अस्तु !

२६ जुलै २०१४ ,शनिवारी संध्याकाळी फ्रांकफुर्टमध्ये डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत 'अस्तु' नावाच्या मराठी सिनेमाचा खेळ आणि त्यांच्याशी गप्पा असा कार्यक्रम आहे.. हे समजल्यावर तिथे जायचे हे लगेचच ठरवले. फ्रांकफुर्ट आणि आसपासच्या गावातून जवळपास ४० एक मराठी मंडळी एकत्र आलेली पाहण्याचा इतक्या वर्षातला हा आमचा पहिलाच प्रसंग! एवढे मराठी लोकं इथे आहेत.. हा सानंदाश्चर्याचा धक्काच होता.
डॉ.आगाशे आले. चित्रपटाबद्दल चर्चा सिनेमा पाहून झाल्यावर करू पण चित्रपट म्हणजे मनोरंजन! हा चष्मा उतरून शिक्षण, प्रबोधन ह्या दृष्टीने त्याकडे बघायला सांगायची,शिकवायची गरज निर्माण झाली आहे आणि जो सिनेमा पाहिल्यावर मनात प्रश्न निर्माण होतात तो चांगला सिनेमा! हा विचार त्यांनी दिला आणि चित्रपटाला सुरुवात झाली.

ही गोष्ट आहे बाप आणि मुलीच्या अनेकपदरी नात्यातली. खरंतर माणसांमधल्या नात्यांच्या स्वीकृतीतली!
अप्पा म्हणजे डॉ.चक्रपाणि शास्त्री! संस्कृतपंडित, ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे निवृत्त डायरेक्टर! त्यांच्या दोन्ही सुविद्य मुली इरा आणि राही, डॉक्टर जावई माधव,नातवंडे.. असे सगळे उच्चशिक्षित,सुसंस्कृत कुटुंब!अप्पांना विस्मरणाचा त्रास सुरू होतो आणि डॉ.शास्त्रींच्या डिमेन्शियाशी जुळवून घेण्याचा त्यांची मुलगी इरा आणि जावई डॉ. माधव करत असतात. आपल्या प्रकांडपंडित वडिलांना असा त्रास आहे हे स्वीकारण्यातला तिचा मानसिक झगडा, त्याचे अनेक पापुद्रे उलगडताना दिसतात.

एके दिवशी अप्पा नाहीसे होतात.. एका भटक्या हत्तीवाल्याच्या मागे ते जातात आणि ते अडाणी कुटुंब केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांची देखभाल करते. त्यांना अप्पांचं मोठेपण माहिती नसतं आणि आकळण्याची पात्रताही नसते, तरीही हा कोणी देवाघरचा अश्राप जीव आहे,त्याचं वृद्धपण संपून मूलपण सुरू झालं आहे, आपली दोन मुलं तसंच हे तिसरं ..इतकी सहज स्वीकृती ती अडाणी बाई करते.

इकडे इरा अप्पांना शोधताना घायकुतीला येते,नकळत स्मृतींमध्ये डोकावते. इरा आणि राही दोघींना वाटतं राहतं अप्पांचा आपल्यापेक्षा दुसर्‍या मुलीवर जास्त जीव आहे. दोघींच्या मनात असलेली एकमेकींबद्दलची सुप्त असूया फार सूक्ष्मपणे दाखवली आहे.गुप्तेबाई आणि अप्पांचं बहुपेडी नातंही तसंच हळुवार उलगडले आहे. गुप्तेबाईंकरता 'सर' म्हणजे जणू देवच तर अप्पांच्या घरातल्या लोकांच्या मनात ते नातं उगाचचं गढुळलं आहे. मानवी मनाचे कंगोरे कितीपदरी असतात ते येथे सहजपणे स्पष्ट जाणवून जाते.

राही,धाकटी बहीण मात्र वास्तववादी विचारांची असते. एखाद्या माणसाच्या मेंदूतून स्मृती पुसल्या गेल्या म्हणजे त्याचा मेंदू जणू मृतच झाला , ती व्यक्ती मृत:प्रायच! असे तिचे लॉजिक तर इराच्या मनात मात्र आपले आईवडील आपल्या मनात कायम अमरच असतात ही भावनिक गुंतवण!

