भविष्याचा वेध : प्रश्नकुंडली

तीन वर्षापूर्वी मी "क्ष" या कंपनीत एक कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम केला होता. 'विश्वास' त्याचा संयोजक (प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर) होता. त्यावेळी त्याच्याशी ओळख झाली, एकाच वयाचे असल्याने आमची मैत्री ही चांगली जमली. मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक तर विश्वास एकदम नास्तिक, ज्योतिषाची हेटाळणी करणारा. पण या गोष्टीची आमच्या मैत्रीस कसलीही बाधा आली नाही.

27 जानेवारी 2013, रविवार होता, सुट्टीचा दिवस,त्यात दुपारची  वेळ त्यामुळे अंमळ विश्रांती घेत होतो - म्हणजेच चक्क लोळत होतो तोच फोन वाजला, डोळ्यावरची झोप आवरत मी फोन घेतला. विश्वासचा फोन होता.

"सॉरी, रविवारी ते सुद्धा दुपारच्या विश्रांतीच्या वेळी फोन करून जरा त्रास देतोय..."
"अरे , सॉरी  कसले, तुझे स्वागतच  आहे, बोल आज कशी काय  आठवण काढली गरिबाची "
"अरे, एक समस्या निर्माण झालीय तेव्हा तुझा सल्ला घ्यावा असे वाटले , त्यात आज रविवार,  तू खात्रीने मोकळा सापडणार म्हणून मुद्दामच ही वेळ साधून फोन केला"
"चांगलं केलेस रे राजा ! पण तू आणि माझा सल्ला?  अरे देवा,  हे म्हणजे  "अडला नारायण गाढवाचे पाय धरी"  असे झाले की"
 "हॅ  हॅ हॅ , गुड जोक.."
"काम काय ते बोल"
"अरे , तुला माहिती  आहेच, गेल्या वर्षी आमच्या कंपनीचे  त्या  "ट" मध्ये विलिनीकरण झाले, तेव्हापासून इथे सर्व पातळ्या वर मोठे बदल होत आहेत, आता मला आणि माझ्या आख्ख्या प्रॉडक्ट टीमला नवी दिल्लीच्या मुख्यालयात (हेड ऑफिस) हालवणार असे दिसतेय.."
"अरे वा,  मस्तच की, यात समस्या कसली,उलट आता तुझ्या कर्तृत्वाच्या कक्षा चांगल्याच रुंदावणार"
"कसल्या बोड्ख्याच्या कक्षा रुंदावतोस, मला काही दिल्लीला जायचे  नाही, साला या बातमीने तर माझी झोपच उडाली आहे"
"वत्सा, गजेंद्रा , मग या परिस्थितीत मी तुला नेमका कसा आणि कोणता मोक्ष देऊ शकतो?"
"हे कमलनयना ,पतितपावना , नारायणा, ज्योतिषी म्हणवशी तू  स्वतः:ला .."
"हे व्यंकटेश स्त्रोत्र झालं"
"इथे माझी xxलीय आणि पी.जे. कसले टाकतो रे ? ती प्रश्नकुंडली का काय म्हणतोस ना , ती मांडून जरा बघतोस का काय होणार आहे ते?
"विश्वास बाबू ! ये मै क्या सुन रहा हू? आप और ज्योतिष ? यकिन नहीं हो रहा है,  ये कोई मजाक तो नहीं ? " 
"साला काय 'हिंदी' फाडतो रे, पयला माझ्या प्रॉब्लेमचे बघ नंतर वाटल्यास काय जोडे मारायचे ते मार, हिंदीतून नै तर कानडीतून"
"तसं पायलं तर आपल्याला वर्‍हाडी पन येऊन र्‍हायलं भौ, पण ते वायलं,  आता तू म्हणतो आहेस तर बघुन सोडतो बघ रे तुझा तो काय प्रश्न म्हंतो मी"

प्रश्नशास्त्रात जातकाचा प्रश्न समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. बर्‍याच जातकांना त्यांचा प्रश्न नेमक्या शब्दात व्यक्त करता येत नाही    शब्द योजना जराशी जरी बदलली गेली तर आख्खा प्रश्नच बदलू शकतो. आता विश्वास च्या बाबतीतच बघा ना, त्याचा प्रश्न तीन प्रकारे असू शकतो:
1.    बदली होणार का?
2.    झालेली बदली रद्द होईल का?
3.   'आख्खी टीम दिल्लीला हालवणार' ही बातमी खरी आहे का अफवा?

त्यासाठी आपल्याला विश्वासला आणखी काही प्रश्न विचारून नेमके काय झाले आहे याचा खुलासा करून घेतला पाहिजे. कारण वरकरणी हे तिन्ही प्रश्न जवळचे वाटले तरी ते सोडवायचे मार्ग / अडाखे / नियम अगदी भिन्न आहेत.

