गाणाऱ्याचे पोर - एक ठसठसती वेदना

भीमसेन जोशी हे माझ्या दैवतपंचकातले एक.  त्यांच्या स्वरांनी मनावर गारुड केले नाही असा माणूस सापडणे विरळा. त्यांच्या चिरेबंदी स्वरांइतकेच त्यांच्या मर्दानी देखणेपणाचे आणि आत्मानंदी रंगलेल्या कलंदरपणाचेही आकर्षण झपाटून टाकणारे होते. त्यांच्याबद्दलच्या कथा-दंतकथा ऐकत मी लहानाचा मोठा झालो. भीमसेन त्यांच्या वयाच्या पंचाहत्तर-ऐंशीपर्यंत अगदी खणखणीत उमेदीत होते. दोनेक दशके त्यांच्या मैफली अनुभवण्याचा योग आला. काही काळ थोडी ओळखही झाली.
पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माझी माहिती किती थोडी होती याचा अस्वस्थ करणारा प्रत्यय राघवेंद्र भीमसेन जोशी यांच्या "गाणाऱ्याचे पोर" या आत्मकथनाने चरचरीतपणे आला. हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या आसपास त्यातला काही मजकूर वृत्तपत्रांत आला होता. तेव्हा एक 'सनसनाटी निर्माण करण्याचा यत्न' अशी काहीशी समजूत का कोण जाणे, माझी झाली होती. हे पुस्तक वाचल्यावर त्या समजुतीबद्दल स्वताडन कितीही केले तरी कमी पडेल याची जाणीव झाली.
भीमसेन जोशींनी द्विभार्याप्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले. 'सर्वामुखी मंगल बोलवावे' हा हेका असलेल्या माध्यमपंडितांनी हे व्यवस्थितपणे झाकून ठेवले. तसेही हा विषय आपल्याकडे अनुल्लेखाने मारण्याचाच. त्यामुळे त्यांची चार अपत्ये असलेली पहिली पत्नी पुण्यातच मुलांसोबत राहते आहे हे मला हे पुस्तक हाती घेईपर्यंत ठावकी नव्हते. असे काही असलेच तर भीमसेन जोशींनी त्या पहिल्या कुटुंबाचीही यथायोग्य काळजी घेतली असेल अशी समजूत बाळगून मी हे पुस्तक उघडले.
आणि अश्वत्थाम्याच्या जातकुळीतली अस्सल वेदना बऱ्याचशा संयत शब्दांत मांडलेली पाहून मलाच उरी फुटायला झाले. बऱ्याचशा संयत अशासाठी की  काही जागी राघवेंद्र जोशींचा सूर थोडा चढा लागला आहे. काही ठिकाणी तो अंमळ भावुक झाला आहे. काही ठिकाणी तो स्वर एकांगी असल्याचाही आभास होऊ शकतो.
पण या सगळ्याला पुरून उरणारी ठसठसती वेदना आपल्याला निर्विकार साथसंगत करत राहते.
रात्री झोपण्याआधी म्हणून हे पुस्तक काल रात्री हातात घेतले. निम्मे संपवेस्तोवर मध्यरात्र उलटली. पहाटे पाचलाच टक्क जाग आली आणि पुस्तक पुरतावण्यावाचून गत्यंतर नाही याची स्वच्छ जाणीव झाली.
या पुस्तकातली उदाहरणे वा अवतरणे देत बसत नाही. सदैव आ वासून उभी असलेली अनिश्चितता, त्यातून पडत-धडपडत मार्ग काढण्याची तीव्र इच्छा, परिस्थितीने कधी तोंडावर तर कधी पाठीवर मारलेले फटकारे, विश्वाला गवसणी घालणाऱ्या महामानवाचे मातीचे पाय, आणि एवढे सगळे भोगूनही विरुद्ध पक्षावर केलेली टीका ही सूचक-उपहासात्मक या पातळीवरच रोखून ठेवण्याचा निग्रह. प्रत्येकाने स्वतःच अनुभवावे असे हे पुस्तक.
काय पण योगायोग. परिस्थितीच्या आसुडाने फोडून निघालेली आयुष्ये, अत्यंत संयत भाषेत परिस्थितीविरुद्धचा संघर्ष आणि त्यातला कमावलेला विजय मांडणारी दोन आत्मचरित्रे गेल्या दोन आठवड्यांतच वाचली. गंगाराम गवाणकरांचे "व्हाया वस्त्रहरण" आणि डॉ हिम्मतराव बावस्करांचे "बॅरिस्टरचं कार्टं". त्याहीबद्दल लौकरच लिहायला हवे.

गाणाऱ्याचे पोर
राघवेंद्र भीमसेन जोशी
शब्द प्रकाशन
किंमत २५० रु
प्रथमावृत्ती - २३ नोव्हेंबर २०१३
द्वितियावृत्ती - २९ नोव्हेंबर २०१३
तृतियावृत्ती - ७ डिसेंबर २०१३
चतुर्थावृत्ती - १० एप्रिल २०१४