सगळे काही आंतरराष्ट्रीय !

     'आम्ही जागतिकीकरणात वाढलो', हे एक पिढी सांगू शकेल एवढा काळ जागतिकीकरण सुरु होऊन झालेला आहे. या काळाच्या सुरुवातीला जागतिकीकरणाबद्दल माझ्या मनात काही क्रांतिकारी विचार आले होते. त्यांचे स्मरण अलिकडेच झाले.
     जागतिकीकरण झाल्यापासून प्रत्येक गोष्टीचा दर्जा आंतरराष्ट्रीय झाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यापासून मुख्य संत्र्यापर्यंत सगळ्यांना वाटू लागले. कसे वाटू लागले, हे त्यांनाही सांगता येणार नाही. कदाचित् 'ग्लोबल लेव्हल' हा शब्द विविध माध्यमांतून कानावर पडत असल्याने तसे झाले असावे. हा संज्ञा इतकी वापरली जाते की, शब्दकोषाच्या यानंतरच्या आवृत्तींमध्ये बहुतेक 'ग्लोबललेव्हल' हा एक सलग शब्द 'जी' मध्ये लिहिलेला असेल.
     माझ्यावरही आंतरराष्ट्रीय परिणाम होऊ लागला होता. मला माझं दैनंदिन जीवन काहीच्याकाही वाटू लागलं होतं. अखेर, एके दिवशी सकाळी मीही विचार केला की, आपणही आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवायची. उठल्यानंतर सर्वात जी पहिली गोष्ट (बहुसंख्याकडून) केली जाते त्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा आणायचा या विचारात मी काही घटिका बुडवल्या. कमोड पध्दतीचा स्वीकार आपण केलेला आहेच, त्यात आणखी दर्जा कसा आणायचा यावर मी खूप चिंतन केल्यानंतरच निर्णय घेणार आहे. तूर्तास, तपशिलात जाणार नाही. 
     जागतिक विचाराने पछाडल्यावर प्रत्येक गोष्ट फालतू उर्फ देशी वाटू लागली. दात घासायच्या ब्रशमध्ये प्रचंड सुधारणेच्या जागा दिसू लागल्या. त्यातील एक : त्या ब्रशची लांबी व थोडी लवचीकता वाढवून दाढांच्या मागेही तो विनासायास जाऊन परिसराची नीट सफाई करुन येईल अशी व्यवस्था करणे शक्य आहे, असे वाटले. अक्कलदाढ येत असलेल्यांसाठी ते विशेष फायदेशीर ठरेल. 
     आवरून बाहेर पडलो. गाडीला किक मारली आणि इथेच दर्जातील बदलाची गरज लक्षात आली. पाय लागल्यालागल्या गाडी सुरु झाली पाहिजे, किक मारायची गरज नाही इतका विकास कंपन्यांनी केला पाहिजे. गाड्या हाताच्या बोटांनी बटन स्टार्ट होऊ शकतात तर पायाची बोटे लागताक्षणी का सुरु होऊ नये ? कंपनीच्या मालकांना एक सूचनापत्र पाठविण्याचे नक्की केले. जाताजाता अनेक सिग्नल लागले. बरेचसे बंद असल्याने प्रवास विनाअडथळा झाला. सिग्नल यंत्रणा अत्युच्च आंतरराष्ट्रीय दर्जाची करून दिवसातील कोणत्या वेळी ते सुरु असतात याची माहिती घरच्या घरी मिळेल, अशी व्यवस्था करायला हरकत नाही, असा विचार मनात विजेसाऱखा चमकून गेला. 
     जाता जाता चाक पंक्चर झालं. पंक्चरवाल्या अण्णाकडे गाडी नेली. (नाना, अप्पा, तात्या ही नावेही या लोकांनी आता हळुहळू घेतली पाहिजेत. प्रत्येकवेळी हा माणूस 'अण्णा'च कसा असतो ?) त्याने चाक काढल्यावर मी डायलॉगची वाटच पाहत होतो – पूरा गयेला है, साब. नया ट्यूब बिठाना पडेगा. 