"अरे, तसे काही नसेल रे, उगाच कशाला त्रास करून घेतोस !"
"उगाच नै  बॉस, दिल्लीला पाठवायच्या लोकांची यादी मी सोता माझ्या डोळ्यांनी बघितली आहे, लिस्टात पैला झूट माझेच नाव आहे"
 
या बोलण्यावरून हे लक्षात येते की 'बदली’ होणार' ही अफवा नाही, बदली होणार हे जवळजवळ नक्कीच  आहे. म्हणजे विश्वास चा प्रश्न 'बदली होणार का / होऊ घातलेली बदली टळेल  का ? '  असा आहे. मात्र बदलीची अधिकृत घोषणा झालेली नसल्याने , 'बदली रद्द होईल का?"  हा प्रश्न आजच्या घटकेला तरी होऊ शकत नाही. 

'बदली होणार का?' या तत्कालीन प्रश्नाचे उत्तर जन्मपत्रिके पेक्षा प्रश्नकुंडलीवरुन जास्त चांगले (अचूक) देता येते.  मी विश्वासला अगदी थोडक्यात प्रश्न कुंडली म्हणजे काय ते सांगून त्याला मनात घोळणाऱ्या  प्रश्नावर लक्ष केंद्रित करून, एक नंबर जो, 1 ते 249 मध्ये असेल असा द्यायला सांगितला. विश्वासने नंबर दिला  '45'. विश्वास ने दिलेला नंबर लिहून घेत मी त्याला अर्ध्या एक तासाने फोन करायला सांगितले.

प्रश्न शास्त्र हे बरेचसे दैवी संकल्पने वर आधारित आहे, जातकासमोर प्रश्न निर्माण होणे, त्याची तीव्रता वाढून आता एखाद्या ज्योतिर्विदाला हा प्रश्न विचारावा अशी पराकोटीची इच्छा निर्माण होणे, अशी उत्तरे देऊ शकणारा ज्योतिर्विद भेटणे ही एक  साखळीच  असते. तुमच्या पुढ्यातल्या प्रश्नाचे उत्तर ज्योतिषाच्याच माध्यमातून मिळावे असा नियतीचा संकेत असेल तरच ही साखळी पूर्णं होते.  जातकाने दिलेला  होरारी क्रमांक हा त्या साखळीचाच एक महत्त्वाचा घटक असतो. होरारी नंबर ही दैवी मदत आहे. त्यासाठीच माझा आग्रह असतो की  हा नंबर जुळवून सांगू नका, तो आपोआपच / उत्स्फूर्तपणे सुचलेला असावा. बऱ्याच वेळ होते काय, जातक आपला एखादा 'लकी' नंबर  देतो किंवा ‘गाडी / अपार्टमेंट / जन्मतारीख / पॅन कार्ड / फोन’ यावर आधारित नंबर देतो (उदा: पहिले/ शेवटचे 2/3  आकडे). असे नंबर जुळवलेले (फॅब्रिकेटेड) असल्याने त्यात दैवी अंश नसतो, पर्यायाने त्या नंबर वर आधारित प्रश्नकुंडली आपल्याला मार्गदर्शन करण्यास निरुपयोगी ठरते.
 
सर्व प्रथम आपण 'बदली' म्हणजे काय व त्यासाठी प्रश्नकुंडलीतली कोणती स्थाने विचारात घ्यायची ते पाहून घेऊ.

बदली म्हणजे काय? कामाच्या जागेच्या ठिकाणातला बदल. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की नोकरीत बदल झालेला नसतो. व्यक्ती त्याच आस्थापनेत (कंपनीत) काम करणार असते. कदाचित व्यक्तीचा हुद्दा  बदलू शकतो (प्रमोशन) ,कामाच्या स्वरूपात बदल असू शकतो (प्रोजेक्ट बदल), कार्यालयीन वेळेत (साईट पोस्टिंग) बदल असू शकतो, पण जागेत बदल हाच मुख्य कळीचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे आपल्याला 1, 3, 10, 12  ही स्थाने तपासावी लागतील. कारण?
1:  जातक  स्वतः:
3: लहान प्रवास, जागेत बदल, घरापासून / कुटुंबीयांपासून  दूर ( 3 रे स्थान हे 4 थ्या स्थानाचे व्ययस्थान आहे)
10: जातकाचा नोकरी, व्यवसाय
12: नवे ,अनोळखी वातावरण, अनोळखी प्रदेश / समाज / रीतिरिवाज / हवामान / संस्कृती / परदेश.

जर बदली खूप लांबच्या प्रदेशात होत असेल तर 9 वे स्थान पण विचारात घ्यावे लागेल. 9:  लांबचा प्रवास.

