पुनश्च हरी ओम

      लो टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यावर आपल्या "केसरी" पत्रात त्यानी पुन्हा अग्रलेख लिहायला सुरवात केली तेव्हां त्याचा मथळा ‘पुनश्च हरि  औम   " असा होता टिऴक तुरुंगातून सुटतात केव्हां आणि त्याच्या सडेतोड भाषेत  अग्रलेख लिहायला सुरवात करतात केव्हां याची जनता आतुरतेने वाट पहात होती, पण आम्हाला  बरेच दिवस अमेरिकेला जाता आले नाही म्हणून तेथील जनता आमची वाट पहात होती अशातला भाग नाही मात्र तीन अमेरिकन नागरिक खरोखरच आमची वाट पहात होते ते म्हणजे आमचा मुलगा, सून व नातू  यावेळी मात्र आमचे न जाण्याचे  कारण केवळ  माझ्या अंगात मुरलेला आळस हे नव्हते। तसे सर्वच कुटुंब प्रमुखांप्रमाणे आमच्या घरात आंतरराष्ट्रीय बाबीं म्हणजे ग्रीसची आर्थिक परिस्थिति ,बराक ओबामा व व्लादिमीर पुतिन यांनी परस्पर संबंध कसे सुधारले पाहिजेत अश्या बाबींवर निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्यावर असते तर अमेरिका   किंवा कुठेही जावयाचे की नाही वगैरे क्षुल्लक गोष्टींचे  निर्णय घेण्याचे काम गृहखात्यावर सोपवून मी स्वस्थ असतो।अर्थात असे स्वातंत्र्य  असूनही गृहखाते स्वस्थ बसण्याचे कारण बराक ओबामा हे होते म्हणजे तसे बराक ओबामांशी आमचे काही भांडण वगैरे नव्हते पण आपल्याकडे जसे एकादी गोष्ट  कॉंग्रेसला करायची असेल तर त्याला भाजप ने खोडा घालायचा आणि उलट असेल तर कॉंग्रेसने हे जसे ठरलेले आहे तसेच अमेरिकेतील डेमोक्रेट्स व रिपब्लिकन पक्षांचे आहे त्यामुळे पहिल्या वेळी अगदी मुलाखतीसही न जाता आम्हाला  रिपब्लिकन जॉर्ज बुश यांनी व्हिसा देऊ केला होता तर मग या वेळी मात्र आम्हाला अडवायचे असा डेमोक्रेटिक ओबामांचा विचार असावा आणि त्यामुळे बुशसाहेबांनी दिलेल्या व्हिसाची मुदत संपल्यावर  आम्हाला अमेरिकेत जाण्याचा व्हिसा नाकारण्यात आला.
         पहिल्या व्हिसाच्या मुदतीत बरेच वेळ  अमेरिकेला  जाऊन  आल्यामुळे व्हिसा संपल्यावर लगेच नूतनीकरण करण्याचा आळस मी केला आणि त्याबाबतीत दक्ष असणाऱ्या गृहखात्यानेही ज़रा ढील दिली आणि मी अधिकच सुस्तावलो  व्हिसा नूतनीकरणाचा फारसा आग्रह तिने न  केल्यामुळे आधीच उल्हास नसणाऱ्या मलास्वस्थ  राहण्यास योग्य वातावरण लाभल्याचा मी फायदा घेतला व व्हिसा या शब्दाचा उच्चारही त्या काळात केला नाही पण निद्रिस्त ज्वालामुखी फार काळ सुप्त राहणे जसे शक्य नसते आणि तशी जाग तिला आल्यावर मला परिस्थितीची दखल घेणे भाग पडले. शिवाय आता अमेरिकन व्हिसा  अगदी सहज उपलब्ध होईल इतकेच काय पण ज्येष्ठ नागरिकांना तर मुलाखतीसही जावे  लागणार  नाही अश्या बातम्या तिच्या खास गोटातून तिला उपलब्ध होऊ लागल्या तसे असेल तर करुया व्हिसासाठी अर्ज असा विचार मी केला। पण कशी काय कुणास ठाऊक पण त्यासाठी एजंट घ्यावा म्हणजे कोणतीच धावपळ करावी लागणार नाही अशी दुर्बुद्धि मला सुचली। दुर्बुद्धि म्हणण्याचे कारण एवढेच की धावपळ करण्याचे फारसे काही कमी झाले नाही आणि एजंटाने  अगदी गैरसोयीच्या तारखा व्हिसा मुलाखतीसाठी काढून दिल्या अर्थात तारखा गैरसोयीच्या असणे हे काही व्हिसा न मिळण्याचे कारण म्हणता  येणार नाही पण शत्रूला गाफील ठेवून अचानक हल्ला करण्याचा गनिमी कावा अमेरिकन वकीलातीनेही लढवला आणि मुलाखतीसही जावे लागणार नाही अश्या भ्रमात असणाऱ्या आम्हा दोघांना मुलाखतीस  बोलावून चारी मुंड्या चीत केले म्हणजे आम्ही  अमेरिकेस इतक्या वेळा गेलो आणि प्रत्येक वेळी बराच काळ राहिलो असा हिशोबच नुतनीकरणाच्या  खिडकीवर बसलेल्या ललनेने सादर केला आणि त्यावरून आम्ही अमेरिकेतच  स्थलांतर   करण्याची  शक्यता असल्याचा निष्कर्षही काढून आमचा अमेरि कन प्रवेशपत्र मिळवण्याचा बेत हाणून पाडला. 
