श्रीमान सर्वज्ञ

     श्रीयुत प्रधान हा माणूस पहिल्याच
भेटीत मला उगीचच अतिशहाणा वाटला आणि त्यामुळे फारसा आवडला नाही.. तसे
आमच्या सर्वच सहप्रवाशाचे मत त्यांच्याविषयी तसेच झाले असणार म्हणा!  
 
       खरे तर केरळ ट्रिपच्या सुरवातीस थिरुअनंतपुरमला उतरेपर्यंत आम्ही
कोणीच कोणाला ओळखत नव्हतो. येऊन जाऊन आम्ही दोघे म्हणजे मी आणि सुमती , माझी
बहीण आणि मेहुणे असे चार जण (अति)पूर्वपरिचित होतो.  
     
दुसऱ्या दिवशी पहाटेसच रॉक मेमोरिअला जावयाचे होते असे आमच्या सहल नियंत्रक
वैभवने बजावूनही निघेपर्यंत आठ वाजलेच आणि प्रवासी कंपनीच्या बसमध्ये
आम्ही आत चढल्यावर मिळेल त्या आसनावर बसलो आणि त्याचवेळी एक तक्रारीचा सूर
प्रथम आमच्या कानावर पडला, "वैभव, हे काय मला पहिल्या किंवा दुसऱ्या
रांगेतलीच सीट हवी असते हे माहीत आहे ना? मागील बाजूस मी नाही बसणार. " आवाज
बसच्या दारातूनच आला होता. तेथेच उभा राहून बहुधा आमचाच एक सहप्रवासी
 तक्रार करत होता. त्याच्या अंगात नेहमी प्रवास करणारे प्रवासी घालतात तशी
खाकी पॅंट व रेघारेघांचा टी शर्ट व डोक्यावर अर्थात केसरीचीच कॅप. माणूस
साठीच्या आसपास असावा पण मध्यम उंचीचा व तश्याच बांध्याचा, वर्ण निमगोरा.
अजून सहलीची सुरवात झाली नाही तोच तक्रार करणारा कोण गृहस्थ आहे हे पाहायला
सगळ्यांचेच लक्ष त्याच्याकडे वळले.. पण सगळ्यांना सौम्यपणे पण दमात घेणारा
सहल नियंत्रक वैभवही त्याला चुचकारत म्हणाला, "अहो प्रधानसाहेब, अजून बसायची
व्यवस्था जाहीर केलेली नाही तुम्हाला दुसऱ्या रांगेतलीच सीट देण्यात आली
आहे. " तेवढ्यात दुसऱ्या रांगेतील एका सहप्रवाशाने उठून आपली बैठक त्यांना
देण्याची तयारी दाखवली, त्यावर प्रधानांनी त्याच्यावरच मेहेरबानी
केल्यासारखे दाखवत ती जागा घेत ते उद्गारले., "मग ठीक आहे, कारण तश्या
बोलीवरच मी या टूरला आलो आहे, त्यानंतर वैभवकडूनच श्रीयुत प्रधान आतापर्यंत
केसरीबरोबरच अनेक टूर्सला आले आहेत त्यामुळे त्यांना असा विशेष दर्जा
देण्यात येतो असे कळले तरी नावाने प्रधानच असणाऱ्या या माणसाने अगदी राजा
असल्यासारखी दादागिरी दाखवलेली मलाच काय पण कोणालाच  आवडली नाही.
 
    प्रधानांशी फार संबंध ठेवायचा नाही असे मी मनात ठरवले आणि तशी काही
आवश्यकता नव्हती पण योगायोगाने आमच्या दोघांची खोली आणि माझी बहीण व मेहुणे
यांची खोली यांच्या बरोबर मध्ये त्यांची खोली होती त्यांना एकट्याला
स्वतंत्र खोली होती हाही त्यांच्या केसरी भक्तीचाच प्रसाद असावा. त्यामुळे
आम्हाला एकमेकांकडे जाताना त्यांची खोली ओलांडूनच जावे लागे.  
   