जर बढती (प्रमोशन) मिळाल्याने बदली होत असेल तर 1, 3, 10, 12  बरोबरच  2,6,11 ही स्थाने पण विचारात घ्यावी लागतील. 2 &11:  आर्थिक लाभ; 6: नोकरीसाठीचे आणखी एक स्थान.

लक्षपूर्वक पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल की यात 3 हे बदल सुचवणारे स्थान व 10 हे  नोकरी / व्यवसायाचे प्रमुख स्थान अशी दोन स्थाने कायम आहेत,बाकीची स्थाने परिस्थिती नुसार बघावी लागतात. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतः:चे  स्थान आपल्या यादीत असले तरी पण त्याला अवाजवी महत्त्व द्यायचे कारण नाही.

इथे लाभ स्थान (11) फक्त पदोन्नती / आर्थिक फायदा साठी विचारात घेतले आहे, साध्या बदलीसाठी नाही, याचे  कारण बहुतांश बदल्या ह्या जातकाच्या इच्छे विरुद्ध झालेल्या असतात. मात्र  'बदली व्हावी' ही जातकाचीच आत्यंतिक तळमळीची इच्छा असल्यास लाभ स्थानाला (11) योग्य ते महत्त्व  द्यावे.

काही वेळा जातक बदलीच्या गावी बायकोपोरां पासून दूर राहत असतो आणि आता त्याला पुन्हा बदली हवी आहे ती पुन्हा आपल्या घरी, बायकोपोरांच्या बरोबर एकत्र राहता यावे यासाठी, असे असेल तर चतुर्थ (4) स्थान महत्त्वाचे, असे असले तरी त्रितीय (3) स्थान हे स्थान विचारात घ्यावेच लागणार.

जर बदली परदेशात होण्याची शक्यता (ओव्हर्सीज ऑन साईट पोस्टिंग) असेल तर व्यय (12) आणि नवम (9) या दोन स्थानांना महत्त्व येते.   
अर्थातच 'बदली' या संदर्भातल्या सर्व प्रश्नांसाठी दशम (10) हे प्रमुख स्थान (प्रिंसीपल हाऊस)  समजायचे.

याच बरोबर ग्रहांची कारकत्वे ही विचारात घेणे गरजेचे असते,
उदा:  मंगळ -  अधिकार पद / वरिष्ठ पद
सगळेच इथे सांगत बसत नाही,  नाहीतर मग माझ्या ज्योतिष अभ्यास वर्गाला (क्लास) कोण येणार?

चला , आपण विश्वासला अर्ध्या तासात फोन करायला सांगितले  आहे.  आन त्ये बेणं घड्याळ्याच्या काट्यांकडे बघत फोन पाशीच बस्लं आसल, तेव्हा आता डायरेक्ट प्रश्नकुंडली कडे:

या '45' नंबर वरून तयार केलेली प्रश्न कुंडली शेजारीच दिली आहे .
प्रश्न कुंडली चा डेटा:
होरारी नंबर: 45 (/249)
दिनांक: 27 जानेवारी 2013
वेळ: 13:44:21
स्थळ: देवळाली कॅम्प (नाशिक)
अयनांश: कृष्णमूर्ती 23 :56:58
संगणक आज्ञावली : KPStar One

प्रश्न कुंडलीत सर्व प्रथम पाहायचे तो चंद्र, तो मनाचा  कारक ग्रह मानला जात असल्याने प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात काय काय विचार घोळत होते याचा दाखला हा चंद्र नेहमीच देत असतो आता हा चंद्र कोणत्या घरात आहे, कोणाच्या नक्षत्रात आहे ते बघायचे.
विश्वास चा प्रश्न 'बदली होणार का?' असा असल्याने, तोच विचार प्रामुख्याने त्याच्या मनात असायला पाहिजे, नव्हे तसा तो नसल्यास प्रश्न विचारण्याची वेळ चुकली अथवा जातक प्रश्नाच्या बाबतीत फारसा गंभीर नाही असा त्याचा अर्थ निघेल. आपण  3, 10, 12  ही स्थाने विचारात घेणार आहोत. यापैकी त्रितिय स्थान (3) हे ‘बदल’ या दृष्टीने  महत्त्वाचे. तर दशम (10)  प्रमुख घर (प्रिंसीपल हाउस) म्हणून विचारात घ्यायचे.

