नाटाचे अभंग... भाग ४९

४८.  चांगला तरी पूर्ण काम । गोड तरी याचेंचि नाम ।
  दयाळू तरी अवघा धर्म । भला तरी दासां श्रम होऊं नेदी ॥१॥
  उदार तरी लक्ष्मीयेसी । झुंजार तरी कळीकाळासी ।
  चतुर तरी गुणांचीच रासी । जाणता तयासी तोचि एक ॥धृ॥
 जुनाट तरी बहुकाळा । न कळे जयाची लीळा ।
 नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळा भुलवणा ॥३॥
 गांढ्या तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत ।
 ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥४॥
 खेळ तो येणेंचि खेळावा । नट तो येणेंचि अवगावा ।
 लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडसी ॥५॥
 उंच तरी बहुतचि उंच । नीच तरी बहुतचि नीच ।
 तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं आहाच पूजा केली ॥६॥

 पूजा करणे म्हणजे आदर व्यक्त करणे, सत्कार करणे हा जसा अर्थ आहे, त्याचबरोबर ‘वाखाणणे’ असाही अर्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात ‘येणें वाग्यज्ञे तोषावे’ अशी प्रार्थना करतात, तद्‍वत् इथे ‘वाखाणणी’चा अर्थ घेता येईल. भगवंताच्या विषयीची श्रद्धा अंतःकरणात जेव्हा दृढ होते, अशा वेळी भगवंताविषयी स्वाभाविकतः जवळीक निर्माण होते. त्याचे गुणवर्णन करताना मनाला आनंद मिळू लागतो. तुकोबाराय अशाच मनस्थितीत असताना त्यांनी भगवंताची काहीशा वेगळ्या ढंगाने केलेली वाखाणणी या अभंगातून व्यक्त होते.
 जीवाला भगवंताने वाक् इंद्रिय दिले आहे. मनुष्यमात्राला दिलेल्या या इंद्रियाचे वैशिष्ट्य हे की, ते आपल्या सामर्थ्याने मनातील भावभावना व्यक्त करू शकते. त्यासाठी रसना किंवा जीभ अत्यंत महत्त्वाचे कार्य संपादन करते. वाचेचे व्यक्तीकरण करणे केवळ रसनेमुळे साध्य होत असते. म्हणून मनुष्याची रसना शब्दोच्चारातील रस आणि अन्नादीच्या चवीचा रस या दोन्हींचाही स्वाद घेऊ शकते. रसनेला दुधारी म्हटले जाते. तिच्या ठिकाणी गोडवा असेल तर मनुष्याला ती शोभा देते. अन्यथा, तीच रसना मनुष्याला खड्ड्यातही घालते. याचमुळे भक्तांची भगवंताकडे ही प्रथम मागणी असते की, त्यांची वाणी नित्य त्याच्या गुणवर्णनातच रंगून जाऊ दे.
