पहा नाठाळ चालवती कशी लाठी, तुकारामा!

गझल
वृत्त: वियद्गंगा
लगावली: लगागागा/लगागागा/लगागागा/लगागागा
**********************************

पहा नाठाळ चालवती कशी लाठी, तुकारामा!
सरळ होतील ते, हाणा तुम्ही काठी, तुकारामा!!

पशूवत माणसांना माणसे बनवायचे आहे.......
असू द्या आज गाथा आमच्या गाठी, तुकारामा!

पहा ही झुंडशाही, दांडगाई अन् अनागोंदी........
पुन्हा या एकदा अमुच्या भल्यासाठी, तुकारामा!

कशी लोकांस शिकवावी अता ज्ञानेश्वरी, गाथा?
करंट्यांच्या कपाळावर, पहा आठी, तुकारामा!

मनस्वी, स्वैर सुटलेले किती मोकाट हे नेते........
करावी गय उनाडांची कशासाठी, तुकारामा?

उतारू या समाजाच्या गळी गाथा, तुकारामा......
असू द्या हात तुमचा आमुच्या पाठी, तुकारामा!

पहा बाजार वाळूचा, भुईचा पोचला गगनी.........
पहा उद्योग लोकांचे नदीकाठी, तुकारामा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१