कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!

मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते. कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही. मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. म्हणूनच तर "प्यासा" च्या देशात "दबंग" सुद्धा हिट होतो. चला एकवेळ मान्य करू की दबंग मध्ये सलमान खान तरी होता. पण मराठी प्रेक्षकांनी एकेकाळी  अलका कुबल चे सिनेमे सुद्धा डोक्यावर घेतले होते. हिचे सिनेमे बघून तर गांधीजींची सुद्धा सहनशक्ती संपून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असता. गांधीजी सोडा, इंग्रजांनी जर बघितले असते तर "चाले जाव" च्या आधी "आम्हाला घरी जाऊ द्या " म्हणून आंदोलन केले असते. तात्पर्य असे की एकदा एखादी गोष्ट आवडली की ती डोक्यावरचं घेतली जाते. काळाप्रमाणे प्रेक्षकांची अभिरुची बदलते असं म्हणतात. २००० सालानंतर आलेल्या काही चित्रपटांच्या यशानंतर "भारतीय प्रेक्षक प्रगल्भ होतोय " अश्या मथळ्याचे लेखही प्रसिद्ध झाले. पण सिनेमांचं यश कोटींमध्ये मोजल्या जाऊ लागलं तेव्हापासून परिस्थिती बदलली. जुन्या काळात सिनेमा कथा आणि अभिनयाच्या जोरावर चालायचा. या दोहोंपैकी एखादी गोष्ट कमीजास्त असली तर तर सिनेमाच श्रवणीय संगीत त्याला तारून न्यायचं. पण आजकालच्या कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या सिनेमांचं काही काळात नाही राव!!

एक गोष्ट सुरवातीलाच स्पष्ट करतो की कोणी कितीही पैसे कमावले तरी मला त्याच्याबद्दल अजिबात द्वेष किंवा मत्सर नाही (कारण शाहरुख किंवा दुसऱ्या कोणाच्या  एखाद्या सिनेमाने १०० कोटी नाही कमावले तरी त्याची आणि माझी आर्थिक परिस्थिती एकसारखी होऊ शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे!! ). पण कोटी म्हणजे यश असं जर समीकरण असेल तर रोहित शेट्टीला "दादासाहेब फाळके " पुरस्कार जाहीर व्हायला फार वेळ लागणार नाही.

सलमान खान चे चाहते अभिमानाने सांगतात की पडद्यावर  ३ तास  जर  सलमान खान ला फक्त झोपलेल्या अवस्थेत जरी दाखवलं तरी आम्ही आनंदाने बघू. म्हणजे सलमान झोपलेला असो की जागा असो त्याच्या अभिनयात प्रेक्षकांना काहीही फरक जाणवत नाही. किंबहुना झोपलेला असतानाच सलमान चा अभिनय जास्त जिवंत वाटत असावा.   पण मग  नक्की  कशाच्या भरवशावर हे सिनेमे चालतात? प्रेक्षकांना नक्की आवडतं तरी  काय?

