गंभीर फिलोसोफिकल प्रश्न

लोकसत्ताचे पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या ब्लॉगची लिंक पाठविली आहे.   पुण्यात एका बिल्डरने एक सार्वजनिक मुतारी "दत्तक घेतली" याची कथा. इथे वाचा. थोडक्यात - पुण्यात नळ स्टॉप जवळ  एक मुतारी होती, अस्वच्छ, घाण वास, वगैरे. संजय देशपांडे या बिल्डरने ती "दत्तक घेतली" व त्या मुतारीच्या स्वच्छतेची व्यवस्था केली. आता ती जागा स्वच्छ आहे, महिन्याला बारा हजार खर्च येतो, इतरांनी पण तसेच का करू नये, बिल्डर लोक "एकेक पार्टी देतात, त्यावर पाच-पन्नास लाख उडवतात... " त्या मानाने हे अगदीच किरकोळच, वगैरे.

फार गंभीर फिलॉसॉफिकल प्रश्न आहे. जे काम ज्याचे ते त्याने केले नाही तर काय करावे - आपणच ते करावे, का त्याला ते करण्यास भाग पाडावे. १९८८ च्या दरम्यानची गोष्ट.   माझा स्टेनो वेळेवर येत नसे, दिवसात जेवढे काम अपेक्षित होते तेवढे करीत नसे. १९८८ पर्यंत संगणक ऑफिसात येण्यास सुरुवात झाली होती, व बऱ्याच ऑफिसर लोकांना संगणक वापरीत असल्याने बऱ्या पैकी टायपिंग येत होते. मी बी टेक व एम टेक दोन्ही वेळी थीसिस बाजारातून टाईप करून घेण्या करता पैसे नसल्या मुळे (साध्या टाइपरायटर वर) स्वतःच टाईप केले होते, तसेच संगणक टर्मिनल वर बरेच FORTRAN प्रोगाम काम केले होते, म्हणून माझा टाइपिंग स्पीड तर खूपच चांगला होता.   तर स्टेनोला डिक्टेशन देऊन तो कधी करेल याची वाट बघत बसण्या पेक्षा सरळ आपणच ते वर्ड-स्टार (१९८८ काळातील वर्ड प्रोसेसर) करून का न टाकावे? एम टेक शिक्षणाचे वेळी यूरोप मध्ये दीड वर्षे असताना पाहिले होते - परदेशात कुठे प्रत्येका कडे स्टेनो असतो? आमच्या विद्यापीठात फक्त हेड ऑफ डिपार्टमेंट कडेच स्टेनो होती.  बाकी प्रत्येक जण - सर्व प्रोफेसर - आपले टायपिंग स्वतःच करतो. असे उदात्त विचार. त्या वेळी मी Deputy  Director म्हणजे ऐकायला जरी मोठे वाटले तरी प्रत्यक्षात ऍडमिनिस्ट्रेशनची फारशी जबाबदारी नसलेल्या पदावर होतो.   आणी मी व आमच्या ऑफिसात इतर पण अनेकांनी बरेच  टंकलेखन स्वतःच करण्यास सुरुवात केली.

काही वर्षांनी एक दोन पदे वर चढून जरा ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आल्या वर मग कळले की जे काम ज्याचे ते त्याने केले नाही म्हणून आपणच ते करू लागल्यास ते काम ज्याचे तो अधिकच निष्काळजी/ आळशी होत जातो. भरीस तुम्ही एक "कमकुवत ऍडमिनिस्ट्रेटर" आहात असा तुमचा लौकिक पसरतो, व त्याचे इतर परिणाम होऊ लागतात.

शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता महापालिका ठेवत नाही म्हणून आपणच ते काम हाती घ्यावे हे किती जणांना मान्य आहे? आणी हे कुठे थांबणार? महापालिका रस्त्या वरचे फ्यूज झालेले दिवे बदलत नाही,   ४५ W  सीएफ़ेएल चारशे रुपयांचा तर असतो, आपणच बदलून टाकावा; रस्त्या वरील खड्डे बुजविण्यास असा किती खर्च येतो? बुजवून टाकावेत.   प्रत्येकाने आपल्या घरच्या पाच मीटर इकडे व पाच मीटर तिकडे असे खड्डे तर बुजविले तर सगळा रस्ता छान नाही का होणार?  

किती जणांना ही फिलॉसॉफी मान्य आहे?