भाषांतरकाराचे कार्य

मूळ जर्मन लेखक: वॉल्टर बेन्जॅमिन (१९२३)
इंग्रजी भाषांतर - "द ट्रान्स्लेटर्स टास्क": स्टीवेन रॅन्डल (१९९७)

(हे मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतरावरून केले आहे.)

    एखादी कलाकृती अथवा कलाप्रकार समजून घेताना तिच्या भोक्त्याला विचारात घेण्याचा काही उपयोग नसतो. कलेचा विशिष्ट गटांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी संबंध जोडण्याचा प्रयत्न दिशाभूल करणारा आहेच, पण कलेच्या उपपत्तीसंबंधी चर्चेत "आदर्श" भोक्ता ही संकल्पनाच खोटी आहे, कारण अशा चर्चा माणसांचे अस्तित्व व सार इतकेच गृहीत धरू शकतात. प्रत्यक्ष कलाही मानवाचे शारीरिक व आत्मिक सार गृहीत धरते, पण कोणतीही कलाकृती त्याचे अवधान गृहीत धरत नाही. कोणतीही कविता वाचकासाठी नसते, कोणतेही चित्र पाहणार्‍यासाठी नसते, कोणतेही संगीत श्रोत्यांसाठी नसते.

    ज्यांना मूळ लिखाण कळत नाही त्यांच्यासाठी भाषांतर असते का? कलेच्या प्रांतात मूळ व भाषांतर ह्यांना असणार्‍या प्रतिष्ठेतील तफावत समजण्यासाठी हे पुरेसे वाटते. निदान "तीच गोष्ट" पुन्हा सांगण्यासाठी हे एकच संभाव्य कारण दिसते. मग, कविता काय "सांगते"? काय व्यक्त करते? ज्याला ती समजते त्याला फारसे काही सांगत नाही. तिच्यासाठी संदेश देणे किंवा विधान करणे आवश्यक नाही. तथापि, कशाचे तरी प्रसारण करू पाहणारे भाषांतर फक्त संदेशाचेच प्रसारण करते — अर्थात, बिनमहत्त्वाच्या गोष्टीचे. अन्‌ हेच वाईट भाषांतरांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पण कवितेत संदेशाव्यतिरिक्त काय असते? आवश्यक असे काहीतरी असते हे वाईट भाषांतरकारही मान्य करतात. काहीतरी दुर्बोध, गुप्त, "काव्यात्मक" असे सर्वसाधारणपणे मानले जाते, नाही का? ज्याचे भाषांतर भाषांतरकार स्वत: कविता लिहीत असेल तरच करू शकतो? ह्यातून वाईट भाषांतराचे आणखी एक लक्षण कळते. ते म्हणजे अनावश्यक आशयाचे यथातथ्य नसलेले प्रसारण. जोवर भाषांतर वाचकाची सेवा करण्याचा दावा करत असेल तोवर आपण ह्याच्यापलीकडे जाऊ शकत नाही. जर ते वाचकासाठी आहे तर मूळसुद्धा वाचकासाठीच असायला हवे. आणि जर मूळ लिखाण वाचकासाठी लिहिले नसेल तर हा संबंध आपल्याला भाषांतर कसे समजवू शकेल?

    भाषांतर एक पद्धत आहे. तशी ती समजण्यासाठी आपल्याला परत मूळ लिखाणाकडे जावे लागते, कारण त्यातूनच मूळ लिखाणाची भाषांतरक्षमता ठरते. लिखाणाच्या भाषांतरक्षमतेच्या प्रश्नाला दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा असू शकतो : त्यास त्याच्या समस्त वाचकांमध्ये कोणी पर्याप्त भाषांतरकार सापडेल का? दुसरा, अधिक समर्पक : ते मुळात आपले भाषांतर करू देते का, आणि म्हणून — ह्या पद्धतीच्या अर्थानुसार — आपल्या भाषांतराची मागणी करते का. तत्त्वत:, पहिल्या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे, दुसर्‍याचे अविवाद्य. वर वर विचार करून दुसर्‍या प्रश्नाचा स्वतंत्र अर्थ नाकारला तरच दोघांचा अर्थ एकच ठरवता येतो. ह्याच्या विरोधात, हेही म्हटले पाहिजे की काही संबंधात्मक संकल्पना जर सुरुवातीपासूनच केवळ मनुष्यांशी जोडल्या नसतील तरच त्यांना त्यांचा योग्य, किंबहुना, सर्वोत्तम अर्थ प्राप्त होतो. अशा प्रकारे, सारी माणसे त्याला विसरून गेली असली तरी आपण एखाद्या अविस्मरणीय आयुष्याबद्दल किंवा क्षणाबद्दल बोलू शकतो. अशा आयुष्यांचे वा क्षणांचे सार त्यांना अविस्मरणीय करत असेल तर हे विधान खोटे ठरत नाही. ती (अविस्मरणीयता) एक मागणी असते जिला माणसांनी प्रतिसाद दिलेला नसतो. त्याच वेळी ते विधान नि:संशय अशा ठिकाणाकडे निर्देश करते जिथे ह्या मागणीला प्रतिसाद मिळेल, अर्थात, देवाच्या मनातील एका विचाराकडे निर्देश करते. तदनुसार भाषिक रचनांचे माणसांकरवी भाषांतर होऊ शकत नसले तरी त्यांची भाषांतरक्षमता विचारात घ्यावी लागेल. आणि भाषांतराचे काटेकोर निकष लावले तर त्या रचना खरोखर काही प्रमाणात अभाषांतरक्षम असायला नकोत का? असे असेल तर आपण हे विचारले पाहिजे की काही विशिष्ट भाषिक रचनांच्या भाषांतराची गरज आहे का. भाषांतर जर पद्धत असेल तर भाषांतरक्षमता काही रचनांसाठी आवश्यक आहे हे विधान इथे प्रस्तुत आहे.

