'विशेष उद्योजक'

नाक्षरं मंत्ररहितं नास्ति मूल वनौषधम्

अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुलर्भः

एकही अक्षर असे नाही ज्याचा मंत्रामध्ये उपयोग होत नाही. जंगलातील प्रत्येक मुळाचा औषध म्हणून उपयोग होतोच, तसेच प्रत्येक व्यक्तीतही काही करण्याची क्षमता ही असतेच. कुणीच 'अयोग्य' असत नाही. त्यांना 'उपयोगी' बनविणारे हवेत.

वरील  श्लोकाचा आशय ध्यानात घेऊन चार मतिमंद मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांमध्ये असलेल्या गुणांचा व प्रशिक्षणाचा कौशल्याने वापर करून १९९८ साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'संकल्प सिद्धी' संस्था स्थापन केली. पालकांनी मुलांच्या पुनर्वसनासाठी चालविलेला हा संपूर्ण विदर्भातील पहिलाच अभिनव प्रकल्प आहे. ही चार मुले इथे सर्व प्रकारच्या ऑफिस फाइल्स व स्क्रीन प्रिंटींगची कामे उदा. बिल बुक, लेटर हेड, व्हिजिटींग कार्ड्स, लग्नपत्रिका इ सफाईने करतात. त्यांची गुणवत्ता बाजारात उपलब्ध असलेल्या मालापेक्षा कुठेही कमी   नाही.

सध्या स्वमग्नता, विशेष मुलं ह्याबद्दल बरंच वाचायला, ऐकायला येतंय. 'संवेदना' शाळेच्या ज्योतीताईंची मुलाखत घेत असताना ह्या प्रकल्पाबद्दल त्यांच्याकडून ऐकले व सर्वांसमोर एक आशावादी उदाहरण समोर  आणायचं ठरवलं होतं पण काही कारणाने मागे  पडलं.पण मनाच्या कोपर्‍यात दडलेली ही गोष्ट मध्ये मध्ये हळूच डोकं  वर काढत होती.   हे लिहायचे ठरवले अन एक दिवस डॉ श्री व सौ फडकेंच्या घरी गेले. दोघांनी मनमोकळेपणाने  सर्वकाही सांगितलं. अश्विन त्यांचा मुलगा त्याला नेमून दिलेलं काम करत होता. तो छान गातो व त्याला संपूर्ण गीतरामायण पाठ आहे हे त्याच्या बाबांचे शब्द कानावर पडताच त्याने गाण्याचा हट्ट केला. आमचं बोलणं झालं की तू म्हणून दाखवायचं, हे दोन-तीनदा सांगितल्यावर तो शांत झाला व आपलं काम  करत होता.. आम्ही गप्पा मारत होतो. दरम्यान अश्विनची खाण्याची वेळ झाली तसे त्याने टेबलावर बसून खाल्लं, ताटली सिंकमध्ये ठेवली, पायात चप्पल घातली, सायकलची किल्ली घेऊन रपेट मारून आला, परत आल्यावर किल्ली जागेवर अडकवली, हातपाय धुतले, देवासमोर बसून परवच्या न चुकता म्हटल्या.    गीतरामायणातील   बरोब्बर सव्विसाव्या गाण्यातील फक्त पाचच कडवे म्हणायला सांगितले होते ते त्याने बरोबर म्हणून दाखवले. मला गंमत वाटली आजकालच्या मुलांना    सात नव ...किती ...नाही.. सेवन नाईन् झा किती विचारलं की, पटकन सांगता येत नाही, अख्खा टेबल म्हणावा लागतो, अश्विनने मात्र अगदी अचूक गाणे म्हटले. दोन मिनिटं  काय बोलावे सूचेचना. केवढी ही शिस्त व आज्ञाधारकपणा!  सहज तोंडून निघालं असतं, काय भाग्यवान आहेत आईवडील,इतका आज्ञाधारक मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. पण जरी ते स्वतःला भाग्यवान समजत नसले तरी  नशिबाला दोष देत  रडत बसले नाही. 

