विश्वाची उत्पत्ती

मी हिंदू वर्तमानपत्र वाचत होतो. भौतिक शास्त्रासाठी वर्ष २०१३चे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. फ्रांकोईस एनग्लर्ट ह्या बेलजियन शास्त्रज्ञाला मिळाल्याचे वर्तमानपत्रात आले होते. एनग्लर्ट व रॉबर्ट ब्राऊटने १९६४ मध्ये विश्वाचे मुलकण, भार आत्मसात कसे करतात त्याच्या बद्दलचा सिद्धांत मांडला होता.  ह्याच सिद्धान्तावर पुढे पीटर हिग्स ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञानाने मुलकण कसे भारदस्त होतात त्याची प्रक्रिया मांडली होती. मी हिंदू वर्तमानपत्रात आलेली त्या बद्दलची बातमी थोडक्यात येथे देत आहे -

"The universe was born with a Big Bang 13.8 billion ..... ". 

नववीत शिकत असलेल्या माझ्या मुलाला मी आलेली बातमी वाचत होतो ती, समजायला अवघड जात होती. विश्वाची उत्पत्ती कुठच्या तरी घटकेला झाली व त्यावेळी अचानक झालेल्या विस्फोटातून अती गरम वायू चोहो दिशांना वाहायला लागला. हळूहळू गरम वायूचे तापमान कमी व्हायला लागले तसे त्या थंडावलेल्या वायूचे स्वतः भोवती फिरणाऱ्या मोठ मोठाल्या गोळ्यात रूपान्तर होऊ लागले. पुढे ह्यातूनच आज दिसणाऱ्या सूर्य मालिका तयार झाल्या. हे सगळे माझ्या चिरंजीवांना समजवत असतानाच, ऐंशी उलटून गेलेली माझी आजी माझ्याकडे बघत मधूनमधून समजल्या सारखी माना हालवतं होती. हिंदू मधला लेख इंग्रजी असल्या कारणाने तो तिच्या डोक्यावरून गेला असावा असा माझा समज. आजीला समजवावे म्हणून मी त्या लेखाचा अर्थ मराठीत सांगायचा प्रयत्न करोत होतो  "पहिल्यांदा एक प्रचंड विस्फोट झाला, चहुबाजूला ऊर्जा फेकली गेली, गरम वायू सगळीकडे पसरायला लागला........................" आजी आणि मी, नकळत विश्वाच्या उत्पत्तीवर बोलायला लागलो. मराठीतून मॅट्रिक पास झालेली माझी देव देव करणारी धार्मिक आजी ह्या विषयावर चांगलीच ‘comfortable’ होती. ती मला म्हणाली..."अरे हे अगदी आपल्या ऋग्वेदातल्या नासदीय सूक्तात (ऋग्वेद – १० वे मंडळ, सूक्त १२९ वे) विश्वाची उत्पत्ती कशी झाली त्याचा सिद्धांत मांडला आहे तसेच काहीसे आहे..." आजी पुढे सांगू लागली.......
"सुरवातीला काहीच नव्हते, का ऊर्जेच्या रूपात सगळे होते? कारण शून्यातून उत्पत्ती कशी होणार? ऊर्जा नुसतीच श्वासा शिवाय श्वासोच्छ्स्वास करत होती. ही सूक्ष्म ऊर्जा, सगळीकडे भरून होती, तिला एकदम प्रगट होण्याची इच्छा झाली, ह्यातूनच स्थूलत्वाचा जन्म झाला व सर्व दूर वेगळेपणाचा आभास तयार झाला, ह्या स्थूलत्वामुळे निर्माण झालेल्या वेगळेपणातून सृष्टीची निर्मिती झाली..........."

भौतिक शास्त्र न शिकलेल्या धार्मिक आजीकडून हा सिद्धांत ऐकायला मिळणे म्हणजे एक आगळा अनुभव होता. माझी आजी म्हणत होती, तिनी विश्वाच्या उत्पत्ती बद्दल भागवतात वाचले होते, पुराणात वर्णन केले आहे असे कीर्तनकारांच्या तोंडून ऐकलेले आहे, गीतेत त्या बद्दलचे श्लोक आहेत असे प्रवचनातून नित्य ऐकले होते.

हिंदूत दिलेल्या विश्वाच्या उत्पत्तीच्या बातमीच्या शेवटच्या चार ओळी तर आजीला खूपच आवडल्या व भावल्या. पुराणातून अशाच गोष्टी ती ऐकत आलेली होती "स्थूलत्व येण्यासाठी, अमक्या अमक्या गोष्टींची जरूर असते, त्यातल्या तीन गोष्टी, इंद्राने गिळल्या. एकट्या राहिलेल्या सूक्ष्म अणुरेणुकणांनी ऊर्जेशी संग साधला व त्यातून स्थूलत्व निर्माण झाले................."  सामान्य लोकांना समजण्यासाठी कीर्तनकार असेच सोप्या भाषेत सांगतात, असे आजीचे म्हणणे होते. तीच सोपी भाषा पुढे पुराणात रूढ झाली व तपशील मागे राहिला.

काही प्रश्न - बिगबॅन्गच्या आधी काय होते? जर काहीच नव्हते तर उत्पत्तीसाठी लागणारे साहित्य कोठून आले? ऊर्जा कशातून झिरपली? बिगबॅन्ग घडवण्याची घटका कोणी ठरवली व बिगबॅन्ग घडवून आणणारी कळ कोणी दाबली?