    काही रचनांचे भाषांतर आवश्यक आहे. ह्याचा अर्थ भाषांतर त्या रचनांसाठी आवश्यक आहे असे नाही तर मूळ लिखाणातील एक विशिष्ट अंगभूत अर्थ त्यांच्या भाषांतरक्षमतेत स्वत:स व्यक्त करतो. हे स्पष्ट आहे की भाषांतर कितीही चांगले असले तरी मूळ लिखाणासाठी त्याचे काही महत्त्व नसते. तरीही, मूळ लिखाणाच्या भाषांतरक्षमतेमुळे भाषांतराचा मूळ लिखाणाशी अत्यंत जवळचा संबंध असतो. हा संबंध मूळ लिखाणासाठी महत्त्वाचा नसल्यामुळेच जास्त घनिष्ठ असतो. ह्याला नैसर्गिक संबंध, किंवा अधिक काटेकोरपणे प्राणभूत संबंध म्हणता येईल. जसा जीवनाविषयीच्या शब्दप्रयोगांचा जिवंत प्राणिमात्रांशी घनिष्ठ संबंध असूनही प्राणिमात्रांना त्याचे काही महत्त्व नसते, तसे भाषांतर मूळ लिखाणामुळे घडून येते. त्याच्या आयुष्यातून नाही, तर "मरणोत्तर आयुष्यातून" किंवा "निभावातून" [Überleben]. तरीदेखील, भाषांतर मूळ लिखाणानंतरचे असते. ज्या महत्त्वाच्या लिखाणांना त्यांच्या काळात योग्य भाषांतरकार मिळत नाहीत, त्यांचे नंतरच्या काळातील भाषांतर हेच सूचित करते की मूळ लिखाणाला अमरत्व प्राप्त झाले आहे [Fortleben]. कलाकृतींचे आयुष्य व अमरत्व ह्या कल्पनेकडे अलाक्षणिक वस्तुनिष्ठपणे पाहिले पाहिजे. चैतन्य फक्त जैव मूर्ततेत नसते ही शंका पूर्वग्रहदूषित विचारांच्या काळातही होती. परंतु फेकनरने प्रयत्न केला त्याप्रमाणे तिचा अमल आत्म्याच्या क्षीण कृपाछत्राखाली विस्तारण्याचा प्रश्नच नाही. तसेच, संवेदनशीलतेसारख्या प्राणिजीवनातील कमी निर्णायक अंगांवरूनही चैतन्याची व्याख्या करण्याचासुद्धा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना, जेव्हा जीवनाचा, चैतन्याचा संबंध इतिहासाच्या नेपथ्याशी न जोडता, इतिहास असलेल्या कशाशीही जोडला जातो, तेव्हाच ह्या संकल्पनेची उपयुक्तता दिसून येते. कारण सजीवांच्या कक्षांच्या सीमांची निश्चिती अंतिमत: इतिहासाच्या आधारावर करायला हवी, निसर्गाच्या नव्हे. तिथे संवेदनशीलता, आत्मा ह्यासारख्या अस्थिर संकल्पनांना स्थान नाही. ह्यातून, सर्व नैसर्गिक जीवनाला इतिहासाच्या अधिक व्यापक जीवनाधारावर जाणून घेणे हे तत्त्वज्ञाचे कार्य उद्भवते. आणि, लिखाणांचे अखंड जीवन प्राणिमात्रांच्या जीवनापेक्षा ओळखायला फारच सोपे नाही का? महान कलाकृतींचा इतिहास त्यांचे उगम, कलाकारांच्या युगात त्यांची घडण, आणि नंतरच्या पिढ्यांमधील त्यांचे अनंत अखंड जीवन जाणतो. ह्या अनंत जीवनालाच कीर्ती म्हणतात. जेव्हा एखादे लिखाण आपल्या अखंड जीवनात कीर्तीच्या युगापर्यंत येऊन ठेपते तेव्हा त्याची संदेशवहनापलीकडे जाणारी भाषांतरे निर्माण होतात. त्यामुळे, वाईट भाषांतरकार दावा करतात त्याप्रमाणे, ही भाषांतरे मूळ लिखाणाची कीर्ती वाढवत नाहीत, तर त्यांचे अस्तित्व मूळ लिखाणावर अवलंबून असते. भाषांतरात मूळ लिखाणाच्या जीवनाचा सतत नितनूतन, अद्ययावत आणि सर्वसमावेषक उलगडा होतो.

    एका खास, उच्च जैवप्रकाराचे उलगडणे असल्यामुळे हे उलगडणे एका खास, उच्च प्रयोजनाने ठरते. आयुष्य आणि प्रयोजन ह्यातील संबंध सुगम भासत असला तरी जाणिवेच्या कक्षेतून जवळ जवळ निसटतो. जेव्हा आयुष्याच्या सार्‍या हेतुंचा कल ज्या हेतूकडे असतो त्या हेतुचा शोध त्याच्याच कक्षेत न घेता उच्च पातळीवर घेतला जातो  तेव्हा हा संबंध स्वत:ला उघड करतो. आयुष्यातील सार्‍या हेतुपूर्ण घटना, तसेच प्रत्यक्ष आयुष्याची सहेतुकता, अंतिमत: आयुष्यासाठी अर्थपूर्ण नाहीत तर त्याच्या साराच्या अभिव्यक्तीसाठी, त्याच्या महत्त्वपूर्णतेच्या प्रतिरूपणासाठी अर्थपूर्ण आहेत. अशा प्रकारे, भाषांमधील अत्यंत घनिष्ठ संबंध अभिव्यक्त करणे हे शेवटी भाषांतराचे उद्दिष्ट आहे. भाषांतर हा छुपा संबंध प्रकट करू शकत नाही किंवा त्याची उत्पत्ती करू शकत नाही. असे असले तरी भाषांतर जेथवर ह्या संबंधाला सखोलपणे समजून घेते तेथवर त्याचे प्रतिरूपण करू शकते. प्रत्यक्षात, एखाद्या वस्तूचे त्याच्याच अपूर्ण रूपाने किंवा त्यातून बनलेल्या बीजाने प्रतिरूपण हे अभाषिक जीवनाच्या क्षेत्रात क्वचितच आढळणारे अतिशय खास प्रकारचे प्रतिरूपण आहे. अभाषिक जीवनाकडे उपमा-रुपकांच्या व चिन्हांच्या रूपात गहन नसलेले, अर्थात, अपेक्षामूलक संदर्भप्रकार आहेत. असे असले तरी भाषांमधील हा कल्पित, अंतस्थ नातेसंबंध खास केंद्राभिसरणाचा संबंध आहे. तो मुख्यत: ह्या गोष्टीत आहे की भाषा परस्परांना परक्या नसून, सकृद्दर्शनी, व ऐतिहासिक संबंधांहून स्वतंत्रपणे, काय सांगायचे आहे ह्यातून एकमेकांशी संबंधित आहेत.

