पत्र

खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो...
आधी विषय सुचत नव्हता
मग वेळ मिळत नव्हता
शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय
आणि आळस-
अशा एक ना अनेक सबबी...
पूर्वी पत्रांना गंध असायचा
आणि अक्षरांत ओलावा
न लिहिलेला मजकूरही दिसायचा
लिहिणार्‍याचा चेहरा 
आणि बोलण्याचा आवाज
वाचता-वाचता उमटायचा...
इतकंच कशाला;
ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं
वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं
पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा...
खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं
वेळ, कागद, पेन काढणं
स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं
आणि खाडाखोड झाल्यावर
किंवा चुकीचं लिहिल्यावर
फाडाफाडी करणं..
इतकं करून झालंच लिहून
तर पाकीट, तिकीट आणि पत्ता
या सोपस्कारांतून पेटीपर्यंत पोचवणं
पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं...
पण पत्र 'पत्र' होतं
टेक्स्ट मेसेज किंवा मेल नव्हतं
जसा फोटो आणि पोर्ट्रेटमधे फरक असतो-
फोटो एखाद्या व्यक्तीचा क्षणिक चेहरा दाखवतो
तर पोर्ट्रेट तिचा जीवनपट उलगडतो, तसा....
पत्रात एक जाणिव होती,जबाबदारी होती
उत्सुकता आणि आतुरता होती
दूर असलेल्या व्यक्तींमधला
दुरावा मिटवायची क्षमता होती...
एक जुनं रायटिंग पॅड सापडलं
तेव्हा लक्षात आलं की 
या पॅडला जो 'फील' आहे
तो 'टचपॅड'ला नाही...
शेवटी हेच एक कारण किंवा निमित्त मिळालं 
तुला हे पत्र लिहायला;
नाहीतर आता पोस्टखात्याच्या (तारेप्रमाणे) पत्रसेवा बंद करायच्या
जाहीर निवेदनाचीच प्रतिक्षा आहे...