विश्वासची बदली पुण्याहून दिल्ली सारख्या लांबच्या गावी होण्याची शक्यता असल्याने नवम (9)  स्थान पण विचारात घ्यावे लागेल.
आता आपण विश्वास च्या प्रश्न कुंडलीतला ‘चंद्र’ काय म्हणतो आहे ते पाहू या:

(इथून पुढे ग्रहाचे अथवा भावाचे कार्येशत्व लिहिताना ते:  A grade  /  B grade  /  C grade  / D grade अशा पद्धतीने लिहिले आहे,  त्यामुळे कार्येश ग्रह कोणते ते तर कळतेच पण त्यांचा प्रथम / द्वितीय इ. दर्जा कोणता हे पण लगेच लक्षात येते.)

हा चंद्र धनात (2), त्रितियेश (3), चंद्र शनीच्या नक्षत्रात, शनी पंचमात (5), भाग्येश (9) व दशमेश (10) म्हणजे  चंद्र : 5/ 2 / 9,10 / 3 या भावांचा म्हणजेच नोकरी/व्यवसायाच्या महत्त्वाच्या दशमाचा (10) कार्येश तर आहेच शिवाय  बदली साठीच्या त्रितीय  (3) व लांबच्या गावी बदली दर्शवणाऱ्या  नवम (9) या दोन्ही भावांचा कार्येश आहे.

काय दैवी करामत असते बघा! प्रश्न तातडीचा / निर्वाणीचा / कळकळीचा असला आणि प्रश्नकर्ता स्वतः: पुरेसा गंभीर असल्यास चंद्र प्रश्नाचा रोख बरोबर दाखवतोच. अगदी विश्वास सारख्या नास्तिक, ज्योतिष्यांची  हेटाळणी करणाऱ्याला सुद्धा मनापासूनची इच्छा असल्यास अशी मदत मिळतेच मिळते!

ही कुंडली आपल्याला विश्वासची बदली होईल का हे तर सांगेलच आणि जर बदली होणार असल्यास केव्हा हे पण सांगेल. आता पुढचा टप्पा, बदली होण्याचा योग आहे का ? याचे उत्तर दशमाचा (10) सब लॉर्ड देणार कारण नोकरी / व्यवसाय विषयक प्रश्नांना दशम स्थान (10) हे प्रमुख ( प्रिन्सिपल हाउस ) भाव आहे.

या टप्प्यावर आपल्याला दोन गोष्टी तपासायच्या असतात:

  1. सर्वप्रथम बघायचे ते हे की हा सब लॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा.तो स्वतः: वक्री असला तरी चालेल. जर हा सब लॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडणार नाही. बदलीचा प्रश्न असेल तर  ‘बदलीचा योग नाही’. पण याचा अर्थ जातकाची बदली कधीच होणार नाही असा नाही, प्रश्नकुंडली साधारणपणे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी (काही अपवादात्मक स्थितीत ही कालमर्यादा वर्ष / दीड वर्षा पर्यंत घेता येते ) उपयुक्त असल्याने याचा अर्थ असा घ्यायचा की नजिकच्या काळात ‘बदलीचा योग ‘नाही, पण त्या पुढच्या काळात तो योग असेलही. उत्तर जर याच टप्प्यावर नकारार्थी आले तर मग केस इथेच बंद करावी, पुढचे विश्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही.
  2.  दुसरा तपासणीचा मुद्दा, हा सब प्रश्ना संदर्भातल्या भाव समूहातल्या एका तरी भावाचा कार्येश असायलाच हवा. या केस मध्ये प्रश्न बदलीच्या संदर्भात असल्याने, दशमाचा सब बदली साठीच्या भावसमुहातल्या 3, 10, 9, 12 यापैकी एका तरी भावाचा कार्येश असायलाच पाहिजे. त्यातही प्राधान्याने 3 किंवा 12 व्या स्थानाचा. हा सब जर 3,10,9,12 यापैकी एकाही भावाचा कार्येश नसेल तर प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे असे समजावे, म्हणजेच नजिकच्या काळात तरी प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडणार नाही (पुढे कदाचित घडूही शकेल). असे झाल्यास केस इथेच बंद करावी, पुढचे विश्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही.

विश्वासच्या प्रश्नकुंडलीतला दशमाचा (10) सब बुध असून तो चंद्राच्या नक्षत्रात आहे, प्रश्न समयी बुध स्वतः: मार्गी आहे आणि चंद्र कधीच वक्री होत नाही. आता ह्या बुधा चे कार्येशत्व बघूया.