    खुलाशाच्या ह्या प्रयत्नामुळे चर्चा निष्फळ वळसे घेऊन भाषांतराच्या पारंपरिक उपपत्तीपर्यंत येऊन पोहोचली असल्यासारखे वाटते. भाषांमधील संबंध स्वत:स भाषांतरातूनच दर्शवणार असेल तर मूळ लिखाणाचा आशय व आकृतीबंध शक्य तितक्या अचूकपणे व्यक्त केल्याशिवाय कसा दर्शवणार? अर्थात, पारंपरिक उपपत्ती अचूकतेच्या ह्या संकल्पनेची व्याख्या करू शकत नाही, आणि त्यामुळे भाषांतरासाठी काय आवश्यक आहे ते सांगू शकत नाही. पण खरे म्हणजे, भाषांमधील संबंध दोन लिखाणांमधील वरवरच्या व व्याख्या न करता येण्याजोग्या सादृश्यतेहून खूप सखोल व असंदिग्ध असल्याचे भाषांतरांमध्ये दिसून येते. मूळ लिखाण व भाषांतरातील खरा संबंध समजण्यासाठी, चिकित्सक ज्ञानमीमांसेने परावर्तन उपपत्तीची अशक्यता सिद्ध करण्यासाठी जसा विचार केला तसा विचार आपल्याला करावा लागेल. जसे चिकित्सक ज्ञानमीमांसेत हे सिद्ध करता येते की वस्तुनिष्ठ ज्ञान जर वास्तवाचे प्रतिबिंब असेल तर ते अस्तित्वात असू शकत नाही, किंबहुना अशा ज्ञानाचा दावाही करता येत नाही, त्याचप्रमाणे इथे असे दाखवून देता येईल की भाषांतर जर आपल्या सत्त्वानुसार मूळ लिखाणासादृश असण्याचा प्रयत्न करत असेल तर भाषांतर अशक्य आहे. कारण मूळ लिखाण आपल्या अखंड जीवनात (ते जिवंत वस्तू नसते तर, व त्याचे परिवर्तन व नूतनीकरण होत नसते, तर हा शब्दप्रयोग वापरला नसता) बदलत असते. प्रस्थापित शब्दांचेही अनुपक्वन होते. लेखकाच्या काळात प्रचलित असलेली त्याची काव्यात्मक भाषा नंतर थकलेली वाटू शकते, आणि त्याच्या लिखाणातून पुन्हा अंतर्शायी प्रवृत्ती उपजू शकतात. जे एके काळी ताजे वाटायचे ते शिळे जाणवू लागते, आणि जी भाषा कधी वाक्प्रचारयुक्त वाटायची ती नंतर जुनाट वाटू लागते. अशा बदलांमधील, तसेच सतत बदलणार्‍या अर्थामधील आवश्यक त्याचा शोध भाषेच्या व भाषेतील लिखाणाच्या अंतस्थ जीवनात न घेता नंतरच्या पिढ्यांच्या आत्मनिष्ठतेत घेणे — हे अगदी ढोबळ मानसशास्त्र प्राथम्यवाद आहे हे कबुल करून — म्हणजे एखाद्या गोष्टीच्या क्षेत्राची व त्याच्या अन्वयार्थाची गल्लत घालणे; किंवा अधिक जोर देऊन सांगायचे, तर वैचारिक नपुंसकत्वातून एक अतिशय शक्तिशाली व फलदायी ऐतिहासिक प्रक्रिया नाकारणे. आपण जरी लेखकाच्या पेनाच्या शेवटच्या फटकार्‍याला coup de grâce (दुवा) मानले तरी ते भाषांतराच्या ह्या मृत उपपत्तीला वाचवू शकत नाही. श्रेष्ठ साहित्यिक कलाकृतींचा सूर आणि अर्थ जसे शेकडो वर्षांनी संपूर्णपणे बदलतात त्याप्रमाणे भाषांतरकाराची मातृभाषाही बदलते. काव्यमय शब्द जरी आपल्या भाषेत टिकून राहत असले तरी सर्वोत्कृष्ट भाषांतराच्याही नशिबात त्याच्या भाषेच्या वृद्धीत गुंतणे व तिच्या पुनरुज्जीवनामुळे मरण पावणे लिहिले असते. भाषांतर दोन मृत भाषांमधील वांझोटी समानता नसून, परक्या शब्दाचे अनुपक्वन, आणि स्वत:च्या प्रसववेदना नोंदण्याची पद्धत आहे.