तिकडे अप्पा मात्र मेंदूने पुसून टाकलेला भूतकाळ आणि अस्तित्वातच नसलेला भविष्यकाळ घेऊन फक्त वर्तमानातले क्षणक्षण हत्तीवाल्या अंता,चिन्नम्मा आणि त्यांच्या मुलांबरोबर जगत असतात. आपली पत,प्रतिष्ठा,हुद्दा सारे,सारे काळाच्या पडद्याआड टाकून.. "आई भूक" असं चिन्नम्माला लहान मूल होऊन म्हणतात. जणू ते डॉ. शास्त्री राहतच नाहीत तर कोणी वेगळीच व्यक्ती बनतात, वर्तमानातच जगणारं एक निरागस लहान मूल! आणि आईच्या मायेने अडाणी चिन्नम्मा आपल्या दोन मुलांबरोबर त्यांना खेळायला सांगते, नकळत हे सत्य ती किती सहजपणे स्वीकारते.

वस्तुनिष्ठ राही पोलिसतपास झाला की समजेलच ,त्याकरता लेक्चर न बुडावे म्हणून परत जायला निघते आणि इरा वडिलांचं असं नाहीसं होणं आणि संध्याकाळी असलेला मुलीचा नाटकाचा प्रयोग.. ह्या कात्रीत सापडते. शेवटी विचारांवर भावना प्रबळ होऊन राही अर्ध्यातून परत येते.

अंता जेव्हा कुटुंबाला घेऊन दुसरीकडे जाण्याचे ठरवतो, तेव्हा अप्पा त्यांच्याबरोबर जातात का? ते पोलिसांना सापडतात का? त्यांचे 'अप्पा न राहणे' इरा स्वीकारते का? हे समजण्यासाठी  हा चित्रपट पाहायला हवा.

डिमेन्शिया,अल्झायमर वर आतापर्यंत हिंदी मराठीत अनेक सिनेमे आले तरीही त्यांच्या गर्दीत हा सिनेमा वेगळा राहतो.
अस्तु- "So Be It", किवा मराठीत नुसतंच 'असो'..
ह्या नावामागचं कारण डॉक्टरांना विचारलं असता ते म्हणाले.. असो किवा अस्तु.. हे स्वीकृती दर्शवतात. acceptance! ती व्यक्ती आता पूर्वीची व्यक्ती राहिलेली नसून कोणी एक नवीन व्यक्ती आहे, असं समजून घेण्याचा, स्वीकार करण्याचा दृष्टिकोन विचारात घ्यायला हवा.. हे शीर्षकातून सांगायचे आहे.

बुद्धी आणि स्मृतीचे प्रतीक असलेला हत्ती , रोजच्या व्यवहारात रस्त्याने हत्ती घेऊन जाणारे आणि त्यावर गुजराण करणारे भटके लोकं.. ह्याची उत्तम सांगड येथे दिसते. म्हणजे हत्तीचे रूपक वापरतानाच, अप्पांचे हत्तीवाल्याच्या मागे जाणे कृत्रिम , ठिगळ लावलेले वाटत नाही.

डॉ. मोहन आगाशे अप्पाच झाले आहेत तर नचिकेत पूर्णपात्रे आणि अमृता सुभाष ही अंता आणि चिन्नम्माच वाटतात.. इरावती हर्षेची मुलीच्या मनातली उलाघाल खरीच वाटते तर देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण यांची सुयोग्य साथ लाभली आहे.
सुमित्रा भावेंची कथा,पटकथा असून दिग्दर्शन सुमित्रा भावे,सुनील सुकथनकर या जोडीचे आहे.
१०फ,वास्तुपुरुष,नितळ,दोघी अशा अनेक अनवट चित्रकर्त्या भावें-सुकथनकर जोडीचा सिनेमा आहे म्हणजे तो कसदार असणारच ह्याची खात्री होतीच.
हा सिनेमा आपण फक्त पाहत नाही तर अनुभवतो. सिनेमातल्या गोष्टीच्या पलीकडची गोष्ट अनुभवण्यासाठी पाहायलाच हवा असा चित्रपट!
सिनेमानंतर डॉ. आगाशेंनी त्यावर केलेले भाष्य,प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे यातून तो जास्त उलगडत गेला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कार मिळवून आता हा चित्रपट दि. १-८-१४ रोजी भारतात प्रदर्शित होत आहे.

ह्या चित्रपटाची झलक येथे पाहता येईल..दुवा क्र. १