अश्विन तिसरी पर्यंत सामान्य शाळेत जाणारा  अभ्यासात हुशार  पण अतिचंचल वृत्तीचा. मुलांमध्ये कुतूहल असतं, प्रश्न विचारतात तसे अश्विन प्रश्न विचारायचा नाही.आईवडील दोघंही डॉक्टर. त्यांनी मानसरोग तज्ञ, समुपदेशकांकडे दाखवलं, निदान होत नव्हतं.   के ईएम, हिंदुजाला दाखवून झालं. पण निदान होतं नव्हतं त्यात त्याला फीट्स यायला लागल्या. त्यासाठी जे औषध देण्यात आलं त्याने फीट्स व  चंचलपणा कमी झाला. अश्विनचे  वडील फार्मोकोलॉजीत एमडी त्यांच्या मते हा त्या गोळ्यांचा हा चांगला साइड इफेक्ट जो पाठ्यपुस्तकात नाही.  बंगळुरुला निमहांसला दाखवलं  तेव्हा  अल्पप्रमाणात स्वमग्नता असल्याचं निदान झालं. त्याची चंचलता कमी व्हावी व एकाग्रता वाढावी म्हणून क्ले खेळायला  देणे, मूर्त्या बनवायला देणे,. गाणी ऐकवणे असे उपायही चालू होते. ऐकून ऐकून सगळी गाणी अगदी तोंडपाठ झाली. दहावी नापास झाला पण पास नापास काही कळत नव्हते. शिक्षणापेक्षा त्याला आपल्या पायावर  उभं करण्याचा प्रयत्न  म्हणून  संज्ञा संवर्धन  शाळेत घातलं. तिथे व्यवसायपयोगी शिक्षण मिळालं. इथेच आदित्य, सारंग, निनादच्या पालकांशी ओळख झाली. आदित्य, सारंग व निनाद हे मतिमंद आहेत. प्रत्येकाला जश्या जन्मजात काही उणीवा आहेत तश्याच देणग्याही  मिळाल्या आहेत. पण खूप ट्रायल एरर, प्रयोगांमधून त्या सापडल्या. अश्विन गणितात पक्का, बेरीज - वजाबाकी झटक्यात करतो. आदित्यचही  गणित पक्क, वेद - उपनिषदातील गोष्टी, वर्षभराचं कॅलेंडर, खडानखडा म्हणून दाखवतो.  चौथी पास सारंग संगणक हाताळणं  त्यावर गाड्या, गाड्यांचं वेळापत्रक बघणं उत्तमरीत्या करतो.

छपाई व फाइल्स तयार करू शकतात हा विश्वास वाटल्यावर,ह्या चौघांच्या पालकांनी  निर्णय घेतला अन 'संकल्प सिद्धी संस्थेची' स्थापना झाली. अडचणी भरपूर आल्या त्यावर मात करीत यशस्वी घोडदौड सुरू आहे. आजपर्यंत काम मागायला जावं लागलं नाही कारण 'उत्तम दर्जा'! मार्गदर्शक, प्रशिक्षक आळशी सर 'संज्ञा संवर्धन' शाळेत व्होकेशनल  कोर्सचे शिक्षक होते. तिथे त्यांनी ह्या चौघांना शिकवले होतेच. त्यांच्या अनुभवाचा संकल्प सिद्धी उभं करण्यात खूप फायदा झाला. ते मुलांबद्दल भरभरून बोलू लागले.  धोका टाळण्यासाठी म्हणून  सगळी मानवचलित यंत्र  आहेत. त्यांच्या योग्यतेनुसार एक साखळी बनवली आहे व त्याप्रमाणे ते काम करतात. फाइल्स बनवण्याच काम असेल तर अश्विन क्रीजींग करतो, सारंग पंचिंग करतो, निनाद कॉर्नर कापतो व आदित्य क्लिपिंग करतो.  सेटिंग करून दिलं की आदित्य छपाई करतो, सारंग बरोबर छपाई झाली की नाही हे बघतो व आदित्य व निनाद वाळत घालणे व गठ्ठे बनवण्याचं काम करतात.     सगळ्यांना सगळी कामे येत असल्यामुळे कोणा एकाच्या अनुपस्थितीतही कामं सुरळीत चालू असतं पण अश्विन प्रिंटींग करण्यात व मोजणी जास्त तरबेज आहे . प्रिंटींग करता करता अचूक मोजणी सुरू असते पण प्रिटींग बरोबर होत नाहीये, रंग बरोबर  नाहीयेत  हे जोपर्यंत सारंग सांगत नाही तोपर्यंत अश्विन अखंड मोजत, प्रिंटींग करतच असतो.  एखादं पान कमी असेल तर ते देईपर्यंत त्याला स्वस्थ बसवणार नाही. एकही पान कमी किंवा जास्त होणार नाही. कंटाळा, बोअर झालं, थकलो हे शब्दच माहीत नाही पण चारवाजेच्या पुढे काम करायला लावले की मात्र चिडचिड सुरू. त्यांच्या वेळापत्रकात बदल केलेले त्यांना अजिबात चालत नाही.   सारंगला खूप प्रश्न विचारायची व बडबड करायची सवय आहे अन अश्विनला काम करत असताना विचलित केलेलं अजिबात आवडत नाही त्यामुळे त्या दोघात थोडी कुरबूर होते अन्यथा एकजूटीने व सलोख्याने नेमून दिलेलं आपआपलं काम करत असतात. निनाद खूप शांत आहे आणि आदित्य आपण बरं न आपलं काम बरं. चौघांनाही  घड्याळ समजतं तसेच पैशाचे व्यवहारही समजतात.आज ते आपल्या पोटापाण्यापुरतं नक्कीच कमावतात. आज त्यांच्याकडे कामाची कमतरता नाही.

