हा चंद्र असा...

हा चंद्र असा, जणु शुभ्र ससा
मेघांच्या रानी पळतो...
झाडातून निंबोणीच्या
तुझे नाव घेऊनी छळतो...

मी पत्र तुला लिहीताना
खिडकीतच येऊन बसतो...                
फसलेल्या उपमांवरती,                    
मग उपहासाने हसतो..                
प्राजक्त खुळ्या शब्दांचा    
निष्पर्ण होऊनी गळतो...         
   
मी झुरतो इथे असा अन्
तो निंबोणीच्या मागे...
रात्रींतून चांदणवेड्या
दोघेही असतो जागे...
गुलमोहर चिंब स्वरांचा
या अंगणात ओघळतो...   
    
तू अंगणात अवतरता
हा विसरून जातो सारे...
की बघुन तुला ह्याच्याही
डोळ्यांत चमकती तारे...?
का उगाच मग तो रुसतो,         
का तुझ्याचवरती जळतो...

हा चंद्र असा, जणु शुभ्र ससा
मेघांच्या रानी पळतो...
झाडातून निंबोणीच्या
तुझे नाव घेऊनी छळतो...