चहा की कॉफी?

चहा आणि कॉफी ही खरी तर जागतिक स्तरावरची पेये. पण आपण ज्या प्रकारे त्यांचे देशीकरण केले आहे ते पाहता अजून दोनेक हजार वर्षांनी त्यावेळी 'भारताची उज्ज्वल परंपरा' शोधणाऱ्या मंडळींनी ही पेये मूळची भारतातलीच असा दावा केल्यास आश्चर्य वाटू नये.
बालपणी माझा प्रथम संबंध आला तो चहाशी. गंगावेशीतला आज्जीकडे गेले की आम्हां लहान मुलांना 'चहा' देण्यात येई. म्हणजे काय, तर फुलपात्रभर दुधात दोन चमचे (मुळातला दुधाळ) चहा घालून ते पेय आमच्या गळी उतरवण्यात येई. मला जरी दुधाची साफ नावड असली तरी तो 'चहा' मला अजूनच भयानक वाटे.
'आमच्या वेळेस असे नव्हते' वा 'बालपणीचा काळ सुखाचा' छाप गळेकाढू मंडळींना त्या काळातली दूध पिण्याची सक्ती, करवंदांचे लोणचे दुसऱ्यांदा मागायला बंदी, पापड-कुर्डया आदी तळणीच्या पदार्थांचे सक्त रेशनिंग या गोष्टी आठवत नाहीत हे बरे आहे. हव्या त्याच गोष्टी आठवणे हे एक वरदान आहे.
त्या काळात कॉफी पिणारी मंडळी मोजकीच असत. आणि जी गोष्ट कमी मंडळी करतात त्याला आपोआप वलय प्राप्त होते या न्यायानुसार 'कॉफी पिणे' याला ते वलय प्राप्त झाले यात नवल नव्हे. माझ्याच वयाच्या आणि त्या काळात अमेरिकेत वाढलेल्या ऍनने नंतर सांगितले की तिच्या बालपणी अमेरिकेत असे वलय 'चहा पिणे' याला असे.
त्या काळी कॉफी म्हणजे वस्त्रगाळ पूड असे, जी दूधपाणीसाखर मिश्रणात घालून खळाखळ उकळण्यात येत असे. काही ठिकाणी ही पूड नसून काळ्या रंगाच्या चिकटसर वड्यांच्या स्वरूपात अस्तित्वात असे. हे द्रव्य गाळण्यातून ओतल्यावर त्यातली बरीचशी कॉफीपूड सटकून कपामध्ये आपला तळ जमवत जाई. कॉफी प्यायला जसजसा उशीर होत जाई तसतसा खालचा साकळलेला तळ ऊर्ध्वदिशेला विस्तार पावत जाई. त्यामुळे शेवटचा घोट पिणे हे सिगरेटचा फिल्टरपेपरला टेकलेला शेवटचा झुरका मारण्याइतकेच अवघड असे.
पण त्याच काळात केव्हातरी ब्रू इन्स्टंट कॉफी प्रचलित झाली. कदाचित ती आधीपासूनही उपलब्ध असेल पण आम्हांला अप्पांच्या प्रमोशननंतर परवडू लागली असेल. 'ब्रू'ने खालचा साका नाहीसा केला. फक्त उकळत्या दुधात ब्रू घातली तर दूध फाटण्याची शक्यता असे. त्यामुळे उकळत्या पाण्यात ब्रू-साखर घालून मग त्यात हळूहळू दूध घालत उकळवणे हा एक प्रकार. दुसरा म्हणजे कपात ब्रू-साखर घालून त्यात उकळते पाणी घालून साखर विरघळली की हळूहळू गरम दूध घालणे हा दुसरा प्रकार.
तिसरा प्रकार नंतर उमजला. कपात ब्रू-साखर घालायची. त्यात एक-दोन चमचे पाणी घालून ते मिश्रण चांगले रगडायचे. गरजेनुसार आणखी एखाद चमचा पाणी घालायचे. दहाएक मिनिटांच्या कष्टांनंतर कॉफीचा काळा रंग नाहीसा होऊन टूथपेस्टच्या फेसासारखा प्रकार तयार होई. त्यात उकळते दूधपाणी घातले की बोटदीडबोट फेस तरंगत असलेली कॉफी मिळे.
