सोबत

शनिवारी रोहन बिल्डिंगखालूनच नाश्ता करून आला. त्याने ऑफिसचा शर्ट काढला, घरातला घातला. कुलुप लावून वळला तर समोरच्या दारात एक मुलगी होती. रोहन कसनुसं हसला. तीही हसली.
     रोहन खाली उतरला. फिरायला चालत चालत खूप दूरवर गेला. नव्या शहरातला हा भाड्याने घेतलेला फ्लॅट उत्तम असल्याचे त्याने गेल्या आठवड्यात घरी कळवले होते. फ्लॅट ऑफिसच्या जवळच होता. आज ऑफिसमधल्या त्याने इतर काही गोष्टी सांगितल्या. कॉलनीतल्या काही गोष्टी सांगितल्या. खूप भटकून हॉटेलमध्ये जेवायला गेला.  
     एका बुधवारी त्याने घरीच सँडविचेस बनवली. इंग्लिश सिनेमांचा चॅनल लावून बसला. दरवाजाबाहेर काहीतरी वाजले म्हणून त्याने दार उघडले तर वॉचमन होता. पाण्याचा सप्लाय कसा आहे, विचारायला आला होता. काही प्रॉब्लेम असेल तर तक्रारबुकात लिहा म्हणून सांगून गेला. समोरच्या फ्लॅटचे दार उघडले गेले आणि खिदळत दोघी-तिघी बाहेर पडल्या. आपापसात विनोद करून झाल्यावर म्हणाल्या, " चल, येतो गं. घे काळजी."
     ती त्यांना पोचवायला जिन्यापर्यंत गेली. हसून तिने दार लावून घेतले. 
     एकदा बँकेच्या कामासाठी त्याने सोमवारची सुटी टाकली होती. शिट्टी वाजवतच तो बसमधून उतरला. सहकाऱ्यांकडे पाहून हात हलवला आणि चालत चालत बिल्डिंगच्या जवळ आला. अचानक एक फुटबॉल त्याच्या पायाशी आला. मैदानकडे पाहून त्याने तो पायाने जोरात मारला. मैदानाकडून ‘थँक्स, अंकल’ च्या आरोळ्या आल्या. बिल्डिंगच्या आवारात ‘मुळा कसा दिला ?’‘ नीट भाव लावा ’ असे बडबडण्याचे आवाज येत होते. बाके म्हातारे, म्हाताऱ्यांनी भरून गेली होती. काही छोटी मुले खेळत होती. अशाच एका बाकावर ती येऊन बसली. बिल्डिंगमधल्या मैत्रिणीबरोबर. अस्फुट आवाजात काहीतरी बोलणे सुरु झाले. ते पाहत पाहतच रोहन लिफ्टने वर निघून गेला. तिनेही आपल्याकडे थोडे पाहिले की काय, असे त्याला वाटले.
     रविवारी अगदी सकाळी दात घासताना समोरच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी आल्याचं जाणवलं. काही वेळाने कचरेवाला आला. कचरा देण्यासाठी त्याने दार उघडले तर तीही कचरेवाल्याला कचरा देत होती. दोघांनी कचरा दिला आणि दारे लावून घेतली. त्याच्या गॅलरीतून तिची गॅलरी दिसायची. थोड्यावेळाने ती रोपांना पाणी घालायला आली आणि रोहन गॅलरीत सहज आला. सगळ्या रोपांची नावं त्याला माहीत नव्हती. एकदा सगळी नावे विचारून घ्यावीत, असे त्याला वाटायचे. गॅलरीत आले की, बरेचदा संगीतही ऐकू यायचे. रोहनने दाढी करायला घेतली आणि गालाला ब्लेड लागले. रोहनने झटकन बाहेर पडून समोरची बेल वाजवली. 
     " हळद आहे का? कापलंय.."
     " आणते. "
     हळुहळू चालत ती आत गेली.
          " धन्यवाद."
          " वेलकम." 
     तेवढ्यात मोबाईल किणकिणला. 
     बोल रे. नाही, नाही.चहा पावडर आणायला जात होतो. बोल...
     सगळा संवाद होईपर्यंत तो पॅसेजमध्येच होता. मोबाईल बंद करून तो उतरणार तेवढ्यात ती म्हणाली..
     "पावडर मी देते. तेवढ्यासाठी खाली कशाला जाता ? "
     "तुम्हाला कशाला त्रास?"
