काळे पाणी --- अंतिम भाग

(छायाचित्रांचा समावेश करण्याच्या अडचणीमुळे शेवटचा भाग समाविष्ट केला नव्हता तो येथे देत आहे अर्थात छायाचित्राशिवायच! )
      आमच्या दुसऱ्या दिवशीचा पहिला कार्यक्रम चॅथम सॉ मिलला भेट हा ठरला होता. आमच्या गावी लहानपणी पाहिलेली सॉ मिल आठवली. त्यात एक मोठा करवतीचा पट्टा दोन चाकावरून  उभ्या रेषेत वेगाने फिरत असे व दोन कामगार एक मोठा लाकडाचा ओंडका आडवा ढकलून त्या करवतीच्या सहाय्याने कापत असत. त्यातून पडणारा भुसा अगदी स्वस्तात मिळत असे व त्यावर आमची आई शेगडी पेटवून स्वयंपाक करीत असे, पण ही मिल मात्र अगदी प्रचंड आहे. पोर्ट ब्लेअर पासून तिकडे जाण्यासाठी  १०० मी. लांबीचा चॅथम पूल बांधण्यात आला आहे. ही मिल जंगल खात्याच्या अखत्यारीत आहे.
    १७८९ मध्ये प्रथम लेफ्टनंट आर्चिबाल्ड ब्लेअर हा इंग्रज अधिकारी  ज्या बेटावर प्रथम उतरला त्याला त्याने आपल्या जहाजाचेच नाव दिले व त्याला व्हायपर आयलंड म्हणतात. त्यानंतर त्याने ह्या अगदी जवळच्या बेटावर पाऊल ठेवले तेच चॅथम बेट. कैद्यांना ठेवण्यासाठी पोर्ट ब्लेअरचा वापर करण्याची कल्पना ही त्यानंतरची. चॅथम सॉ मिल ब्रिटिशांनी १८८३ मध्ये सुरू केली. त्यासाठी त्यांनी जुन्य़ा मिलची यंत्रसामुग्री मागवली व बेटावरील विपुल वृक्षराजीतून लाकडे काढून त्यांची कापणी करून त्या लाकडांचा इमारतीसाठी वापर केला. पोर्ट ब्लेअरमधील तुरुंग व रॉस बेटावरील शासकीय व वास्तव्यासाठी बांधलेल्या इमारतींसाठी या लाकडाचा वापर करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी मिलचा विध्वंस केला व शेकडो मजूर त्यात बळी पडले.
        तीन वर्षांनी म्हणजे १९४६ मध्ये तिचा पुनरुद्धार करण्यात आला. चॅथम मिलच्या आवारातील संग्रहालय म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांच्या माहितीचा समृद्ध खजिनाच आहे. सर्व बेटांचे नकाशे, तऱ्हेतऱ्हेचे उपलब्ध होणारे लाकडाचे नमुने व त्यांच्यापासून बनवलेल्या वस्तू तेथे पहावयास मिळतात संग्रहालयात लाकडाच्या शोभिवंत वस्तू तसेच फर्निचर स्थानिक कलाकारांचे कौशल्य दाखवतात. ब्रिटिश अंमलात पाश्चिमात्य देशांना अगदी अमेरिकेलाही लाकडाचा पुरवठा या मिलमधून होत होता. बकिंगहॅम पॅलेसच्या आकर्षक जांभळ्या रंगाच्या भिंतींसाठी येथीलच पडुक लाकडाचा वापर करण्यात आला आहे. चॅथम सॉ मिलनंतर समुद्रिका मरीन संग्रहालय पाहिले. त्यात सागरी शंख शिंपले व निरनिराळे जलचर ज्यात अधिक प्रमाणात माश्यांचे विविध प्रकार होते. संग्रहालयाच्या शेवटी असलेल्या विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंमध्ये एक शिंपल्यांची माळ सौ. ला पसंत पडली. अंदमानमध्ये कोठेही  विकत घेतलेल्या सागरी चस्तूंच्या खरेदीची पावती घेणे आवश्यक आहे नाहीतर तेथील जलसंपत्तीची तुम्ही चोरी केली असे समजून शिक्षा होते, पण ही गोष्ट आम्हाला उशीरा कळली शिवाय मी काही भारतीय वकिलातीत काम करत नसल्यामुळे तेही संरक्षण नव्हते त्यामुळे पोर्ट ब्लेअर सोडेपर्यंत आम्हाला अटक होण्याची मी वाट पहात होतो. पण एवढी मोठी वस्तू तुम्ही चोरून न्याल असे विमानतळावरील कर्मचाऱ्यांना वाटणार नाही म्हणून काळजी करू नका असा दिलासा नाबर यांनी दिला होता त्यामुळे उरलेल्या वास्तव्यात अगदीच झोप लागत नाही असे झाले नाही.
       दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम जॉली बीच बेटाला भेट व बीचवर स्नॉर्केलिंग, स्कुबा डाइव्ह व समुद्रस्नान यांची मजा लुटणे असा होता. प्रवेश करताना कडक तपासणी करून प्लास्टिकचा तुकडाही आमच्या बरोबर आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात येते. अगदी पाण्याच्या बाटलीतील पाणीही दुसऱ्या सेलो वगैरे कंपनीच्या पाण्याच्या बाटलीत ओतून आत न्यावे लागते. त्यासाठी २०० रु. अनामत घेऊन बाहेर पडताना त्यातील काही रक्कम (दहा रु. ) कापून बाकी परत करण्यात येते. इतकी दक्षता घेतल्यामुळे पाणी अगदी स्वच्छ असते. बेट अगदी जवळच होते. तेथून बोटीने बीचवर गेलो. तेथे काचेचा तळ असलेल्या बोटीत बसून एक रपेट मारली. बोटीचा तळ काचेचा असल्यामुळे व पाणी अगदी स्वच्छ असल्यामुळे आतील जलचर स्वच्छ दिसत होते. बोटीच्या चालकाने आमचे बौद्धिक घेऊन अंदमानला, सेल्युलर जेल, सागरी प्राणीजीवन व आदिवासी बघण्यासाठीच लोक येतात. त्यात आम्हाला आदिवासी पहाण्याचा आमच्या कार्यक्रमात समावेश नव्हता तेव्हा निदान सागरी जीवन तरी नीट पहा असा सल्ला दिला. हे अर्थातच त्याचे मार्केटिंग होते, पण त्याचा त्याला लगेच फायदा झाला आणि मग बोटीतील सर्वांनी प्रत्येकी दोनशे रु. देऊन त्या बोटीची आणखी एक चक्कर मारण्याचे ठरवले.
   त्यानंतर स्नॉर्केलिंग म्हणजे डोळ्यावर चष्मा व तोंडावर मुखवटा घालून तोंडाने श्वास घेत चेहरा पाण्यात बुडवून सागरी जीवनाचे निरीक्षण करायचे. यातील एक चक्कर केसरीतर्फे होती आणखी हवी असल्यास वेगळा पैसा मोजून अधिकस्य अधिकं फलं या उक्तीचा अनुभव घेण्याची मुभा होती. स्नोर्केलिंगमध्ये प्रत्येकाचे सुरवातीस तोंडाने श्वास घेण्याच्या प्रयत्नात खारट पाणी तोंडात जाते. पण एकदा त्याची चूळ भरल्यावर पुन्हा तोंड पाण्यात बुडवल्यावर जमू लागते व डोळे नीट उघडून पाहिल्यावर मासे व शिंपले वगैरे स्पष्ट दिसू लागते. स्कुबा डायव्हिंगमध्ये तर अंगावर पूर्ण पाणबुड्यासारखा रबरी सूट चढवून व तोंडावर मुखवटा घालून समुद्र अंतरंगाची सफर घडवण्यात येते व सागरी जलचर व प्रवाळ, शिंपले वगैरी गोष्टी अगदी जवळून पहायला व पाहिजे असल्यास हाताळायलाही मिळतात. त्यासाठी वेगलीच वेळ नियोजित करण्यात आलेली होती. स्नॉर्केलिंग व स्कुबा डायव्हिंगसाठी बरोबर मार्गदर्शक असतो. शिवाय स्कुबा डायव्हिंगचे उथळ पाण्यात एक सराव फेरी पण घेण्यात येते. मात्र त्यासाठी प्रत्येकी २०००/- रु. वेगळे ही मोजावे लागणार होते, केसरीच्या पॅकेजमध्ये त्याचा समावेश नव्हता. या धाडसासाठी बहुतेक ज्येष्ठ नागरिकांनी नकार दिला. त्यात कसलाही धोका नाही असे सांगून केसरीचे प्रतिनिधी सर्वांना आग्रह करत होते परंतु आम्ही तेवढे धाडस दाखवू शकलो नाही.
