वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, 'ते' येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये

बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये

                                         - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==