लैंगिक शिक्षण : कसं व केव्हा बोलावं

लैंगिक विषयावर मुलांशी कसं व केव्हा बोलावं: ह्या विषयावर सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरमतर्फे मैत्रेयीने पालकांशी संवाद साधला. त्याचा हा वृत्तांत.

मुलगी/मुलग्यात शारीरिक बदल ठळकपणे दिसू लागले की पालकांना काळजी वाटू लागते ( मुलींच्या बाबतीत जरा जास्त. ) अन हीच ती वेळ, हाच तो क्षण असं वाटून पालक  अस्वस्थ होतात पण मोकळेपणाने, धिटाईने ह्या विषयावर बोलता येईल का, ही शंका तर जबरदस्त असते.  मुलं वयात येताना अथवा आल्यावर जर का आपण  संवाद साधत असू तर तो साधायला नक्कीच उशीर झालाय, हे काम ह्यापूर्वी करायला हवं होतं अन तेही तयारीनिशी. आपण जेवणाच्या, शिस्तीच्या, भाषेच्या ज्याप्रमाणे सवयी शिकवितो त्याचप्रमाणे त्यांच्याशी लिंग व सेक्सविषयी बोललं पाहिजे. तीन वर्षाच्या मुलाला मुलगा/मुलगी हा फरक समजतो न शिकविता. म्हणजेच आपल्याला लैंगिक शिक्षणाची सुरुवात मुल तीन वर्षाचं झालं की करायची आहे. आज  त्यासाठीचा लक्ष्य गट आहे तीन ते चोवीस वर्ष वयाचा! आज समाजात घडणार्‍या घटना आपण बघतो आहोतच.  मुली सुरक्षित नाहीत त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पुरुषजातीपासून, ज्यात आपले भाऊ, मित्र, काका, मामा आहेत! ही जी पुरुष जात आहे तिला स्त्रीचा आदर  करायला  शिकवल्याचं गेलंच नाहीये का? हे असं घडू नये म्हणून मुलांना हे शिकविण्याचं काम लहानपणापासून झालं पाहिजे. समाज सुदृढ, निकोप होण्यासाठी योग्यपध्दतीने, योग्य वयात (लहानपणापासून) लैंगिक शिक्षण दिल्या गेले पाहिजे, त्याची सुरुवात पालकांनी करायची आहे.   

शिकवायचं कसं व केव्हा त्यासाठी  ३-६, ६-१२, १२-१६ व १६-२४ अशी वयाची विभागणी करू व त्या  वयात त्यांच्यात होणारे शारीरिक बदल, भावनिक बदल व सामाजिक वर्तन अश्या तीन स्तरांवर  आपण  विचार करु.

पहिल्या तीन ते सहा ह्या गटाविषयी बोलू. ह्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होत असते  व ग्रहणशक्ती प्रचंड असते. नवनवीन गोष्टी, भाषा ह्या वयात मुलं शिकत असतात. ही उदाहरणं  आहेत आपल्या आसपास किंबहुना  आपल्या घरात घडणारी,लिंगभिन्नतेसाठीची. मुलांना  विचारलं स्वयंपाक कोण करतं? आई, ऑफिसला कोण जातं ? बाबा.  अशी उत्तरे मिळतात. मुलाला म्हणतो मुलींसारखं काय रडतो किंवा बाहुलीशी काय खेळतो मुलींसारखं  किंवा मुलीला म्हणतो काय मुलांसारखी बॅट्बॉल खेळते... इ.  एवढंच कशाला बाळ जन्माला आल्या आल्या मुलगा असेल तर निळा व मुलगी असेल तर गुलाबी कपडे आणतो.  ते इतरही रंगाचे किंवा सारख्या रंगाचे का असू नये? ह्या अन अश्या गोष्टी आपण पालकच करत असतो ना?  स्त्री - पुरुषांमध्ये भिन्नता आहे पण  उच्चनीचता नाही. स्वयंपाक, नोकरी करणे  एक काम आहे  ते कोणीही करू शकतं. पोलिसमॅन असतो तशी पोलिसवुमनही असते, हे आपण शिकवले पाहिजे.   वागणूक, नियम, शिस्त व कामाची  (घरातली/बाहेरची)वाटणी हे लिंगभेदविरहीत असली पाहिजे ह्याची जाण पालकांना असली पाहिजे व ती मुलांपर्यंत पोचली पाहिजे योग्य तर्‍हेने व योग्य वयात.