              खरे म्हणजे आम्ही अमेरिकेत स्थलांतर   करण्याची आम्हाला  असलेली संधी  दहा वर्षे वापरली नाही हीच गोष्ट आम्ही  अमेरिकेत  स्थलांतर करण्यास उत्सुक नसल्याचा खणखणीत पुरावा असताना आम्हाला अमेरिकन  प्रवेशपत्र नाकारून  आपल्या  ढासळत्या आर्थिक  परिस्थितीस आमच्या प्रवेश पत्र  नूतनीकरणासाठी भरलेल्या  ३२० डॉलरचे ठिगळ लावणे बराक ओबामाला शोभले नाही पण होणारे न चुके !  
            खरे तर मी मनातल्या मनात ओबामाला धन्यवादच दिले होते. कारण काही झाले तरी अमेरिकन प्रवासाचे संकट माझ्यासाठी तात्पुरते टळले होते. पण हे समाधानही तात्पुरतेच होते, कारण यापूर्वी आम्ही बरेचदा अमेरिकेस गेलो होतो हे  माहीत असणाऱ्या पैकी बरेचजण  "काय आता अमेरिकेस केव्हां जाणार ? "  असा सहजच प्रश्न विचारत बऱ्याच लोकांची अशीही समजूत असे की आम्ही नेहमीच अमेरिकेत असतो म्हणजे व्हिसा नाकारणाऱ्या वकिलातीलाच अगदी नावे ठेवायला नकोत. आ सुरवातीला "आम्ही जाणारच आहोत थोड्या दिवसात व्हिसा मिळाला की " असे उत्तर देत आम्ही त्यांचे समाधान केले पण नंतर नंतर हा प्रश्न विचारला की प्रत्येक वेळी तेच उत्तर देऊन  आपली पडती बाजू संभाळणे जिवावर येऊन  शेवटी खरे काय ते सांगून टाकावे म्हणून "आमचा व्हिसा अर्ज रिजेक्ट झाला हो " असे सांगू लागलो पण पुढे पुढे तसे सांगतानाही आपण एकाद्या परीक्षेत नापास झालो असे  सांगण्यासारखीच लाज वाटू लागली त्यामुळॅ अमेरिकेला जावेलागले तरी चालेल पण व्हिसा  परीक्षेत नापास होऊन चालणार  नाही असे मीसुद्धा  म्हणू लागलो . मधला एक   वर्षाचा काळ आम्ही बराच शांततेत  काढला होता आणि व्हिसा मिळवून शान्ततेच्या  त्या महासागरात खळबळ उडवून द्यायचे जिवावर आले होते तरी व्हिसा न मिळाल्याची नामुष्की पण चैन पडू देत नव्हती. आमच्या चिरंजीवांनीही  यावेळी  आई  बाबांना व्हिसा मिळवून द्यायचाच असा चंग  बांधला. यावेळी एजंटकडॅ जाण्याची चूक मी केली नाही कारण एजंट म्हणजे फक्त असून अडचणच असतो याचा अनुभव आला होता. जेवढ्या अडचणी येण्याची शक्यता होती त्या सर्वांचा विचार करून कागदपत्रे तयार केली  आणि  घरातूनच संगणकावर व्हिसा कार्यालयाची मुलाखतीची वेळ घेतली. 