...आणि काय आश्चर्य !  त्याने असे काहीही म्हटले नाही. 
"तीन पॅच लगाना पडेगा." 
"ये पंक्चर क्यों होता है, मालूम है ?" 
"क्यों बोले तो....छोटे छोटे कील, पत्तर." 
"वो मुझेभी मालूम है. मैं बताता हूँ. तुम्हारा पॅच बहोत लोकल है. उसका लेव्हल बढाओ."
"बढाया साब. एककी जगह दो दो चिपकाये."
"उस लेव्हलकी बात नही  कर रहा हूँ. इंटरनॅशनल लेव्हल करो." 
मी त्याला एक मोठे व्याख्यानच दिले. 
तो म्हणाला, "कितना भी करेंगा ना तो बी कुछ नही होयेंगा. जब तक रस्ता विंटरनॅशनल नही होना, तब तर ऐसाईच पंक्चर होना.
अण्णा बराच शहाणा होना, म्हणजे होता. 
     एटीएम सेंटरला गेलो. या सेंटरमध्ये काही माणसे बाहेर येण्यास अपेक्षेपेक्षा फार वेळ लावतात. त्यांचे नुसते आत जाणे व येणेही अत्यंत अभ्यासू व श्रध्दायुक्त असते. नशीब अजून चप्पल काढून आत जाणारा कुणी दिसला नाही. 'एटीएम सेंटर्स : एक चिकित्सक अभ्यास’  असा विषय डॉक्टरेटसाठी विद्यापीठात नोंदला गेला असल्यास कल्पना नाही. काही जण भोज्याला शिवून आल्यासारखे पटकन बाहेर येतात. त्यांचा नेमका उद्देश कळायला मार्ग नसतो. काही जण आणखी एकाला (किंवा एकीला) आत घेऊन खल करत बसतात. कोणता माणूस किती वेळ आत राहणार आहे, याची मनाच्या स्पंदनांवरुन चाचपणी करण्याची एक यंत्रणा बनवावी असे मनात आले. खूपच आंतरराष्ट्रीय प्रकार होईल हा.
     पुस्तकाच्या दुकानात शिरलो. प्रत्येक पुस्तक स्वतःची जागा सोडून दुसरीकडे होते. काय होतं की, पुस्तक चाळता चाळता दुकानात आलेला माणूस हलके हलके चालू लागतो आणि खांबावर किंवा काऊंटरवर येऊन धडकतो. किंमत विचारतो. ती कळल्यावर पुस्तक जवळच्याच रॅकवर ठेवतो आणि बाहेर पडतो. दुकानात शिरल्याशिरल्या शीर्षकांऐवजी किंमतच आधी कळावी, अशी काही सोय असल्यास तो बदल आपल्याकडेही करावा व दुकानाचा दर्जा आंतरराष्ट्रीय करावा, असे वाटते. सर्वात जास्त किंमत लाल रंगात रंगवावी कारण लाल रंग धोक्याची सूचना देतो. 
       मित्राकडे गेलो. दोघे हॉटेलमध्ये गेलो. वेटरने चहा आणला. मित्राला विचारलं,
"काय रे, आपल्याकडे चहा फार फार तर आसाम किंवा दार्जिलिंगमधून येत असतो ना ?" (आपली चहाबद्दलची माहिती यापुढे सरकलेली नाही.) 
"हो. का?"
"म्हणजे, सर्व भारतीयांना देशीच चहा प्यावा लागतो. सर्वांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा चहा मिळेल, अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे. जग कुठे चाललंय आणि आपण कुठे आहोत?" 
"पण आंतरराष्ट्रीय म्हणजे काय ? "
"जे राष्ट्रीय नाही नाही ते. आता असं पहा, तू आणि मी एकमेकांना चहा पाजतो ते राष्ट्रीय झालं. दोन राष्ट्रे एकमेकांना पाजतील तो आंतरराष्ट्रीय चहा." 
