एक धुंद पहाट..

आम्ही नासिकच्या बंगल्यात ९६ साली राहायला आलो. बागकामाची आवड घरच्या सर्वांना. अल्पावधीतच वेगवेगळ्या फुलांनी आणि फळांनी बाग बहरून गेली. ७-८ प्रकारचे देशी-विदेशी गुलाब, मोगऱ्याचे २-३ प्रकार, जास्वंद, तेरडा, झिनिया सारखे विविधरंगी फुले. ‍. जाणाराऱ्येणारा हमखास थांबून बागेचे कौतुक करत असे.

नोकरी निमित्त घराबाहेर राहायला जावे लागल्यामुळे माझं बागेत काम करणं जवळपास बंदच झालं, पण बागेवरचं प्रेम मात्र तसंच होतं. जमेल तेव्हा झाडांना पाणी देणे, खतं घालणे अशी कामे मी करायचो. 
एकदा जवळपास महिन्याभराने मी गौरी-गणपतीसाठी नासिकला येत होतो. घरी पोहोचेपर्यंत पहाट झाली होती. आमच्या शेजाऱ्यांनी सोनचाफ्याचे झाड लावले होते. लांबूनच त्याचा धुंद करणारा सुगंध दरवळत होता. घराच्या ओढीने वेगात पडणारी माझी पाउले हळू झाली.. क्षणभर थांबत मी उर भरून श्वास घेतला..स्वर्गीय सुखाची ति अनुभूतीच होती.
मी बंगल्याच्या फाटकापाशी आलो.. फाटक उघडणार तेव्हढयात वाऱ्याबरोबर रातराणीचा गंध आला. हिरव्यापानांवर डोलणाऱ्या रातराणीच्या शुभ्र चांदण्या सुगंधाची उधळणं करत होत्या. रातराणी न लावण्याचा सल्ला आम्हाला बऱ्याच जणांनी दिला होता. रातराणीमुळे साप येतात असं त्यांचं म्हणणे होते. तो सल्ला आम्ही मानला नाही याचं विलक्षण समाधान वाटलं. नाहीतर ह्या  धुंद सुगंधाला आम्ही मुकलो असतो.
डोक्यावर अचानक काहीतरी पडल्यासारखे वाटले.. पारिजातकाची फुले.. टपोऱ्या, शुभ्र फुलांचा अंगणात सडा पडलेला होता. मी ओंजळभर फुलांचा वास घेतला. प्राजक्ताच्या झाडाने पुष्पवर्षाव करूनच जणू स्वागत केलं. सत्यभामेच्या अंगणात श्रीक्रुष्णाने प्राजक्ताचं स्वर्गातून आणलेले झाड लावले, पण त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडत आणि सत्यभामेला त्याचा हेवा वाटायचा. ती शुभ्र-केशरी रंगाची फुले आज भरभरून दान देत होती. फुले वेचणारा थकून जाईल, परंतु फुले संपणार नाहीत. हि नाजूक फुले वेचणे पण फार कौशल्याचं काम. फुलं अलगद वेचून परडीत ठेवण्यात एक वेगळंच आनंद आहे.

फाटक उघडून, पायाखाली येणारी प्राजक्ताची फुले कशीबशी चुकवत मी आत आलो. हवेत अजून एक सुवास दरवळत होता. मी त्या दिशेने गेलो. बघितलं तर तिथे ब्रह्मकमळाची शुभ्र फुले फुललि होती. पूर्ण बागेभर त्यांचा वास दरवळत होता. या फुलांचा जवळून खूप वास येत नाही, पण वातावरणात धुंद वास दरवळत राहतो. रात्री उमलणारी हि फुले, सूर्योदय होईपर्यंत कोमेजून जातात. वर्षातून एकदाच, पावसाळ्यातच फुलणारी हि फुले आज उमलली होती आणि माझ्या भाग्यात त्यांचा आनंद लुटणं होतं.

त्याच्या शेजारीच मोगऱ्याच्या झाडाची कुंडी होती. त्यालापण छान फुले फुलली होती. अद्वितीय वासाची देणगी लाभलेला मोगरा हुंगत मन परत धुंद झालं. वेलीमोगऱ्याचा वेल पण तिथेच होता. दोन्ही फुलांना वेगळा वास होता, पण कोणाचा वास अधिक छान होता हे निवडणं अशक्य होतं.

जाई-जुई आणि सायलीचे वेल पण बहरले होते. त्यांचा मंद वास मन अजून प्रसन्न करत होता. वेलाची कमान आणि त्यावर फुललेल्या फुलांच्या लक्ष-लक्ष चांदण्या!!!

लक्षात आलं की एक सोनचाफा सोडला तर सगळी फुले पांढरी आहेत. लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली. फार पूर्वी सर्व फुलं पांढऱ्या रंगाची होती. त्यांना आकाशातल्या रंगीत ढगांचा हेवा वाटायचा. देवाने गंधा बरोबर रंगही द्यायला हवा असं त्यांना वाटायचं. आणि वारा जेव्हा ढगांकडे जायचा तेव्हा त्या फुलांच्या सुगंधासमोर ढगांना त्यांचा रंग निरुपयोगी वाटायचा. वाऱ्याने ढगांना सांगितलं की फुलांना तुमचा रंग हवा आहे. ढगांनी फुलांना निरोप पाठवला.. पाऊस रंग घेऊन खाली येईल.. फुलांनी तो रंग घ्यावा आणि त्या बदल्यात सुगंध द्यावा. ठरल्या प्रमाणे रंग घेऊन पाऊस आला. जे फुलं जागी होती त्यांनी आवडेल तो रंग घेतला. परंतू काही फुलं झोपून राहिली, ती तशीच पांढरी राहिली. तेव्हापासून रंगाची वाट बघत ती रोज रात्री उमलतात आणि जागी राहतात, धुंदपणे दरवळंत. ..पावसाला मात्र परत ढगांकडे जाता नाही आलं. तेव्हा पासून फुलं रंगीत झाली आणि पावसाचे ढग काळे.

वाऱ्याची झुळूक मन परत धुंद करून गेली. मनात विचार आला, कोणत्या फुलाचा वास घेत राहू? सोनचाफा, मोगरा की ब्रह्मकमळ? की रातराणी? की जाई-जुई आणि सायली? प्रत्येकाचा एक वेगळाच धुंद करणारा वास. अचानक पावसाचे थेंब बरसू लागले आणि सुगंधाच्या स्पर्धेत मातीसुद्धा उतरली.