         व्हिसा साठी ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे ही समजूत चुकीची ठरली ८० वर्षे वा अधिक वयाच्या नागरिकांना मात्र व्हिसा मुलाखतीशिवाय मिळतो ही गोष्ट कळून सध्या काही फ़ायदा नव्हता  त्यामुळे एकदा बोटांचे ठसे देण्यासाठी आणि नंतर मुलाखतीसाठी असे दोन दिवस जावे लागले. बोटांचे ठसे घेण्याचे काम एका कार्यालयात तर मुलाखत वकिलातीत होती. आता या कार्यालयात मात्र शिस्तशीर काम चालते त्यामुळे दिलेल्या वेळेत जाणाऱ्या व्यक्तीला एक तासापेक्षा  जास्त वेळ लागत नाही यावेळीही मागील वेळेस आमच्या अमेरिकेच्या पूर्वीच्या भेटींविषयी जो हिशोब त्यानी मांडला होता तोच पुन्हा मांडायला सुरवात केली त्यामुळे नमोनी अमेरिकन नागरिकांना ताबडतोब व्हिसा देण्याचे धोरण आरंभले  तरी त्याची परतफेड करण्याचा विचार ओबामानी केल्याची लक्षणे काही दिसेनात आणि आतापर्यंत कोणत्याही परीक्षेत नापास होण्याची नामुष्की  स्वीकारावी लागली नाही त्या सगळ्यांचे उट्टे निघणार की काय असे वाटू लागले.मुलाखत घेणाऱ्या  व्यक्तीच्या चेहऱ्यावरून काही अंदाज लागेना ‌शे वटी इतके दिवस आमची दोन्ही मुले तेथे होती म्हणून जास्त राहिलो असे सांगितले आता एकच मुलगा  असल्यामुळे आता चार महिन्याच्यावर  राहणार नाही असे त्याला पटवण्याचा प्रयत्न केला त्यावर त्याने "पहा हो जर जास्त राहिला  तर तुमचा व्हिसा रद्द करण्यात येईल "  असे सांगितल्यावर मी मनातल्या मनात "रद्द करायला अगोदर दे तरी" असे म्हणून आता आम्ही राहणार नाही अश्या त्याला दिलेल्या    आश्वासनावर त्याचा  विश्वास बसला असावा आणि त्याने परीक्षेत पास केले व  अखेरीस व्हिसा प्राप्ती झाली 
       अश्या प्रकारे मी आगीतून फुफाट्यात उडी घेतली म्हणजे व्हिसा न मिळण्याच्या नामुष्कीतून सोडवणूक झाली पण आता अमेरिकेच्या प्रवासास  तोंड देण्याची तयारी करावी लागली अमेरिकन प्रवेशपत्र मिळवण्याचा पराक्रम केल्यावर आता त्या प्रवेशपत्राचा उपयोग करून किल्ला सर  करणे अर्थातच कर्तव्याचाच भाग होते. खरे तर  परीक्षेत नापास होण्याची नामुष्की टाळणे  हा माझा उद्देश सफल झाल्यावर पुन्हा  अमेरिकेच्या   प्रवासास तोंड देण्याच्या दुसऱ्या संकटास तोंड देण्याची माझी फारशी इच्छा नव्हती पण आता जाणे न जाणे हा माझ्या इच्छेचा प्रश्न नव्हता जास्तीत जास्त केव्हां जायचे यावर विचार करण्याचा व मत व्यक्त करण्याचा अधिकारच काय तो मला होता ,अर्थात आपले मत मांडता येण्याचे  स्वातंत्र्य  उपभोगून आपण किती चुकीचे मत व्यक्त करू शकतो याची पावती घेण्याची माझी इच्छा नव्हती आणि तशी आवश्यकताही नव्हती  कारण व्हिसा  हातात पडताक्षणीच आता गौरी गणपतीला आपण मुलाकडे असणार असे उद्गार माझ्या कानावर पडले आणि त्यामुळे जूनमध्ये निघण्याची आपल्या मनाची तयारी करायची आहे अशी मनात खूणगाठ बांधून पुढच्या तयारीस सज्ज राहण्याचा मी मनाला आदेश दिला अर्थात प्रत्यक्ष तयारी करण्याचे काम माझ्यावर नसणार याची मला खात्री होतीं  त्यामुळे  मला फक्त तिकिटे खरेदी करणे, प्रवासी विमा व तिकिटे खरेदी करणे व या साऱ्यासाठी लागणारे पैसे काढणे एवढ्याच कामाकडे लक्ष द्यावे लागले बाकी  बॅगा काढण्यापासून त्या वजनाची मर्यादा राखून भरण्यापर्यंत सर्व कामे सौं ने आपल्याकडेच घेतली होती  आणि त्यात मी दखल देऊन आपली नाचक्की  करून घेण्याचे टाळले होते. कदाचित मी त्यात काही सुधारणा सुचवली तर लगेचच ती किती  चुकीची होती हे सप्रमाण लगेच सिद्ध होण्याची शक्यता होती‌, शिवाय मी माझ्या अंदाजाने ठेवलेली माझी वस्तूही नंतर  मला न सापडता ती शोधण्यासाठी  तिचीच मदत घ्यावी लागण्याची शक्यता असल्यामुळे मी दूर राहून दृष्टी फेकण्याचेच काय ते काम दूरदृष्टीने पत्करले.  