हाच प्रकार यंत्राच्या सहाय्याने करता येई. तयार कॉफीमध्ये एका नळकांड्याने फसाफसा वाफ मुरवत असा फेस करण्यात येई. पुण्यात त्याला 'एक्स्प्रेसो' (अधिक बहकलेल्या मंडळींसाठी 'एस्प्रेसो') म्हणण्याची प्रथा होती. पुढे खरी एक्स्प्रेसो पिण्याची वेळ आल्यावर यातल्या बहुतांश मंडळींची तोंडे कडवट झाली. आजही तुम्ही पुण्यात 'सीसीडी' वा 'बरिस्ता'मध्ये जर 'एक्स्प्रेसो'ची मागणी केलीत आणि तुमच्या चेहऱ्यावर पुणेरी भोटपणाचा अंश दिसला तर वरकरणी आदर दाखवत "दॅटस कॉफी विदाअट मिल्क ऍन शुग, व्हेरी बिटअ" असे ऐकवण्यात येते.
असो.
तर ब्रू कॉफी आमच्याघरी प्रचलित झाल्यापासून, म्हणजे चाळीसेक वर्षांपूर्वी, मी कॉफीपक्षाला मिळालो. लहानपणी घेतलेला दुधाळ चहाचा धसका अजून गेला नव्हता.
तसा आमच्या घरी चहापक्ष मवाळच होता. सकाळी एकच वेळ चहा घेण्याची जन्मदात्यांना सवय होती. उकळलेल्या पाण्यात साखर घालून ती विरघळल्यानंतर त्यात चहापूड (लिप्टन यलो लेबल) घालून लगेच ज्योत बंद करून वर झाकण ठेवण्यात येत असे. पाचेक मिनिटांत चहापूड खाली बसली की मग तो चहा कपात गाळून वरून गरम दूध घालून एकजीव करण्यात येत असे. चहा करून प्यायची वेळ आलीच तर मी हीच कृती वापरतो.
ब्रू कॉफी हातास लागल्यापासून मला काळी कॉफी प्यायची चटक लागली. ब्रू-साखर कपात घालून वर उकळते पाणी घालायचे. ती कडवट गोड चव मला आवडू लागली. पातेले धुण्याची कटकट नाही. दुधाळ ओशटपणा नसल्याने कपही धुवायला सोपा.
चहा पिणे मात्र मुळीच होत नसे. मी कॉलेज पार करेपर्यंत दोन कप चहा एका वर्षात असे माझे सरासरी प्रमाण असे. हे दोनसुद्धा म्हणजे कुणाच्या घरी गेले आणि 'मी चहा पीत नाही' हे सांगण्याची संधी मिळण्याआधीच चहाचा कप समोर आला तर. पुन्हांदा त्या घरी गेले तर तेव्हाना ती मंडळी शाहणी झालेली असत.
नंतर पोटासाठी घर सोडल्यावर कमी (म्हणजे खिशात असलेल्या) पैशांत तरतरी देणारे आणि सहज उपलब्ध असलेले हे पेय मी सहज पिऊ लागलो. कॉफी महाग मिळे, त्यामुळे तिकडे वळलो नाही.
घर सोडल्यावर सहाएक वर्षांनी भाड्याची का होईना, स्वतःची अशी जागा झाल्यावर, मी परत कॉफीपक्षाला येऊन मिळालो. आता मी कॉफीच्या रंगापेक्षा तिच्या कॉफीपणाला अधिक धार्जिणा झालो होतो. त्यामुळे काळ्या वा पांढऱ्या रंगाकडे मी दुर्लक्ष करू लागलो. पांढरी कॉफी करण्यासाठी माझ्या ब्रह्मचाऱ्याच्या मठीत दूध ठेवणे कटकटीचे होते. त्यामुळे मी कपात ब्रू-साखर घालून वर गाळणीत चमचाभर 'अनिकस्प्रे'ची दूधभुकटी घालून वरून उकळते पाणी ओतत असे. पांढरट (काळी नसलेली) कॉफी तयार. असंख्य गुठळ्या होणाऱ्या 'अमूल'च्या  दूधभुकटीपेक्षा 'अनिकस्प्रे' कितीतरी सरस होती. पिठीसाखरेइतक्या सहजतेने ती पाण्यात विरघळत असे.
