हिटलर आणि शिकेलग्रुबर नावाचा शिपाई

मारिया ऍना शिकेलग्रुबर. ऑस्ट्रीयामधील वाल्डफीअर्टेल Waldviertel विभागातल्या (जन्म १५-०४-१७९५) स्ट्रोन्स या छोट्याशा खेड्यात श्री. योहान शिकेलग्रुबर आणि श्रीमती थेरेसा फेईसिंगर या दांपत्याच्या पोटी १५-०४-१८४७ रोजी जन्माला आली. या दांपत्याला एकूण ११ अपत्ये झाली पण त्यातली केवळ ६च जगली. मारिया २६ वर्षांची असतांना तिची आई वारली. नंतर ४० वर्षांची होईपर्यंत ती काय करीत होती याचा कुठे काही पुरावा सापडत नाही.

आपल्या वयाच्या ४२व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. मारिया ऍना शिकेलग्रुबरला ऍलॉईस हे पुत्ररत्न झाले तेव्हा ती स्ट्रोन्स या गावी ट्रमेल्श्लागर नावाच्या एका कुटुंबात काम करीत होती. लौकरच मारिया आपल्या बापाच्या घर क्रमांक २२, स्ट्रोन्स इथे राहायला गेली. ऍलॉईसच्या बापाचे नाव सांगायला मारियाने नकार दिला म्हणून शेजारच्या डॉलर्सहाईम Döllersheim गावातल्या चर्चमध्ये ऍलॉईसच्या जन्मनोंदीत नाव 'ऍलॉईस शिकेलग्रुबर' व बापाच्या नावाच्या जागी illegal म्हणजे अनौरस अशी नोंद झाली. शेजारचे हेर आणि फ्राउ (श्रीमान व श्रीमती) ट्रमेल्श्लागर यांची ऍलॉईसचे गॉडफादर आणि गॉडमदर म्हणून नोंद आहे. पुत्रप्राप्तीनंतर लौकरच मारिया घर क्रमांक २२, स्ट्रोन्स इथे आपल्या आईवडिलांकडे गेली. धर्माने कॅथलीक असलेल्या गरीब शेतकरी कुटुंबातली मारिया काटकसरीने खर्च करणारी, हातचे राखून वागणारी तसेच असाधारण धूर्त अशी शेतकरी महिला होती असे जर्मन इतिहासकार वेर्नर मेसर याने लिहिलेले आहे.

नंतर १८-०५-१८४२ रोजी मारिया ऍना शिकेलग्रुबरचे योहान जॉर्ज हीडलर Johann George Hiedler याच्याशी तिचे तिच्या वयाच्या ४७व्या वर्षी झाले. नवरदेवाचे वय होते ५०. म्हणजे या लग्नाअगोदर पाच वर्षे ऍलॉईसचा जन्म झालेला होता. या जॉर्ज हीडलरचे अगोदर लग्न झालेले होते परंतु ती प्रथम पत्नी आणि पुत्र हे दोघही जॉर्जच्या या दुसर्‍या विवाहाअगोदर मृत्यू पावले होते.  या लग्नानंतर पाच वर्षांनी १८४७ साली ऍना मारिया मरण पावली. त्यानंतर जॉर्ज हीडलर कुठे होता याचा काहीही अभिलेख उपलब्ध नाही. हा जॉर्ज हीडलर एक फिरता चक्कीवाला (itinerant miller) होता. त्यामुळे तो सतत फिरतीवर असावा. पिठाची फिरती गिरण कशीकाय असेल याबद्दल माझ्या डोळ्यासमोर काही चित्र उभे राहात नाही. फिरती गिरणी कशी असते, त्या काळच्या कोणत्या वाहनावर असे, घोडे ओढत की माणसे वगैरे कुतूहल देखील शमले नाही परंतु ते विषयांतर होईल म्हणून तो विषय सोडून दिला. युरोपात त्या काळी फिरती गिरण हे काय असेल कोण जाणे.