           आमच्या निघण्याच्या अगदी थोडॅच दिवस अगोदर मृग निघाला होता व तो आमच्यावर हल्ला करतो काय या काळजीने मला ग्रासले होते.  हवामानखात्यानेही  यंदा पाऊस वेळेवर सुरू होणार अशी भीती मला दाखवलीच होती.तसा हवामानखात्याचा लौकीक  काही अचूक अंदाज करण्याचा  नसला तरी चुकून त्यांचा अंदाज बरोबर ठरला तर काय घ्या असे मला वाटत होते  आणि अगदी सात जूनलाच पुण्यास  बऱ्यापैकी पाऊस पडलाही. अर्थात तो मान्सूनपूर्व पाऊस होता. आणि  त्यानंतर पुण्यातून पावसाने काळे केले ते अगदी आम्ही निघण्याची वेळ येईपर्यंत ! मात्र तो केरळात उतरला अशी बातमी फुटली आणि पाठोपाठ तो मुंबईत दाखल झाला तो अगदी बरोबर आमच्या निघण्याच्या चार दिवस अगोदर म्हणजे अठरा जूनला आणि तोही इतका जोराचा की मुंबईच्या तिन्ही लोहमार्ग वाहिन्या बंदच पडल्या . टी. व्ही. वर सर्व वाहिन्यांनी बंद पडलेल्या गाड्या व अडकलेल्या प्रवाश्यांच्या मुलाखती दाखवून माझ्या चिंतेत भर टाकली पुण्यात मात्र पावसाला जणू प्रवेशबंदी होती. मुंबईत ठाकरे कुटुंबीयांनी मान्सूनपूर्व शहराची पाहणी करून यंदा नागरिकांना कसलाच त्रास होणार नाही अशी ग्वाही दिलेली वरुणराजाच्या कानावर पडली आणि  श्रीकृःणाने इंद्राची पूजा कारण नाही असे गोकुळवासीयांना सांगितल्याचा राग येऊन इंद्राने गोकुळावर अतिवृष्टी करावी त्याप्रमाणे वरुणराजालाही राग येऊन त्याने एका दिवसात विक्रमी पाऊस पाडून ठाकरे कुटुंबियांना आपले शब्द गिळण्याचे नित्यकर्म उरकून अश्या आपत्तीला आणखीनच इतर कोणती कारणे आहेत त्यांचा पाढा वाचावा लागला. पण अर्थात पाऊस मुंबईतच पडला तरी माझ्या तोंडचे पाणी पळवण्यास अनुकूल होता कारण त्यामुळे महामार्गावर दरड कोसळून वाहतूक आठ तास ठप्प अशी बातमी आमच्या निघायच्याच दिवशी आली आणि त्याच बरोबर पुण्यातही धो धो पाऊस सुरू झाला.  पण अर्थात आम्हाला मुंबई विमानपत्तनावर पोचवणाऱ्या प्रवासी वाहतूक कंपनीस मी दूरध्वनी करून विचारल्यावर त्यांनी मात्र "काळजी करू नका दरड कोसळली तरी तुम्हाला अगदी वेळेवर मुंबई विमानतळावर पोचवण्यात येईल असा दिलासा दिला.   