बुध अष्टमात (8) व लग्नेश (1), धनेश(2) व पंचमेश (5).  बुध चंद्राच्या नक्षत्रात आहे , चंद्र धनात (2), त्रितियेश (3).  बुध  2 / 8 / 3 / 1,2,5  या स्थानांचा कार्येश आहे. बदली साठीच्या भावसमुहातली लग्ना (1) व त्रितीय (3) स्थानांचा बुध कार्येश होत असल्याने दशमाच्या सब चा होकार आहे असे समजायला हरकत नाही. पण बुध अष्टम (8), पंचम (5) या तापदायक स्थानाचा कार्येश होत आहे. म्हणजे ‘बदली’ झालीच तर फारशी सुखावह होणार नाही,  विश्वास च्या बोलण्या वरून बदली त्याच्यासाठी त्रासदायक  ("इथे माझी xxलीय ..") आहे हे दिसतेच आहे, ग्रहांनी आता त्याला पुष्टी  दिली.

आपला पहिला टप्पा पार पडला पण दशमाच्या सब चा होकार म्हणजे बदली होणारच असे काही नाही, त्यासाठी पुढे येणार्‍या दशा, अंतर्दशा, विदशा या अनुकूल असायला हव्यात, सेवानिवृत्तीचे वय गाठल्यानंतर बदलीचे योग  असलेल्या दशा येणार असेल तर त्याचा काय उपयोग!
प्रश्नाच्या वेळी कुंडलीत शनी महादशा चालू होती ती 23 डिसेंबर 2014 पर्यंत आहे. आता शनीदेव विश्वास ची बदली घडवून आणणार का नाही ते पाहू.

शनी चे कार्येशत्व असे: शनी पंचमात (5), भाग्येश (9) व द्शमेश (10) शनी राहु च्या नक्षत्रात, राहू  पंचमात म्हणजे  5 / 5 / - / 9,10.
दशा स्वामी त्रितिय (3) स्थानाचा कार्येश नाही, मात्र नोकरीच्या विरोधी स्थानांचा म्हणजे पंचम (5) व नवम (9) चा कार्येश  आहे. नोकरीच्या दशम स्थानाचा (10) क्षीण कार्येश ही आहे.

शनीचा सब  शुक्र  आहे , शुक्र सप्तमात (7) व व्ययेश (12) , शुक्राची तुळ रास लुप्त असल्याने शुक्राला दुसर्‍या स्थानाचे स्वामित्व  मिळणार  नाही. शुक्र रवी च्या नक्षत्रात, रवी अष्टमात (8) व सुखेश (4) म्हणजे  8/7/4/12. शनीचा सब ही बदली साठी प्रतिकूल आहे. सगळे प्रकरण नोकरीच्या विरुद्ध जाण्याचे संकेत दिसत आहेत.

मग शनीदेव बदली देणार का? नाही, शनीच्या दशेत विश्वास ची बदली होणार नाही. पण काय होणार?  इथे बदली नाही तर चक्क बडतर्फी  दिसत आहे !!  8  (शिक्षा) आणि 12  (सजा,मानहानी, गुप्तशत्रू,देशोधडीला लागणे ).

विश्वासची नोकरी जाऊ नये असे मला मना पासून वाटत होते ,बदली तर बदली, निदान रोजीरोटी तरी शाबूत राहील या आशेने मी अंतर्दशा / विदशा  बघायचे ठरवले.

शनी महादशेत सध्या गुरुची एकमेव अंतर्दशा उरली असून ती 23 डिसेंबर 2014 संपते त्या बरोबरच शनीची महादशा पण संपते.
गुरु चे कार्येशत्व असे: गुरु व्ययात (12), सप्तमेश (7), अष्टमेश (8) व लाभेश (11) , गुरु चंद्राच्या नक्षत्रात , चंद्रा धनात (2) आणि त्रितीयेश (3).  म्हणजे गुरु :  2 /12 / 3 /  7,8,11.  गुरु चा सब राहु आहे, राहु पंचमात (5), शनी च्या युतीत आहे. राहु  गुरुच्या  नक्षत्रात म्हणजे राहु: 12 / 5 /7,8, 11 / -  , शिवाय शनी चे  कार्येशत्व 5 / 5 / - / 9,10  आहेच. म्हणजे अंतर्दशा स्वामीचा सब ही  बदली साठी नाही तर नोकरी जाण्याचेच संकेत देत आहे.

गुरुचे आणि त्याच्या सब राहुचे  कार्येशत्व  बुचकळ्यात  टाकणारे आहे.  बघा, गुरु बदली साठीची  3 ,12  हे घर  देत आहे त्याचबरोबर 2, 11 ही पैशाची घरे पण  देत आहे आणि जोडीला 8 वे घर जे मन:स्तापाचे  आहे  ते पण  देत आहे. 3, 12 ,2, 11 तर चांगली प्रमोशन वर बदली सुचवताहेत पण हे सारे झाले अंतर्दशे च्या स्वामीचे फळ, पण महादशा स्वामीच्या इच्छे बाहेर अंतर्दशा स्वामी काही करू शकत नाही आणि महादशा स्वामी तर पंचम (5)  आणि नवमाच्या (9)  माध्यमातून  नोकरी  घालवायलाच  बसलाय. मग 3, 12 , 2, 11 चा कौल वेगळाच घ्यावा लागेल, 3 बदल, 12 देशोधडीला लागणे, तसा 2, 11 चा संकेत पैसा मिळण्याचाच आहे पण तो आता अष्टमाच्या माध्यमातून म्हणजेच विमा, नुकसान भरपाई, प्रोव्हिडंट फंड  व ग्रॅच्युईटी द्वारा...बाप रे !!