ऍलॉईसची पाठवणी मग जॉर्ज हीडलरचा भाऊ योहान नेपोमक हीडलर Johann Nepomuk Hiedler याच्याकडे झाली. त्याची स्पिटाल इथे शेती होती.

परंतु मारिया ऍनाच्या मृत्यूनंतर जवळजवळ २९ वर्षांनी हा जॉर्ज हीडलर प्रकट झाला. ६ जून १८७६ रोजी तीन साक्षीदारांसमोर त्याने या ऍलॉईस शिकेलग्रुबरचा जन्मदाता आपणच आहोत असे प्रतिज्ञापत्र दिले. २३-११-१८७६ रोजी हे प्रतिज्ञापत्र डॉलर्सहाईम इथल्या पॅरीश प्रीस्टकडे दाखल झाले. तेव्हा तिथे बाप्तिस्म्याच्या नोंदवहीत ऍलॉईसच्या बापाचे नावाच्या जागी - illegal - असे लिहिलेले होते. तिथे ऍलॉईस हिटलर असे नोंदवले आणि हिटलर या आडनावाने जन्म घेतला. हिटलर हे आडनाव अगोदर अस्तित्वातच नव्हते. हा ऍलॉईस हिटलर म्हणजेच जर्मनीचा दुसर्‍या महायुद्धातला एकमेवाद्वितीय क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलर याचा बाप. अशातर्‍हेने अद्वितीय क्रूरकर्मा असलेला हिटलर हा आडनावाने देखील एकमेवाद्वितीय होता. हिटलरच्या बापाचा जन्म १८३७चा म्हणजे हिटलर आडनाव जेव्हा त्याला मिळाले तेव्हा सन १८७६ मध्ये तो ३९ वर्षांचा होता.

आता युरोपातली तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहू. त्या काळात युरोपमध्ये नोकर स्त्रिया ज्या कुटुंबात काम करीत त्या कुटुंबातल्या पुरुषांपासून त्यांना अनौरस मुले पण होत आणि ती अनौरस मुले आईकडचे आडनाव लावीत असत. तेव्हा युरोपात तशी पद्धतच होती. त्या काळी जन्माला आलेल्या एकूण अर्भकांपैकी लोअर ऑस्ट्रियातील काही ठिकाणी अनौरस अर्भकांचे प्रमाण ४० टक्क्यापर्यंत पोहोचले होते. नंतर १९०३ पर्यंत हे प्रमाण २४ टक्क्यांपर्यंत घसरले. बर्‍याच वेळा मुले मोठी झाली की नंतर बाप ते मूल आपले आहे म्हणून जाहीर करीत असे. असो. ऍना शिकेलग्रुबर हिचा मुलगा ऍलॉईस याचा जन्म आहे ७ जून १८३७चा.

‘मारिया ऍना शिकेलग्रुबरला ऍलॉईस हे पुत्ररत्न झाले तेव्हा ती ग्राझ इथे फ्रांकेनबर्गर या ज्यू कुटुंबात स्वैपाकीण म्हणून कामाला होती. हा फ्रांकेनबर्गर नावाच्या ज्यू गृहस्थ ऍलॉईस शिकेलग्रुबर याला तो १४ वर्षांचा होईपर्यंत पितृत्व भत्ता देत होता.