           "त्रास काही नाही. थांबा, आणते."
     
     पुढच्याच आठवड्यात संध्याकाळी त्याने एका सीडीबद्दल विचारले. ते त्याचे आवडते गाणे होते. तिने आणून दिली. 
     "मी देतो ऐकून लगेच."
     "घाई नाही. द्या सावकाश." 
     ती सीडी देत असतानाच लाईट गेले. पॅसेजमध्ये किंचित अंधार झाला. तिच्याशी बोलावं की लाईट गेल्याचं काहीतरी करावं, यात तो सापडला. 
          " लाईट किती वेळा जातात असे? म्हणजे मी नवीनच आहे ना इथे." 
    " जातात. जनरेटर आहे तसा. काही प्रॉब्लेम नाही". 
    " मग ठीक आहे. दिवसा गेले तर काही प्रॉब्लेम नाही."
    "रात्री नको जायला." 
     मिनिटभरात लाईट आले.
     
    एका शनिवारी बिल्डिंगची ट्रिप जाणार असल्याची नोटीस फिरली. रोहनला आधी ठरवलेल्या काही कामांमुळे जमणार नव्हते. दिवसभर कामे झाल्यावर रोहनने संध्याकाळी नळ दुरुस्ती, पॅसेजमधली साफसफाई या कामांचा सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन आढावा घेतला. घरी आल्यावर कॉफी घेता घेता दोन फोन झाले. टीव्ही लावला आणि आवडता इंग्रजी चित्रपटांचा चॅनेल लावला. चित्रपट रंगात आला, बेल वाजली आणि लाईट गेले. रोहनने दार उघडले तर ती. संपूर्ण पॅसेज अंधारलेला. आभाळ थोडे भरून आले होते. 
    "खूपच अंधार झाला, नाही ? " 
         " हो ना."
    " आमच्या घरातल्या ट्यूबचा आवाज झाला. बहुतेक फुटलीच ती. आता नवीनच आणायला लागेल. वॉचमनला सांगणार होते मी नवीन ट्यूब आणायला. तोही आता बिल्डिंगच्या कामात. "
     ती एका दमात, जरा गडबडीत बोलली असं रोहनला वाटलं. तिला मदत हवी होती की नुसतीच माहिती द्यायची होती, समजले नाही.
   " तुम्हाला ट्यूब हवी असेल तर मी देतो आणून." 
   " तो वॉचमन..."
      " मी आणतो खालून...
    तिने दार लावले. रोहन खाली जाऊन आला. फ्लॅटमधे परतला. 
   " नवीन आणली नाही. माझ्याच फ्लॅटमधली एक काढून आणली. लावतो. पण लाईट आल्याशिवाय काही उपयोग नाही."
         रोहनने ट्यूब लावली. तोपर्यंत तिने चहा करून टेबलवर ठेवला होता. अंधार वाढला. चहा घेऊन रोहन फ्लॅटवर परतला. त्यालाही त्याच्या घरी काहीच करता येण्यासारखं नव्हतं. खाली जाऊन वॉचमनला पाहून आला. काही वेळाने त्याने दोन मेणबत्त्या लावल्या. काहीतरी वाटून तो उठला आणि समोरच्या दाराची बेल वाजवली. धडपडण्याचा आवाज झाला आणि दार उघडलं गेलं. 
    " तुम्हाला मेणबत्ती हवी आहे का?" रोहनने विचारलं.
    " मिळाली तर बरं होईल. तशी एक घरात होतीच. आणखी एक.."
        "  अहो, मग सांगायचं ना. थांबा देतो."
         रोहनने एक मेणबत्ती आणि टॉर्चही दिला. 
    "मी एकदा वॉचमनला पाहून येतो."
    रोहन परत खाली जाऊन आला. जिने चढता चढता त्याला अस्फुट बोलणे ऐकू आले,"हो ना अगं. कोणीच नाही सोबतीला. काहीच दिसत नाहीये." 
          त्याची चाहूल लागताच फोन थांबला.
        " तुम्ही नीट दार लावून घ्या. काही लागलं तर सांगा." 