    भाषांतील नातेसंबंध जर भाषांतरातून अभिव्यक्त होत असलेच तर ते मूळ लिखाण व त्याच्या भाषांतरातील धूसर सादृश्यतेतून होत नाहीत, कारण हे स्पष्ट आहे की नातेसंबंधांसाठी साम्य आवश्यक नसते. ह्या संदर्भात नातेसंबंधांची संकल्पना तिच्या मर्यादित वापराशी सुसंगत आहे, कारण दोन्ही बाबतीत नातेसंबंधाची पर्याप्त व्याख्या उगमाच्या समानतेने करता येत नाही. ऐतिहासिक नात्याव्यतिरिक्त दोन भाषांतील नातेसंबंध कोठे शोधता येतील? शब्दांच्या साम्यात नाही तसेच साहित्यिक लिखाणांच्या साम्यातही नाही. भाषांचे सारे अधीतिहासिक नातेसंबंध ह्यात आहेत की सर्व भाषांचा उद्देश एकच आहे, पण कोणतीही भाषा तो उद्देश एकटीने गाठू शकणार नाही. तो त्यांच्या अन्योन्यपूरक उद्देशांच्या साकल्यानेच गाठता येईल. तो उद्देश आहे शुद्ध भाषा. वेगवेगळ्या भाषांतील विशिष्ट घटक जरी परस्पर अपवर्जक असले तरी उद्दिष्टांमध्ये ह्या भाषा एकमेकींना पूरक आहेत. भाषिक तत्त्वज्ञानाच्या ह्या अत्यंत मूलभूत नियमाला नेमकेपाणाने समजून घेण्यासाठी उद्देश आणि उद्देशाच्या पद्धतीत फरक करणे गरजेचे आहे. "Brot" व "pain"मध्ये उद्दिष्ट एकच आहे पण तर्‍हा वेगळी आहे. पद्धतीतील फरकामुळे हे  दोन शब्द जर्मन व फ्रेन्च माणसांना वेगळे जाणवतात, त्यांची अदलाबदल करता येत नाही, आणि शेवटी ते शब्द एकमेकांना अपवर्जित करतात. असे असले तरी, उद्देशाचा विचार केल्यास, निरपेक्षपणे ते एकच गोष्ट सूचित करतात. अशा रीतीने, ह्या दोन शब्दांच्या उद्देशाच्या तर्‍हा परस्परविरोधी असल्या तरी ज्या भाषांतून ते उद्भवतात त्यांच्यात ते एकमेकांना पूरक आहेत. खरे तर त्यांच्यात उद्देश व उद्देशाच्या तर्‍हा ह्यातील संबंध पूरक झाला आहे. प्रत्येक अपरिपूरित भाषेत उद्देश सापेक्ष स्वतंत्रपणे, उदाहरणार्थ सुट्या शब्दांत किंवा वाक्यांत, कधीच सापडत नाही. उद्देशांच्या ह्या सार्‍या तर्‍हांच्या ताळमेळातून शुद्ध भाषा होऊन वर येईपर्यंत तो सतत बदलत असतो. तोवर तो विविध भाषांत दडलेला असतो. पण भाषा त्यांच्या अंतापर्यंत अशाच वाढत असतील, तर लिखाणाच्या अनंत आयुष्याने आणि भाषांच्या अनंत पुनरुज्जीवनाने भाषांतर, भाषांच्या पवित्र वाढीची परीक्षा घेण्यासाठी, त्यांच्यात जे दडलेले आहे ते प्रकट होण्यापासून किती दूर आहे ते निश्चित करण्यासाठी, व हे अंतर कळल्यास ते किती जवळ येईल ते ठरवण्यासाठी, प्रज्वलित होते.

    अर्थात, हे म्हणणे म्हणजे भाषांतर भाषांच्या एकमेकींपासूनच्या परकेपणाशी जुळवून घेण्याची प्राथमिक पद्धत आहे हे मान्य करणे. ह्या परकेपणाचा कालिक व प्राथमिक नव्हे, तर तात्कालिक व अंतिम शेवट करणे निदान थेटपणे मानवी क्षमतेच्या पलीकडे आहे. अप्रत्यक्षपणे मात्र, धर्मांची वाढ भाषांमधील बीजाला पिकवून एका उच्च भाषेत त्याचे रूपांतर करते. अशा प्रकारे, भाषांतर जरी कलेप्रमाणे, आपली उत्पादने टिकून राहतील, असा दावा करू शकत नसले तरी अंतिम व निर्णायक भाषिक प्रगतीचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न करणे सोडत नाही. भाषांतरात मूळ लिखाण अधिक उच्च व अधिक शुद्ध पातळी गाठते. पण ते कायम ह्या पातळीवर राहू शकत नाही कारण ते तिथे पूर्णांशाने पोहोचलेले नसते. तथापि, भाषांचा जिथे मेळ बसतो व त्यांना पूर्तता लाभते त्या पूर्वनिर्धारित, दुर्गम क्षेत्राकडे ते किमान आश्चर्यजनक मर्मज्ञतेने अंगुलिनिर्देश तरी करते. मूळ लिखाण सर्व बाबतीत ते क्षेत्र गाठू शकत नाही, पण त्याच्यात काहीतरी असते जे भाषांतरात संदेशापेक्षा काहीतरी अधिक असते. हा अत्यावश्यक गाभा म्हणजे भाषांतरातून ज्याचे पुनर्भाषांतर होऊ शकत नाही ते. आपण भाषांतरातून हवा तितका संक्रमणशील आशय काढू शकतो, व तेवढ्याचे भाषांतर करता येते; परंतु खर्‍या भाषांतरकाराचे प्रयत्न ज्या घटकाच्या दिशेने असतात तो हाती लागत नाही. मूळ लिखाणाच्या साहित्यिक भाषेप्रमाणेच तो अभाषांतरणीय असतो, कारण मूळ भाषा व आशय ह्यांतील संबंध भाषांतरातील संबंधापासून सर्वस्वी भिन्न आहे. मूळ लिखाणात आशय व भाषा ह्यांच्यात एक प्रकारची एकात्मता असते, जशी फळात व त्याच्या सालीत असते. भाषांतर मात्र आपल्या आशयाला एखाद्या राजेशाही प्रावरणासारखे वेढते, कारण भाषांतर स्वत:हून उच्च भाषेचा निर्देश करते, व म्हणून आशयाच्या बाबत अनुचित, हिंसक, व परके राहते. त्यामुळे भाषांतराचे आणखी भाषांतर करण्यात बाधा येते, तसेच ते अनावश्यकही होते. ह्याचे कारण असे की एखाद्या लिखाणाचे भाषेच्या इतिहासातील एका विशिष्ट टप्प्यावरील भाषांतर, त्याच्या आशयाच्या विशिष्ट अंगाच्या दृष्टिने सर्व भाषांत भाषांतराचे प्रतिनिधीत्व करते. एक प्रकारे भाषांतर मूळ लिखाणाचे आणखी उच्च भाषिक क्षेत्रात प्रतिरोपण करते कारण आणखी भाषांतर केल्याशिवाय त्याला तिथून विस्थापित करता येणे शक्य नाही. हा विरोधाभास आहे. इथे "विरोधाभास" हा शब्द आपल्याला स्वच्छंदतावादी विचारसरणींची उगाच नाही आठवण करून देत. कलाकृतींच्या आयुष्याचे मर्म इतर कोणाहूनही अधिक स्वच्छंदतावाद्यांनी जाणले. भाषांतर ह्या गोष्टीचा सर्वोच्च पुरावा आहे. अर्थात, स्वच्छंदतावाद्यांनी भाषांतराचे महत्त्व फारसे ओळखले नाही. त्यांनी सारे लक्ष आलोचनेवर केंद्रित केले होते. आलोचना ही देखील कलाकृतीच्या अखंड जीवनाचा अस्सल परंतु मर्यादित घटक आहे. भाषांतर त्यांच्या सिद्धांताचा केंद्रबिंदू नसले तरी भाषांतराचे जे महान काम त्यांनी करून ठेवले आहे त्यातच ह्या प्रकाराच्या सत्त्वाची व प्रतिष्ठेची जाण आहे. सर्व काही हेच सुचवते की ही जाणीव कवीमध्ये सर्वाधिक असायला हवी असे नाही. किंबहुना कवीमध्ये एक कवी म्हणून ह्या जाणिवेची भूमिका सर्वात छोटी असेल. सर्वसामान्यपणे असे समजले जाते की महत्त्वाचे भाषांतरकार कवी आहेत, आणि किरकोळ कवी सुमार भाषांतरकार असतात. पण इतिहास असे म्हणत नाही. ल्यूथर, वॉस व श्लेगेलसारखे अनेक उत्कृष्ट कवी, कवी असण्यापेक्षा भाषांतरकार म्हणून अधिक महत्त्वाचे आहेत. हॉल्डरलिन आणि जॉर्जसारख्या इतर काहींचे समग्र लिखाण, व विशेषत: त्यांची भाषांतरे, पाहिल्यास त्यांना केवळ कवी म्हणता येणार नाही. जसा भाषांतर एक विशिष्ट प्रकार आहे, तसेच भाषांतरकाराचे कार्य कवीच्या कार्याहून वेगळे व सुस्पष्टपणे विभेदित कल्पिता येते.