          अनुभव हा मोठा गुरू असतो असे म्हणतात पण कधी याच्या  उलटही होते म्हणजे  तोता मैनेच्या  गोष्टीत जसे घडते , लबाड मैना  भुई मुगाची शेंग लपवते आणि पोपटाला विचारते "तुला काय पाहिजे ?आतले की बाहेरचे ?" पोपट उत्तर देतो "बाहेरचे" तेव्हां ती आतले शेंगदाणॅ खाऊन वरची टरफले  त्याला देते. दुसऱ्यावेळी ती खारिक लपवते व पुन्हा तोच प्रश्न विचारते आता पोपट शहाणा झाल्यामुळे उत्तर देतो "आतले 
दे " बेरकी मैना तेव्हां त्याला आतली बी देते व स्वतः खारीक खाते थोडक्यात पोपटाला पूर्वानुभवाचा तोटाच होतो. आमचीही परिस्थिती तशीच झाली म्हणायला हरकत नाही त्याचे एक कारण म्हणजे आमचा पूर्वानुभव फारच पूर्वीचा म्हणजे मधील व्हिसा नकार प्रकरणामुळे आमच्या अमेरिका प्रवासास चार वर्षे  लोटली होती आणि त्या काळात बराच बदल घडला होता  अगदी मुंबई विमान पत्तन सुद्धा अगदी ओळखू न येण्याइतके बदलले म्हणजे सुधारले होते. मागच्या वेळी आम्ही फार लवकर पोचल्यामुळे आम्हाला बाहेरच प्रतीक्षा  गृहात बसावे लागले होते. याही वेळी आम्ही लवकर म्हणजे  नऊ वाजता पोचल्यामुळे आत सोडणार नाहीत ही माझी समजूत चुकीची ठरवून आम्हाला आत प्रवेश मिळाला इतकेच नव्हे आम्ही आरक्षण केलेल्या जेट एअरवेजची  सामान पडताळणीची रांगही उभी होती‌  सुरक्षारक्षकांनी आमची पासपोर्ट तपासणी करून त्यावर चिठ्ठ्या चिकटवल्यावर बोर्डिंग पास मिळण्याच्या रांगेत आम्हाला पुढे जाण्याची सूचना मिळाली. गेल्या वेळी जेट एअर वेजच्या कौंटरवर सामान उतरवून बोर्डिंग पास मिळाल्यावर नको नको म्हणत असताना चाक खुर्ची कौंटर सुंदरीने आग्रहाने  गळ्यात घातली होती. यावेळी मात्र आम्हाला आमच्या सामानाच्या बॅगा निर्धारित वजनापेक्षा थोड्या कमीच वजनाच्या असल्यामुळे लेबले लावून  आत धाडल्यावर ती आम्हाला  खुर्चीचा आग्रह केव्हां  करते  याची वाट पाहून शेवटी "चाक खुर्ची  आम्ही मागितली आहे "असे  आम्हीच म्हटल्यावर तिने त्यासाठी १२ वाजेपर्यंत थांबावे लागेल असे सांगितले अर्थात मी  लगेच चालतच जाण्याची तयारी  दाखवली  पण  सौं. ने अगदी ठामपणे "नाही खुर्चीतूनच जावयाचे" असे म्हटल्यावर माझा नाइलाज झाला  व  सामान आत गेल्यामुळे उरलेल्या केबीन बॅगवर व सौ. ची  पर्स व माझ्या   गळ्यात तिनेच अडकवलेले पाउच (त्यात मी बोर्डिंग पास ठेवायचे म्हणजे केव्हांहि काढून दाखवायला सोयीचे जाते या प्रतिपादनासह ) यांवर लेबले लावून त्यावर आमची नांवे व पत्ते अगदी मन लावून गिरवीत बसलो.           आम्ही विमानतळावर पोचलो असून खुर्चीची वाट पाहत होतो ही बातमी मोबाइलवरून पुण्यातील व एडिसनमधील मुलालाही कळवली‌ सौं.  ने  तिच्या काही मैत्रिणींनाही हे वृत्त ( म्हणजे चाकखुर्चीची वाट पहाण्याचे नाही)  मोबाइलवरून कळवले कारण मोबाइल मधील शिल्लक  रकमेचा उपयोग काही अमेरिकेत गेल्यावर होणार नाही आणि विमानात बसल्यावर एकदा मोबाइल बंद केल्यावर त्याचा हाच अंतीम उपयोग असेल न्हणून तो पुरेपूर वसूल करण्याचा उद्देश त्यामागे होता. यात थोडाफार वेळ गेला व अकरा वाजले. आमच्याशेजारी पाजारी आता चाक खुर्ची याचकांची बरीच गर्दी वाढू लागली. आमच्या गतप्रवासाची माहिती इतरांना देताना आम्ही सर्वांना चाकखुर्ची घ्याच आपले बरेच श्रम कमी होतात असा जो सल्ला दिला होता तसाच सल्ला  इतरही बऱ्याच जणांनी आपल्या गणगोताला दिला असावा (हां सल्ला देणाऱ्याचे कुठलेच नुकसान होत  नाही ) कारण एकूण प्रवाशांपैकी निम्मे अधिक प्रवासी चाकखुर्ची चा आग्रह धरणारे निघाले. आतापर्यंत सत्तेच्याच खुर्चीचाच हव्यास असतो या समजुतीत थोड़ा बदल करून  त्यात चाकखुर्चीचाही समावेश करायला हवा असे वाटायला लागण्यासारखी  परिस्थिती उत्पन्न झाली.  काही काळानंतर तर  चाकखुर्चीसाठी मुलाखती घेऊन अगदी योग्य व्यक्तींनाच चाक खुर्ची देण्यात येईल असे विमान वाहतूक कंपन्यांना ठरवावे लागेल आणि इमिग्रेशन चाचणीप्रमाणेच प्रवाशांची शारीरिक तपासणीही करण्याची आवश्यकता वाटून  डॉक्टरांचे पथकही त्या रांगेत अंतर्भूत करावे लागेल असे मला वाटून गेले.    
