असा मी अबब मी - ३

लेखांकाला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. पट्टरुंदी अर्थात बॅण्डविड्थ कमी पडल्यामुले चित्रेच चढवता येत नव्हती. माझ्या खेडेगावातल्या २जी सेवेवर जमलेच नाही. शेवटी सायबर कॅफेमधून हे काम करावे लागले. असो.

गेल्या लेखात चढवू शकलो नाही ते चित्र. शिस्तीत बसलेले सोन्याचे अणू.

शिस्तीत  बसलेले सोन्याचे अणू

" कालच जरी भेटलो होतो तरी खूप दिवसांनी भेटतो आहोत असं वाटतंय. अबबतंत्रातून भौतिकीला गेल्या काही दशकात अबब-वीजक-विज्ञान - nanoelectronics, अबबयांत्रिकी -  nanomechanics, अबबऊर्जाकणविज्ञान - nanophotonics  आणि अबबमूलक-विज्ञान - nanoionics असे नवनवीन धुमारे फुटलेले आहेत. या धुमार्‍यांमुळे अबबतंत्राला एक पायाभूत वैज्ञानिक अधिष्ठान लाभलेले आहे." सारा.

"म्हणजे आदित्य आणि पप्पूच्या अकलेला जशी सांबरशिंगं फुटली आहेत तसे?" रेणुका.

"कुठे होतो आपऽऽण? हंऽऽ! त्यानंतर अमेरिकेच्या ‘नॅशनल नॅनोटेक्नॉलॉजी’ तंत्रज्ञांच्या पुढाकारामुळे या तंत्राचे अधिक व्यापक असे वर्णन रूढ झाले. त्यांनी अब्जांशतंत्राची नेमकी व्याख्या केली. या व्याख्येप्रमाणे ‘किमान एक मिती १ ते १०० नॅनोमीटर या सूक्ष्म आकाराची असलेल्या पदार्थाची कुशल मांडणी’ म्हणजे अब्जांशतंत्र.  या व्याख्येतून असाही एक अर्थ ध्वनित होतो की, अतिसूक्ष्म अशा क्वॉन्टम प्रणालीत ‘पुंज यांत्रिक बला’ला क्वान्टम मेकॅनिकल फोर्स - ला फारच महत्त्व प्राप्त होते. आणि त्यामुळे मग हे तंत्र हे तंत्र उरत नाही. मग अबबतंत्र बनते ‘एक विशिष्ट तांत्रिक साध्य’ अशी संशोधन शाखा." रिचर्ड.

"वस्तूंच्या या खास अतिसूक्ष्म आकारमामानामुळे या वस्तूला मिळालेल्या गुणधर्मांचे संशोधन." ग्रेसी.

"फक्त आकार कमी झाल्यावर गुणधर्म कसा काय बदलेल?" केतनभाई.

"माझ्या पण डोक्यात हाच प्रश्न उगवला" माही.

"तमे बारीक झालात की वजन कमी होते आणि बीपी नॉर्मल होते ना तसा! कालचं खरंच विसरलात की फिरकी घेताय?" हन्साबेन.

"बदलतात बरंऽऽ केतनभाईऽऽ, बदलतात. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे बदलतात." ग्रेसी.

"कमी म्हणजे आकार किती कमी झाल्यावर?" रेणू.

"तुझ्या मेंदूएवढा कमी!" पप्पू.

"पण तुझ्या मेंदूपेक्षा मोठा! चूप! बोल ग तू आई." सारा.

"साराचा सारांश नेहमीपणे चुकीचा." पप्पू.

"उदाहरणार्थ साधे ऍल्यूमिनिअम आपण भांडी बनवायला वापरतो. ऍल्यूमिनिअमच्या प्रेशर कुकर, तवा इ. वस्तू आपल्या नेहमीच्या वापरात आहेत. परंतु याच ऍल्यूमिनिअमच्या कणांचा आकार कमी होत २० ते ३० अबबमी एवढा कमी झाल्यास ऍल्यूमिनीअम कण अचानक स्फोटक बनतात." ग्रेसी.

"आयच्या गावाला स्फोट!" आदित्य.

