भारतीय सौर दिन दर्शिका

     थोड्य़ाच दिवसापूर्वी म्हणजे एप्रिल ८,२०१६ या दिवशी आपण गुढीपाडवा म्हणजे वर्षप्रतिपदेचा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला. तरीही भारतीय उपखंडात वर्षाचा प्रारंभ  सर्वत्र याच दिवशी झाला असे समजण्यात येते असे नाही.भारतातीलच काही हिंदू नागरिकही त्यांची वर्षप्रतिपदा या दिवशी साजरी करत नाहीत. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षदिन बहुधा उत्तर भारत,महाराष्ट्र, आन्ध्र प्रदेश,तेलंगण, आणि कर्नाटकात मानतात.दिवाळीतील पाडवा हाही विक्रमसंवतनुसार वर्षप्रतिपदा आहे हे सर्वश्रुत व सर्वज्ञातच आहे व गुजरातमध्ये तो नववर्षदिन म्हणून साजरा होतो. तामिळनाडूत पोन्गल हा नववर्षदिन म्हणून साजरा होतो व तो या वर्षी १५ जानेवारीस म्हणजे संक्रान्तीस साजरा झाला.सिन्धी लोक चेती चान्द हा त्यांचा नववर्षदिन साजरा करतात व तो या वर्षी ९ एप्रिल २०१६ या दिवशी होता. मुस्लीम बांधव त्यांचे हिजरी साल वेगळ्या दिवशी सुरू करतात तर पारशी नववर्ष दिन वेगळ्याच दिवशी साजरा होतो.मुस्लिम व हिंदू कालगणना चांद्रवर्षीय असल्याने त्यांच्यात व ख्रिश्चन म्हणजे ग्रेगोरियन वर्षगननेत एकवाक्यता असण्याची शक्यताच नाही.
       अश्या प्रकारे सर्वसम्मत कालगणना स्वातंत्र्यपूर्व भारतात मूलत: अस्तित्त्वात नसल्यामुळे ग्रेगोरियन कॅलेंडरच स्वातंत्र्यानंतर आधारभूत मानण्यात आले परंतु भारतीय परंपरेस योग्य अशी दिनदर्शिका असावी ही भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती आणि त्याच दृष्टीने त्यानी त्वरित पावले उचलून तशी कार्यवाही पण केली आणि अतिशय शास्त्रीय पायावर आधारित भारतीय सौर कालगणना इ.स.१९५७ मध्ये अस्तित्त्वात आणली एवढेच नव्हे वापरातही आणली.सर्व शासकीय व्यवहारात तिचा वापरही सुरू झाला. आकाशवाणीवर दिवसाची सुरवात ग्रेगोरिअयन कॅलेंडरच्या दिनांकाबरोबरच भारतीय सौर दिनांकाच्याही उच्चारणाने होते पण ही गोष्ट आपल्या लक्षातही येत नाही आणि त्यामुळे  थोड्याच वेळानंतर आज भारतीय सौर दिनांक कोणता हे विचारले तर आपल्याला उत्तर देता येत नाही कारण ही गोष्ट आपल्या अंगवळणीच पडलेली नाही.खरे तर एकदाच आपण भारतीय सौर दिनांक ऐकून त्याची नोंद ठेवली तर तिथी कोणती आहे हे कळण्यासाठी पंचांगाचा आधार घ्यावा लागतो तसा न घेता पुढचा दिवस आपण कॅलेंडर न पहाता सांगू शकतो तसाच सौर दिनांकही आपण सांगू शकतो.आणि त्याविषयी सर्व देशात एकवाक्यता असते,दुर्दैवाने आपण हा मोलाचा ठेवा वापरण्याचा आळस करत आहोत.लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही कालगणना जावा,बाली व इन्डोनेशियन हिंदूंमध्ये वापरात आहे.
        पं.जवाहरलाल नेहरूंनी भारतातील सर्व नागरिकांना सोयिस्कर आणि ज्यात कोणताही विरोधी मुद्दा उपस्थित होणार नाही अश्या प्रकारची सौर कालगणना तयार करण्याची कामगिरी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदे (कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ऍंड इंडस्ट्रियल रिसर्च) वर सोपवली  अंतराळ वैज्ञानिक डॉ.मेघनाथ सहा या समितीचे प्रमुख होते. ए.सी.बॅनर्जी ,के.के दफ्तरी, जे.एस. करंदीकर,गोरख प्रसाद,आर.व्ही.वैद्य व एन.सी.लाहिरी त्या समितीचे सदस्य होते. त्यांनी शक संवत आधारभूत करून चैत्र १ शके१८७९  हा त्याचा शुभारंभ २२,मार्च १९५७ या दिवशी केला.दिनदर्शिका शोधन समितीने अंतराळस्थितीवर आधारित ही सौर कालगणना अस्तित्त्वात आणली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी भारतात ज्या ३० वेगवेगळ्या कालगणना पद्धती अस्तित्त्वात होत्या त्यांचा अभ्यास केला. त्यात एकवाक्यता असण्याची शक्यताच नव्हती. समिती च्या अहवालाच्या प्रस्तावनेत पं.नेहरूंनीच म्हटले आहे " त्या सर्व कालगणना ही भूतकाळातील भारतातील राजकीय विभागणीचेच प्रतिनिधित्व करत होत्या.----- आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि त्यामुळेच भारतातील राजकीय ,सामाजिक व इतरही सर्व बाबतीत वापरण्याच्या कालगणना पद्धतीत एकवाक्यता असणे आवश्याक आहे व कार्य शास्त्रीय पद्धतीने व्हावयास हवे "  