      वेळ जसजसा जाऊ लागला तशी चाकखुर्चीची माझी चिंता वाढत होती   चाकखुर्चीचा खेळ म्हणजे अगदी संगीत खुर्चीचा वाटू लागला कारण एकादा दुसरा चाकखुर्ची वाहक येई व "लंडनला कोण जाणार ? " अशी विचारणा करून त्याना रवाना करण्यात येई कारण लंडन चे उड्डाण अगोदरचे होते. चाकखुर्ची न मिळाल्यामुळे फ्लाइट चुकली तर काय करावे लागते याविषयी माहिती देणारा कोणी मिळाला नाही. येऊन जाऊन चाकखुर्ची न मिळून उड्डाण चुकले तर यापुढे कधीच अमेरिकेला जाण्याची यतायात करावी लागणार नाही कारण चाकखुर्चीचा आग्रह सौ. चा होता व बघ आता जन्माची अद्दल घडली तेव्हां उगीच अमेरिकेचे नाव काढू नको असे म्हणण्याची मला संधी होती एवढीच बाब दुःखात  सुखाची ! अर्थात तशी संधी मला उपलब्ध  करून देईल तर ती सौ. कसली.  तिने एकदम चाकखुर्ची  निरीक्षकाला आम्हाला दोन ऐवजी एकच खुर्ची मिळाली तरी चालेल असे म्हणून आमचा नंबर लावला व जवळ जवळ एक वाजता मला चाकखुर्चीवर बसवून आम्हाला ज्या ७४ क्रमांकाच्या द्वारापाशी जाण्यास सांगितले होते तिकडे प्रयाण केले .
      आम्ही आत शिरताना चाक खुर्चीमुळे आमचा प्रवास सुरळीत झाला. व अगदी दहा मिनिटातच आम्ही इष्ट प्रवेशद्वारापाशी पोचलो लगेचच प्रवाश्यांना विमानात सोडण्यासही सुरवात झाली व आमचेच क्रमांक पुकारण्यात आले व थोड्याच वेळात आम्ही स्थानापन्न झालो व दोम्ही मुलांना मोबाइलवरून संदेश पाठवून मी मोबाइल बंद केला तो पुन्हा न उघडण्यासाठीच, बाहेर बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याचे खिडकीतून मला दिसत होते पण आता त्या पावसाची फिकिर  करायचे कारण नव्हते कारण विमानतळावर आम्ही पोचलो होतो एवढेच नव्हे तर विमानातही बसलो होतो विमान चालकाने आपण अगदी वेळेवर निघत आहोत असा इशाराही दिला होता पण अजुन घरघराट  सुरु झाला नव्हता।तेवढ्यात सूचना सुरु झाली " विमानातील पाण्याची पातळी खाली गेली आहे तेव्हां पाणी भरून घेण्याचे काम सुरु आहे व् ते संपताच उड्डाण सुरु होईल " सुदैवाने पाण्याची पातळी लवकरच योग्य तेवढी झाली आणि विलम्बाबद्दल आमची क्षमा मागून वैमानिकाने विमान सुरु केले व आम्ही खरेच मुंबई चा विमानतळ सोडला पहाटेचे (की रात्रीचे २ वाजून वीस मिनिट होत  होती.विमानात  बसल्याची सूचना दोघाही मुलांना दिलेलीच होती.आमच्या मागेच असलेले देसाई कुटुंब चाकखुर्चीच्या आमच्याच मेळाव्यात होते आणि त्यांच्यापैकीही एकालाच चाकखुर्चीवर ( बसण्याचे) समाधान लाभले होते त्यामुळे समदु:खी किंवा समसुखी असलेल्या आमची ज़रा दोस्ती झाल्यासारखे झाले होते शिवाय ते बडोद्याचे असल्यामुळे त्यांना मराठी थोडेफार व हिंदी बऱ्यापैकी कळत होते त्यामुळे सौं ने त्यांच्याशी बातचीत सुरु करूनहीं टाकली होती. समोरच्या खुर्चीच्या मागील पटलावर चित्रपट पहाण्याची सधी होती त्यामुळे पुण्यात पहाणे शक्य न झालेले "एलिझाबेथ एकादशी " व इतरही काही चित्रपट पहाण्यास सौंने  सुरवात केली  व तिचेच अनुकरण मी केले.