          रोहन स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेला. अंधारात मोबाईलवर गाणी लावली. तेवढे एकच काम तो करू शकत होता. लाईट लवकर येण्याची लक्षण दिसेनात.  रोहनने दोघा-तिघा मित्रांना फोन लावले. दोघांचे लागले नाहीत. एकाचा लागला पण कट झाला. त्याला कोणाशी तरी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं, ठरवलं नव्हतं. अंधार, थोडा उकाडा अशा वातावरणात त्याने थोडा वेळ काढला. रोहनने हॉटेलमधे जाऊन काहीतरी खाऊन यायचं ठरवलं. बाहेर पडला तशी तेही दार उघडलं.
    " येतो जाऊन. लाईट लवकर येण्याची चिन्हे नाहीत. जवळजवळ सगळी बिल्डिंग ट्रिपला गेली आहे. आपल्या मजल्यावरही फक्त आपणच न गेलेले. बाकीचे लोक गेलेत. तुम्ही कुठेही बाहेर पडू नका."
     " बरं. "
     रोहन हॉटेलमध्ये पोचला पण तिथे काहीही खाल्लं नाही. पार्सल घेतलं आणि परतला. कुलुप उघडत असताना ते दार उघडलं. 
     " तुम्ही खायला चालला आहात, माहीत नव्हतं. नाहीतर मी परोठे केले होते. तुमच्यासाठीही अजून दोन केले असते."
     "हरकत नाही. पुन्हा केव्हातरी. तुम्ही कशाला अंधारात....उलट, मीच आणलं असतं काहीतरी.."
     दोघेही एकमेकांना दिसत नव्हते. फक्त आवाज ऐकू येत होते.
     रोहनने स्वतःचं दार लावून घेतलं. स्वैपाकघरात मेणबत्ती लावली. खायला सुरुवात करणार होता पण तो ताट घेऊन हॉलमध्ये आला. ते दार वाजवलं.
     "मी असं करतो इथेच हॉलमध्ये जेवतो. तुम्हाला काही लागलं तर सांगा."
     "मीही हॉलचं दार उघडंच ठेवणार आहे. आत फार उजेड नाही."
    दोघांनीही आपापल्या घराच्या हॉलमध्ये जेवायला सुरुवात केली. रोहनने हॉलमधली मेणबत्ती घेऊन दोन्ही दारांच्या मध्ये पॅसेजमध्ये लावली. मेणबत्तीचा प्रकाश दोन्ही चेहऱ्यांवर एका बाजूने पडला. 
    शेवटी रोहनने सुरुवात केली,
    " तुम्ही कोण कोण असता इथे?
         " तशी आत्ता मी एकटीच. संदीप, नवरा माझा, टूरवर गेलाय. सासू-सासरे दुसरीकडे राहतात. मी त्यांच्याकडे जाते अधून मधून. तेही अधून मधून चक्कर टाकून असतात. गेल्या आठवड्यात आले होते पण त्यांनाही सतत इकडे येणे जमत नाही. मैत्रिणी येतात भेटायला. आज मैत्रिणी येणार होत्या पण लाईटमुळे घोळ झालेला दिसतोय. सासऱ्यांना फोन केला होता. त्यांच्याकडेही लाईट गेलेत...अशात बस, रिक्षा काही मिळणंही कठीण आहे. ही राधिकाही ट्रिपला गेली आहे. राधिका म्हणजे हा शेजारचा फ्लॅट."  
     काही क्षण शांततेत गेले.
     " तुम्ही एकटेच?"
           " सध्या तरी. महिनाभरापूर्वीच इथे ट्रान्सफर झाली. फ्लॅटची माहिती कळली आणि कंपनीजवळच असल्याने लगेच घेतलाही. आई-वडिलांचं चाललंय इकडे यायचं. कधी जमतंय पाहू या.
     "अजून कोणी ?"
           " लग्न ठरलंय. एकदा इथे सेटल झालो की, बायकोलाही आणणार आहे..."
            "काय नाव म्हणालात?"
          " संदीप." 
     "नाही. तुमचं?"
          "नेहा."
      " बोलवा लवकर वहिनींना. ओळख करून द्या." नेहा म्हणाली.
     " संदीपचा फोन आला की त्याच्याशीही ओळख करून द्या." रोहन बोलला. 
     जेवणे संपली होती. रोहनच्या मघाशी कट झालेल्या मित्राचा फोन वाजला.
     " करतो नंतर." रोहनने सांगितले. नेहाचाही फोन वाजला. फोन घ्यायला ती आत गेली.
     "सासूबाई, तुम्ही या सावकाश.  काही प्रॉब्लेम नाही."                                   
                                                                                                                                                                             -  केदार पाटणकर