 तिसऱ्या दिवशी सकाळी उठून बहिणीकडे जाऊन त्यांची तयारी कुठपर्यंत आली आहे
हे पाहावे म्हणून मी एकटाच बाहेर पडलो तर श्रीयुत प्रधान आपल्या खोलीच्या
व्हरांड्यातील खुर्चीवर बसून नुकत्याच रूम सर्व्हिसमध्ये समाविष्ट असलेल्या
चहाचा आस्वाद घेत होते. मला पाहून त्यांनी हाक मारून मला जणू पकडलेच, "गुड
मॉर्निंग मि. कुलकर्णी, "  सहल परिचराने आमचा परिचय सुरवातीस करून दिला असला
तरी माझे नाव त्यांनी बरोबर लक्षात ठेवले होते याचे आश्चर्य वाटले. मीही
"गुडमॉर्निंग  श्रीयुत. प्रधान" असा त्यांना  प्रतिसाद दिल्यावर एकदम  
", चहा
कसला गचाळ केलाय, काय तुमचे काय मत आहे? " अशी सुरवात केली. तसा मला चहा
काही वाईट वाटला नव्हता, पण त्यांना अगदीच उडवून लावण्या ऐवजी मी, "चालायचंच
इतके आपण पर्टिक्युलर राहून कसे चालेल! " असे गुळमुळीत उत्तर
दिल्यावर, "अहो असा विचार केला तर हे केसरीवाले आपल्याला आणखीनच
लुटतील. मुख्यत्वे खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था या कंपनीच्या आश्वासनावर
विसंबून आपण यांच्याबरोबर येतो आणि त्यात अशी काटकसर? हे मला नाही चालणार
आजच वैभवकडे तक्रार करणार आहे मी " त्यावर मान हालवून मी पलीकडील खोलीत
शिरलो.  
      हळू हळू आमच्या सहप्रवाशांच्या ओळखी होत होत्या
जेवण्याचे वेळी ठराविक जण कोंडाळे करून गप्पाष्टकही जमवू लागले. अर्थात
काही प्रवासी आपापलाच मोठा गट करून आलेली असल्यामुळे कोठेही गेली तरी
त्यांचा तो ठराविक गट एकत्र असेच. तसा आमचाही गट होताच असाच एक आणखी गट
तिघाजणांचा होता. तो लक्षात राहण्याचे कारण सुमतीचे बारकाईचे निरीक्षण
 त्यात  एक जोडी आणि त्यांचा एक मित्र यांचा समावेश होता. श्रीयुत विवेक
शास्ते नावाप्रमाणेच जरा उग्र वाटत होते. त्यांना पाहताच प्रथम त्याच्या
मिश्याच डोळ्यात भरत. वर्ण काळ्यातच जमा होणारा. त्याला पाहिल्यावर हा माणूस
सैन्यदलात असला पाहिजे असा ग्रह होत असे आणि प्रत्यक्षातही तो खरोखरच
सैन्यदलात कॅप्टनच होता. त्याची बायको सुमीता मात्र एकदम गोरीपान आणि
आकर्षक व्यक्तिमत्त्वाची म्हणता येईल अशी होती. विवेक तिला मीता असे संबोधत
असे. विवेकचा मित्र प्रतीक  त्या गटाचा तिसरा सदस्य. हा मात्र गोरापान
, सुदृढ बांध्याचा हसतमुख. बहुधा हे तिघे एकत्र असत.  विवेक व सुमीता जेव्हा
जेव्हा असत तेव्हा तेव्हा तिच्याशी बोलताना त्यांच्या स्वरात हुकूमत जाणवत
असे तर सुमीता त्यांच्यापुढे अगदी दबून वागताना दिसत असे. हा तिघांचाच गट
का होता याविषयी सुमतीला लगेच शंका आलीच. म्हणजे तिच्या मते आमच्या
चौघांसारखाच गट त्यांचाही  असावा, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी हा प्रश्न तिच्या तोंडून बाहेर पडलाच!  
" काय हो  प्रतीक आपल्या बायकोला घेऊन का आला नाही? "
"आता हे मी कसे सांगणार कदाचित त्याचे लग्न झाले नसेल "
" इतका स्मार्ट माणूस लग्नाशिवाय राहणार नाही. "
"हल्ली
स्मार्ट मुलीसुद्धा लग्नाशिवाय राहतात आणि त्या आनंदातही असतात. आणि
प्रतीकही आनंदातच आहे की "मी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत म्हटले.    
" सुमीता त्याच्याबरोबर जरा जास्त आनंदात असते नाही का? "या प्रश्नाला मी काय उत्तर देणार?
 
    दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्रीच्या जेवणानंतर हॉटेलसमोरच्याच
रस्त्यावरून थोडे चालून गेल्यावर समुद्रकिनाराच होता त्यामुळे आम्ही चौघे
चालत निघालो व किनाऱ्याकाठी असणाऱ्या झाडीखाली टाकलेल्या बाकांवर बसून
गप्पा मारू लागलो. आमच्या समोरील बाकांवर आमच्या सारखेच काही इतर प्रवासीही
येऊन बसले. त्यातच श्रीयुत प्रधानही होते.  
       मी जरी
त्यांच्या गप्पात सामील झालो नाही तरी अगदी समोरच असल्याने त्यातील जो काही
भाग ऐकू येत होता त्यावरून कोणताही विषय निघाला, मग विषय भारतातील
देवळांविषयी असो, बागांविषयी असो किंवा भारताबाहेरील इतर देशातील प्रेक्षणीय
स्थळांविषयी असो तरी प्रधानांचे त्याविषयी ठाम मत असते आणि समोरच्याच्या
गळी उतरविल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते असे मला वाटून गेले. गृहस्थ खूप
हिंडलेला असावा आणि सगळीकडे त्याने बारकाईने निरीक्षणही केले असावे पण तरी
वाद घेताना तो जास्त हेकेखोरच आहे असा माझा ग्रह झाला. आपल्याला पाहून
सगळ्यांना बरे वाटते अशी  का कुणास ठाऊक प्रधानांची समजूत होती. त्यामुळे
कोणत्याही गटात ते अगदी सहज मिसळत त्यामुळे सगळ्याच सहप्रवाशांची त्यांची
अगदी पूर्वपरिचय असावी तशी जवळीक झाली होती. वैभवचे तर ते जुने मित्रच होते
त्यामुळे जिथे तिथे ते आपले अस्तित्व दाखवत आणि त्यामुळे वर वर जरी सगळे
त्यांना आदर देत तरी प्रत्यक्षात परिस्थिती अगदी उलट होती 
 