     ब्रुसेल्सला विमान थांबून  आतील सेवक चमु बदलणार होता।  विमान थांबल्यावर आम्हाला खाली उतरुन काही काळ  विमानतळावर काढता येणार होता व नंतर पुन्हा विमानात प्रवेश करायचे होते।मागच्या वेळी ज्या प्रवेशद्वारातून बाहर पडलो त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर पुन्हा प्रवेश करण्याचे द्वार होते असे मला आठवत होते. देसाईनी परत आपण प्रवेश कोणत्या द्वारातून करणार ऎसे मला विचारल्यावर मी ती दोन्ही प्रवेशद्वारे  जवळच असतील त्यामुळे येथे चाकखुर्चीची आवश्यकता पडणार नाही असेही सांगितले।आम्ही बाहर पडताना आम्हाला हसतमुखाने निरोप देणाऱ्या आमच्या चमूतील सहाय्यकास त्याने नंतर कोणत्या द्वाराने प्रवेश करायचे हे मात्र विचारले. बाहेर पडल्यावर यावेळी माझ्या विनंतीस मान देऊन सौंने  चाक खुर्चीचा आग्रह धरला नाही व आम्ही केबिन बैगेज म्हणजे एक छोटी सूटकेस सौ.च्या गळ्यात पर्स व माझ्या गळ्यात पाऊच अश्या थाटात चालू कागलो व अगदीच जवळ असणारे प्रवेशद्वार सापडता सापडता अगदी "अजुन चालतोची वाट " अशी परिस्थिति झाली। मध्ये पुन्हा सुरक्षा चाळणी पण होती आम्ही तेथे असलेल्या मोठ्या रांगेत उभे असतानाच श्री व सौ देसाई आले त्यांनी चाक खुर्चीची वाट पाहिली होती व सर्व चाकखुर्चीवाल्यांना एकाच मोठ्या उघड्या   गाडीतून आणण्यात आले असे त्यांनी सांगितले अर्थात आम्ही चालत आल्यामुळे त्यांच्या अगोदरच पोचलो होतो शिवाय माझे २३ ता.चे मॉर्निंग वॉक राहिलेच होते ते पूर्ण झाले असे मी मनाचे समाधान करून  घेतले.सुरक्षा चाचणीनंतरही बरेच अंतर चालल्यावर आमचे द्वार क्रमांक ४० आले व स्वच्छतागृहात जाऊन  येईपर्यंत पुन्हा आत सोडायला सुरवात झालेली होती. 
