दुष्काळात घरगुती बाग वाचवून वाढवण्यासाठी मदत हवी आहे

गेल्या दोन वर्षापासून आमच्या घरगुती बागेतली रोपे (५ गुलाब, अनंत, सोनचाफा, ब्रह्मकमळ, कृष्णकमळ, गवती चहा, शेवंती, रुक्मिणी तुळस, पुदिना आणि ४-५ शोभेची रोपे) उन्हाळ्यात शक्य तितके जास्तीत जास्त पाणी टाकूनही जळून जाताना पाहावी लागली. आई आणि मी दोघीही खूप रडलो. या वर्षी नाही पडला पाऊस पण पुढच्या वर्षी नक्की पडेल आणि मग आपण रिकाम्या झालेल्या जागा भरून काढायला नवी रोपे आणू असे मनाला टंगवण्यात दोन वर्षे गेली आणि आता पाहावे तर याही पावसाळ्यात पावसाची काही धड चिन्हे दिसत नाहीत. आता मात्र मन नवी झाडे लावण्यात चालढकल करायला तयार नाही पण पाण्याची टंचाई असताना आणिक नवी झाडे लावायची म्हणजे खिशावरचा ताण आणखी किती वाढवायचा तेही पाहणे आले. या सर्व पार्श्वभूमीवर या चर्चा प्रस्तावात मला दोन गोष्टींबद्दल मार्गदर्शन मिळू शकल्यास हवे आहे -

१. कमी पाण्यावरदेखील जगतील असे घरगुती बागेत अथवा घरालगतच्या रस्ताकडेला लावण्यासाठी वृक्ष सुचवा. (सद्ध्या आमच्याकडे कडीपत्ता, लिंबू, आंबा, चिकू, सीताफळ,५ जास्वंद, तगर, स्वस्तिक, रायआवळा, मोगरा, हजारी मोगरा, पांढरा आणि पिवळा चाफा, बेल, पारिजातक, पेरू, कडूलिंब, शेवरी कापूस असे वेल/वृक्ष आणि कोरफड, लाजाळू, तुळस, पानफुटी, गुळवेलसत्व अशी रोपे आहेत.छोटी नाजूक रोपे आता लावायलाच नको असे वाटते आहे.)

२. पाण्याच्या टंचाईवर उपाय म्हणून ठिबक सिंचनाचा बागेसाठी वापर करता येईल का? असल्यास कसे ते सांगावे. ( ठिबक सिंचनासाठी पाईपला योग्य ठिकाणी भोके पाडून त्यातील तज्ज्ञ(!) माणसाकडून बागेत जोडणी करून घेतली होती पण बागेत वेगवेगळ्या प्रकारची आणि वयाची झाडे असल्याने एखाद्या झाडाला पाणी जास्त पडायचे तर एखाद्याला कमी. असे झाल्याने सद्ध्या तो पाईप काढून माळ्यावर ठेवून दिला आहे!)