            मूळ रोमन दिनदर्शिका १० च महिन्यांची होती व महिन्यांची नावे देण्यामागे कुठलीही भौतिकी घटना नसून काही व्यक्ती व देवता यांच्या नावांचा उपयोग करण्यात आला होता.जानेवारी हा पहिला महिना जानुरियस देवतेच्या तर फेब्रुआरी हा फेब्रुअरियस या त्या महिन्यात येणाऱ्या उत्सवाच्या नावने ओळखला जाऊ लागला.मार्च महिना मार्शियस या देवाच्या तर एप्रिल महिना एप्रिलियस या देवतेच्या नावने तसेच मे व जून महिना मइयस (Maius) व जुनियस (जुनो) देवतेच्या नावाने संबोधण्यात येऊ लागले. सेप्टेंबर.ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर   हे सातव्या,आठव्या,नवव्या व दहाव्या क्रमांकाचे असल्यामुळे त्यांना सरळ सरळ सेप्टेम, ऑक्टो, नोवेम् व डिसेम् या रोमन अंकपद्धतीनेच संबोधण्यात येऊ लागले प्रत्यक्षात जुलियस सीझर व ऑगस्टस या रोमन बादशहांच्या नावे महिने घोषित करण्यासाठी जुलै व ऑगस्ट हे दोन महिने नंतर घुसडण्यात आल्यामुळे प्रत्यक्षात हे महिने ९व्या १०व्या,११व्या व १२व्या क्रमांकावर आहेत.या नावातील चुकीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यांचा व वातावरणातील घडामोडींचा अन्योन्य संबंधच नाही.म्हणजे १ जानेवारीस कोणतीही महत्त्वाची सौरघटना घडत नाही याउलट २२ मार्च या चैत्र १ या भारतीय सौर दिनदर्शिकेच्या पहिल्या दिवशी सूर्य कर्क वृत्तात प्रवेश करतो व त्यादिवशी रात्र व दिवस बरोबर बारा तासांचे असतात.अर्थात यात थोडा म्हणजे २-३ दिवसांचा फरक स्थानपरत्वे पडतो. १ आषाढ हा सर्वात मोठा दिवस असतो.(२१ जून). वैशाख ते भाद्रपद हा पाच महिन्यांचा काल उर्वरित कालापेक्षा थोडा मोठा असल्याने यातील सर्व महिने ३१ दिवसांचे असतात आणि उरलेले सात महीने ३० दिवसांचे, म्हणजे एकूण ३६५ दिवस होतात. प्लुत(लीप) वर्षाच्या वेळी चैत्र सुद्धा ३१ चा होतो, जसा तो यंदा आहे. १ आश्विन ला पुन्हा सूर्य विषुववृत्तावर येतो. आणि १ पौष ला सर्वात लहान दिवस येतो. म्हणजे निसर्गातील बदलांशी महिने नीट जुळवून घेतलेले  असतात भारतीय सौर दिनदर्शिकेतील महिन्यांची नावे ही सुद्धा सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो त्यानुसार चैत्र , वैशाख अशी पूर्वीपासूनच आहेत याप्रकारे भारतीय सौर बर्ष पूर्णपणे सूर्याच्या राशिस्थितीवर आधारित असल्यामुळे शास्त्रीय पायावर उभे आहे.
    भारतीय सौर दिनांक इ.स.१९५७ पासून वापरात आहेत हे तर सत्यच आहे पण सर्व शासकीय कागदपत्रात त्यांचा वापर करणे सक्तीचे आहे.धनादेशावर भारतीय सौर दिनांक वापरता येतो अश्या प्रकारे आर्थिक व्यवहारासाठीही ही दिनदर्शिका वापरता येते. असे असून व   ती कालगणना नेहरूंनी पुढाकार घेऊन सुरू केलेली असली तरी त्यांनी ती फक्त अधिकृत शासकीय दस्तावेजापूरती (जाणीवपूर्वक ?) मर्यादित ठेवली. लोकांच्या आणि शासनाच्याही दैनंदिन व्यवहारात ती  यावी याची काळजी घेतली नाही. शासनाचे वेतन जर त्याच्याशी जुळवले असते तर ते ताबडतोब व्यवहारात आले असते.पण त्यांना ते तसे करायचे नसावे. हे वाक्य कदाचित त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे वाटेल. पण ५७  साली झालेली गोष्ट आपोआप व्यवहारात येत नाही हे पाहिल्यावर स्वत:च्या हयातीत म्हणजे त्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीत ही गोष्ट घडवून आणणे सहज शक्य होते. वेतनाच्या एका बदलाने ते करता आले असते. प्रश्न इच्छेचा होता आणि अजूनही आहे.सध्याचे भारतीय शासन  उत्साहाने वर्षप्रतिपदेचा उत्सव जिकडे तिकडे साजरे करताना दिसले.अश्या उत्सवप्रियतेपेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात भारतीय सौर दिनदर्शिका आणणे हे अधिक महत्त्वाचे आहे. हे त्यांच्या निदर्शनास आणून देणे व त्याचा आपण पाठपुरावा  करणे गरजेचे आहे.ही गोष्ट रास्त आहे असे ज्यांना वाटते त्यांनी राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेच्या संदर्भात   काम करणारी संस्था "राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंच"  (कार्यालय: "श्री दुर्गा" ,  5-6-20 नवा उस्मानपुरा, औरंगाबाद. दूरभाष:0240-2358465) आणि त्यात पुढाकार घेणारी मुख्य व्यक्ती  श्री.अभय मराठे (+91 758 839 9310) यांच्याशी संपर्क साधावा .