       या नंतरच्या प्रवासात पुन्हा एकदा पेयपान ( आम्ही अर्थातच साधे सरबत ) व त्यानंतर भरपेट जेवण झाले। जेट एयरवेज़ ने आपला खाण्यापिण्याविषयीचा लौकिक पाळला।आठ तासात नेवार्क आले व "आपण अगदी नियोजित वेळेत म्हणजे स्थानिक वेळेनुसार दु. १२-३० वा नेवार्क विमानतळावर प्रवेश करात आहोत अशी उद्घोषणा झाली व विमान खाली उतरू लागले विमानातून उतरतानाही "आयक़िया " हे फर्निचरचे मोठे मॉल दिसते ते पहाण्याची (ते मागील वास्तयात आतून अनेकवेळा पाहिले होते तरी) सौ.ची  इच्छा होती पण आम्ही बसलेल्या विरुद्ध बाजूस ते असल्यामुळे तिची निराशा झाली यावेळी इमिग्रेशन प्रमाणपत्र एका कुटुम्बास एकच भरायचे होते त्यामुळे माझा त्रास थोड़ा कमी झाला कारण दोघांचे फॉर्म्स भारताना पासपोर्ट क्रमांक ,जन्मतारखा यात अदलाबदल होऊन फॉर्म्स अनेकदा भरण्याची एकदा पाळी आलेली मी विसरलो नव्हतो एकच फॉर्म भरायचा असल्यामुळे तसे काही झाले नाही व तो फॉर्म व केबिन सामान घेऊन आम्ही नेवार्क विमानतळावर उतरलो। बाहेर  पडल्यावरच चाक खुर्च्यासह बरेच वाहक उभे होते. त्यांच्या प्रमुखाजवळ चाकखुर्ची मागणाऱ्यांची यादी होती त्याच्या यादीत आमचे नाव नव्हते असे तो म्हणाला पण आमच्या तिकिटावरची नोंद पाहून अखेरीस आम्हाला एक चाकखुर्ची मिळाली। येथेही खुर्च्यांची संख्या कमीच होती त्यामुळे बहुतेक दोघांपैकी एकालाच खुर्ची मिळाली दोघेही अगदीच हालता येत नाही अशी परिस्थिति असणाऱ्यानाच   दोन खुर्च्या मिळाल्या आमच्या खुर्चीला व आणखी एका जोडीच्या खुर्चीला मिळून एकच वाहक मिळाली म्हणजे ती  एक धष्टपुष्ट महिलाच होती दोन खुर्च्या  (त्यावरील व्यक्तीसह )  आपण सहज नेऊ  असा विश्वास तिने हसतमुखाने व्यक्त केला. ती भारतीयच होती त्यामुळे सौं ने तिच्याशी लगेच हिंदीत बोलून मैत्री करून मी तुला ढकलायला मदत करते असे पण सांगितले त्यामुळे बाहेर गेल्यावर टिपची विभागणी कशी करायची  याचा मी विचार करू लागलो. मुंबईत विमानतळावर सी सी टीव्ही बसवले आहेत त्यामुळे चाकखुर्ची वाहक बक्षीशी (टिप) घेत नाहीत असे कोणीतरी सांगितले होते पण त्यात काही तथ्य नव्हते असे आढळून आले होते त्यामुळे अमेरिकेत तर टॅक्सी वालेही टिप घेतात तर विमानतळावरील खुर्चीवाहक घेणार नाही ही शक्यताच नव्हती. वाहिकेने सौ.च्या मदतीने दोन्ही खुर्च्यांचे चालकत्व सांभाळत इमिग्रेशन खिडकीपर्यंत आम्हास नेले. चाकखुर्चीधारकाची रांग वेगळी असल्याने तेथे आमच्या पुढे फारसे कोणी नव्हते आता इमिग्रेशनवाला आपल्याला शिक्का कोणता मारून देतो एवढीच एक चिंतेची  बाब राहिली सुदैवाने आमचा चेहरा घरातून निघून चोवीस तास झाले तरी बराच फोटोशी मिळताजुळता राहिला होता व बोटाचे ठसेही जुळले व त्यानंतर तेथील अधिकाऱ्याने आम्हालाच किती दिवस राहणार विचारले व आम्ही अगदी काटेकोरपणे आमच्या तिकिटांच्या तारखानुसार चार महीने व दोन दिवस सांगितल्यावर (हो इथूनच परत पाठवायला नको )कोणाकडे जाणार विचारले व "मुलाकडे" ऎसे उत्तर दिल्यावर "मुलाकडे आणि चारच महीने ?' असे उदगार हसत हसत काढले तेव्हां आता हा सहा महिन्याचाच शिक्का मारणार असे वाटले व त्याने शिक्का मारून आम्हाला सोडल्यावर पासपोर्ट पाहिल्यावर त्याच्यावर फक्त प्रवेशाच्या तारखेचाच शिक्का मारल्याचे दिसले. त्यामुळे पुन्हा प्रत्यक्षात त्याने नोंद काय केली आहे हे पाहायला सौ. ला  पाठवले पण तिला त्याने समाधानकारक उत्तर दिल्यावर आता फक्त आपल्या बॅगा ओळखून त्या घेणे हे काम राहिले होते त्यासाठी सहा डॉलर्स टाकून ट्रॉली चाकखुर्चीतून उतरुन मीच घेऊन आलो म्हणजे चाकखुर्ची हे एक नाटकच झाले होते !  शेवटी आमच्या बॅगा काढून त्या ट्रॉली  वर लादून आम्ही बाहर पडलो आणि समोरुनच चिरंजीव येत आहेत असे दिसले मग त्यानेच आमचा ताबा घेत चाक खुर्ची चालिकेस (काय द्यायची ती )टिप देऊन खूष केले व आमचा मार्ग आता मोकळा झाला.