"वस्तूच्या आकारमानातील लांबी, रुंदी, जाडी/खोली यापैकी एक जरी मिती - डायमेन्शन २० ते ३० अबबमीपेक्षा कमी झाली की जादूच होते. रंग, वीजवाहकता, प्रकाशवहन, प्रकाशपरावर्तन, चुंबकीय गुणधर्म बदलतात. १५०० अंशावर वितळणार्‍या एखाद्या धातूचा अबबकण कदाचित ५०० अंशात देखील वितळू शकेल. ऍल्यूमिनियमची जादू आपण आत्ताच पाहिली आहे." रिचर्ड.

"आयच्या गावाला पाऊस! मग अगोदर एकेका सगळ्यात स्वस्त पदार्थांचे गुणधर्म तपासायचे. ते गुणधर्म जिथे हवे असतील तिथे मूळ पदार्थाऐवजी तो अबबकण वापरायचा. म्हणजे कदाचित सोन्याऐवजी अबबदगड वगैरे वापरता येईल." पप्पू.

"मग आपण सगळ्या वैज्ञानिकांना घालवून देऊन तिथे सुद्धा आदित्य, पप्पूसारखे अबबदगड बसवूयात की!" सारा.

"तुझ्या पंधराशेबावनकशी अबबदगडी मेंदूला दगडाचे फारच प्रेम ग सारिटले. सध्या माझ्या मेंदूसारख्या तेज, वेगवान असे अग्निबाण बनवण्याच्या तंत्रात अबबइंधन वापरण्यावर प्रयोग सुरू आहेत." आदित्य.

"पण सध्यातरी अबबकण मिळवण्याची प्रक्रिया अतिखर्चिक आहे. खसखशीच्या ढीगातून आपण बोटांनी खसखशीचा एकच दाणा उचलायला गेलो तर नीट जमत नाही. हवा तो नेमका दाणा तर ............. बापरे! मग आपल्याला दहावीस रुपयांचा सूक्ष्म चिमटा घ्यावा लागेल. मग ५ - १० हजार अबबमी आकाराचा सूक्ष्मजिवाणू म्हणजे बॅक्टेरीया उचलायला किती किंमतीचा चिमटा लागेल? शिवाय तो नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही म्हणून एक अबबसूक्ष्मदर्शी लागेल, त्यासाठी एक अबबप्रयोगशाळा बनवावी लागेल, प्रयोगशाळेत जोडीला इतर अबबउपकरणे, कुशल वैज्ञानिक, तंत्रज्ञ, कुशल कर्मचारी वगैरे लागतील. म्हणजे सोन्याऐवजी अबबदगड वापरायचा झाला तरी सोन्यापेक्षा जास्त महाग पडेल." आदित्य.

"अबबमहाग म्हण गधड्या!" रीटा.

"आयच्या गावाला दुष्काळ! पण कुशल नाही अबबकुशल कर्मचारी." रेणुका.

दुरुस्तीबद्दल धन्यवाद. मंडळ आपले आभारी आहे." आदित्य.

"अबबआभारी आहे." सारा.

"अरेवा!, नवी परिभाषा नवा शब्दकोष. शाबास मुलांनो." देसाई.

"वात्रटपणातून विज्ञान पुढे जावे तर असे." पप्पू.

"विज्ञान नाही पुढे गेले, फक्त तुमची आचरट भाषा पुढे गेली. परिभाषा पण नाही. विज्ञान आणि परिभाषा अजून तिथेच आहेत." सारा.

"पुन्हा पाऊस!" आदित्य. 

"आता अबबमुस्काटात मिळेल हं एकेकाला!" सारा.

"मोठ्यांना पण?" पप्पू.

"चूप!" सारा.

"पण विषय डोक्यात शिरला ना! माहिती, विचार, भावना वगैरे दुसर्‍याला सांगणे हेच तर भाषेचे काम आहे. विषय सोप्या भाषेवर स्वार झाला तरच डोक्यात शिरतो. गडबड इथे असते की ही भाषा किंवा परिभाषा हा एक खट्याळ, अवखळ वारु आहे. त्यावर स्वार होणे तसे कठीणच. मनात आले तर पाठीवर घेईल नाहीतर फेकूनच देईल." सीमा.