 तुकोबारायांनी भगवंताच्या गुणवर्णनाचे या अभंगाद्वारे वर्णन करताना पहिल्यांदा भगवंताच्या उत्तम गुणांचे वर्णन करून नंतर ते त्याच्या अशा गुणांचे वर्णन करतात, जे मानवी पातळीवर विचार केल्यास हेय, निंदनीय असे अवगुण असल्यासारखे वाटते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते; भगवंताचे वैशिष्ट्य असे आहे की, गुणांना भगवंताच्या योगे अधिक सौंदर्य लाभते, तर अवगुणांना महत्ता प्राप्त होते. भगवंताचे वर्णन करताना असा विचित्र पालट का व्हावा, याचा विचार करू गेल्यास असे दिसते की, ज्याला आपण बाह्यतः निंदास्पद समजतो अशा ‘अवगुणा’त ‘गुण’ हा शब्द आहेच. इत्यर्थ असा की, भगवंताचे वेदप्रतिपाद्य वर्णन तो गुणातीत असल्याचे सांगणारे आहे. भगवंताचे गुण असोत वा अवगुण, ते प्रसंगानुरूप केवळ जीवाच्या कल्याणार्थच प्रकट होणारे आहेत. दुसरा भाग असा की, गुण हे बंधनकारक ठरणारे असतात आणि भगवंत तर सदा, सर्वत्र स्व-तंत्र आहे. गुण असोत् वा अवगुण, त्याला आवृत्त करू शकत नाहीत. भगवंताचे थोरपण याच्यातच आहे की, तो यच्चयावत् चांगल्या आणि वाईट गोष्टींना समर्थपणे आश्रय देतो. तुकोबारायांचे अन्यत्र वचन आहे की, ‘अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तेही तेणें वंद्य केलें ॥’ आणखिन् असेही वचन आहे की, ‘अग्निमाजीं गेलें । अग्नि होऊन तेंच ठेलें ॥’ अग्नीला पावक म्हणजे पवित्र करणारा असे म्हटले जाते आणि भगवंताचे वर्णन ‘पावकः पावनानाम्’ असे केले जाते. जे पावक आहेत, त्यांच्या ठायी असलेले सामर्थ्य या भगवंताकडूनच प्रदान केले गेले आहे. भगवंताशी जे मिळाले, ते परमपवित्र, भगवंतरूपच होऊन जाते. पुष्पदंतांनी शिवमहिम्न स्तोत्रात वर्णन केले आहे - ‘अहो, विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः ।’ (‘काय आश्चर्य पहा, जगाचे दुःख नष्ट करण्याचे ज्याला व्यसनच जडले आहे, त्याच्या ठिकाणची विकृतीही प्रशंसनीय होते.) भगवान् महेश्वराने कालकूट विषाचा अंगिकार केला. त्यामुळे कर्पूरगौर असलेल्या महेश्वराच्या कंठाला काळासर-निळा रंग प्राप्त झाला. तो त्यांच्या गौरवर्णाला कलंकित करणारा जरी असला, तरीदेखील तो त्याठिकाणी प्रशंसनीय झाला. अभंगाच्या मध्यानंतर तुकोबारायांनी जे भगवंताचे वर्णन केले आहे, त्यातही भगवंताच्या अवगुणाचे केलेले वर्णन ही त्याची प्रशंसाच आहे.     
 तुकोबारायांनी अशा प्रकारे भगवंताच्या गुणांचे वर्णन अत्यंत चातुर्याने करून शेवटी म्हटले आहे की, त्यांनी या भगवंताची पूजा ‘आहाच’ म्हणजे ‘वरपांगी’ केलेली नाही. यातून त्यांना असे सांगावयाचे आहे की, ‘पू’ म्हणजे पूर्णतः आणि ‘जा’ म्हणजे ‘जाणून घेणे’ अर्थात् भगवंताला यथार्थपणे जाणून घेणे, हीच त्याची खरी पूजा ठरते.
