माझी भटकयात्रा - १ (ठेंगोडे चा जागृत सिद्धीविनायक)

भटकंती दिनांक - ३० डिसेंबर २०१५
गाव - ठेंगोडे 
ठिकाण - जागृत सिद्धिविनायक मंदिर व इतर छोटी मंदिरे
कसे जायचे ?  
महाराष्ट्रातले नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहर अनेकांना माहीत असेलच. मालेगाव च्या जुन्या बस स्थानकावर गेल्यास तेथून सटाणा जाणारी बस पकडावी. सटाणा या गावाचे दुसरे नाव बागळण असेही आहे.  मालेगाव सटाणा ३३ किलोमीटर आहे. सटाणा येथे उतरून नासिक किंवा देवळा बस पकडावी. त्या बसला या मंदिराचा थांबा आहे. बसेस कमी आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत चालत जाऊन तेथून काळी पिळी रिक्षा पकडावी.  तेथून मंदिर ७ किलोमीटर आहे.  
सिद्धिविनायक मंदिराबद्दल - 
अनायासे मी आणि कुटुंब मुलाच्या ख्रिसमस च्या सुटीत मालेगावला (सासुरवाडीला) आलेलो असल्याने तेथे जायचा योग आला. आमच्या सासूबाई गणपतीच्या उपासक आहेत. आम्ही तेथे साधारण दुपारी एक वाजता पोहोचलो. मंदिर छान आहे. मूर्ती सुखद आणि प्रभावी आहे.  आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या मागची मोठी गिरणा नदी पूर्ण आटलेली होती. एरवी पावसाळ्यात येथे यायला वेगळीच मजा येईल असे सासरेबुवांनी सांगितले. मंदिर प्रशस्त आहे.    मी आणि सौ ने दर्शन घेतले. तसेच सगळ्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तेथे आम्ही सगळ्यांनी आणलेला डबा खाल्ला. अशा हवेशीर ठिकाणी आम्ही सोबत आणलेली चटणी, कोबीची भाजी, भाकरी, पोळी, कांदा, मुळा, गाजर या सगळ्यांची चव नेहमीपेक्षा छान लागली. माझी ७ महिन्यांची मुलगी सोबत होती. तिला सुद्धा हा मंदिराचा हवेशीर परिसर आवडल्याचे जाणवले. मंदिर परिसरात छोटे आसरा देवी आणि खंडेराव मंदिर आहे.
इतर मंदिरांकडे पायपीट -
मी माझ्या मुलाला घेऊन (सध्या सहावीत आहे) सहजच जवळपास  फेरफटका मारायला निघालो.  ठेंगोडे गाव एकदम लहान खेडेगाव आहे. तेथे थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर हनुमान आणि शनी यांची एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असलेली मंदिरे आम्हाला दिसली. (पाठोपाठ विरुद्ध भिंत). दोन्ही मंदिरात दर्शन घेतले आणि परत आलो. त्यातील शनी मूर्ती मला वेगळीच वाटली आणि या आधी मी कुठेही न पाहिलेली अशी ती मूर्ती होती. शनी देव रथात बसलेले होते.  

एकूणच मला एक छान मंदिर पाहिल्याचा आनंद झाला.