पुढचा टप्पा आहे तो सहा ते बारा वर्षाचा. तुम्ही निरीक्षण केलं असेल तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. वर्गात मुला मुलींचे बेंचेस वेगवेगळे असतात. एकमेकांबद्दल तिरस्कार असतो. मुली काय अश्याच किंवा मुलं काय असेच असा शिक्का बसलेला असतो, भांडणं होत असतात. घरात मुलगा व मुलगी दोघही असतील तर मुलगा वर्चस्व दाखवायला लागतो... मी मुलगा आहे... मी ताकदवान आहे ... मला हे करण्याची मुभा आहे इ.  हा  काळ आहे संस्काराचा  किंवा एकमेकांबद्दल आदर प्रस्थापित करण्याचा , निकोप स्त्री - पुरुष संबंधाचा पाया मजबूत करण्याचा. आठ ते दहावर्षामध्ये (मुलांमध्ये थोडं उशिरा)आंतरिक शारीरिक बदल लिंग सापेक्ष दिसायला सुरुवात होते अन त्याबाबत त्याला प्रश्न पडायला लागतात.   त्याला जिज्ञासा, कुतुहल आहे शरीरात घडणार्‍या घडामोडींची.  अयोग्य, चुकीच्या पद्धतीने मुले माहिती घेत असतात त्याला कारण घरी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलल्या जात नाही.माध्यमं व मित्रमंडळाचा प्रभाव ह्या वयात खूप असतो. व्दिअर्थी , सेक्स संबंधित विनोद ह्या वयात मुलं करताना  आढळतील.  

बाराव्या व चौदाव्या वर्षी मानसिक पातळीवर होणारा बदल वेगळा आहे. लक्षात येण्यासाठी एक उदाहरण पाहू. टीव्हीवर आयटेम साँग लागलंय... चौदा वर्षाचा मुलगा ते गाणं एन्जॉय करेल न बोलता, प्रतिसाद न देता कारण त्याला माहिती आहे असं केल्याने पूर्ण गाणं ऐकता येणार आहे. पण बारा वर्षाचा मुलाला नक्कीच काही प्रश्न पडतात ते त्याला  न संकोचता  विचारता येण्यासाठी घरात  मोकळं वातावरण असायला हवं.  आपल्या समाजात आई मुलीला चार गोष्टी सांगत असते पण वडील मुलाशी ह्या विषयावर बोलताना आढळत नाही, ही दुर्दैवाची,चिंतेची बाब आहे.

दहा बारा वर्षाच्या मुलांपाशी शिव्यांचा  भरपूर साठा असतो खास करून आईबहिणीच्या. खरंतर त्यांना त्याचा अर्थही कळत नसतो. पण त्यांना ते भूषणावह, मर्दानगीचं लक्षण वाटत असतं.  पालकांनी विशेषतः वडिलांनी अश्या शिव्या देणं चुकीच आहे हे त्यांना समजावयाला हवे कारण ते ह्या परिस्थितीतून गेलेले असतात. मुलगी   उठते-बसते, बोलते कशी ह्यावर आईचा पहारा असतो. चूकीची वागली की  लगेच तिला उपदेशामृत पाजले जाते पण मुलांच्या बाबतीत असं घडत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत अतिशय खेदजनक बाब आहे की वडील आपल्या मुलाशी त्याच्यात होणार्‍या शारीरिक बदलांविषयी बोलत नाही. 

