणिबाणीनंतरच्या काळातल्या प्रचारसभांतून त्यांचा तारुण्यसुलभ आवेश प्रभावी वाटत असल्याचे स्मरते. पण त्यावेळेस भाजपची शक्ती अगदीच तुटपुंजी होती. आणि १९८४ मध्ये तर 'देशहिताची चिंता करणार कोण? लोकसभेत जागा मिळाल्यात दोन! ' असे काँग्रेसकडून हिणवून घ्यायची पाळी त्या पक्षावर आली.
पण रामजन्मभूमी आंदोलनामुळे बघता बघता सायकलीची स्कूटर आणि स्कूटरचे विमान झाले. त्या काळात भाजपचा 'बहुजनसमाजातला' चेहरा म्हणून गोपीनाथ मुंडे स्थिरावू लागले होते. ते महाजनांचे मेव्हणे ही माहिती सगळ्यांपर्यंत पसरू लागली होती. संघात जातिभेद पाळण्यात येत नाहीत असे मानण्याची प्रथा आहे. पण वंजारा समाजातल्या या नेत्याला मास-बेस असला तरी संघ-बेस फारसा नव्हता हेही खरेच. आणि प्रमोद महाजनांनी तर संघाच्या धुरीणांशी काटकोनात जात आपली दौड चालू ठेवली होती.
विशेषतः १९९६ च्या निवडणुकांनंतर प्रमोद महाजनांचे नाव दुमदुमू लागले. लालकृष्ण अडवानींच्या रथयात्रेत त्यांचा उजवा हात म्हणून वावरणारे महाजन सात वर्षांतच वाजपेयींचे उजवे हात झाले होते. टीव्हीच्या स्टुडिओंमधून त्यांची छबी नित्यनेमाने झळकू लागली होती. सराव करून कमावलेले वक्तृत्व, हजरजबाबीपणा, इंग्रजी भाषेतही ठामपणे मुद्दे मांडण्याची हातोटी, उदारमतवादी असल्याची पुरेपूर बतावणी, सगळे कसे रीतसर चालू होते. एक महाराष्ट्रीय महाजन दिल्लीत झेंडा फडकवतो याबद्दल महाराष्ट्र भाजपमध्ये आनंद ते पोटदुखी या टप्प्यातले रंग उधळले जात होते.
आणि इतर सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी.
पण प्रवीण महाजन शक्य तेवढ्या स्पष्टपणे काही प्रश्न उपस्थित करतात. त्यांची उत्तरे देणे वा ना देणे हा 'महाजन कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न' आहे असे म्हणणे शक्य आहे. सोपेही आहे.
पण तसे म्हणून आपण 'सर्वामुखी मंगल बोलवावे' असा कातडीबचाऊ पवित्रा घेतो आहोत काय हा विचार करण्याचा मुद्दा आहे.
हे असे वैयक्तिक वाटणारे प्रश्न बाकी इंटरेस्टिंग असतात. आपल्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे शरद पवार दर निवडणुकीच्या वेळी का नाकारतात? ते ज्या गाडीतून हिंडतात  त्या गाडीची मालकी कुणाकडे आहे? अविनाश भोसले यांस विमानतळावर अटक आणि सुटका इतक्या सहजतेने कशी होते? डेक्कन थिएटर आणि लकी रेस्टॉरंट या एकत्रिक भूखंडाची मालकी नारायण राणेंकडे बिनबोभाट कशी जाते? अगदी शिवसेनाही तो प्रश्न विचारायला का धजत नाही? असो.
प्रवीण महाजन या पुस्तकात बरीच माहिती देतात आणि बरेच प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच मिळणार नाहीत. अनुल्लेखाने मारणे ही कला सर्वच राजकीय पक्षांनी व्यवस्थित आत्मसात केलेली आहे. आणि संघाने तर तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे यापेक्षा दुसरे काय होणार?
अर्थात प्रवीण महाजनांनीही काही प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच ठेवली आहेत. प्रवीण महाजनांचा संसारखर्च कसा चालत होता? नुसता चालत होता नव्हे, तर ठाण्यात फ्लॅट आणि नवीकोरी मारुती स्विफ्ट याचे पैसे कुणी दिले. रिव्हॉल्वरचे लायसेन्स कसे मिळाले?
या प्रश्नांची उत्तरे द्यायला आता प्रवीण महाजनही नाहीत.
या पुस्तकाबद्दल लिहावे की नाही याबद्दल विचार करण्यातच चार दिवस गेले. कारण हे पुस्तक वाचल्यावर वेळ कारणी लागला वा वाया गेला यातले काहीच जाणवले नाही. काही दुवे, काही कार्यकारणसंबंध, काही अस्वस्थ करणारे प्रश्न अशी काहीतरी भलतीच भेळ झाली. पण 'न लिहून तरी काय होणार आहे' असा स्वतःलाच बिनतोड सवाल केला नि हे टंकायला घेतले.
प्रकाशकः सारंगी महाजन
प्रथमावृत्तीः जुलै २००९
किंमतः १५० रु