     १५ नोव्हेंबरला राधानगरी बीच हॅवलॉकला लवकर उठून मॅक क्रुझ मधून जायचे होते. क्रुझसाठी अगदी विमानासाठी काढावे तसे बोर्डिंग पास घ्यावे लागतात व त्यासाठी ओळखपत्रही दाखवावे लागते. क्रुझ पूर्ण बंदिस्त नौकाच असते.   वातानुकूलित असून त्यातही तीन मजले व तीन वर्ग असतात. आमचा सर्वसाधारण म्हणजे प्रीमियम होता व त्यात २०८ प्रवासी बसण्याची क्षमता होती. डीलक्स मध्ये ६४ व रॉयलमध्ये ८ प्रवासी क्षमता असते. ताशी ३२ नॉटिकल मैल वेगाने ती जाऊ शकते पण बहुधा २२ ते २४ नॉ. मैल वेग राखतात.   हवा चांगली असल्याने ती डगमगत नव्हती त्यामुळे उलटी होणाऱ्यांचे हाल झाले नाहीत. ऐसपैस जागा असल्यामुळे फिरावयास मोकळीक होती. केसरीने खाण्यासाठी पाकिटे दिलेली होतीच. खिडक्या जवळ जवळ पूर्ण उंचीच्या असल्याने बाहेरील दृष्य नयनमनोहर दिसत होते. सर्वत्र हिरवा रंग भरून राहिला होता. झाडांच्या रांगामधून बेतावरील लाइटहाउस डोकावत होते. दुसऱ्या दिवशी बोटीच्या प्रवासात ते पाहिले होते. २० रुपयाच्या नोटेवर त्याचे चित्र आहे, हे त्यावेळी कळले.
        क्रुझचा प्रवास एक तासाचा होता व हॅवलॉक बेटावर उतरून होटेल सिम्फनी लॉनमध्ये उतरलो. जेवण व विश्रांतीनंतर दु. ३-३० ला राधानगरी बीचवर गेलो. तेथे सूर्यास्त पहायचा होता पण ऐन वेळी म्हणजे संध्याकाळी ४-४५ वाजता सुर्यावर ढगांचे आच्छादन आल्याने आमचा तो बेत अमलात आला नाही पण थोड्याच वेळात म्हणजे ५ वा. चंद्र मात्र टळटळीत दिसू लागला व आम्ही सूर्यास्त पहायला आलो नसून चंद्रोदयच पहाण्यास आलो असावे तसे झाले. एकूण अंदमान भारताच्या बरेच पश्चिमेस असल्यामुळे सूर्योदय व सूर्यास्त खूपच लवकर म्हणजे सूर्योदय पहाटे ५ वा व सूर्यास्त सायंकाळी ४-४५ वा अशा वेळा त्यादिवशी होत्या. दुसऱ्या दिवशी हॅवलॉक बीचवर पुन्हा काही जणांनी स्नॉर्केलिंग केले. तर स्कुबा डायव्हिंगवाले त्या दिवशी पहाटे गेले होते. आम्ही त्यातले नसल्यामुळे आरामात सर्व आटोपून हॅवलॉक नीचवर जाऊन समुद्रस्नान केले. आज रबरी ट्यूबमध्ये बसून अधिक वेळ तरंगलो. म्हणजे लहानपणी भोपळा किंवा मोदळा बंधून पोहायला शिकलो त्याची आठवण झाली. रात्री होटेलच्यासमोरील बीचवर गप्पा व गायनाचा सराव केला. सुदैवाने कोणी त्याला फारसा आक्षेप न घेता त्यात सर्वचजण सहभागी झाले.