घरी चहा करण्याचा विचार एकदा मनात आला आणि मी लिप्टन रेडलेबलचा (यलो लेबल मिळाला नाही) एक पावकिलोचा पुडा आणून ठेवला. आठेक वर्षांनी लक्षात आले की तो उघडलाच गेला नव्हता. तसाच टाकून दिला.
नेस्कॅफे नामक प्रकाराकडे मी कायम डोळेझाक केली. रविवारच्या 'इंडियन एक्स्प्रेस'मधल्या मेघनाद देसाईच्या सदरासारखाच हा अनुल्लेखाने मारण्याच्याच लायकीचा प्रकार आहे. नेस्लेचा मालक जर कधी भेटला तर त्याला शुद्ध कोल्हापुरीत काही वैश्विक सत्ये समजावून देण्याचा माझा निश्चय आहे, पण लेकाचा अजून तरी गावलेला नाही.
अचानक माझ्या आयुष्यात फिलिप्सचा इलेक्ट्रिक कॉफी परकोलेटर आला. ब्रू कॉफीची यत्ता ओलांडून आता फिल्टर कॉफीच्या प्रकारांमध्ये डोके घातले. पुण्यात सहजी मिळणारे प्रकार तीन - पीबेरी, प्लँटेशन आणि रोबस्टा. मध्येच कधीतरी 'मैसूर नगेटस' नावाचा प्रकार मिळू लागला आणि बंदही झाला.
विविध प्रयोगांती पीबेरी आणि प्लँटेशन निमेनिम या मिश्रणाला येऊन ठेपलो आहे. पीबेरी-प्लँटेशन-रोबस्टा ४०-४०-२० असेही कधीकधी करतो. पण चिकोरी मिसळण्याची फडतूस चिंधीचोरगिरी करत नाही. 'वैशाली' वा 'रूपाली'मधल्या कॉफीच्या नावाने उसासे टाकणाऱ्यांना या दोन्ही ठिकाणी कॉफीमध्ये प्रच्छन्नपणे चिकोरी मिसळतात हे ठाऊक आहे की नाही कोण जाणे.
कॉफी म्हणजे बिनदुधाची, बिनसाखरेची, परकोलेटरमधून ठिपठिप गळताना अख्खे घर त्या गंधाने भारून टाकणारी.
चहापक्षही मधून अधून आपला मानतो, कारण हिरवा चहा (ग्रीन टी). हे अतिमाफक वासाचे आणि जवळपास बिनचवीचे पेय मला भावले. 'हँगओव्हर'वरती हा एक छान उतारा आहे हे कळल्यावर तर फारच. उन्हाळ्यात त्यात एकादी लिंबाची फोड पिळली तर उत्तम.
कधीकधी कॉफीपक्षातून तात्पुरते निलंबित व्हायची वेळ येते. सर्दी वा तत्सम संसर्ग झाल्यावर घैसास तत्परतेने कॉफी बंद करायला लावतात. त्यावेळी हिरवा चहा मदतीस धावतो. मातापित्यांचे स्मरण करून कधीमधी फिकट चहाही ढोसतो. पण सकाळी उठल्यावर काही लिहा-वाचायला बसले की दोन-तीन तास जे पाचसहा कप द्रव्य लागते ते फिल्टर कॉफी वा हिरवा चहाच असावे लागते. तेवढ्या प्रमाणात फिकट चहा पिणे मला तरी अशक्य आहे.
काही मंडळी 'अमृततुल्य' नामक पेय पितात. थालिपिठाचा आणि ब्रिटिश खाद्यसंस्कृतीचा जेवढा घनिष्ट संबंध आहे तेवढाच या पेयाचा चहाशी संबंध आहे. स्थलपरत्वे साखर, सुंठ, वेलदोडे, लवंग, दालचिनी असे त्यात बरेच काही असते. काहीवेळेस तो अतिदुधाळही असतो.
असो. आता माझी कॉफी पिण्याची वेळ झाली.