    भाषांतरकाराचे कार्य हे: ज्या भाषेत भाषांतर करावयाचे आहे तिच्या प्रती उद्देश शोधून त्या आधारावर तीत मूळ लिखाणाचा प्रतिध्वनी जागा करणे. इथे आपल्याला भाषांतर व काव्य ह्यात फरक दर्शवणारे भाषांतराचे वैशिष्ट्य दिसते. काव्याचा उद्देश साकल्याने भाषेच्या अभिमुख नसून, फक्त आणि तत्काळ आशयाच्या काही संरचनांच्या अभिमुख असतो. परंतु, साहित्यिक लिखाणांप्रमाणे भाषांतर काही उच्च भाषेच्या जंगलात नसून, त्याच्या बाहेर, त्यास संमुख आहे. त्या जंगलात न शिरता, जिथे स्वत:च्या भाषेत मूळ लिखाणाचे निनाद ऐकू येतील तिथे त्याला साद घालते. एका कलाकृतीपासून सुरू करून भाषांतराच्या हेतुची दिशा आहे सकल भाषा. हे काव्याच्या हेतुहून वेगळे तर आहेच, पण स्वतंत्रपणेही वेगळे आहे: कवीचा हेतू उत्स्फूर्त, प्राथमिक व ठोस असतो, पण भाषांतरकाराचा हेतू साधित, अंतिम, व आदर्श असतो, कारण भाषांच्या अनेकतेचे एका खर्‍या भाषेत एकात्मीकरण करण्याचे त्याद्वारे कार्य होत असते. ह्या एकात्मीकरणात पृथक विधाने, काव्याच्या संरचना, व निर्वाळे ह्यांचे कधीही एकमत होत नाही (कारण ते भाषांतरावर अवलंबून असतात). एकमत होते ते भाषांचे, ज्यांच्या उद्देशांचा मेळ बसतो व एकमेकांना पूरक ठरतात. तरीसुद्धा, सर्व विचार ज्याचा शोध घेतात अशी अंतिम शांत, मूक गुह्ये ज्यात साठवली आहेत अशी सत्याची एक भाषा जर असेल तर ती आहे "यथार्थ भाषा". ह्या यथार्थ भाषेच्या अपेक्षेत व वर्णनातच तत्त्वज्ञानाच्या एकमात्र परिपूर्णतेची आशा आहे. ही भाषा भाषांतरांत सखोल दडलेली असते. तत्त्वज्ञानाची आणि भाषांतराची कोणीही स्फूर्तिदेवता नाही. पण भावूक कलावंत मंडळी समजतात तसे तत्त्वज्ञ व भाषांतरकार उदरभरणैकवादी नाहीत. ह्यास कारण एक तत्त्वज्ञानविषयक प्रतिभा असते जिचे गुणवैशिष्ट्य म्हणजे भाषांतरात घोषित भाषेची अभिलाषा. "Les langues imparfaites en cela que plusieurs, manque la suprême: penser étant écrire sans accessoires, ni chuchotement mais tacite encore l'immortelle parole, la diversité, sur terre, des idiomes empêche personne de proférer les mots qui, sinon se trouveraient, par une frappe unique, elle-même matériellement la vérité." मायार्मे वरील शब्दांत जे म्हणत आहे ते काटेकोरपणे तत्त्वज्ञाला लागू केल्यास भाषांतर, ज्यात अशा भाषेचे बीज आहे, हे काव्य व सिद्धांत ह्यांच्या मधोमध असेल. भाषांतराचे कार्य सिद्धांताएवढे ठळक नसले तरी ते इतिहासावर तितकाच खोल ठसा उमटवते.