 अभंगाच्या प्रारंभी तुकोबाराय भगवंताच्या चांगुलपणाचे वर्णन करतात. ते त्याला ‘पूर्णकाम’ असल्याचे सांगतात. भगवंत हा ‘पूर्ण’ आहे. म्हणजेच तो सर्व कामना आणि शक्तीने परिपूर्ण आहे. तसेच ‘काम’ या विशेषणात्मक नामाने ‘पुरुषार्थाची महत्त्वाकांक्षा असणार्‍यांची कामना पूर्ण करणारा’ असा बोध होतो, असे आद्यशंकराचार्य सांगतात. भगवंताच्या ठायी सर्व विषयांच्या इच्छांना पूर्णत्व लाभते. किंबहुना, ज्याच्या प्राप्तीने सर्वच वासना निःशेष होतात, पूर्ण समाधान प्राप्त होते, असा हा भगवंत एकमेव अद्वितीय असा आहे. भगवंताचा दुसरा गुण त्याचा ‘गोडवा’ आहे. भगवंताचे नाम-रूप-लीला आदी सर्वच गोड असल्याचे संत वर्णन करतात. तुकोबाराय भगवंताच्या गोडव्याचे वर्णन करताना, काहीसा अतिक्रम केल्यासारखे, भगवंताला अन्यत्र सुनावतात, ‘तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा ॥’ आणि पुढे म्हणतात, ‘आम्हां जन्म गोड यासाठीं ॥’ भगवंताचा दयाळूपणा असा आहे की, त्याचा अधर्मही धर्म ठरतो. स्तनपान करविण्यास आलेल्या पूतनेचा तो वध करतो. मथुरेत गेल्यावर मागितलेले कपडे दिले नाहीत, म्हणून धोब्याला बुकलून मारतो. वरवर पाहता भगवंताची ही कृत्ये अधर्म वाटणारी असली, तरी त्या त्या प्रसंगाची कार्यकारण-मीमांसा पाहता, भगवंताने त्या त्या व्यक्तीच्या पूर्वजन्मातील इच्छांची पूर्ती वा त्यांच्या दोषांचे हरण केले असल्याचे दिसून येते आणि तो त्याचा धर्म असल्याचे प्रचितीला येते. भगवंत हा ‘भला’ असल्याचे तुकोबाराय पुढे सांगतात. ‘भला’ म्हणजे सुस्वभावी, भद्र अर्थात् अनुकूल, सुखकर, स्तुत्य असा हा भगवंत आहे. याच्या भलेपणाचे वर्णन करताना तुकोबाराय सांगतात, ‘तरी दासां श्रम होऊं नेदी’. जीव हा त्याचाच अंश असल्याने जीवाचे आत्यंतिक कल्याण होण्यासाठी, जे भावयुक्त अंतःकरणाने त्याचा अवलंब करतात, त्यांना हा श्रम होऊ देत नाही. दामाशेठींसाठी विठू महार होऊन त्यांची सुटका करतो, जनीसंगे जाते ओढतो तर एकनाथांकडे पाणी भरतो.
 भगवंताला ‘उदार’ म्हणून संबोधताना तुकोबाराय म्हणतात, प्रसंगी भक्तप्रेमापोटी तो त्याची पत्नी असलेल्या लक्ष्मीशी वियोग झाला (लक्ष्मीयेसी उदार) तरी क्षिती बाळगत नाही. लक्ष्मीला सोडून बळीकडे हा द्वारपाल म्हणून राहिला आणि त्याला परत मिळविण्यासाठी नंतर लक्ष्मीला दीन होऊन बळीकडे पतीची ओवाळणीच्या स्वरूपात मागणी करावी लागली. भगवंताने ज्या शरणागतांचा अंगिकार केला, त्या भक्तांकडे लक्ष्मी कामारी (पडेल ते काम करणारी दासी) होत असल्याचे वर्णन संतवाङ्गमयातून अनेक ठिकाणी केले गेले आहे. भगवंत प्रत्यक्ष कळीकाळासी झुंजणारा असल्याचे तुकोबारायांनी म्हटले आहे. वास्तविकपणे काळ ही भगवंताचीच विभूती आहे. कळीकाळ या पदाने काळाचे रौद्ररूप ध्यानात येते. तथापि, भक्तांच्या रक्षणार्थ आपल्या कळीकाळस्वरूपास तो पराजित करतो. कालियाचे मर्दन करतो, असुरांचा विनाश करतो अन् पतितांचा उद्धार करून तो.कृपेची पाखर घालतो. चातुर्य हा भगवंताचा गुण श्रेष्ठतम गुणांमध्ये गणला जातो. प्रसंगाच्या सोडवणुकीसाठी जी तत्परता लागते, ती ज्ञानाशिवाय लाभत नसते. भगवंत हा ज्ञानाची घनमूर्ती आहे. त्यामुळे तो गुणांची राशी असून त्याचा चतुरपणा एकमेव,
अद्वितीय असा आहे. असा हा गुणांचीच राशी असलेला भगवंत सर्वार्थाने जाणण्यासाठी त्याचा तोच समर्थ आहे. अन्य कुणी त्याला पूर्णांशाने जाणू शकत नाही. म्हणूनच वेदही ‘तो असा नाही, इतकाच नाही, नेति नेति’ म्हणतात. आपण या भगवंताला पूर्णपणे जाणू शकत नाही, ही जाणीव होते, तीही भगवंताच्याच कृपेने आणि तेच त्या भगवंताला जाणणे असते. 
