जानेवारी २९ २०१६

मनोगत

पल्याला काय आवडतं ? आपलं मन नक्की कशात रमतं, हे प्रत्येकाला केव्हा ना केव्हा समजतंच. कोणाला हे लवकर उमगतं तर कोणाला थोडं उशिरा.
सह्याद्री हा शब्द कानावर पडताच असंख्य आठवणी डोळ्यांसमोरून भराभर धावू लागतात.

राजगडाच्या असंख्य आठवणी पैकी कोणती आठवण छान आणि कोणती सर्वात छान अशी मनामध्ये तुलना सुरू होते. संजीवनीवरचा स्वर्गीय अनुभव देणारा सूर्यास्त ! त्या पवित्र क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केलेल्या राजगडाच्या असंख्य वाऱ्या. हिवाळ्यात तोरण्याच्या बुधल्या शेजारी अस्ताला जाणारा सूर्य. अभेद्य अश्या त्या प्रचंडगडाच्या सावलीची ठळक झालेली सीमा ! मनामध्ये सूर्य आणि तोरण्याच्या नावानं सुरू झालेला "तव तेजांतील एक किरण दे ।" असा जप !
एकदा संजीवनी वर सूर्यास्त बघायला गेलो असताना अचानक ढग दाटून येऊन आलेला मुसळधार पाऊस. आपल्या पुड्यात पाणी भरून नेणारे अनेक छोटे छोटे ढग आणि तोरण्याच्या बुधल्याला झाकायचा त्यांचा असफल प्रयत्न.... पश्चिमेला भाटघरच्या पाण्याचा आरसा, त्यातून परावर्तित होणारी सूर्यकिरणे...

मढे  घाटातली ती दोघातच काढलेली अंधारी रात्र. घाटाच्या अगदी कडेला टाकलेला तंबू. ताऱ्यांनी गच्च भरलेलं नेत्रदीपक आकाश, त्याला मधोमध छेदणारा आकाशगंगेचा धूसर पट्टा. खाली जंगलातून मधूनच ऐकू येणारा रान डुकरांच्या ओरडण्याचा आवाज. तो ऐकून अंगावर आलेला काटा. तंबूच्या बाहेर मांडलेला टेलिस्कोप, त्यामधून दिसणारे अनेक तारकापुंज, गुरुवरील पट्टे आणि शनीची कडी…

उघड्यावर झोपून, कुडकुडत काढलेली कमळगडावरची गोठवणारी रात्र. मध्यरात्री चार पायऱ्या उतरून त्या कावेच्या खोल विहिरीत जाण्याचा मोह. अष्टमीच्या चंद्राच्या तेजस्वितेला न जुमानणाऱ्या ताऱ्यांनी खचाखच भरलेलं आकाश. चंद्र मावळेल तसं आपलं अस्तित्व स्पष्ट करणारा आकाशगंगेचा पट्टा. संपूर्ण आकाशात आपली सत्ता गाजवणारा तो वृश्चिक आणि त्याच्या शेपटाला लटकवलेले दोन तेजस्वी तारकापुंज…उघड्या जमिनीवर आडवं पडून रात्रभर बघितलेला हा अवकाशातील खेळ !

निवती, यशवंतगड, सिंधुदुर्ग बघण्यासाठी रात्रभर चालवलेली अपाचे. रात्री गाडीच्या उजेडात चमकणारे आणि भरभर मागे जाणारे रस्त्यावर आखलेले  पांढरे पट्टे. पहाटे लवकर घेतलेलं कोल्हापूरच्या देवीचं शांत आणि अभूतपूर्व दर्शन. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि माझ्यावर रोखलेली तिची नजर… पहाटे कोल्हापूरच्या मंदिराबाहेर गाडीवरच काढलेली अर्ध्या तासाची डुलकी.
भोगवे किनाऱ्यावर आतमध्ये ओढून नेणाऱ्या समुद्रात सावधपणे केलेला धिंगाणा, आणि अखेर निवतीच्या पवित्र किल्ल्यावर काढलेली निवांत, पण नवचेतना देणारी सुखद रात्र !

एन एच फोर वर अपाचे सुसाट पळवताना ११४ वर थरथरणारा स्पीडोमीटरचा काटा !  दिवसभर गाडी चालवून, स्वराज्याच्या 'पार' टोकाला असणाऱ्या पारगडाचा घेतलेला शोध ! मावळत्या सूर्यासोबत पारगडाच्या भेटीची मावळत जाणारी आशा आणि वाढत्या अंधारासोबत गडद होणारी भीती !
परंतु पारगड दृष्टिक्षेपात येताच अंगात संचारलेली नवी ऊर्जा, आणि अखेर अजिंक्य राहिलेली त्याच्या भेटीची जिद्द !
पारगडावर पोचून सोडलेला नि:श्वास. तिथल्या घनदाट जंगलात आणि खोल दऱ्यात मावणार नाही इतका अपार आनंद !
आणि ह्यासोबत दिवसभरात अपाचे वर बसून कापलेलं ४७० किलोमीटरचं अंतर !
पारगडावर फिरताना पावलो पावली 'जाणवणारा' आणि 'जागवणारा' रायबा मालुसरे आणि शेलार मामा ह्यांचा इतिहास ! त्यांच्या पराक्रमाने आणि सहवासाने पावन झालेला पारगडावरचा प्रत्येक दगड !

सुधागड समजून त्याच्या शेजारच्याच डोंगरावर केलेली यशस्वी चढाई ! वर पोचल्यावर आलेली निराशा, पण सुधागडच्या बुलंद बुरुजाचे लांबून दर्शन होताच मनात संचारलेली नवी उमेद !
मंगळ गडावर केलेली चढाई, समोर काही उंचीवरच, भेटीस मन:पूर्वक आमंत्रण देणारा त्याचा पश्चिमेकडील बुरूज, पण सहा फूट उंच गवतात हरवलेली पायवाट…अवघड ठिकाणी केलेले चढाईचे असफल प्रयत्न ! वेळे अभावी परत फिरायची आलेली परिस्थिती, आणि गळ्यात अडकलेला आवंढा !
काही दिवसातच, मनामध्ये मागचे अपयश ठेवून, मंगळ गडाची केलेली यशस्वी मोहीम, त्यावर तंबू ठोकून काढलेली रात्र, आणि सोबतीला ग्रहण लागलेला चंद्रमा !

माघ वद्य नवमीच्या रात्री दर वर्षी सिंहगडाला दिली जाणारी  भेट, तान्हाजींच्या स्मारकासमोर म्हटलेली सांघिक पद्य ! तान्हाजींच्या पराक्रमाच्या जागवलेल्या आठवणी आणि त्यामुळे मनात आलेला भावनांचा महापूर !

सह्याद्री हा शब्द कानावर पडताच असंख्य आठवणी डोळ्यांसमोरून भराभर धावू लागतात. भूत काळातून आणि भविष्य काळातून वर्तमानात आल्यावर मनात एक विचार खेळ करतो ..
आपलं मन नक्की कशात रमतं हे प्रत्येकाला केव्हा ना केव्हा समजतंच. कोणाला हे लवकर उमगतं, कोणाला थोडं उशिरा.

Post to Feedछान
धन्यवाद !
लिखाण उत्तम......
धन्यवाद !
कोलाज
आठवणींचे कोलाज ..

Typing help hide