विविध संस्थळांवर विविध उल्लेख आढळतात. पण बहुधा ऐतिहासिक दृष्ट्या ग्राह्य धरता न येण्याजोगे. एके ठिकाणी म्हटले आहे की ऍना मारिया गरोदर राहिली तेव्हा योहान हीडलर महाशय तेव्हा ग्राझमध्ये नव्हतेच. तो पराक्रम श्रीमंत फ्रांकेनबर्गर यांच्या १९ वर्षीय लाडक्या चिरंजीवांचा. म्हणून मग मारिया ज्या कुटुंबात काम करीत होती त्यांना तिच्या गरोदर असल्याची चाहूल लागल्यावर तिथून तिला आपल्या स्ट्रोन्स येथील आईवडिलांकडे जावे लागले. त्यामुळे 'ऍलॉईस शिकेलग्रुबरचा खरा बाप हा फ्रांकेनबर्गर नावाच्या धनाढ्य ज्यू गृहस्थाचे लाडावलेले १९ वर्षीय चिरंजीव असण्याची शक्यता आहे' असे काहींचे मत आहे. साहाजिकच आपल्या बापाच्या शरीरात फ्रांकेनबर्गर या ज्यू माणसाचे रक्त असू शकते त्यामुळे तो अर्धा ज्यू (फ्रांकेनबर्गर) असू शकतो हा सल हिटलरला ते कळल्यापासून मरेपर्यंत राहिला असावा असे बर्‍याच ठिकाणी म्हटले जाते. १९३१ साली वावड्या उठल्या की हिटलरचा वडीलांकडचा आजा ज्यू होता. फक्त विष्णूनेच अवतार घेतले असे नाही. रामायणातल्या रजकाचा हा कलीयुगातला ज्यू अवतार असावा. अतिरेकी वंशाभिनान असलेल्या हिटलरला आपण कसे शुद्ध रक्ताचे किंवा शुद्ध वंशाचे हे सिद्ध करावेसे वाटले नाही तरच नवल. याबद्दल जास्त माहिती काढण्यासाठी हिटलरने हे प्रकरण एस एस या नावाने नंतर कुख्यात झालेल्या शूट्झस्टाफेल या संस्थेकडे दिले. हिटलरचा वंशवृक्ष शोधून काढायच्या कामगिरीवर रुडॉल्फ कोपेनस्टाईनर याची नेमणूक झाली. याचा अहवाल नंतर १९३७ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. "Die Ahnentafel des Fuehrers" (The pedigree of the leader) हे त्या पुस्तकाचे शीर्षक. त्यात हिटलरचा वंशवृक्ष प्रसिद्ध झाला असून हिटलरचे कुटुंब हे ऑस्ट्रियन जर्मन असून त्यांचे कोणतेही पूर्वज ज्यू नसून हिटलर हा शुद्ध आर्यनवंशाचा आहे असे प्रशस्तिपत्रक आहे.

ऍडॉल्फ हिटलरचे चरित्रकार रॉबर्ट पेन आणि जॉन टोलॅंड तसेच सुप्रसिद्ध लेखक विल्यम शिरर देखील तपशिलातल्या थोड्याफार फरकाने अशीच नोंद करतात असे महाजालावर म्हटलेले आहे. विल्यम शिररने असे कुठे म्हटले त्याचा उल्लेख मात्र तिथे नाही. राईज ऍंड फॉल ऑफ़ द थर्ड राईश मध्ये तसा उल्लेख केलेला मला आठवत नाही. ते पुस्तक मी वाचल्याला आता काही वर्षे लोटली आणि याबद्दलचा उल्लेख मला आता तरी आठवत नाही. 

न्यूरेंबर्ग खटल्याच्या वेळी हान्स फ्रांक म्हणाला की त्याला हिटलरने १९३० मध्ये सांगितले की हिटलरचा एक नातेवाईक हिटलरचा वडिलांकडून असलेला ज्यू वांशिक संबंध चवाठ्यावर आणण्याची धमकी देऊन हिटलरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत होता. हिटलरचा सावत्र भाऊ ऍलॉईस ज्युनियर याचा मुलगा पॅट्रीक हिटलर हाच तो नातेवाईक असे एका संस्थळावर म्हटले आहे. तेव्हा हिटलरने फ्रांकला सत्य शोधून काढायला सांगितले. फ्रांकने या प्रकरणाचा शोध घेतला. 'मारिया ऍना शिकेलग्रुबर हिने जेव्हा ऍलॉईसला जन्म दिला तेव्हा ती ग्राझ येथे फ्रांकेनबर्गर कुटुंबात स्वयंपाकीण म्हणून काम करीत होती असे फ्रांकने केलेल्या चौकशीत आढळून आले' असे त्याने हिटलरला सांगितले होते.