 तुकोबाराय भगवंताला जुनाट म्हणताना ‘बहुकाळा’ असे म्हणतात. भगवंताचे अस्तित्व बहुकाळाचे आहे, म्हणजे त्याचा आदि किंवा जन्म सांगता येण्यापलिकडचा आहे, किंबहुना तो अजन्मा आहे. भगवद्‍गीतेच्या अकराव्या अध्यायात अर्जुनाने भगवंताला ‘आदिमध्यान्तहीन’ म्हटलेले आहे. त्याला आदि नाही, मध्य नाही आणि अंतही नाही. तुकोबाराय पुढे सांगतात, या भगवंताच्या अनंत लीला काळालाही कळत नाहीत. (बहुकाळा न कळे जयाची लीळा). ज्ञानघन असणारा हा भगवंत, जो चतुरांचा शिरोमणी आहे, तोच गवळ्यांच्या संगतीत अडाणी गोवळा होतो आणि त्यांच्याबरोबर गाई वळतो अन् त्यांच्याशी क्रीडा करतो. येथे दोन वेळा गोवळा हा शब्द योजला आहे. यातील एक गोवळा म्हणजे ‘गो’ अर्थात् इंद्रिये, त्यांना वळविणारा तर दुसरा गोवळा शब्द भोळ्या-भाबड्या गोपाळांचा वाचक आहे. ज्या साधकांनी इंद्रियांवर सत्ता मिळविलेली आहे आणि अनुकूल पद्धतीने ती इंद्रिये वळविली आहेत, ती भगवंताच्या कारणी लावली आहेत, अशा वंदनीय साधकांमध्ये भगवंत भावभोळा होऊन राहतो. हा भगवंत ‘लाघवी’ असल्याचे सांगताना तुकोबाराय त्याला ‘अबळा’ आणि ‘भुलवणा’ म्हणून वर्णन करतात. याच्या रूप गुणांनी जीव मोहित होतो, स्वतःला विसरतो. भगवंताचा संग हाच साधकाचा किंवा भक्ताचा छंद बनतो. हा भगवंत अशा वेळी ‘अबळा’ होऊन स्वतःचे सारे सामर्थ्य विसरतो. मग तो लुब्ध होऊन बासरी वाजवतो, रास खेळतो, वेगवेगळे खेळ खेळतो. इथे असाही अर्थ घेता येतो की, जीवाला भुरळ घालणार्‍या भगवंताच्या रूप-गुणांचे वर्णन करण्यासाठी जीव दुबळा ठरतो.
 भगवंताच्या उत्तम गुणांचे वर्णन केल्यानंतर तुकोबाराय भगवंताचे असे गुण वर्णन करतात, ज्यामुळे वरवर पाहता त्याच्या ठिकाणी अवगुणांचे आरोपण केल्यासारखे वाटावे. ‘गांढ्या’, ‘बराडी’, ‘ओंगळ’ आणि ‘भ्याड’ अशी विशेषणे ते योजतात. प्राकृत भाषेतील हे शब्द अधिकच प्रभाव दाखवितात, निंदनीय अर्थ प्रकट करतात. हे चारही शब्द भगवंताचे ज्ञान-रूप-गुण-ऐश्वर्य झाकोळून टाकणारे वाटतात. तथापि, या शब्दांचा लक्ष्यार्थ चांगला आहे. त्यातून भगवंताचा स्वभाव उलगडून दाखविला जात आहे.