"हॅ हॅ हॅ! खरे तर बहुतेक वेळा कठीण परिभाषाच विज्ञानावर स्वार होते. मग ती सगळ्यांनाच भारी पडते." केतनभाई.

"खरे तर या पातळीवर परिभाषा मी वापरणारच नाही. उगीच आ बैल मुझे मार कशाला? निसर्गातल्या सत्याचा वेध म्हणजे विज्ञान. वैज्ञानिक सत्याची अचूक आणि नेमकी शब्दबद्ध अभिव्यक्ती म्हणजे परिभाषा. अर्थाच्या नेमकेपणासाठी आणि अचूकतेसाठी परिभाषा निर्माण केली जाते. परिभाषेशिवाय विज्ञान पुढे जाणे अशक्यच आहे. उष्णता आणि तापमान यातला भेद, विशिष्ट उष्णता म्हणजे काय, अनुदभूत, सुप्त उष्णता म्हणजे काय हे आपण परिभाषेशिवाय समजून घेऊ शकणारच नाही. अबबला काय अर्थ आहे का? परंतु सामान्य माणूस पारिभाषिक शब्दांना बिचकतो. एरवी वापरात नसलेले ते शब्द त्याला नीट कळत नाहीत. अगोदर तो विषय समजून घ्यायला जवळ येतो. पण दोन पारिभाषिक शब्दांची अबबमुस्काटात बसली की मग तो विज्ञानापासून दूर पळतो. गणिती सूत्राचे तर नाव काढताच वाघसिंह दिसावेत तसा दूरच पळतो. आजूबाजूलाही फिरकणार देखील नाही. तसं होऊ नये म्हणून मी गणित पूर्णपणे टाळीनच, सध्या फक्त सोपे शब्द वापरणार आहे. आणि विषयाचा गाभा नीट समजल्यावर नंतरच पारिभाषिक शब्द हळूच वापरीन. शब्द पारिभाषिक आहे की नाही हे कळावे न कळावे अशा सहजतेने. परिभाषा असूद्यात शिस्तबद्ध अध्ययनासाठी. सध्या परिभाषेचा वारु माणसाळवण्याऐवजी आपणच भाषाळूयात. आपल्याला फक्त विषय काय आहे तेवढेच समजून घ्यायचे आहे. तरी एखादा पारिभाषिक मराठी शब्द ठाऊक असेल तर नक्की सांगा. सगळ्याची उजळणी होईल. सध्या मात्र अब्जांशऐवजी अबब!" ग्रेसी.

"हो. गणित तर एक आईच आहे. जमलं तर आई! नाही जमलं तर सावत्र आई!" हन्साबेन.

"सावत्रआज्जीला माझा प्रणाम." पप्पू.

