............. पण

                                      " पण""   हा शब्द पुरातन काळापासून वापरात आहे. पण म्हणजे प्रतिज्ञा , विवाहात योग्य निवडीसाठी वापरण्यात आलेली कृती वगैरे . तसेच त्याचे इतरही अर्थ होत असतील. जसे , जुगारात मिळकत अथवा व्यक्ती पणास लावणे, पणात एखादी वस्तू  जिंकणे अथवा हरणे, इ. परंतु माझ्या मते पण हा पूर्वी काही प्रमाणात तरी (चांगल्या वाईटाचे प्रमाण माहीत नाही) चांगल्या कर्मांसाठी वापरला जात असे. असे दिसते. म्हणजे विवाहासाठी द्रौपदीने पण लावला. आणखीनही काही उदाहरणे देता येतील. वाईट कामांसाठीही पण केले जात असतील. असा हा पण आजच्या युगातही घट्ट रुजलेला आहे. मात्र आता पण वापरला जातो तो नकारात्मक गोष्टींसाठी.  कोणी जर पण हा शब्द पन असा वापरीत असेल तर ते जास्त योग्य आहे. कारण पण मध्ये लपलेला नकार पन मध्ये जास्त दिसतो. तुम्ही एखाद्याला विचारून पाहा, "काय कसं चाललंय ?   उत्तर बऱ्याचदा ""ठीक आहे, प...‌‌.ण " असं ऐकू येतं. माणसं परिस्थिती चांगली असली तरी अशी उत्तरं देतात याचं मला आश्चर्य वाटतं. कधी कधी ह्या पण ने आयुष्य पार उधळून टाकलेलं दिसतं तर कधी कधी या पण चे चांगल्या प्रसंगांना गालबोट लागलेले दिसते.                                                             मला तर वाटतं पण ही एक सोय आहे. नकार कळवण्याची. पण असा हेल काढून म्हटलं  (प आणि ण मध्ये हेल काढला )तर हाच नकार जास्त परिणामकारक होतो. किंवा खालच्या मानेने हळूच नकार दाखवण्यासाठी म्हटलेला पणही परिणामकारक होतो. जशी दुधात माशी पडावी तसा सगळा प्रसंग गढूळ करता येतो. मला वाटतं पण हा शब्द आवडीचं काही सांगण्यासाठी नसावाच. अशाच एक आजी  त्यांना त्यांच्या दहा बारा वर्षांच्या नातवा बद्दल विचारल्यावर म्हणाल्या , " तसा हुशार आहे हो. पण कामन सेन्स नावाची गोष्ट त्याच्याजवळ नाही. " आता आजीना कामन सेन्स किती होता हा वादाचा विषय होऊ शकेल. उत्तर देताना दुसऱ्याचा विचार सहसा केला जात नाही. (पाहा मी पण , पण  वापरला. ) एकदा एक विद्यार्थी पहिला आला. त्याला बक्षीस मिळाल्यावमास्तर म्हणाले, " बघ हो तुला समारोपाचे चार शब्द बोलावे लागतील हं" . त्यावर तो म्हणाला, "समला भाषणबाजी जमत नाही. " मग मास्तर समजावणीच्या सुरात म्हणाले, " तुला काही भाषणबाजी करायला सांगत नाही. तू एवढा हुशार आहेस पण समारोपाचे चार शब्द बोलण्याचे तुझ्यात धाडस नाही ? " पाहा पण आलाच . कदाचित ते धाडस मास्तरांमध्येही नसावं. आपल्यालाही अशी बरीच उदाहरणे माहीत  असतील. पण च्या उच्चारानंतर येणारं वाक्य होकारार्थी  असण्याची शक्यता मला तरी कमी वाटते. आपल्याला माहीत असतील अवश्य लिहा . काही असलं  तरी एखाद्या मोठ्या माणसाने लादलेल्या अटी अमान्य आहेत हे एका शब्दात सांगण्यची सोय पण या शब्दात आहे. म्हणजे बघा , तुम्ही अशा पण नंतर वाक्या पूर्ण करण्याची गरज नाही, कारण तुमच्यात ते धाडस असतं तर तुम्ही सरळ विरोध केला असतात , नाही का ? म्हणजे झाली ना एका शब्दात सोय. नकाराची आणि विरोधाचीही. तुमचं मत काय आहे ते अवश्य लिहा.