येड...

येड्यागत करायचा आबा कधी कधी...
चिडचिड करत पडवीम्होरं जायचा,
तावातावानं आभाळाकं हात नाचवत
म्हणायचा, 'पड की रं भाड्या एकदाचा'...


सवताचा बैल करून नांगारली जिमीन,
पोरांच्या ताटातलं काढून दाणं पेरलं...
समद्या दुन्नयेवर पसरलासाकी तू
तुझ्या डोळ्यानं नसंल का हेरलं?...
पड की रं भाड्या एकदाचा...


चावडीवरचा रेड्यो सांगत सुटायचा,
अमक्या राज्यात ढगफुटी,
तमक्या राज्यात पूर...
तापल्या सुर्व्यागत व्हायचा आबाचा नूर...
मग चप्पलच भिरकवायचा आभाळावर...
म्हणायचा, 'हांगं तिथंच घाल तुझी,
आमी हितं आमची घालतो...
तिथं ढगापल्याड लेका...
उरफाटाच कारभार चालतो'...


कोरड्या खोल हीरीच्या तळाशी
त्याला कायबी दिसायचं...
त्याचं हिरवं सपान बहुतेक
सुकून पडलेलं असायचं...
मग कसनुसा हासत म्हणायचा,
'पानी ह्येच जीवन...
पानी न्हाय तर....?


कधीकधी पिपळाच्या पारावर
दोर वळत बसायचा...
भुंड्या बोडक्या झाडाला बघत
परत कसनुसा हासायचा...
म्हणायचा,
'लेका, हीरीपेक्षा का नाय,
ह्यो पिपळंच बरा...
धा परस खोल जाऊन
माझं मढं आनायचा ताप
लेकरांनी कशाला करा...


मग परत आरोळी ठोकायचा,
'पड की भाड्या आतातरी...
का आता हे जिनंच गहान ठेऊ...
का ह्या दोरखांडाला लटकून...
ढगात जाब इचाराया येऊ...
पड की रं भाड्या,
का आता येऊ आभाळामधी?...


...शेवटी शेवटी
येड्यागत करायचा आबा कधीकधी ...