भेटली दाद तर हवी आहे



भेटली दाद तर हवी आहे


भेटली दाद तर हवी आहे
शेवटी मी सखे कवी आहे

प्रीत माझी नवीनवी आहे
शैशवातील पालवी आहे

सावळे, सावळी तुझी काया
रंगते रंग माधवी आहे

गाळले पाहताच डोळ्यांनी,
स्वप्न माझे अवाजवी आहे


पाहिला भाकरीत चांदोबा
केवढी भूक लाघवी आहे

सत्य साधेसुधे मला कळते
(पण तुझी थोर थोरवी आहे!)

आर्द्र होऊ नयेच का कोणी?
देखणीशीच वाळवी आहे

झाकतो मी उगाच शब्दांनी
आग जात्याच नागवी आहे


एकला चालणेच भाग्य तुझे,
आणि ही वाटही नवी आहे

ठेव अंधार माझियासाठी
चंद्र आहे तुझा रवी आहे

थांब बाहेर तू मना माझ्या
आत एकांत पाशवी आहे


चित्तरंजन