महाजालावर विविध संस्थळांवर बरेच उलटसुलट वाचायला मिळाले. थिसेन आणि कोहलर Thyssen and Koehler या इतिहासकारंच्या मते तर चॅन्सेलर डॉल्लफस याने ऑस्ट्रीयन पोलीसांना मारियाबद्दल माहिती काढायला फर्मावले होते. त्या गुप्त अहवालानुसार मारिया जेव्हा गर्भवती झाली तेव्हा ती बॅरन सॉलोमन मायर फॉन रॉथ्सचाईल्ड - Baron Salomon Mayer von Rothschild यांच्याकडे व्हिएन्ना इथे काम करीत होती. बॅरन म्हणजे उमरावाचा अधिकृत वारस. उमराव हे त्या सरंजामशाहीच्या काळी फारच धनाढ्य गृहस्थ असत हे बहुतेकांना ठाऊक आहेच. ती गर्भवती आहे हे कळल्यावर तिची स्पिटाल इथे रवानगी केली गेली. अशा तर्‍हेने हिटलर १/४ ज्यू होता असे या संस्थळावर म्हटलेले आहे. हा गुप्त अहवाल डॉल्लफसने ऑस्ट्रीयाचा दुसर्‍या महायुद्धाच्या वेळचा चॅन्सेलर शूशनिग Schuschnigg याच्याकडे सुपूर्द केला. हा गुप्त अहवाल हस्तगत करण्यासाठीच हिटलरने एवढे मोठे हत्याकांड घडवून आणले. तर दुसर्‍या एका संस्थळावर म्हटले आहे की हिटलरची राजकीय ताकद जरा वाढू लागल्यावर सन १९२० च्या दशकात केव्हातरी त्याच्या राजकीय विरोधकांनी ही वावडी उठवली. पण या वावडीला प्रसिद्धी १९३०च्या नंतर मिळाली असावी. ज्यूविरोधी जनतेची मते हिटलरला मिळू नयेत म्हणून. जसे बोलणार्‍याचे तोंड कोणी धरू शकत नाही तसेच लिहिणार्‍याची लेखणी वा टंकणार्‍याचा कळफलक आपण धरू शकत नाही. सारेच तर्कवितर्क. सत्य काय ते ऍना मारियाबरोबरच गाडले गेले. इयान करशॉ - Ian Kershaw आणि इतर जवळजवळ सर्व इतिहासकारांनी ही ‘ज्यू’ शक्यता फेटाळून लावली आहे. इतिहास अशा लिखित आधार नसलेल्या दंतकथा ग्राह्य धरीत नाही.

हिटलर हा ऍलॉईस शिकेलग्रुबरऱ्हिटलर याची तिसरी पत्नी क्लारा हिचा मुलगा. आपल्या पहिल्या पत्नीपासून त्याला ऍलॉईस ज्युनिअर हिटलर हा मुलगा झाला होता. म्हणजे हा ऍलॉईस ज्यूनिअर हिटलर हा क्रूरकर्माचा सावत्र भाऊ. या ऍलॉईस ज्युनिअर हिटलरचा मुलगा पॅट्रीक हिटलर. म्हणजे क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलरच्या मोठ्या सावत्र भावाचा मुलगा हा पॅट्रीक हिटलर. ऍडॉल्फ हिटलर जेव्हा चॅन्सेलर झाला तेव्हा पॅट्रीक इंग्लंडमध्ये होता. पण जर्मनीचा सर्वेसर्वा ऍडॉल्फ हिटलर आपला काका आहे हे त्याला ठाऊक नव्हते. त्याने त्याच्या बापाला म्हणजे ऍलॉईस ज्युनिअरला म्हणजे हिटलरच्या सावत्र भावाला पत्र लिहून नाते वगैरे आहे का म्हणून विचारले. पण ऍडॉल्फने त्याला उत्तर पाठवून बोलावून घेतले. ऍलॉईस ज्युनिअरला आपल्या बापाने दत्तक घेतले असल्यामुळे आपला काही संबंध नाही आणि माझ्या घराण्याबद्दल जाहीर वाच्यता होता नये असा दम त्याला ऍडॉल्फ हिटलरने दिला. आता अमेरिकेतील वृत्तपत्रांना काहीतरी मसाला पुरवून पैसे मिळवता येतील असे वाटल्यामुळे त्याने अमेरिकन वृत्तपत्रांशी संधान साधले. एका फ्रेंच वृत्तपत्राने देखील पॅट्रीकचा मजकूर छापून धोडाफार धुरळा उडवला. त्यात त्याने ऍडॉल्फ हिटलरच्या तोंडी वरील अर्थाची वाक्ये घातलेली आहेत. 