बसमध्ये पण त्याच्या बरोबर मागील बाकावरच आम्हाला बैठका मिळाल्या व त्याच
कायम असल्यामुळे सहप्रवाशांशी होणारे त्याचे संभाषण वादात रूपांतर होऊन
आपलेच म्हणणे कसे खरे आहे हे पटवण्याचा त्याचा कलच आहे हे सगळ्याच
प्रवाशांच्या लक्ष्यात आले आणि त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत सगळे जण
त्याला श्रीमान सर्वज्ञ असे संबोधू लागले.
       चौथ्या दिवशी
दुपारचा कार्यक्रम बऱ्याच जणांनी माघार घेण्याची शक्यता अपेक्षित
असल्याप्रमाणे जाहीर करण्यात आला कारण नॅशनल पार्कला बरेच अंतर जीपने जावे
लागेल त्यानंतर थोडे चालावे लागेल व वर गेल्यावर दिसले तर एडका/के
दिसेल/सतील. एडक्याची ओळख मुळाक्षरांबरोबरच (ए एडक्यातला) एवढीच झालेली व
एडका म्हणजे मोठा मेंढा हे कळल्यावर त्यासाठी इतकी यातायात करण्याचे कारण
नाही असे आम्ही दोघांनी अगोदरच ठरवले. माझी बहीण व मेहुणे यानी मात्र प्रथम
जायचा विचार केला पण नंतर त्यातील फोलपणा त्यांच्याही ध्यानात आला असावा व
त्यांनीही माघार घेतली अश्या तऱ्हेने दुपारी आम्ही मोकळेच राहिलो. त्या
दिवशी बऱ्याच जणांनी विश्रांतीच घेणे पसंत केले. कॅप्टन विवेक्ने मात्र
मोठ्या उत्साहाने आपण जाणार असे जाहीर केले.  
        तेवढ्यात
प्रधानही तेथे आले, त्यांचे व विवेकचे बऱ्यापैकी सूत जमलेले दिसले. त्यांनी
मलाही येण्याचा आग्रह केला, "चला हो मि. कुलकर्णी, सगळे अनुभव घ्यायला हवे. आता
एडक्याला पाहायचे म्हणून गेलो तरी तेथे प्रत्यक्षात आणखी काहीतरी असे
पाहाल की मग वाटेल बरे झाले ही संधी चुकवली नाही. अहो जपानमध्ये मी गेलो
तेव्हा माझे असेच झाले होते, ----"
आता हा आपल्या जपानभेटीचे
लांबलचक वर्णन ऐकवेल म्हणून मी त्याला, "पण प्रधानसाहेब, तुम्ही जपानला
कशाला गेला होता इतक्यांदा कारण कालही मी तुम्ही आमच्या समोरील प्रवाशांना
सांगत ऐकलेले ऐकले.
"फारच तीक्ष्ण कान आहेत हो तुमचे " प्रथमच
स्वतःपेक्षा दुसऱ्याकडॅ काहीतरी विशेष बाब आहे हे मान्य करत ते पुढे
म्हणाले "अहो माझ्या व्यवसायाचाच तो भाग आहे कल्चर्ड मोत्यांचा जपानशी आमचा
बराच मोठा व्यापार चालतो. "
तेवढ्यात सुदैवाने जीप आली व वैभवने
"ज्यांना नॅशनल पार्कला जायचे त्यांनी लगेच जीपमध्ये बसा"अशा हुकूम सोडला
आणि ते दोघेही जीपमध्ये बसले. सुमीताने  हात हालवत त्यांना निरोप दिला. "
मीता तेवढ्यात तुझी काय खरेदी करायची असेल ती आटोपून घे, प्रतीकला घेऊन जा
हव तर "असे विवेकने तिला बजावले.
      "शास्ते ना हे बरं चालतं"
त्यांची जीप सुटल्यावर सौ. सुमतीनं आपलं मत व्यक्त केलं. अर्थात तिचा हा
गूढ अभिप्राय मला समजणं शक्यच नव्हते म्हणून मी नेहमीप्रमाणे "कशाविषयी
बोलतेस तू? " "अहो हेच त्या प्रतीकबरोबर बायकोनं फिरणं ""मला पण जरा
विचित्रच वाटत "आमच्या बहिणाबाईनीही तिच्या सुरात सूर मिसळला.
"
उलट मला तर वाटतं सुमीता  आपल्या नवऱ्याच्या खूपच धाकात आहेत. " माझे
मेव्हणे म्हणाले आणि मीही त्यांच्या सुरात सूर मिसळला, कारण आमच्या बाबतीत
आम्ही दोघेच आपापल्या बायकांच्या धाकात आहोत असे आमचे दोघांचेही मत होते
आणि ते त्यांच्यासमोर व्यक्त करण्याचे धाडस फक्त आम्ही चौघे एकत्र असलो तरच
होत असे कारण त्यावेळीच आमच्या बायकांपासून एकमेकांचे रक्षण करण्यासाठी
आपल्याला सहाय्यक कोणी तरी आहे असे आम्हाला वाटत असे.  
"अगदी
बरोबर बोललात गोपाळराव, "त्यांच्या सुरात सूर मिळवत मी म्हणालो अशी
नवऱ्याच्या धाकात राहणारी बायको पाहिली की त्या नवऱ्याचे कौतुक करावे वाटते
खरे "
"नुसते धाकात राहण्याचा काय उपयोग? " 
"आम्हाला त्याचीच अपूर्वाई वाटते "मी धाडस करून म्हटले 
"
खरंच तो धाक आहे की ते तिचे नाटक आहे, जाऊ दे तुम्हाला ते कळणार नाही"
सौ. सुमतीने भरतवाक्य म्हणून वादाचा तिच्या मते शेवट केला. त्या दिवशी आम्ही
जवळचेच एक मंदिर पाहण्यात वेळ घालवला.
     प्रवासाचा आता शेवटच
आला होता त्यामुळे त्या दिवशी सगळ्या प्रवाशांना एकत्र बोलावून काही
स्पर्धा वगैरे वैभवने आयोजित केल्या होत्या त्याच दिवशी सौ. सुमीता यांच्या
वाढदिवस पण केसरीने मोठ्या उत्साहात साजरा केला. ही त्या प्रवासी कंपनीची
खासियत होती. केक वगैरे कापल्यानंतर एका टेबलावर विवेक, सुमीता आणि प्रतीक
त्याच टेबलावर आम्हीही चौघे योगायोगाने होतो आणि भरीस भर म्हणून श्रीयुत
प्रधानही तेथेच होते. अर्थात त्यांच्या वाचाळपणाला उधाणच आले होते, अचानक
सुमीतावहिनींकडे पाहत त्यांनी, "वा, वहिनी कॅप्टनसाहेबांनी फारच भारी गिफ्ट
दिलेली दिसत्येय वाढदिवसानिमित्त " असे उद्गार काढले. सुमीताच्या
चेहऱ्यावरील हास्य एकदम नष्ट होऊन त्यांची             मुद्रा एकदम कावरीबावरी झाल्यासारखे दिसले..
 
