मिनेसोटा स्टेट कॅपिटॉल

भारतातील केंद्र व राज्य सरकारी वास्तूमध्ये सहजपणे प्रवेश मिळणे नक्कीच सोपे नसते. संसदेच्या किंवा विधिमंडळांच्या अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीमध्ये बसता येते पण निवांतपणे वास्तूचे निरीक्षण करायला मिळणे तर अशक्यच. तेथे जाऊन फोटो काढण्याबद्दल तर आजकाल विचारही केला जाऊ शकत नाही.

अशा सरकारी संस्कृतीचा अनुभव घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला अमेरिकेतील अशा वास्तूंना भेट देणे हा खूप सुखद अनुभव असतो. माझा असाच एक अनुभव म्हणजे आम्ही अमेरिकेत ज्या राज्यात राहतो त्याची राजधानी सेंट पॉल येथील स्टेट कॅपिटॉलला दिलेली भेट. कुठलीही अपॉइंटमेंट घेणे नाही, गेल्यावर नावनोंदणी व सुरक्षा तपासणीही नाही. मिनेसोटा हिस्टॉरिकल सोसायटीच्या स्वयंसेवकांकडून गायडेड टूर घेऊन कॅपिटॉल विषयी रोचक माहिती मिळवावी अन सोबत स्थापत्यसौंदर्याचा आस्वाद घ्यावा.
Full View
कॅपिटॉलची सध्या वापरात असलेली इमारत ही तिसरी इमारत आहे. पहिली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुसऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच तिच्यात गंभीर त्रुटी निर्माण झालेल्या होत्या व तिचे क्षेत्रफळ कॅपिटॉलच्या गरजांसाठी फारच तोकडे होते. सध्याच्या इमारतीचे बांधकाम १८९६ साली सुरू झाले व १९०५ मध्ये संपले. ही इमारत बांधताना तत्कालीन धोरणकर्त्यांचा उद्देश होता की पूर्वेकडील श्रीमंत राज्यांना दाखवून द्यायचे की संपन्नतेच्या बाबतीत मिनेसोटाही काही कमी नाही.
Closer view
त्या काळात कॅपिटॉलची इमारत बांधण्यास  ४.५ दक्षलक्ष डॉलर्स खर्च आला. आजची किंमत ४०० दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. कॅपिटॉलचे वास्तूरचनाकार आहेत कास गिल्बर्ट. मिनेसोटाखेरीज त्यांनी अर्कान्सास व वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांच्या कॅपिटॉल्सची वास्तुरचना केली आहे. या इमारतीचे डिझाइन रोममधील सेंट पीटर्स बॅसिलिकाप्रमाणे आहे. कुठलाही आधार नसणारा या इमारतीचा संगमरवरी घुमट आकारमानाच्या बाबतीत (संगमरवरी व आधार नसलेल्या घुमटांच्या यादीत) सेंट पीटर्सनंतर जगात द्वितीय क्रमांकावर आहे.
Closeup
कॅपिटॉलच्या बाह्य दर्शनी भागात घुमटाशेजारी रथाचे सोनेरी शिल्प आहे. रथाचे चार अश्व निसर्गाच्या चार घटकांचे प्रतिनिधित्व करतात. ते घटक म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी व जल. आपल्या पंचमहाभूतांपैकी केवळ आकाश नाही. रथावरील स्वार माणूस संपन्नतेचे प्रतिनिधित्व करतो. घोड्यांशेजारील स्त्रिया नागर संस्कृती दर्शवतात. आपण जर हिवाळ्याखेरीज इतर काळात कॅपिटॉलला भेट दिली तर गायडेड टूरदरम्यान इमारतीच्या टेरेसवर जाऊन या रथाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळते. यावेळी भोवताली असलेले डाऊनटाऊन सेंट पॉल व कॅथेड्रलची भव्य इमारत दिसते. तसेच जरा लांब असलेले डाऊनटाऊन मिनियापोलिसही दिसते.
Horses
कॅपिटॉलमधली मध्यवर्ती जागा.
Center
कॅपिटॉलच्या इमारतीमध्ये गवर्नर ऑफ मिनेसोटा यांचे कार्यालय,  लेजिस्लेटिव ऑफिसेस, मिनेसोटाचे सुप्रीम कोर्ट, सिनेट व राज्य प्रतिनिधिगृह ही सभागृहे आहेत.
House

Closeup

House 2

मिनेसोटा सुप्रिम कोर्टाचे कक्ष.
MN Supreme Court
त्या कक्षाच्या छताचा हा फोटो. Lex हा कायद्यासाठी वापरला जाणारा लॅटिन शब्द आहे.
Top

कॅपिटॉलमध्ये जागोजाग दिसणारी अप्रतिम कलाकुसर व पेंटिग्ज डोळ्यांचे पारणे फेडतात.
Painting
ऑफिस ऑफ गवर्नर बाहेरील चेंबर्समध्ये जुन्या काळातल्या युद्धांची मोठाली पेंटिंग्ज लावली आहे. तत्कालीन सरकारने नेटिव्जबरोबर केलेल्या कराराचेही भव्य पेंटिंग आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या करारानुसार ठरलेली रक्कम नेटिव्जला कधीही दिली गेली नाही. हा अप्रिय इतिहासही टूर गाइडस आपल्यापासून लपवत नाहीत.
Design

या फोटोत दिसणारे स्तंभ बांधकामाच्या वेळी उलटे लावले गेले. ती चूक वेळेत लक्षात आल्याने सुधारली गेली.Pillars

Stairs

रात्रीच्या वेळी लांबून दिसणारे कॅपिटॉल.At night

आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक भारतीय समुदायातर्फे भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी कॅपिटॉलच्या प्रांगणात साजरा केला जातो. मिनेसोटाचे गवर्नर गेल्या वर्षीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम व भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल असते.
India Festival

कॅपिटॉलला केवळ एकदा भेट देऊन समाधान होणे अवघड आहे. एवढेच नव्हे तर इतर राज्यांच्या कॅपिटॉल्सलाही भेट देण्याची इच्छा निर्माण होते.

माहितीचे स्रोत - कॅपिटॉलची गायडेड टूर व विकी.
टीपः मोठ्या आकारमानात फोटोज पाहायचे असल्यास त्यांवर क्लिक करावे.