२० एप्रिल १९९० रोजी पीट्सबर्गचे संशोधक डॉ. एरिक लीफ डेव्हीन न्यूयॉर्क टाईम्समध्ये म्हणतात की हा धुरळा उडेपर्यंत हिटलरला यातले काहीच ठाऊक नव्हते. लहानपणापासून त्याला स्वतःची ओळख ऍडॉल्फ हिटलर म्हणूनच होती. युद्धातील डावपेच म्हणून दोस्त राष्ट्रांनी या प्रकरणाला प्रसिद्धी दिली. तरीही रुडॉल्फ कोपेनस्टाईनरचा अहवाल आपण नाकारू शकत नाही. इतिहासकारांनी देखील पण तो नाकारलेला नाही. पण तरीही काही ठिकाणी म्हटले जाते की या कोपेनस्टाईनर आयोगाने चौकशीचे काम केले नाही तर जुने पुरावे नष्ट करून नवे बनावट पुरावे उभे करायचे काम केले. काही असले तरी जेत्यांच्या इतिहासकारांनी पराभूत जर्मनांची बाजू घेणारी खोटी बाब इतिहासात लिहायला कारण काय असू शकेल असा प्रश्न मनात उभा राहतोच. ते कारण मात्र कुठे दिसत नाही. संशोधन दिशांकित करून; नव्हे संशोधनाची दिशाभूल करून समाजाचा बुद्धिभेद करण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे असे मानायला जागा आहे. शिवाय जो आरोप हे संस्थळ १९३१ च्या हिटलरच्या चौकशी आयोगावर करते तोच आरोप कोणीही व्यक्ती अशा संस्थळांवर करू शकते.

सन २०१० मध्ये काही इतिहाससंशोधकांनी हिटलरचे दूरचे वंशज असलेल्या नातेवाईकांच्या रक्ताचे वगैरे नमुने घेऊन त्यांच्या जैव अनुवंशिकतेत ज्यू अंश सापडतो का हे पाहिले. परंतु त्यातही निर्णायक असे काही सापडले नाही.

हिटलर राजकारणात पडण्यापूर्वी एक साधा कॉर्पोरल म्हणजे सामान्य शिपाई होता. चॅन्सेलर झाल्यानंतर तो केवळ सत्तेच्या जोरावर सेनाप्रमुख झाला. सैन्यातला सर्वोच्च अधिकारी असलेल्या हिंडेनबर्गला हिटलरसारखा एक सामान्य दर्जाचा कॉर्पोरल हा जर्मनीचा चॅन्सेलर व्हावा असे वाटत नसे. चर्चिलने पण ही माहिती काही प्रमाणात शोधून काढली. त्यात बोहेमियन लोकांना इतर जर्मन लोक हीन वंशाचे समजत. हा साम्राज्यशाहीचा, सरंजामशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलेला गर्विष्ठ चर्चिल हिटलरचा उल्लेख खाजगीत 'दॅट बोहेमियन कॉर्पोरल शिकेलग्रुबर' असा तुच्छतेने करीत असे. हिटलरला हे कळले होते की नाही ठाऊक नाही. कळले असेल तर कळल्यावर हिटलरचा नक्कीच तिळपापड झाला असेल. मयमहालात दुर्योधन पाण्यात पडल्यावर द्रौपदीने त्याला आंधळ्याचा मुलगा आंधळा म्हणून हिणवल्यावर कसे वाटले असेल कोण जाणे. रामायणातल्या धोब्याचा अवतार युरोपात होता, नारदमुनींचा होता की नाही कोण जाणे. होता असला तर त्याने हे नक्कीच हिटलरला सांगितले असेल.