 " काहीतरी चुकीचा समज झालेला दिसतोय तुमचा मि. प्रधान, कशाविषयी बोलता
आहात तुम्ही? मीताला वाढदिवसाचं गिफ्ट मी अजून दिलेलंच नाही
"कॅप्टनसाहेबांनी आपला खर्जातला सूर काढून म्हटले.
"अच्छा मला
वाटलं त्यांच्या गळ्यातली ती मोत्यांची माळ तुम्ही त्यांना वाढदिवसाची भेट
म्हणून दिली असणार, मग जाऊदे मला काही बोलायचं नाही "
"मि. प्रधान माझ्या बायकोला तिच्या वाढदिवसाचं इतकं फडतूस गिफ्ट देईन असं कसं वाटलं तुम्हाला? " कॅप्टनसाहेबांचा आवाज चढला होता.
"काल
आपण नॅशनल पार्कला गेलो तेव्हा इथल्या एका दुकानातून ती फडतूस मोत्यांची
माळ फक्त दीडशे रुपयात तिनंच आणली आहे. तिनंच मला सांगितलं ही किंमत काय
मीता खरे ना? "
" हो ना, जाऊ दे ना विवेक उगीच वाद कशाला "सुमीताचा चेहरा तर एकदम विदीर्ण झाला होताच पण आवाजही थरथरत होता.
 
