स्मशानयात्रा (कविता)

स्मशानयात्रा (कविता)
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८=२४ मात्रा
*********************************************

हंबरडा फोडला मुलीने.....आई.....आई!
डोळे मिटुनी कायमची निजलेली आई!!
तिला वाटले उठेल आई, रडले म्हणजे!
गेलेला का फिरतो मागे, रडले म्हणजे!
आई, बघ ना भले मला रागाव कितीही....
मनाप्रमाणे तुझ्याच मी वागेन पुढेही
सकाळीच तर तूच मला जागवले आई....
 तूच कशी निजलीस अवेळी आता आई?
कुठे चूक झाली माझी मज सांग तरी तू....
नको अबोला धरू, बोल मज काहीही तू!
घरभर आई, फिरायची तू सगळ्यांसाठी!
ऊठ अता ना, अन् ओ दे तू माझ्यासाठी!!
रड रड रडली मुलगी ती त्या आईसाठी.........
जी न अता उठणार कधीही कोणासाठी!
रडता रडता मुलगी सुद्धा निपचित झाली.....
आईच्या मागे मुलगीही निघून गेली!
आता घर ते स्मशान झाले दोन शवांचे!
आईचे शव अन् शेजारी तिच्या मुलीचे!!
सगे सोयरे जमले अन् कल्लोळ माजला!
काय नेमके झाले ते ना कळे कुणाला!!
पहा निघाली स्मशानयात्रा दोन जिवांची!
अन् सरली ती कथा माय अन् त्या लेकीची!!

-------प्रा.सतीश देवपूरकर             
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१