    भाषांतरकाराच्या कार्याकडे ह्या दृष्टिकोणातून पाहिल्यास त्याच्या पूर्ततेकडे जाणार्‍या वाटांवरील अंधार अधिकच गडद होतो. खरे म्हणजे यथार्थ भाषेच्या बीजास भाषांतरात पक्वता आणण्याचे हे कार्य अशक्य वाटते, कोणत्याही परिपूर्तीत अनिर्धार्य वाटते. आणि अर्थाचे पुनर्निवेदन हा जर निकष नसेल तर अशा परिपूर्ततेला पायाच उरत नाही. नकारात्मक विचार केल्यास वरील सार्‍याचा हाच अन्वयार्थ आहे. भाषांतराविषयी चर्चांमध्ये इमान व स्वातंत्र्य ह्या जुन्या व पारंपरिक संकल्पना आहेत - अर्थानुसार अनुवाद करण्याचे स्वातंत्र्य, व शब्दाशी इमान. जी उपपत्ती भाषांतरात अर्थाच्या पुनर्निवेदनाहून काहीतरी वेगळे शोधते तिच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी उपयुक्त वाटत नाहीत. खरे म्हणजे, प्रचलित पद्धतीनुसार वापरल्यास त्या एका सोडवता न येणार्‍या संघर्षात कायम अडकतात. अर्थाच्या पुनर्निवेदनात इमानाचे योगदान काय? भाषांतरात सुट्या शब्दाशी इमान राखून मूळ लिखाणातील त्याचा अर्थ पूर्णपणे जवळ जवळ कधीच अनुवादित करता येत नाही. मूळ लिखाणातील शब्दाचा हा अर्थ उद्दिष्टात पूर्णत्वाला जात नसून उद्दिष्ट त्या शब्दाशी नेमके कोणत्या पद्धतीने बद्ध आहे त्यात पूर्णत्व गाठतो. हा मुद्दा सहसा शब्दांना भावनिक लक्ष्यार्थ असतात असा मांडला जातो. खरे तर वाक्यरचनेबाबत विचार केल्यास शब्दाला प्रतिशब्द ठेवून केलेले भाषांतर अर्थाच्या पुनर्निवेदनास पूर्णपणे नाकारून सरळ अनाकलनीयतेकडे जाऊ लागते. सोफॉक्लीसच्या लिखाणाची एकोणिसाव्या शतकात हॉल्डरलिनने केलेली भाषांतरे अशा शब्दश: भाषांतराची भयंकर उदाहरणे आहेत. शेवटी, हे उघड आहे की अनुवादात घाटाशी इमान राखल्यास अर्थनिवेदन जास्त कठीण होते. त्यामुळे अर्थ कायम ठेवण्यातील रुचीतून शब्दश: भाषांतराची मागणी झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. ही मागणी काव्याची व भाषेची सेवा न करता वाईट भाषांतरकारांना बेशिस्तीचा परवाना देते. अतएव, जिचा आधार खोल दडलेला आहे अशा ह्या न्याय्य मागणीस अधिक समर्पक संबंधांच्या आधारावर समजून घेतले पाहिजे. ज्या प्रमाणे एखाद्या भांड्याचे तुकडे जोडण्यासाठी छोट्यातले छोटे तुकडेही सारखे दिसणे गरजेचे नाही, तर ते जुळले पाहिजेत, त्या प्रमाणे भाषांतराने मूळ लिखाणाच्या अर्थासदृश असण्यापेक्षा आपल्या भाषेत मूळ लिखाणाच्या उद्देशाच्या पद्धतीचे अतिशय प्रेमपूर्वक व तपशीलवार प्रतिरूप बनवावे, जेणेकरून मूळ लिखाण व भाषांतर दोन्ही एका भांड्याचे तुकडे, एका व्यापक भाषेचे अंश म्हणून ओळखता येतील. ह्याच कारणास्त्व भाषांतराने आपले अधिकतर लक्ष काहीतरी कळवण्यापासून, अर्थापासून हटवावे. भाषांतरासाठी मूळ लिखाणाची आवश्यकता इतकीच की त्याने भाषांतरकारास व त्याच्या भाषांतरास, जे सांगायचे आहे त्याचे संघटन करण्यापासून व त्याच्या ओझ्यापासून आधीच मुक्त केले केलेले असते. En arche hen ho logos, सर्वात आधी होता शब्द : हे भाषांतराच्या प्रांतातही लागू आहे. उलटपक्षी, आपल्या उद्देशपद्धतीला पुनर्निवेदन म्हणून नाही, तर सुसंवाद म्हणून, ज्यात भाषा स्वत:स अभिव्यक्त करते अशा भाषेस पूरक म्हणून, प्रतिध्वनित होण्यासाठी, भाषांतराची भाषा स्वत:स अर्थाच्या बंधनातून मोकळी करू शकते, नव्हे, तिने तसे केलेच पाहिजे. म्हणूनच, भाषांतर हे भाषांतराच्या भाषेतील मूळ लिखाण असल्यागत वाचणे, विशेषत: ज्या काळात ते भाषांतर केले गेले त्याच काळात, ही काही त्याची सर्वोच्च प्रशंसा नाही. किंबहुना, शब्दश: भाषांतरामुळे राखलेल्या इमानाचा अर्थ हा आहे की भाषेच्या परिपूर्ततेची जबरदस्त इच्छा लिखाणातून अभिव्यक्त होते. खरे भाषांतर पारदर्शी असते, मूळ लिखाणास अस्पष्ट करत नाही, स्वयंप्रकाशी नसते, ते यथार्थ भाषेला आपल्या माध्यमाने सशक्त होऊन मूळ लिखाणावर अधिक पूर्णपणे चमकू देते. विशेष म्हणजे, हे वाक्यरचनेचे शब्दश: निवेदन केल्याने शक्य होते. ह्यातून हे दिसून येते की भाषांतराचा मूळ घटक शब्द आहे, वाक्य नाही. वाक्य हे मूळ लिखाणाच्या भाषेपुढील भिंत आहे, व शब्दश: अनुवाद म्हणजे कमान तोरण.