 पण आता प्रधानांना अगदी आपल्याला जणू कोणी आव्हानच दिल्यासारखं वाटलं
सुमीतांच्या चेहऱ्यापेक्षा त्यांचं सर्व लक्ष तिच्या गळ्यातील माळेकडेच
अधिक होतं.
" मी अगदी पैज लावून सांगतो की त्या माळेची किंमत पन्नास हजारापेक्षा एक पैही कमी नाही, असल्यास कसलीही पैज हरायला मी तयार आहे"
" ठीक आहे लागली मग हजार हजार रुपयांची पैज " आता कॅप्टनही हट्टाला पेटलेले दिसले.
"जाऊ दे ना विवेक प्रत्यक्ष किंमत माहीत असताना पैज लावण्यात कसला शहाणपणा, " सुमीताचा चेहरा आणखीनच रडवेला झाल्यासारखे मला वाटले.
"सुमीतावहिनी, आपण किती भारी गिफ्ट दिली हे साहेबांना उघड करायचे नसेल तर राहूद्या. "
सुमीताकडे पाहत प्रधान उद्गारले आणि त्या वेळी प्रथमच त्यांचे तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले.
आता हॉलमधील सगळ्याच जणांचे या टेबलाकडे लक्ष वळले होते.
पण आता कॅप्टन अगदी हट्टालाच पेटले होते,
"आता माघार नका घेऊ बरंका प्रधान काढ गं सुमीता ती माळ आणि त्यांना पाहूदे नीट. "
""अरे मला ती काढता येत नाही, माहीत नाही का तुला  " सुमीताने न देण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून म्हटले 
"अशी
कशी निघत नाही पाहतोच " म्हणून विवेकने उठून तिच्या मानेवरील हूक ढिला
करून अलगद माळ काढली आणि विजयी मुद्रेने प्रधानांच्या हातात दिली.
 
   प्रधानांनी खिशातून सूक्ष्मदर्शक भिंग काढत माळ हातात घेतली आणि एक एक
मोती तपासायला सुरवात केली. काही काळ तेथे एकदम शांतता पसरली होती. प्रत्येक
मोती तपासून पाहत शेवटपर्यंत माळ तपासून शेवटी चेहरा कसनुसा करत त्यांनी
माळ विवेकच्या हातात ठेवली, आणि म्हणाले,
"तुम्ही जिंकलात कॅप्टन, ही अगदी कवडीमोल किमतीची माळ आहे दीडशे रुपयेही फारच झाले. "
सुमीताच्या चेहऱ्यावर एकदम तकाकी आली.
"बघा मी म्हटलं नव्हतं उगीचच प्रधानांना भरीस घातलंस तू विवेक"
"चुकतेस तू मीता, मी नाही त्यांना भरीला घातलं त्यांनी मला भरीला घातलं"
"अगदी
बरोबर "प्रधान उठून म्हणाले आणि भिंग खिशात ठेवत दुसऱ्या खिशातून पैशांचे
पाकीट काढत त्यातून हजाराची नोट काढत त्यांनी विवेकच्या हातात ठेवली.
 
   आता सगळ्यांचा त्या घटनेतील रस संपला होता व शिवाय श्रीमान सर्वज्ञ
यांची अश्या प्रकारे परस्पर जिरली याचाच सगळ्यांना आनंद झाला. सगळेच जण
आपापल्या खोल्यांत परतले.
        दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा
श्रीयुत प्रधानांनी मला पकडलेच व आपण स्नोर्केलिंग करताना काढलेले व्हिडिओज
 दाखवण्यास सुरवात केली. खोलीत अंधार व्हावा म्हणून दार बंद केलेले
होते. मध्येच दारापाशी काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून ते दारापाशी गेले व
त्यांनी दार उघडले पण बाहेर कोणीच नव्हते मात्र एक पाकीट दारापाशी पडलेले
दिसले. दार पुन्हा बंद करत आत येता येता त्यांनी पाकिटाची कड कापत पाकीट
उघडले तो त्यात ती त्यांनीच दिलेली हजाराची नोट बाहेर पडली.
"
आपल्या सुंदर बायकोला नुसतेच धाकात ठेवायचे नसते समजले ना जयंतराव "ती नोट
माझ्यापुढे नाचवत प्रधान म्हणाले. सुमतीच्या विधानाचा अर्थ आता माझ्या
लक्ष्यात आला. प्रधानांविषयी माझे मत मात्र आता बरेच बदलले होते.  
(W Sommerset Maughm यांच्या   Mr.Know All या कथेचे स्वैर रूपांतर )