आपल्याला ठाऊकच आहे की आर्यन वंशाचे जर्मन हे अखिल मानवजातीत सर्वश्रेष्ठ असून बाकी सारे हीन वंशाचे आणि दूषित रक्ताचे आहेत असे हिटलरचे वैयक्तिक तत्त्वज्ञान आणि वैयक्तिक मत होते. माईन काम्फमध्ये हिटलर अशाच अर्थाचे लिहितो. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये त्याने इथिओपियाचे कृष्णवर्णीय राजे महाराज हेले सिलासी यांच्याशी हस्तांदोलन करण्याचे नाकारले. परिणामी कोणाही ऑलिंपिकविजेत्याशी हस्तांदोलन करण्यास त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मज्जाव केला.

काही असले तरी एक गोष्ट मात्र ध्यानात आली की तथाकथित ज्यू रक्त हिटलरच्या शरीरात नसले तरी हिटलरचा बाप मात्र हिटलरच्या आजीला तिच्या विवाहापूर्वी झालेले अपत्य होता. तो धार्मिक दृष्ट्या कर्मठ काळ लक्षात घेतला तर ही काही साधी गोष्ट नव्हे. अनौरस अपत्यांचा सुळसुळाट जरी युरोपात झाला असला तरी त्या अपत्यांना आणि त्या अपत्यांच्या मातांना तत्कालीन कर्मठ सरंजामी समाजात प्रतिष्ठा वगैरे मिळणे शक्यच नसणार. त्यांना अवहेलनेचीच वागणूक मिळाली असणार. ऍना मारियाची आणि ऍलॉईसची बरीच परवड झाली असणार. श्री. पंढरीनाथ सावंत लिखित हिटलरविषयी पुस्तक वाचनात आले आणि एकीकडे ऍना मारियाची परवड तर दुसरीकडे हिटलरचा अतिरेकी वंशाभिमान हा विरोधाभास पाहून गंमत वाटली तर ऍना मारिया शिकेलग्रुबरविषयी कणव देखील वाटली. अशा संमिश्र भावना मनांत दाटून आल्या. पुस्तक लेखक सावंत यांना, महाजालावरील या विषयातल्या उपलब्ध माहितीला आणि विलियम शिररला तसेच हिटलरच्या चरित्रकारांना अनेक धन्यवाद.

गेल्या दोन वर्षात आणखी एक खास पुस्तक वाचनात आले. त्या वाचनातून अनेक प्रश्न मनात उभे राहिले. वंशश्रेष्ठत्त्वाची, जातिश्रेष्ठत्त्वाची भावना कशी आली असावी? श्रेष्ठत्त्वाचे निकष कोणते, श्रेष्ठत्त्व कोणत्या गुणांवर ठरते, अनुवंशिकता म्हणजे काय? गुणधर्म एका पिढीतून दुसर्‍या पिढीत कसे संक्रमित होतात,  वैज्ञानिक दृष्ट्या मात्र अमुक एक जात किंवा वंश श्रेष्ठ आहे असे आपण म्हणू शकतो का? वगैरे प्रश्न मनात उभे राहिले. त्यातूनच नुकतीच पूर्ण झालेली, भरपूर अवांतर फाफटपसारा खच्चून भरलेली जीवनगाणे ही लेखमाला चित्रविचित्र वळणे घेत उभी राहिली. 

