कौतुकास्पद, पण . . . .

लोकसत्ता वर्तमानपत्राच्या ३१ ओक्टोबर रोजी चतुरंग या पुरवणीत "आणि पुन्हा आयुष्याच्या पेटल्या मशाली" या मथळ्याचा लेख आहे. लेखाचा विषय आहे अश्या काही शेतकरी महिला ज्यांच्या पतीने आत्महत्या केली पण त्यांनी खचून न जाता कंबर कसली, शेतीत स्वत: लक्ष घालून शेती करण्यास सुरुवात केली व आता त्या मुलांना, कुटुंबाला समर्थपणे सांभाळत आहेत. व अशी एक नाही तर अनेक  उदाहरणे आहेत. (हे माझे निष्कर्ष नसून लेखात जे काही आहे त्याचे सार आहे). पहा दुवा क्र. १ 

या महिलांनी जे काही करून दाखविले आहे ते फारच कौतुकाची  गोष्ट आहे यात शंकाच नाही. पण यातून काही गंभीर प्रश्न उभे राहतात.

शेतकरी आत्महत्यांना सरकारची चुकीची धोरणे व जनतेची  भूमीतून निपजलेल्या वस्तूंची किंमत मोजायची तयारी नसलेली, व पोशिंद्याला सदैव अशोकवनात बंदिस्त ठेवू पाहणारी रावणी मानसिकता (पहा कविता "रावणदहनाच्या" हार्दिक शुभेच्छा) असल्याचे सांगण्यात येते. मी शेतकरी नाही, त्या मुळे मला काय बरोबर व काय चुकीचे ते माहीत नाही.  पण हे मात्र खरे कि सरकारची धोरणे, वा जनतेची मानसिकता, या दोन्ही पैकी एक पण गोष्ट तर बदलली नाही. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकर्याची जमीन, हवामान/पाउस काहीही बदलेले नाही. आणि तरी सुद्धा या महिला शेती करून  मुलांना, कुटुंबाला समर्थपणे सांभाळत आहेत. जर त्या शेतकर्या कडे जी आणि जेवढी जमीन होती त्यात कुटुंब चालेल एवढी शेती करणे शक्य होते तर मग त्याच्या वर आत्महत्या करण्याची पाळी का आली? व जर त्या जमीनीत अशी शेती करणे शक्यच नव्हते, कारण सरकारची चुकीची धोरणे व जनतेची मानसिकता, तर मग आता त्या महिला - ज्यांना शेतीचा पूर्व अनुभव नाहीच - त्या समर्थ पणे शेती कश्या काय करीत आहेत? कोणाला या कोड्याचे उत्तर माहीत आहे का?