    भाषांतरात मूळ लिखाणाशी इमान, आणि स्वातंत्र्य ह्या पूर्वापार परस्परविरोधी समजल्या गेल्या आहेत. त्यापैकी एकाचे हे खोल अर्थनिर्णयन त्या दोघांचा मेळ घालू शकत नाहीच, किंबहुना, दुसर्‍याला कोणतेही समर्थनही नाकारते. कारण अर्थाच्या पुनर्निवेदनाशिवाय स्वातंत्र्याला अर्थ काय? अन्‌ अर्थाच्या पुनर्निवेदनास आता प्रमाणकस्थापक मानले जात नाही. भाषिक रचनेचा अर्थ व तिच्या आशयाचा अर्थ एकच असतात असे गृहीत धरले तरच मजकुरापलीकडे काहीतरी अंतिम व निर्णायक उरते, जे त्या मजकुराच्या निकट असूनही त्याच्यापासून अमर्यादपणे दूर असते, त्याच्या खाली दडलेले असते किंवा स्पष्ट असते, मजकुरामुळे मोडून पडलेले तरी असते अथवा त्याहून शक्तिशाली असते. सर्व भाषांत व त्यांच्या रचनांमध्ये जे संक्रमणशील असते त्याच्या पलीकडे काहीतरी असंक्रमणशील असते, जे संदर्भानुसार कशाचे प्रतीक तरी असते किंवा भाषेच्या विकासात कशाला तरी प्रतीकात्मकता बहाल करत असते. भाषेचा विकासात यथार्थ भाषेचा गाभा प्रतिरूपित किंवा उत्पादित होत असतो. पण जीवनात जरी हा छुपा व शकलित गाभा कशाला तरी प्रतीकात्मकता बहाल करत असला तरी भाषिक रचनेत तो स्वत: प्रतीक असतो. ही अंतिम यथार्थ भाषा भाषांशी व त्यांच्यातिल परिवर्तनांशी बद्ध असली तरी भाषिक रचनांमध्ये तिच्यावर जड, परका अर्थ लादलेला असतो. त्याला अर्थापासून मुक्त करण्याची, प्रतीकाचे रूपांतर मुळात करण्याची, भाषिक विकासातील यथार्थ भाषा वेचण्याची शक्ती फक्त भाषांतरात आहे. ही यथार्थ भाषा काहीही सूचित करत नाही की व्यक्त करत नाही. यथार्थ भाषा म्हणजे निर्विकार व सर्जनशील शब्द - जो सार्‍या भाषांचा उद्देश असतो. ह्या यथार्थ भाषेत सर्व निवेदन, सर्व अर्थ, व सर्व उद्देश अशा पातळीवर पोहोचतात जिथे ते नष्ट होतात. वास्तविक त्यांच्या जोरावरच भाषांतरातील स्वातंत्र्याला नवे, उच्च औचित्य लाभते. ह्या स्वातंत्र्यास संदेशातील अर्थामुळे प्रतिष्ठा लाभत नाही; सत्याचे कामच आहे स्वातंत्र्याला अर्थापासून मोकळे करणे. खरे म्हणजे, यथार्थ भाषेच्या सेवेत आपण काय करू शकतो ते स्वातंत्र्य भाषांतराच्या भाषेत दाखवून देते. परक्या भाषेत मंत्रमुग्ध असलेल्या यथार्थ भाषेस स्वत:च्या भाषेत मोकळे करणे, लिखाणात बंदिस्त असलेल्या भाषेस पुनर्लेखनाने मुक्त करणे हे भाषांतरकाराचे कार्य आहे. ह्यासाठी तो आपल्या भाषेचे कमकुवत अडसर पार करतो : ल्युथर, वॉस, हॉल्डरलिन, जॉर्ज ह्या सर्वांनी जर्मन भाषेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मूळ लिखाण व भाषांतर ह्यांच्या संबंधात अर्थाच्या उरल्या-सुरल्या महत्त्वाचा गोषवारा एक तुलनेत सांगता येईल. ज्याप्रमाणे स्पर्शरेषा वर्तुळास केवळ एका बिंदुला व ओझरता स्पर्श करते, व ज्याप्रमाणे तो बिंदू नव्हे तर तो स्पर्श स्पर्शरेषेचा अनंताकडे जाणारा मार्ग ठरवणारा कायदा निश्चित करतो, त्याचप्रमाणे भाषांतर मूळ लिखाणास अर्थाच्या अत्यंत सूक्ष्म बिंदुला ओझरता स्पर्श करते, जेणेकरून ते भाषिक विकासातील स्वातंत्र्यात इमानाच्या सूत्राशी सुसंगत असा स्वत:चा मार्ग अनुसरू शकते. ह्या स्वातंत्र्याचे नाव न घेता त्याचे खरे महत्त्व रुडॉल्फ पॅनविट्झने आपल्या Die Krisis der europäischen Kultur ह्या पुस्तकातील काही परिच्छेदात विशद केले आहे. भाषांतराच्या उपपत्तीविषयी जर्मन भाषेत प्रकाशित सर्वोत्तम लिखाणात गटेने आपल्या Westöstlicher Divanच्या टिपणांमध्ये  जे म्हटले आहे त्याच्या खालोखाल पॅनविट्झच्या त्या लिखाणाचा क्रमांक लागतो. तो लिहितो : "आपली सर्वोत्तम भाषांतरेही चुकीच्या तत्त्वांवर आधारित आहेत. जर्मन भाषेचे भारतीयीकरण, ग्रीकीकरण, इंग्रजीकरण करण्याऐवजी ती भारतीय भाषांचे, ग्रीकचे, इंग्रजीचे जर्मनीकरण करू पाहतात. परभाषेतील लिखाणाच्या चैतन्यापेक्षा त्यांना स्वत:च्या भाषिक सवयींच्या आदर व दरारा बराच जास्त असतो. ... भाषांतरकाराची मूलभूत चूक अशी की तो परभाषेला आपल्या भाषेस गतिमान करू न देता आपली भाषा ज्या स्थितीत आहे त्या स्थितीस चिकटून बसतो. विशेषत: स्वत:च्या भाषेहून फार वेगळ्या अशा भाषेतून भाषांतर करताना त्याने भाषेच्या मूलतत्त्वांपर्यंत मागे जाणे गरजेचे आहे. जेथे प्रतिमा व छटा एकरूप होतात तेथे परभाषेद्वारा स्वत:च्या भाषेस रुंद व खोल करणे गरजेचे आहे. हे कितपत शक्य आहे, प्रत्येक भाषा स्वत:ला कितपत बदलू शकते, दुसर्‍या भाषेपासून आपले वैशिष्ट्य कितपत राखू शकते ह्याची आपल्याला कल्पना नाही. परंतु हे तेव्हाच होते जेव्हा ह्या गोष्टी हलके नव्हे तर पुरेशा गांभीर्यानी घेतल्या जातात."