 ‘गांढ्या’ शब्दाने षंढ, दुबळा, भित्रा असा अर्थ दाखविला जातो. तुकोबारायांनी, त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहणार्‍या विठ्ठलाला, अन्य एका अभंगात ‘काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शक्तिहीन झाले दिसा ॥’ असे म्हटलेले आहे. यावरून असे दिसते की, भगवंताच्या प्राप्तीसाठी उत्कट भावावस्थेत साधकाच्या सहनशीलतेची परिसीमा जेव्हा गाठली जाते, तेव्हा भगवंताची अविचलता साधकास किंकर्तव्यमूढ किंवा अगतिक बनवते आणि तो मग भगवंताला जागे करण्यासाठी त्याच्यावर अवगुणांचे आरोपण करतो. अर्थात् भगवंताला ते आवाहनस्वरूप असते किंवा ते त्याचे कौतुक सांगणेच असते. त्यात अन्य भाव नसतो. भक्तांच्या भावाला भुललेला भगवंत मग भक्ताचा अंकित, त्याच्या आज्ञेत निरपेक्षपणे राहणारा सेवक होतो. भक्ताचा जसा भाव असेल तशी रूपे तो धारण करतो.
 ‘बराडी’ या शब्दाने ‘आशाळभूत्, हावरा, खादाड’ असे अर्थ दाखविले जातात. नामदेवराय एका अभंगाची सुरुवात करताना म्हणतात, ‘भक्तांची आवडी मोठी त्या देवासी’ आणि पुढे वर्णितात, ‘धर्माचिये घरीं उच्छिष्ट काढी । जाहला बराडी देवराव ॥’ रामाने शबरीची उष्टी बोरे प्रेमाने खाल्ली, तर कृष्णाने सवंगड्यांसह वृंदावनात काला केला. कृष्णाच्या दर्शनाने मुग्ध झालेल्या विदुरपत्नीने सोललेल्या केळांच्या साली त्याच्या हाती दिल्या, त्या या भक्तवेड्या भगवंताने आनंदाने खाल्ल्या. भगवंताने आपला ‘बराडी’पणाचे स्वरूप स्वमुखाने सांगताना म्हटले आहे, ‘पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ (जो कुणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी देऊ करतो, त्या शुद्धबुद्धी निष्काम प्रेमी भक्ताने अर्पिलेले जे काही असेल, ते मी सगुण रूपात प्रकट होऊन भक्तप्रेमलोभा पोटी आनंदाने खातो.) (गी.९.२६)
 पुढे तुकोबाराय भगवंत ‘ओंगळ’ असल्याचे सांगताना हा कुब्जेशी रत होतो असे म्हणतात. कुब्जा ही कंसाची एक दासी. ती तीन ठिकाणी वाकडी होती. तिचे घर पांथस्थांसाठी विसाव्याचे एक ठिकाण होते. तिच्या शारीरिक दुर्बलतेमुळे तिला कंसासाठी चंदनाची उटी उगाळून देण्याचे काम देण्यात आले होते. त्या कामात मात्र ती निपुण होती. कृष्ण-बलराम मथुरेत गेले असताना आणि राजपथावरून चालताना कुब्जेने त्या दोघांना पाहिले. उटी घेऊन ती राजप्रासादाकडे निघाली होती. सुंदर, देखण्या स्त्रियांना ज्याचा मोह टाळता येत नाही, त्याचप्रकारे कुब्जेच्या मनातही कृष्णाविषयी भावभावना जाग्या झाल्या. तिलाही कृष्णाचा मोह पडला. परंतु, आपले ओंगळ रूप आठवून ती मनातल्या मनात खट्टू झाली. तिच्या मनातील भाव जाणून कृष्णाने तिचे कौतुक करीत उटीची मागणी केली आणि तिच्यावर कृपा करण्यासाठी तिच्या पावलांवर पाय ठेऊन तिची हनुवटी वर खेचली. त्यायोगे कृष्णाचा संग झाल्याने ती सुंदर रूपवती झाली. तिने कृष्णाला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. तिला आश्वासित करून श्रीकृष्ण-बलराम पुढे कंसाच्या राजप्रासादाकडे धनुर्यज्ञासाठी गेले. अशा प्रकारे भगवंताने ओंगळ दिसणार्‍या त्रिवक्रा कुब्जेशी संग केल्याचे तुकोबाराय सांगतात.