आपण गुरु च्या अंतर्दशेतल्या विदशा काय  आहेत ते पाहू या.
1.    शनी: 8 मार्च 2013 पर्यंत.
2.    बुध:  17 जुलै 2013 पर्यंत.
पुढे केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू यांच्या विदशा आहेत, पण प्रश्न कुंडलीची काल मर्यादा (सहा महिने), प्रश्नाचे  स्वरूप  व प्रश्ना मागची पार्श्वभूमी पाहता आपला तपास शनी व बुधाच्या विदशांपर्यंतच  मर्यादित ठेवू या. पुढचे पुढे  हरी !!

पहिली शनी ची विदशा. शनीचे  कार्येशत्व आपण आधीच बघितले  आहे: म्हणजे  5 / 5 / - / 9,10.
दुसरी विदशा बुधाची. बुधाचे  कार्येशत्व ही आपण  आधीच  बघितले  आहे
बुध: 2 / 8 / 3 /1, 2,5  या स्थानांचा कार्येश आहे. ( 1, 3, 5 , 8  ही सर्व नोकरीच्या विरोधी स्थाने आहेत)
म्हणजे दोन्ही ग्रह विश्वासची  वाट लावू शकतात. शनी तसा पाहिला तर नोकरीचा कारक आणि तुलनात्मक दृष्ट्या बुधाचा दणका "इथे माझी xxलीय .."  च्या बाबतीत जरा जास्तच स्ट्राँग आहे. 

मग आता हा मान कोण पटकवणार? ट्रान्सीट्स पाहूया.

अपेक्षित घटना (अरे नाही रे नाही !)  लगेचच दोन एक महिन्यात घडणार असल्याने रवी चे भ्रमण तपासायचे.

आपली  अपेक्षित  साखळी  शनी - गुरु - शनी किंवा  शनी - गुरु- बुध.  12 फेब्रुवारी पर्यंत रवी मकरेत, शनी-मंगळ असा  असेल, साखळी जुळत नाही. 13 फेब्रुवारी ते 13 मार्च रवी मकर - कुंभ असा असून त्या दरम्यान तो मंगळ, राहू व गुरु च्या नक्षत्रांतून भ्रमण करेल. त्यापैकी शनी - गुरु  जोडी आपली साखळी पूर्ण करते. 4 मार्चला रवी कुंभेत  गुरु च्या नक्षत्रात  येईल.

आपण  विदशांच्या तारखा बघितल्या असे दिसेल की 8 तारखेला बुधाची  विदशा चालू होते . अगदी त्याच तारखेला, 8 मार्चला रवी कुंभेत, गुरुच्या नक्षत्रात व बुधाच्या सब मध्ये येईल व 10  मार्च पर्यंत तो बुधाच्या सब मध्येच असणार आहे. घटना ह्याच कालावधीत घडणार. (अरे नाही रे नाही !) 
9 - 10  मार्च  2013 हे शनिवार- रविवार,म्हणजे सुट्टी,त्यामुळे त्या दोन दिवसात काही घडण्याची शक्यता नाही. आता राहता राहिला एकच  दिवस, 8 मार्च 2013 . मी त्या दिवशीचे चंद्र नक्षत्र पाहिले. 8 मार्चला चंद्र दुपारी 3:15 पर्यंत शनीच्या मकरेत,रवी च्या नक्षत्रात असेल, नंतर तो मकरेतच पण स्वतः:च्याच म्हणजे चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश करेल. चंद्र 5/ 2 / 9,10 / 3 आगीत तेल ओतायला जय्यत तय्यार. शनीची विदशा त्याच दिवशी 12:11 वा संपून बुधाची विदशा चालू होणार  आहे , रवी आधीच बुधाच्या सब मध्ये आहे.

म्हणजे शुक्रवार , 8 मार्च 2013 दुपारी 3:00 नंतर विश्वास वर हे नोकरी जाण्याचे  गंडांतर येणार. आणखी एक गोष्ट जरूर होईल, विश्वासला चांगले कॉम्पेनसेशन प्याकेज (severance package ) मिळेल कारण 2,11 आणि गुरु. हे सर्व ठीक (?) पण आता विश्वासला हे कसे सांगायचे?