"वा ग्रेसी वा. किती मूलगामी विचार मांडलेस. विज्ञानाची तुझी व्याख्या तर लाजबाब. मी पण थोडे विषयांतर करते. ऍलन पेव्हीओ Allan Urho Paivio नावाचा एक कॅनेडीयन वैज्ञानिक होऊन गेला. एक वल्लीच होता तो. शरीरसौष्ठव स्पर्धेत कॅनडातला अव्वल क्रमांक १९४८ साली पटकावल्यानंतर या महाशयांना मानसशास्त्राची गोडी लागली. पुढे हा एक मोठा मानसशास्त्रज्ञच बनला. स्मरणशक्ती वाढवायला उपयुक्त अशी ड्युअल कोडींग थिअरी - DCT नावाची एक उपपत्ती त्याने विकसित केली. भाषा आणि दृश्यप्रतिमा यांची स्मृती मेंदूतील दोन वेगळ्या ठिकाणी साठवली जाते. पण दृश्य प्रतिमेचे स्मरण साध्या शब्दांपेक्षा जास्त दीर्घकाळ टिकणारे असते. त्यामुळे एकाच गोष्टीसाठी शब्दाबरोबर दृश्य प्रतिमा वापरल्यास ती प्रतिमा स्मरणाची कळ किंवा मेमरी ट्रिगर म्हणून काम करते. दिवा लावतांना दिव्याचे बटण काम करते तशी. त्यामुळे गरज पडली की ती माहिती अचूक आठवते. त्याचबरोबर त्या व्यक्तीची ती स्मृती दीर्घकाल टिकण्याची कुवत देखील वाढते हे त्याने शोधून काढले. अबबतंत्र असा मनावर ठसा उमटवणारा शब्द, प्रतिमा किंवा प्रतीक जर कठीण पारिभाषिक शब्दाबरोबर वापरले तर स्मरण जास्त खोल, पक्के राहाते आणि स्मरणातली सरमिसळ की सळमिसर किंवा भेसळ टळते त्यामुळे बलासाठी F, शक्तीसाठी P तर ऊर्जेसाठी E  अशी अक्षरप्रतीके स्मरणबटणे म्हणून वापरली की जवळजवळ सारख्या अर्थांच्या शब्दांचा गुंता, परीक्षेतला अनर्थ टळतो. ही अक्षरप्रतीके डोळ्यांसमोर आणून पहा ऍलन पॅव्हीओची जादू. अणू म्हटल्यावर हायड्रोजन अणूचे नील्स बोहरचे प्रारूप, डीएनए म्हटले की डबल हेलीक्स अशा प्रतिमा वापरल्या तर स्मृती जास्त खोल, पक्की राहाते. अब्जांश आणि अबब हे मस्त जुळते. एकदा का विषयात जिज्ञासा, आकर्षण निर्माण झाले की मग पारिभाषिक शब्द आणि त्यांची प्रतीके आपल्या नकळत आपल्याला कळू लागतात. तेव्हा अबब हा शब्द ट्रॉयच्या घोड्यासारखा अब्जांशाच्या राज्यात घुसवून हवी ती माहिती काढूयात." सीमा.

"ऍलन बॅडली Alan Baddeley याने नंतर याच उपपत्तीचा विकास करून व्हीज्युओ स्पेटीअल स्केचपॅड - त्रिमिती दृश्यपाटी आणि फोनोलॉजिकल लूप - ध्वनीतार्किक आकलन या संकल्पना मांडल्या."  रीटा.

"मुख्य गोष्ट म्हणजे अबबतंत्रामुळे, भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, सारीच विज्ञाने सर्वांगानी पुढे जातील. असे हे सर्वांगांनी, अंगप्रत्यंगांनी विकसित होणारे दूरगामी तंत्रज्ञान आहे. म्हणजे जैवभौतिकी, जैवरसायन या चालीवर अबबभौतिकी, अबबरसायन वगैरे वगैरे. बरेचसे वेगळे देखील आहे ते. कसे ते मुलांनो आता पुढच्या वेळी. मला तरी वाचावे लागेल. तेव्हा आपण विविध सूक्ष्मदर्शी कसे विकसित होत गेले त्याचा इतिहास पण पाहूयात. तुम्ही महाजालावर हॅंग आऊट करता करता एकमेकांना अहूनमधून भेटत असालच. आता आम्ही मोठी माणसं इतक्या दिवसांनी भेटलो आहोत तर जरा ख्यालीखुशालीच्या गोष्टी करतो." रिचर्ड.

"रिचीकाका तसे मोठ्ठेच आहेत." रेणू.

"बटाटा म्हणायला लाजतेस काय? बटाटा काय इंझमाम काय, सगळं मला ठाऊक आहे बरं. केतनभाई तुला ही पोरं टका म्हणजे टकलू कावळा म्हणतात. काळा कोट घालतोस म्हणून. आता जीभ काढू नकोस ग! पण गमतीदार नावे वाईट असो वा बरी, ती प्रेमानेच ठेवली जातात आणि कोणाला चिडवले की सारे जग क्षण दोन क्षण चमकदार होते आणि अचानक वीज चमकून जावी तसे मन पण लख्ख होऊन जाते. ज्याला नावे ठेवतात त्यानेही त्या आनंदात सहभागी व्हावे. आम्ही पण तुमच्याएवढे असतांना खडूस मोठ्यांना हिटलर, अयूबखान, खोमेनी वगैरे नावे ठेवीतच होतो." रिचर्ड.

"आयच्या गावाला पाऊस!" केतनभाई.

"काका तुम्ही पण?" आदित्य.

क्रमशः