पावसाच्या सरी

   पावसाच्या सरी

कळंना तऱ्हा,
पावसाची अशीकशी
नको तेव्हा कोसळून
केली वाटमारी,
आता जणू मृगातही
भोगी कुठे अंधारी
आजा माझा सांगायाचा
गोष्ट पावसाची न्यारी,
होई सांगतांना त्याचा उर
ढग आषाढाचा भारी
सांगायाचा तो,
वळवा पासून ते चारी महिने
अशा झडायाच्या सरी,
असा गाळ गुडघाभर नि 
असा भरुनी धावायाचा
वहाळ नि पाटचारी
मुश्किलीनं मोठ्या,
पडायाचो आम्ही दारी,
पेटवूनी कधी भुसा
बसायचो आम्ही घरी
ऐन पावसाळ्यात आता
जातो मी गारव्याला पारावरी,
आठवून गोष्ट आज्याची
मित्रांसंगे घेतो भिजुनी अंगभरी
परवा पोरानं माझ्या,
धरली माझ्या पुढं वही
म्हणे सांग निबंधासाठी
चार ओळी पावसावरी
हबकलो मी, गलबललो
दोन थेंब टपकन
पडले त्याच्या वहीवरी,
गडबडूनी विचारी तो
सांग डोळ्यांची का तुझ्या
तुंबली पाटचारी ?
बोललो दाटल्या कंठी मी
नाही रे पोरा नाही
याच आहे आता पावसाच्या सरी........!!!
                      -उद्धव कराड (मो. नं. ९८५०६८३०४५)
                        मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.