खरे तर जात, जमात, टोळी यातून मानवाची काही आदिम वैशिष्ट्ये दिसतात. काही गुणधर्म तर काही जातीत अद्वितीय असे असतात. एखाद्या घरात बहुतांश मुलेमुली कलावंत असतात तर एखाद्या घरी सरस्वतीचे वरदान असते. एखाद्या घराला गुन्हेगारीचा शाप असतो तर काही कुटुंबात यशस्वी उद्योजकांची परंपरा असते. काही जमाती दीर्घायुषी असतात तर काही जमातीत गंभीर अनुवंशिक आजार दिसतात. अर्थात हे १०० टक्के नव्हे पण एखाद्या जातीतले किंवा कुटुंबातले सर्वसाधारण सरासरीपेक्षा तौलनिक दृष्ट्या लक्षणीय प्रमाणात जास्त संख्येने असलेले प्रमाण आहे. भारतीय समाजातील बहुतांश व्यक्तींना स्वतःची जात ही श्रेष्ठ आहे असे वाटते. संगमनेरात एक म्हण आहे, 'बारा ‘शहरी बरोबर एक संगमनेरी' कोकणी माणूस तर कोणत्याही जातीचा असो, स्वतःला सर्वश्रेष्ठच आणि जगातला सर्वात बुद्धिमान माणूस समजतो. (मी देखील कोकणीच बरे का!) यात काही वाईट नाही. स्वतःला श्रेष्ठ समजले तर अंगी सकारात्मक दृष्टीकोन बाणतो आणि प्रगती होते. परंतु इतरांना तुच्छ लेखणे, इतरांचा द्वेष करणे मात्र नक्कीच वाईट आहे. महात्मा गांधींची हत्या झाली? द्या ब्राह्मणांची घरे पेटवून. इंदिरा गांधींची हत्या झाली? कापा शिखांना. राखीव जागांचा फायदा मिळतो? छळा दलितांना. मानाने जगायचा प्रयत्न करतात? करा दलितांवर अनन्वित क्रूर अत्याचार. हे पाहून मन विषण्ण होते.  शेकडो वर्षातून शेकडो होळ्या पार पडल्या तरी या हलहलाचे काही अद्याप दहन होऊ शकले नाही. प्रत्येक वाचकाच्या भावना, मते अर्थातच यापेक्षा वेगळी असू शकतात. या प्रश्नांची उत्तरे आपली आपण विश्लेषण करून शोधावीत आणि निष्कर्ष काढावेत हे बरे. असो.

या लेखात अवांतर फापटपसारा भरपूर झाला असला तरी पुस्तकपरिचय हा या लेखाचा मुख्य विषय आहे. राजकारणात पडल्यापासूनच्या हिटलरबद्द्ल मराठीतून बरेच लिहिले गेले आहे. परंतु त्याअगोदरचे, हिटलरच्या बालपणाबद्दल, फारच कमी लिहिले गेले आहे, म्हणून हे पुस्तक त्यांनी लिहिले असे लेखकमहाशय प्रस्तावनेत म्हणतात. दोन्ही पुस्तकांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

१.
पुस्तकाचे नाव: ऍडॉल्फ हिटलर
लेखक: पंढरीनाथ सावंत
प्रकाशक: अनिल रघुनाथ फडके,
१०२ सी, माधववाडी, खोली नं. ११,
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग,
दादर मध्य रेलवे स्टेशनसमोर,
दादर पू., मुंबई ४०० ०१४
पहिली आवृत्ती: दासनवमी २२ फेब्रुवारी २००६.
पृष्ठसंख्या:३०४
किंमत रु. ३००/-

२.
रोझलिंड फ्रॅंकलीन
ले.: वीणा गवाणकर
प्रकाशक दिलीप माजगावकर,
राजहंस प्रकाशन,
१०२५,सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
टे.: ०२०-२४४७ ३४५९, फॅक्स: २४४३ ३७१९.
rajhans1@pn2vsnl.net.in
पहिली आवृत्ती: २० जुलै २००९.
पृष्ठे : १४४ किंमत रु. १३०/-