    शेवटच्या दिवशी मॅक क्रुझनेच रॉस आयलंडला गेलो. यावेळी मात्र जोरदार पाऊस आमच्या प्रवासाच्या काळातच पडला पडला व उतरल्यावर प्रथमच रेनकोट घालण्याची पाळी आली. पण पाऊस लगेच थांबला. रॉस आयलंडवर अनुराधा राव या समाजसेविकेने तेथील वन्य जीवन व रहिवासी यांसाठी बरेच काम केले आहे. रॉस आयलंड पोर्ट्ब्लेअरच्या पूर्वेस २ कि. मि. अंतरावर आहे. १९४१ साली झालेल्या भूकंपापूर्वी ते सर्व बेटांचे इंग्रज सरकारचे मुख्यालय होते. भूकंपात सर्व शासकीय निवासस्थाने व इतर इमारतींची धूळदाण झाली व आता पडिक अवस्थेत त्या सर्व गोष्टी पहावयास मिळतात. आता भारतीय नौ सेनेच्या ताब्यात ते असून प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीस तेथे ठेवलेल्या रजिस्टरवर सही करावी लागते. एकेकाळी ब्रिटिश आमदानीत सर्व बेटांचे प्रमुख शहर असल्यामुळे सर्व शासकीय इमारती ज्यात कमिशनरचे कार्यालय, राजधानीचे कार्यालय, चर्च, बॉलरूम, सुश्रुषागृह, छापखाना, तरण तलाव, सैनिकांच्या छावण्या इ. चे भग्न अवशेष पहायला मिळतात. त्यात एकुलती एक बेकरीची इमारत अजून तग धरून आहे. पोर्ट ब्लेअरपासून सारख्या बोटी या बेटाकडे पर्यटकांना घेऊन येत असतात. प्रत्येक प्रौढ व्यक्तीस २० रु. चे तिकिट घ्यावे  लागते
         रॉस  आयलंड वरील एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तेथीला महिला मार्गदर्शक श्रीमती अनुराधा राव. १९८९ पासून म्हणजे गेली २४ वर्षे स्वयंप्रेरणेने त्या हे काम करत आहेत. त्यांचे वडील अर्मीत असताना येथे स्थायिक झाले होते व त्यांचे सर्व आयुष्य त्यांनी येथेच व्यतीत केले व बेटावरील मनुष्य प्राणि व वन्य जीवन टिकावे म्हणून त्यांची धडपड चालू असते. वरवर पहाणारास अगदीच सामान्य वाटनाऱ्या या स्त्रीने भारतीय शासनाशी दोन हात करून बेटावरील प्राणिजीवन रक्षणाचे काम एकहाती चालवले आहे. येथील प्राण्यांची ती अगदी जिवाभावाची मैतिणच आहे. तिच्या इशाऱ्यावर ते नाचत असतात. त्यात मोर हरीण व इतर पक्षी यांचा समावेश असतो. ते तिच्या "आव आव "अश्या इशाऱ्यावर तिच्याकडे येऊन तिच्या हातून खाद्य घेतात
         रॉस आयलंड ही आमची अंदमानच्या पर्यटनातील जवळ जवळ शेवटचीच भेट होती. तेथून बोट व बस प्रवास करून शेवटच्या मुक्कामास आम्ही होटेल पीअरलेसला आलो. यावेळी प्रथमच आम्हा चौघांना वेगवेगळ्या मजल्यावरील खोल्या मिळाल्या. आत्तापर्यंत आमच्या खोल्या शेजारी शेजारी असत, पण यावेळी आम्हाला पहिल्या मजल्यावरील ११५ तर त्या दोघांना वरच्या मजल्यावरील म्हनजे २०२ क्रमांकाची खोली मिळाली. या हॉटेलमध्ये आनखी एक गैरसोय म्हणजे स्वागतकक्षातून खोल्यांना प्रवेश नव्हता. स्वागतकक्षातून बाहेर पडून डावीकडील रस्त्यावरून खोल्यांकडे जावे लागत होते. इतर वेळी त्यात फार गैरसोयीचे काही वाटले नसते पण त्या काळात पाऊस पडत असल्याने छत्री उघडून अथवा पळत पळत खोली गाठावी लागे. तरीही केसरीच्या रेनकोटाचा फारच कमी वापर करावा लागला एवढे मात्र खरे. दुसऱ्या दिवशी पहाटे बाहेर पडून एकमेकाचे फोटो काढले तसेच हॉटेलसमोरील समुद्रकिनाऱ्यावरही चक्कर मारली. या सर्वच हॉटेल्सना मागे किंवा पुढे सागरकिनारा आहेच त्यामुळे फारसे काहीही न पहाता केवळ कोणत्याही एका होटेलात येऊन समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेणे सुद्धा आनंददायक ठरेल कारण एवढा स्वच्छ आणि शांत समुद्र इतरत्र कोठे पहायला मिळेलसे वाटत नाही.