अर्धा तास होतोय न होतोय तोच फोन वाजला !

"बोल सायबां, झाली का  गणिते? काय होणार माझ्या बदलीचे?"
"नाही, म्हणजे तसे बदलीचे काही दिसत नाही.."
"काय सांगतोस काय! गुड न्यूज यार.. साला नाहीतर दिल्लीला जाणे म्हणजे शिक्षाच होती रे.."
"विश्वास, पण ग्रहमान एकदम प्रतिकूल आहे रे.."
"ए भाया, जरा समजेल असे सांग ना, आधी म्हणालास बदली नै,आता म्हणतोस ग्रहमान वाईट्ट .. म्हणजे बदली होणार असेच ना , मग तसे सांग ना खुल्लमखुल्ला, हाय काय नाय काय ?"
"नाही  ...  बदली नाही .. नोकरी पण नाही"
"म्हणजे तुला काय म्हणायचेय काय?"
"सॉरी विश्वास, पण ग्रहमान असे सांगतेय की तुझी नोकरी  जाणार ..."
"काय?, पुन्हा बोल.."
"येस,  तुला कामावरून काढून टाकले जाईल ,  फायर्ड .. बडतर्फी म्हणतात याला ,  आणि  ते सुद्धा अगदी  नजिकच्या काळात, नेमकेच सांगायचे तर शुक्रवार 8 मार्च 2013 , दुपारी 3 नंतर... पण खूप चांगली नुकसान भरपाई मिळेल ‘ severance package’  बेटर द्यान बेस्ट इन द इंडस्ट्री ..."
"व्हॉट? आर यु शोर?"
"येस माय चाइल्ड"
" हे बघ, जस्ट तासाभरा पूर्वी तू मला म्हणाला होतास - ये कोई मजाक तो नहीं ? आता मीही तुला तेच विचारतोय - ये कोई मजाक तो नहीं?"
"काश सचमुच में ये मजाक होता!  प्रश्नकुंडली ने मला जे सांगितले तेच मी सांगतोय"
"अरे पण हे कसे शक्य आहे, तुला कल्पना नाही माझी इथली पोझिशन किती सॉलिड आहे ते ! अरे माझ्या वाचून इथले पान पण हालत नाही. दे शुड बी ग्लॅड दॅट आय वर्क विथ देम"
"असे प्रत्येकालाच वाटते, पण पॉलिसीज बदलल्या, प्रायोरिटिज बदलल्या की सकाळचा हीरो संध्याकाळी कशाला लंच टाइमालाच झिरो होतो. त्यातून ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे काही सांगू नको, मर्जर ,टेक ओव्हर्स , बोर्डरुम पॉलिटिक्स मध्ये कोणाचाही गेम होऊ शकतो. स्टीव्ह जॉब्सला नाही का त्याच्या स्वतः:च्याच 'अ‍ॅपल' मधून चक्क हाकलून दिले होते लोकांनी"
"नाही, माझ्या बाबतीत असे घडणे शक्यच नाही.."
"फाईन, अशुभ असले तरी जे भविष्य आहे, ते प्रामाणिकपणे सांगणे माझे काम आहे, ते मी केले आहे, असे काही होऊ नये असे मलाही वाटतेय, पण...  एनी वे,  हे एका परीने चांगलेच की तुला आगाऊ सूचना मिळाली आहे , काहीतरी हातपाय हालवता येतील , अजून महिना दीड महिना आहे आपल्या हाताशी"
"हॅट ,साला, कै च्या कै, तुझे भविष्य तुझा पाशीच ठेव, मला नको, जाऊ दे, मीच उगाच हात दाखवून अवलक्षण करून घेतले"
"जशी तुझी मर्जी, माझे भविष्य चुकावे अशी मीच देवा पाशी प्रार्थना करेन.."
"बरेय,ठेवतो फोन, जरा इथले वातावरण निवळले झाले की निवांतामध्ये  कॉल करतो.."
"चालेल, माझ्या शुभेच्छा .."

 मध्ये फेब्रुवारी च्या 11 तारखेला विश्वास चा एकदा फोन आला होता. 

"बदली चे अजून ऑफिशियली कळवलेले नाही पण फायनलच. बाकी तुझे भविष्य चुकले म्हणायचे, जाऊ दे, नाही तरी तुमचे सगळं असलंच, अंदाज पंचे दाहोदर्सेच, बोलाफुलाला गाठ पडली तर येत असेल एखादे भाकीत बरोबर कधी मधी.. काय?"
"हा आता तू म्हणतोस तशी माझी काही भाकिते चुकतात म्हणा पण तुझ्या बाबतीतले हे भाकीत चुकल्यास तुझ्यापेक्षा मलाच जास्त आनंद होईल
" ओक्के देन, नंतर कॉल करतो, मीटिंग्ज चालू आहेत सारख्या.."
"नो प्रॉब्लेम, कीप इन टच.."