 यानंतर तुकोबाराय अनंत म्हणविल्या जाणार्‍या भगवंताला ‘भ्याड’ असे विशेषण योजतात. ‘भ्याड’ या शब्दाने ‘भेकड, डरपोक’ असा अर्थ दाखविला जातो. सकृतदर्शनी दिसणारा हा अर्थ इथे घेता येत नाही, तर ‘भ्याड’=ब्याहडा’ असा अर्थ येथे दिसतो. अद्वेष्टा असणारा अनंत, अत्यंत पापी लोकांसाठी ‘ब्याहडा’ म्हणजे कठोर, निबर होऊन त्या नराधमांना पुन्हा पुन्हा क्रूर योनींमध्ये जन्माला घालतो, ज्यायोगे ते पापात्मे पवित्र होऊन आपले कल्याण करून घेतील. (भ.गी.१६/१९) भगवंताशी सन्मुख असणार्‍यांसाठी मात्र तो मेणाहून मऊ होतो.
 तुकोबाराय पुढे सारांशाने सांगताना म्हणतात, भावविव्हल भक्तांच्या संगे सुख भोगण्याचे खेळ असोत् किंवा दुर्जनांचा द्वेष करीत त्यांना शासित करण्याचे खेळ असोत्, ते या भगवंतानेच खेळावेत. अन्य कुणाला त्याच्या नखाचीही सर येणार नाही. वेगवेगळ्या प्रसंगी अनंत रूपे धारण करणार्‍या या नटवराचे सामर्थ्य त्याच्या अगम्य लीलांवरूनच ओळखावे (अवगावा). हा जीवाच्या अंतःकरणात लपून बसतो आणि सारे खेळ त्याच्याकडून खेळवून घेत राहतो. अज्ञानी जीवाला मात्र तो दिसत नाही किंवा ओळखता येत नाही. सगळे हे तथ्य जाणतात, नाही असे नाही, पण स्वसामर्थ्याने, ज्ञान-वैराग्यादिकांच्या द्वारे किंवा कोणत्याही लौकिक साधनांनी तो जीवाला सापडणारा नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत जीवाच्या ठायी अहंता-ममता ही दोन टोके असणारे दोरी आहे, तोपर्यंत त्या दोरीने या भगवंताला बांधून ठेवता येत नाही. ही दोरी सदा आखूडच पडत असते.
 तुकोबाराय शेवटी म्हणतात, याची उंची अफाट आहे, ती मोजता येणारी नाही. तसेच, तो इतका सूक्ष्म आहे की, हा त्रैलोक्याधिपती, सर्वतंत्र, स्व-तंत्र असलेला अनंत, पण कुठेही त्याचे अस्तित्व दाखविता येत नाही. श्रुती म्हणूनच त्याचा महिमा गाताना त्याला ‘अणुरणियान् महतो महियान्’ म्हणतात. तुकोबारायांना अशा या भगवंताची आत्मप्रचिती आलेली आहे. त्यांनी त्याला आतुडला आहे. त्यांनी या भगवंताची अशा प्रकारे या अभंगाद्वारे वाक्-पूजा केली आहे. भगवंताला पूर्ण जाणले आहे. त्याच्या पूजेच्या नावाखाली केवळ प्रदर्शन वाटेल असे वायफळ श्रम केलेले नाहीत. त्यांची पूजा वरपांगी (आहाच) नाही.
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)