"फिल्मे सिर्फ तीन वजह चे चलती हैं. एण्टरटेनमेंट! एण्टरटेनमेंट! एण्टरटेनमेंट! " हा विद्या बालनचा डॉयलॉग आता आकाशवाणी असल्यासारखा खरा ठरतोय. जे सिनेमे जुन्या काळात डोअरकीपर ने सुद्धा बघितले नसते  ते सध्या  एण्टरटेनमेंट च्या नावाखाली कोटींमध्ये खेळतायेत. अवाजवी तिकिट दर आणि जास्तीत जास्त शो यामुळे कोटींमध्ये कमाई फार कठीण नाहीये पण सिनेमाचा दर्जा बघता हे सगळं अनाकलनीय वाटतं. नव्वद च्या दशकात सलमान आणि श्रीदेवी चा "चंद्रमुखी " नावाचा सिनेमा आला  होता. सिनेमा पहिल्याच दिवशी पहिल्याच खेळाला आपटला. त्यानंतर त्या सिनेमाचा दिग्दर्शक उद्वेगाने म्हणाला. " मी भलेही लाख वाईट सिनेमा बनवला असेल. पण न बघताच प्रेक्षकांना हे कसं कळते?? " आता परिस्थिती या उलट झाली आहे. त्याच सलमान खानचा सिनेमा लागायच्या आधीच सुपरहिट होतो. त्या साजीद खान चे सिनेमे तर ट्रेलर बघायच्या लायकीचे पण नसतात. पण सिनेमाच नावचं हाऊसफुल ठेवल्यावर आणखी काय होणार? एखाद्या खेळाडूने गैरवर्तन किंवा फिक्सिंग वगैरे केलं तर त्याला आजीवन बंदीची शिक्षा होते. अशी शिक्षा जर हिंदी सिने सृष्टीत  सुरू झाली तर साजीद आणि फराह खान अनुक्रमे हमशकल्स  आणि हॅपी न्यू इयर साठी या शिक्षेचे पहिले मानकरी ठरतील. त्या दोघांवर खर म्हणजे सिनेमा बनवायलाच काय तर बघायला पण बंदी आणायला हवी. एकेकाळी गोविंदाच्या सिनेमात तोचतोचपणा आल्यावर प्रेक्षकांनी त्याला नाकारलं होतं. दबंग, दबंग २, सिंघम, सिंघम २ या चारही सिनेमात फक्त हीरोकडून मार खाणारे लोकं बदलले होते. बाकी काहीही नवीन नव्हतं. पण त्यांच्या कमाईचे आकडे चढत्या क्रमाने आहेत. शाहरुख ची चेन्नई एक्सप्रेस तर चेन्नई च्या पुढे नेऊन डायरेक्ट हिंदी महासागरात बुडवायच्या लायकीची होती. त्या सिनेमाने म्हणे कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. अक्षयकुमार ने तर अखिल भारतीय रद्दी सिनेमांचा विडा उचलल्यासारखा वाटतोय. (अपवाद स्पेशल छब्बीस! )  

या सगळ्यावर एक युक्तिवाद नेहमी केला जातो. तो म्हणजे, " सिनेमा हा डोकं बाजूला ठेवून बघायचा असतो. आवडला तर आवडला नाहीतर सोडून द्यायचा. " पण जे सिनेमे जबरदस्तीने  "डोक्यात जातात" त्याचं काय? शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. लवकरच त्यात बदल करून  शहाण्या माणसाने कोर्टाची आणि थेटरची  पायरी चढू नये असं म्हणावं लागेल. एखादा जातिवंत सेल्समन जसा वाळवंटात सुद्धा माती विकू  शकतो तसे हे आजकालचे सिनेमा वाले आपल्याला तोच हीरो, तेच नाव , आणि तिचं कथा वारंवार विकू शकतात. त्यांचा फार्मुला अगदी सोपा आहे. हीरो ची धमाकेदार एंट्री! दर दहा मिनिटांनी मारझोड! हीरो चं जगण्याविषयी अगम्य तत्त्वज्ञान सांगणारा एखादा प्रसंग! कार्टून शोभावा असा खलनायक! चवीला कमनीय बांध्याची हिरॉईन!   हीरो- हिरॉईन ची  दोन- तीन गाणी!! हसावं की रडावं असं वाटणारे विनोदी प्रसंग! स्वीट डीश म्हणून एखादी मुन्नी किंवा शीला आहेच!

थोडक्यात सांगायचं तर हिंदी सिनेमा दाक्षिणात्य सिनेमांसारखा अतर्क्य होत चालला आहे. एक रजनीकांत कमी पडतोय की काय म्हणून सगळेच रजनीकांत बनू पाहतायेत. निखळ मनोरंजक सिनेमे बनवायला हरकत नाही. पण त्या नावाखाली प्रत्येक वेळेस जर तीन तासांचा तमाशा बघायला मिळणार असेल त्यातली मजा निघून जाते. प्रत्येक कथेचा एक प्रवास असतो. पण म्हणून प्रवासासाठी कथा लिहिली जात नाही. कारण प्रवास मनोरंजक असला तरी कथेला अर्थ असल्याशिवाय ती पूर्णत्वाला पोहोचत नाही!!

                                                                    -- चिनार