पुढचा टप्पा आहे सोळावर्ष व पुढील - ह्या टप्प्यात त्याच्यात झालेल्या बदलांविषयीची त्याला/तिला थोडीफार जाण आलेली आहे. ह्या टप्प्याला स्वीट सिक्सटीन  म्हटलं आहे त्याचबरोबर सोळावं वरीस धोक्याचंही ! लव्ह लेटर पाठवणं, गर्ल/बॉय फ़्रेंड असणं, रेड रोज डे, व्हॅलेंटाइन डे अश्या गोष्टींचं आकर्षण वाटणं वा हवंहवंस वाटण्याचं हे वय. ह्याही वयात मित्रांचा प्रभाव खूप असतो. पण लिंग निरपेक्ष मैत्री, मित्राचं आपल्या आयुष्यातील स्थान, चांगला/वाईट मित्र ह्या विषयावर  त्यांच्याशी संवाद साधल्या जात नाही. ह्या वयात त्यांच्यात होणार्‍या बदलामुळे बॉय/गर्ल फ़्रेंड असणं त्यांना स्टेटस सिम्बॉल वाटत असतं.   पालकांनीही हे ध्यानात घ्यायला हवं की त्यात गैर काही नाही. एकमेकांना बद्दल आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे, हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे.  मुलींना पाळी येणं हे अगदी नैसर्गिक आहे आणि हे आई समजूनही घेत असते. मुलांच्या बाबतीत असं घडत नाही. वर्गात लिंग उद्दपीत झालं तर काय करायचं हे मुलं विचारू शकत नाही किंवा पालकांनीही त्याला ह्याबद्दल काही सांगितलेलं नसतं. ते त्यांच्या मित्रांशी बोलतात. चुकीची माहिती, ज्ञान  अयोग्य पद्धतीने त्यांना मित्रांकडून मिळतं किंवा माध्यमातून.  माध्यमांबद्दल तर बोलायलाच नको कश्यातऱ्हेने माध्यमातून ज्ञानगंगा वाहत असते ते! पालकांपेक्षा मुलांना ही माध्यमे जास्त परिचयाची आहेत. ह्या विषयावर बोलण्याची  मुख्यतः ही वडिलांची जबाबदारी आहे  आणि ह्या विषयावर मोकळा संवाद साधला गेला तर तो स्वतः स्वतःचा आदर करेल व त्याचबरोबर मुलींचाही करेल. तो मुलींच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही, अपशब्द बोलणार नाही. मुलांनी कुठलाही लैंगिक विषयाबद्दल प्रश्न विचारला की, अभ्यासाकडे लक्ष देत नाही व भलते सलते प्रश्न विचारतो, असं म्हणत त्याला गप्प केलं जातं. पण जोपर्यंत त्याचं कुतूहल शमल्या जातं नाही, तोपर्यंत त्याचं  अभ्यासात लक्ष लागत नाही. एक निरीक्षण आहे सातवीपर्यंत हुशार असणारी मुलं नंतर घसरणीला  लागतात, त्याच कारण काय?  पालकांनी विचार करायला हवा. हे वय त्याचं स्वप्रतिमा तयार करण्याचं असतं आणि ते करण्यासाठी पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. सोळा वर्षाच्या मुला-मुलीत मुलं जन्माला घालण्याची शारिरीक क्षमता असते पण जबाबदारी पेलण्याची नसते. वीस ते चोवीस हा  स्वओळख तयार करण्याचा, चूक -बरोबर पारखून निर्णय क्षमता विकसित करण्याचा काळ!  

दहावीच्या शालेय पुस्तकात लैंगिक शिक्षणाविषयी शास्त्रीय माहिती दिलेली आहे ती आपल्याला द्यायची गरज नाही. पण मुलं चोवीस वर्षाची होईपर्यंत पालकांनी भावनिक व सामाजिक स्तरावर असणार्‍या समस्यांविषयी  मोकळेपणाने बोलायला पाहिजे. आज मुलींना एकविसाव्या शतकात जगण्यासाठी स्वतंत्र, सक्षम केलंय पण मुलांना मात्र विचाराने एकोणिसाव्या शतकातून बाहेर पडूच दिलं नाहीये. मुलींनी उच्चशिक्षण घ्यायचं पण नोकरी करायची नाही किंवा घर सांभाळून नोकरी करायची पुरुषांच्या सहभागाशिवाय. घर संसाराची जबाबदारी ही दोघांचीही असते, ह्याची जाण पुरुषांमध्ये अत्यल्प दिसून येते.   समाज सुदृढ होण्यासाठी  हा विरोधाभास मिटवणं पालकांची व शिक्षकांची जबाबदारी आहे.