"अरे, पण कुठलाही चहा आणला तरी त्याची चव बदलणार आहे का ?"
"बदलते, मित्रा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हाच चहा पितात, असे सांगून पहा फक्त. पिणाऱ्याला लगेच वेगळी चव लागेल." 
"आणि कपांचं काय ?"
"तेही आंतरराष्ट्रीय बनवायचे." 
"म्हणजे, जगातल्या सर्वात उंच म्हणजे दुबईतल्या त्या उंच हॉटेलमध्ये हेच कप वापरतात असे सांगायचे. बरोबर ना ?" 
"दुबई म्हणजे आंतरराष्ट्रीय ? उद्या तू इस्लामाबाद म्हणशील." 
"अरे यार...
"हेच ते. आता हा 'यार’. 'मित्र’ म्हणायचं. आपल्या खऱ्या शब्दांचा सर्वत्र प्रचार करायचा. मित्राला यार बनवण्याची गरज नाही. आपल्या शब्दांच्या प्रसारामुळे मराठी आंतरराष्ट्रीय होऊ शकेल. 
"पण कशाला ? 
"तुझ्यामाझ्याशिवाय मराठी कळते का कोणाला? कळणे आवश्यक आहे."
"कळते की. तुझ्या वडिलांना. माझ्या वडिलांना.
"तसं नाही. महाराष्ट्राबाहेर कोण बोलतं मराठी ?
"बोलतात. महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेले मराठी लोक."
"पुन्हा पाचकळपणा. अरे, परदेशीय कोण बोलतात ?
"बिल गेटस् ला 'नमस्कार’ शब्द माहीत आहे. 
"एका शब्दाने काय होणार आहे, अख्खी भाषाच शिकbली पाहिजे. म्हणूनच मराठीतील विविध बोली एकत्र करुन 'एक स्टेट ऑफ द आर्ट’ मराठी बनवली पाहिजे आणि तीच आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केली पाहिजे. "
"मराठी कधीच पोचली आहे आंतरराष्टीय पातळीवर. बघ ना, मराठीतला ‘कुमार’ शब्द घेऊन नाही का संगकारा कुटुंबाने त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं. 'शंकराची पिंडी’ मधला ‘पिंडी’ रावळपिंडी मधे आहे. बरोबर ना ?"
"बरोबर."
"आपल्याकडे आई जेव्हा हाक मारते, तेव्हा बाबा काय करतात ?"
"दुर्लक्ष."
"अरे, तसं नाही. काय देतात ?"
"जांभई."
अरे, 'ओ’ देतात. द्यावीच लागते. त्यातला 'ओ’ घेऊनच बराकने आपल्या आडनावात घातलाय. मिशेलच्या हाकेला त्यांनी कायमस्वरुपी 'ओ’ देऊनच ठेवली आहे. गेली आहे की नाही मराठी आंतरराष्ट्रीय पातळीवर?
"खरंच की मित्रा."
"आता ज्याची देशाला गरज आहे त्या गोष्टी आंतरराष्ट्रीय करणे गरजेचे आहे." 
"म्हणजे?"
"आपल्याकडे बॉम्वस्फोटानंतर सगळे कामाला लागतात. पोलीस, मंत्री, पत्रकार, गुप्तहेर. सगळ्यांपाशी असलेली यंत्रणा आंतरराष्ट्रीय पाहिजे. सगळ्यांचा आपापसातला संवाद एकदम सफाईदार झाला पाहिजे." 
"फरक एकच. ही यंत्रणा स्फोटाच्या आधी कामी आली तर उत्तम म्हणजे स्फोट घडूच नये यासाठी प्रयत्न करता येतील." 
"बरोबर अगदी." 
घरगुती विषय आंतरराष्ट्रीय करण्यापेक्षा हे असेच विषय आंतरराष्ट्रीय केले पाहिजेत, यावर आमचं मतैक्य झालं आणि आमची आंतरराष्ट्रीय चर्चा आम्ही देशी चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकली. 
- केदार पाटणकर