      आमचे परतीचे विमानोड्डाण गो एअरचेच दुपारी १२-१० चे होते त्यामुळे विमानतळावर दोन तास अगोदर म्हनजे १०-२० ला पोचायचे होते. त्यामुळे नाश्ताच भरपेट करून निघायचे ठरले होते, शिवाय केसरीच्या खाक्यास अनुसरून विमानात खाण्यासाठी खाद्यवस्तूंचा साठा बरोबर दिलेला होताच. विमानतळाच्या वाटेवर शेवटचा एक थांबा अक्वेरियमचा घेतला, व बरोबर १० वा. विमानतळावर पोचलो. हवा छान होती. आमच्या मोठ्या बॅगांची तपासणी होऊन बोर्डिंग पासेस मिळायला फार काही वेळ लागला नाही. त्यानंतर विमानतळावरील खुर्च्यांवर स्थानापन्न झालो कारण सुरक्षा चाचणी सुरू झाली नव्हती. थोड्याच वेळात तशी सूचना मिळाल्यावर आम्ही रांगेत उभे राहिलो. पण पहिले काही प्रवासी आत गेल्यावर रांगे पुढे सरकायला तयार नव्हती याचे आश्चर्य वाटले. बहुधा आत गेलेल्या प्रवाश्यांनी बऱ्याच शंखशिंपल्यांचा साठा केलेला दिसतोय असे वाटले पण नंतर सुरक्षा चाचणीसाठी सामान म्हणजे हातपिशव्या, अंगावरील घड्याळ, मोबाइल इ. वस्तू ज्या चाळणीतून जावे लगते ते मशीनच बंद पडले आहे व त्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे असे कळले, अश्या वेळी दुसरे मशीन सर्वसाधारणपणे असते पण ते अगोदरच बंद पदले आहे हेही समजले तेव्हां आता पुन्हा खुर्च्यांवर बसून घ्या असा आग्रह तेथील कर्मचाऱ्यांनी केला पण मग रांगेतील आपला नंबर जाईल या भीतीने आम्ही उभे रहाणेच पसंत केले. सुदैवाने मशीन थोड्याच वेळात दुरुस्त झाले व आमच्या रांग न सोडण्याचे सार्थक झाले. तपासणीत आम्हाला काही अडवले नाही शिंपल्यांच्या माळेस कोभी हात लावला नाही. बहुधा आधीच मशीन बिघडल्यामुळे झालेला विलंब भरून काढायचा त्यांचा विचार असावा, काही का असेना या दिव्यातून पार पडून शेवटच्या म्हणजे विमानात चढायच्या रांगेत आम्ही उभे राहिलो.
              आमच्याकडे पाहून दोन महिला काहीतरी कुजबुजत होत्या पण त्या महिला पोलिस दिसत नव्हत्या त्यामुळे मला फारशी धास्ती नव्हती. त्याही आमच्यासारख्याच ज्येष्ठ नागरिक संज्ञेत बसणाऱ्या होत्या. बराचवेळ कुजबुज केल्यावर त्यातील एक धीर धरून आमच्याकडे आली वाम्हाला विचारू लागली, "तुम्ही पुण्यास जाणार आहात का? "अर्थातच आमचे उत्तर होकारार्थी होते. "मग मुंबईहून तुम्ही पुण्यास कसे जाणार आहात? "त्याबाबतीत आम्ही फारच दक्ष असल्याने मी आदल्याच दिवशी केके ट्रॅव्हल्सला फोन केला होता व त्याचबरोबर माझा फोन लागलाच नाही तर काय घ्या म्हणून चिरंजीवांसही फोन करून केकेशीच संपर्क साधायला सांगितला होता. सुदैवाने माझा फोन केकेलाही लागला व लगेच त्यांचा गाडी पाठवत आहे असा संदेशही माझ्या मोबाइलवर आला होता. तिकडे आमच्या चिरंजिवांनाही तसाच संदेश मिळाला होता अर्थात मी करत असलेले व तो करत असलेले आरक्षण एकाच कुटुंबासाठी आहे असे त्याने व मीही केकेला बजावून सांगितले होते. त्यामुळे त्या महिलेच्या प्रश्नास मी"आम्ही पुण्यास केके तर्फे जाणार"असे सांगितले. त्यावर त्या महिलेने केकेचा फोनक्रमांक माझ्याकडून घेतला. इतरांना मदत करण्यात अत्सुक असल्यामुळे मीही केकेला फोन केला व आश्चर्य म्हणजे माझे काम असले तर न लागणारा फोन आता मात्र अगदी फोनची बटणे दाबताच लागला. त्यामुळे त्या महिलेची अडचण निवेदन करून तिला मुंबई विमानतळावरून पुण्यास नेता येईल का असे विचारल्यावर त्यांनी आमच्यासाठी चार आसनांचीच गाडी पाठवणार असल्यामुळे त्यानंतर थोड्याच वेळानंतर केकेचीच आणखी एक गाडी येईल त्यात त्यांना समाविष्ट करता येईल असे त्यांचे उत्तर दिले. असे आम्ही त्यांना सांगितले.