 25 फेब्रुवारी 2013 ला रात्री उशीरा विश्वासचा फोन आला.

"इथले वातावरण चांगलंच बिघडलंय रे.."
"का , काय झाले ?"
"एक शॉकिंग न्यूज आहे, मी काम करतो ती आख्खी प्रॉडक्ट डिव्हिजनच आमच्या कंपनीने त्या 'फ़'  कंपनीला विकली , तसा करार तीन महिन्यांपूर्वीच झालाय म्हणे! पण आजपर्यंत आम्हाला कोणाला कसलीच कल्पना नव्हती, आज मीटिंगमध्ये  आमच्या व्हा‌इस प्रेसिडेंट नी सांगितले सगळं आम्हाला."
"इंडस्ट्रीत हे नेहमीचेच, पण तुला तर काही भिती नाही ना, तुझी पोझिशन तर एकदम सॉलिड आहे, तू नसलास तर तिथले पानही हालत नाही ना?."
"पण त्या 'फ'कंपनीला तसे वाटत नाहीयेना. आमचे ब्रॅन्डस घेतले , टेक्नॉलॉजी घेतली,पेटंट्स घेतली पण मॅनपॉवर नकोय म्हणे त्यांना. झालं , एका फटक्यात माझ्या सकट आख्खी टीम redundant  ठरली. साले ‘xxxx' ! अरे नुसता घाम नाही तर रक्त सांडलेय आम्ही ही डिव्हिजन उभी करायला , ते काय  ह्या  XXXXना माहिती  नाही का ?  अरे सलग पाच वर्षे बेस्ट परफॉर्मर चे अॅवॉर्ड  घेतलेय त्या XXX Xद   हा‌इस प्रेसिडेंटच्या हातून आणि तोच मी आज चक्क redundant? साल्यो... "
"शांत हो, अजून जायला सांगितले नाही ना?"
"तेव्हढंच राहिलंय फक्त, आमच्या कंपनीच्या इतर कोणत्याही प्रॉडक्ट डिव्हिजन्स आम्हाला सामावून (अॅ्बसार्ब) घ्यायला तयार नाहीत, आम्ही आता  ओझे  झालोय  कंपनीला,  आता आम्हाला जावेच लागणार, तुझे भविष्य खरे ठरणार रे.."
"कदाचित तशी वेळ येणारही नाही, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, धीर धर, बघूया काय होते ते "
उत्तरा दाखल फक्त एक ‘हुंदका’ आणि फोन ठेवल्याची क्लीक.

शुक्रवार 8 मार्च 2013 उजाडला , सकाळीच विश्वासचा फोन !

"आज लास्ट डे.."
"काय म्हणतोस काय?"
"आमच्या हेडऑफिसचे लोक त्या 'फ' च्या टेक ओव्हर टीम सोबत गेला आठवडाभर इथे तळ ठोकून आहेत, तसे त्यांनी सगळं आवरतच आणलंय म्हणा.. एक एक करत आमची सर्व टीम घरी पाठवली, मी आणि एक दोघेच उरलोय.. आज आम्हाला पण.. मला  4:00 वाजता बोलावलेय ..  मला.. मला नारळ देणारेत रे हे साले xxx xx"
"सॉरी टु नो  .. असे व्हायला नको होते.."
"तू मला सावध केले होतेस, तेव्हाच हालचाली केल्या असत्या तर.."
"मोठा धक्का आहे हा, माणूस खचतो अशा वेळी,  पण घटना  म्हणजे काही जगाचा अंतकाळ  नाही, तुझ्या कडे शिक्षण आहे,अनुभव आहे व सिद्ध केलेले कर्तृत्व आहे त्या जोरावर मिळेल दुसरी नोकरी, होईल सगळे व्यवस्थित"

"तेच..  आता ते केव्हा होणार हे प्रश्न कुंडली मांडून बघतोस का जरा..."

"...."

गुरुजी कृष्णमुर्तींना माझे सादर प्रणाम

शुभं भवतु
सुहास

(विश्वास फार काळ बेकार राहिला नाही,  दुसरी नोकरी मिळाली त्याला, त्या दुसर्‍या नोकरीचे माझे भविष्यही  बरोबर आले आहे, त्याची केस स्टडी अशीच केव्हातरी वेळ होईल तेव्हा..)


ही केस स्टडी मनोगत वर प्रथम , त्या पाठोपाठ प्रश्नकुंडली सहीत माझा ब्लॉग     दुवा क्र. १   वर तसेच  इतर काही संकेतस्थळांवर ही.प्रकाशित करत आहे.