सुपरवाइजर पुष्पाताईंना ह्या मुलांचं कौतुक किती सांगू न किती नाही असं झालं. दहावर्षापूर्वी गरजेपोटी  काहीश्या साशंकतेने त्यांनी ही नोकरी पत्करली. आज आर्थिक गरज नाहीये पण आता ह्या मुलांनी (मुलंच म्हणतात पण खरंतर त्यांच्याच वयात फारसं अंतर नाहीये) त्यांना इतका लळा लावलाय की  त्यांना घरी चैनच पडत नाही.   त्यांचं हे एक समांतर कुटुंबच झालंय. काम लवकर संपलं असेल तर त्या मुलांना जवळच्या बागेत फिरायला घेऊन जातात. मुलांना कोणी हसलं तर त्यांना ते आवडत नाही, त्या लोकांना समजावून सांगतात. त्यांनाही कळकळीने वाटतं की समाजाने ह्या मुलांना  स्वीकारलं पाहिजे. तसेच अश्विनच्या आईच्या मते सर्वप्रथम पालकांनी, कुटुंबाने व समाजाने स्वीकारलं पाहिजे. त्यासगळीकडे अश्विनला घेऊन जातात त्याची त्यांना कधीही लाज वाटत नाही, आणि हे त्या  'स्वीकार','मातृ-संघर्ष' गटातल्या इतर पालकांनाही सांगत असतात. आम्हाला हसू नका, आमच्याबरोबर हसा एवढीच समाजाकडून त्यांची अपेक्षा आहे.

दरवर्षी गुढीपाडव्याला सत्यनारायणाची पूजा,  सगळ्यांचे वाढदिवस,  एक दिवसाची सहल व एक निवासी सहल, दहा दिवस गणपती असे कार्यक्रम साजरे करतात. फावल्या वेळात कॅरम, पत्ते खेळतात. हरल्याचं दु:ख नसतं तसंच जिंकल्याचा आनंद  नाही. आदित्य घरच्या अंगणात असलेलं दुकान सांभाळतो, बेरीज वजाबाकी अचूक करतो कॅलक्युलेटर शिवाय. मालाचे बरोबर पैसे घेणं बाकीचे पैसे परत करणं चोखपणे करतो. चौघंहीजण घरातील नेमून दिलेली कामं  करतात. त्यांना व्यस्त ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सतत  काहीतरी काम द्यावं लागतं.चारचौघात वावरायची, बोलण्या -  चालण्याची शिस्त व्यवस्थित पाळतात.  

आजन्म निरागसतेचं व निष्पापतेचं, निष्कपटतेचं वरदान लाभलेल्या  ह्या 'विशेष उद्योजकांना'कुठल्याही प्रकारची ना सहानुभूती हवीये ना आर्थिक मदत, त्यांना हवी आहे फक्त पाठीवर शाबासकीची थाप व मनःपूर्वक शुभेच्छा!  अश्विन, सारंग,  आदित्य, निनाद व त्यांच्या पालकांना  खूप खूप शुभेच्छा !