        आमच्या या उत्तरामुळे त्यांना दिलासा मिळाल्यासारखे दिसले. आम्हाला विचारणारी महिला तिच्या मैत्रिणीसाठी आम्हाला विचारत होती. त्या दोघीही आमच्याचप्रमाणे अंदमानच्या सहलीस आल्या होत्या पण त्यांचा वेगळा प्रवासी मेळा होता व त्यांची सहल अजून दोन दिवसांनी संपणार होती, पण त्या दुसऱ्या महिलेचे (तिचे नाव कर्णे असे नंतर तिने सांगितल्यावर कळले. )वडील अचानक मरण पावल्यामुळे तिला सहल अर्धवट सोडून परत जावे लागत होते. तेवढ्यात आत प्रवेश करण्याची सूचना आली व त्या महिलेची मैत्रिण तिला आमच्या हवाली करून आमचे आभार मानून निघून गेली. अश्या प्रकारे प्रवासाच्या सुरवातीस आमच्यावर दोन महिलांची जबाबदारी जेसरीने टाकली होती तर आता एकीची आम्हीच स्वीकारली होती.
      कर्णेबाई आमच्याच गो एअरच्या विमानातून मुंबईस उतरल्या. आमच्या उड्डाणास निघण्यास थोडा उशीर झाला पण तरीही मुंबईस आम्ही जवळ जवळ नियोजित वेळेत पोचलो. आम्ही बाहेर पडेपर्यंत ४-३० वाजले होते व केकेच्या ड्रायव्हरला फोन केल्यावर तोही विमानतळावर पोचला आहे असे कळले. कर्णेबाई आता आमची पाठ धरून होत्या व आम्हालाही ती आमची जबाबदारी आहे असे वाटू लागले. निघताना त्यांच्या व्डीलांची प्रकृती चांगली होती आणि त्यामुळेच त्यानी सहलीस येण्याचा घाट घातला होता. त्या कुठल्याश्या शाळेत शिक्षिका होत्या व त्यांचे यजमान वारले होते त्यामुळे मधून मधून त्यानीही अशा सहलीस जाऊन स्वतःचे मन रिझावावे अशी आपल्या वडीलांची इच्छा, त्यामुळे त्या नको नको म्हणत असताना वडिलांनी जाण्याचा आग्रह केला म्हणून आपण आल्याचे त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले आणि त्यांच्या अंत्यदर्शनास पोचणे आवश्यक आहे म्ह्णून सहल मध्येच सोडून आपण निघालो असेही सांगितले. केकेच्या गाडीच्या चालकाशी बराच वेळ मोबाइलवरून हितगुज केल्यावर आम्ही कोठे आहोत हे त्याला कळले व तो आम्हाला विमानतळाच्या बाहेरील बाजूस भेटला व गाडीकडे गेल्यावर आम्हाला गाडीत बसवून नंतरच्या गाडीत कर्णेबाईंची व्यवस्था करतो असे त्याने सांगितले.