    भाषांतर ह्या पद्धतीच्या तत्त्वाशी मिळतेजुळते आहे की नाही हे वस्तुनिष्ठपणे मूळ लिखाणाच्या भाषांतरक्षमतेवरून ठरते. भाषेस मोल व प्रतिष्ठा जितकी कमी, ती अर्थवाहनाचे साधन जितकी अधिक, तितका तिचा भाषांतरासाठी फायदा कमी. इतके की शेवटी अर्थाचे असह्य ओझे एवढे होते की ह्या पद्धतीशी पूर्णपणे मिळतेजुळते भाषांतर करण्याचे साधन होणे सोडा, ती असे भाषांतर अशक्य करते. लिखाणाची रचना जेवढी उच्च, अर्थाशी त्याचा संबंध जेवढा ओझरता, तेवढे ते भाषांतरक्षम राहते. अर्थात, हे केवळ मूळ लिखाणाबद्दल खरे आहे. उलटपक्षी, भाषांतरे अभाषांतरक्षम ठरतात. ह्यास कारण हे नाही की त्यांच्यावर अर्थाचे ओझे असते, तर हे की  अर्थाची भाषांतराशी जोडणी फारच क्षणभंगुर असते. हॉल्डरलिनची भाषांतरे, विशेषत: सोफॉक्लिजच्या दोन शोकांतिकांची त्याने केलेली भाषांतरे, ह्याला पुष्टी देतात. त्यांच्यात भाषांचा ताळमेळ इतका आहे की अर्थास होणार्‍या भाषेच्या स्पर्शाची तुलना फक्त इओलियन हार्पला होणार्‍या वार्‍याच्या स्पर्शाशीच करता येते. हॉल्डरलिनची भाषांतरे त्यांच्या पद्धतीची आदिरूपे आहेत. मूळ लिखाणांच्या परिपूर्ण भाषांतरांशी त्यांचा संबंध हा आदिरूपाचा नमुन्याशी असलेला संबंध आहे. पिंडारच्या तिसर्‍या पिथियन ओडचे हॉल्डरलिन व बॉर्चार्ड ह्यांनी केलेल्या भाषांतरांची तुलना हे दाखवून देते. ह्याच कारणास्त्व हॉल्डरलिनच्या भाषांतरांमध्ये, भाषेची अशा प्रकारे रुंद व विस्तारक्षम केलेली दारे बंद होऊन भाषांतरकाराला मूक करतील, हा भाषांतराचा आद्य व अक्राळविक्राळ धोका इतरांहून अधिक दिसून येतो. सोफोक्लिजची भाषांतरे ही हॉल्डरलिनने केलेली शेवटची. त्यांच्यात अर्थ एका दरीतून दुसर्‍या दरीत असा कोसळत जातो की भाषेच्या अगाध खोलीत हरवतो. ह्याला शेवट आहे. परंतु तो केवळ पवित्र धर्मग्रंथांमध्ये, ज्यांच्यात अर्थ हा भाषेच्या व साक्षात्कारांच्या प्रवाहांमधील सीमा राहिलेला नसतो. खर्‍या भाषेनुसार शब्दश:, अर्थाच्या मध्यस्थीशिवाय जे लिखाण तत्त्व वा सिद्धांतात मोडते, ते बिनशर्त भाषांतरक्षम आहे. स्वत:साठी नाही तर फक्त भाषांसाठी. अशा लिखाणाबाबत भाषांतरावर हा असीम विश्वास असावा लागतो की मूळ लिखाणात ज्याप्रमाणे भाषा व साक्षात्कार अविभक्त आहेत त्याप्रमाणे ओळींमधील भाषांतरात स्वातंत्र्य व शब्दश: भाषांतर ह्यांचा संगम झालेला आहे. कारण सर्वच उत्कृष्ट लिखाणात काही प्रमाणात, पण खास करून पवित्र धर्मग्रंथात, त्यांचे जवळ जवळ संपूर्ण भाषांतर त्यांच्या ओळींच्या दरम्यान असतेच. पवित्र धर्मग्रंथांचे हे ओळींच्या दरम्यानचे संस्करण अखिल भाषांतराचे आदिरूप किंवा आदर्श आहे.


वॉल्टर बेन्जॅमिनच्या "द ट्रान्स्लेटर्स टास्क" ह्या निबंधाचे परीक्षण इथे उपलब्ध आहे.