       आमच्या मेव्हण्यांना लगेच तिची कणव वाटून त्यानी आपण मागील गाडीने येतो व त्यांनी आमच्याबरोबर आमच्या गाडीतून जावे असे सुचवले. त्यानी "उगीच तुम्हाला त्रास कशाला मी मागील गाडीतून येते "असे बरेच वेळा म्हटले व ते मान्य करण्यातच शहाणपणा होता हे नंतर लक्षात आले. त्यांनी आमच्या आग्रहावरून शेवटी आमच्याबरोबर यायचे मान्य केले. अर्थात मेव्हणे मागे राहिले.
      आम्ही निघालो व काही अंतर पुण्याकडे आल्यावर आमचा एक सहप्रवासी म्हणजे आमचे मेव्हणे मागेच राहिले असल्यामुळे त्यांना गाडी मिळाली की नाही हे जाणण्याची आम्हाला उत्सुकता होती पण सौ. आशाच्या अंदाजाप्रमाणे त्यांनी विमानातून उतरल्यावर मोबाइल चालू केलाच नव्हता अर्थात तो त्यांना लागणे शक्यच नव्हते. आम्ही प्रवासाच्या मध्यावर आलो तरी त्यामुळे त्यांचा काही पत्ता लागेना. चहापान होऊन पुन्हा  आम्ही गाडीत बसल्यावर आमचे संभाषण ऐकत बसलेल्या हुषार चालकाने मागील गाडीच्या चालकाचा मोबाइल नंबर बरीच फोनाफोनी करून मिळवला. त्याच्या अखंड फोनवर बोलण्याने तो गाडी खड्ड्यात नेऊन टाकतो की काय अशी सारखी भीती मला वाटत होती पण त्याला आमच्या मदतीची किनार असल्यामुळे फारसे कडक धोरण स्वीकारणे शक्य नव्हते. शेवटी मागील गाडीच्या चालकाचा फोन लागला व त्याला आमच्या सहप्रवाश्याला मोबाइल चालू करण्याची सूचना द्यायला सांगितले तेव्हां कोठे त्यांच्याशी आम्हाला संपर्क साधता आला व ते एक दीड तास आमच्या मागे आहेत असे समजले.
          जरी त्यांच्या (म्ह. गोपाळरावांच्या)अत्याग्रहावरून बाईंनी आमच्याबरोबर येण्याचे मान्य केले तरी त्यांची सोय व्हावी हाच आमचा उद्देश होता आणि त्यांची सोयही झाली यात काही वादच नव्हता पण त्याबद्दल त्याना फारसा आनंद झाला असे दिसले नाही. अर्थात त्या दुःखात असल्याने त्याना आनंद वाटावा अशी परिस्थिती नव्हती हे उघडच होते. पण  आमच्याबरोबर येऊन त्यानीच आमच्यवर मेहेरबानी केली असा एकूण त्यांचा आविर्भाव होता. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीमुळे त्यांच्याविषयी आम्हास सहानुभूती होती आणि ही त्यांची अडचण लक्षात घेऊन आम्ही त्यांना फारस्र बोलू शकत नव्हतो. त्यांना आमच्या गाडीतून आणले नसते तर त्या अजून एक दीड तासाने पुण्यास पोचल्या असत्या पण आमच्या गाडीतून आणल्याने त्या बऱ्याच अगोदर पुण्यात पोचल्या होत्या हे त्यांना जणु मान्य नसल्यासारखे  आता गाडी अगोदर त्यांच्या घराकडे नेऊन मग आमच्या घरी आम्हाला सोडावे असे त्यानी सुचवले. म्हणजे त्या आमच्याबरोबर आल्या नसत्या तर त्याना एक दीड तास मागे रहावे लागले असते याचा जणु त्यांना विसरच पडला. आता मात्र त्यांना फारच घाई झाली होती. अर्थात आमच्यात आता ड्रायव्हरव्यतिरिक्त मीच एकटा पुरुष असल्याने मीही त्याने तसेच करावे असे सुचवून पाहिले पण अगोदर आमचे घर लागत असल्याने त्याला ते सोयीचे नसल्यामुळे त्याने तसे न करता अगोदर आम्हाला सोडून मगच त्याना सोडायचे मान्य केले. त्यामुळे माझा व त्यांचाही नाइलाज झाला. पण आम्ही आमच्या घरापर्यंत पोचल्यावर आणखी एक समरप्रसंग उत्पन्न झाला. पण त्याचा उल्लेख न करणे हेच योग्य!