आषाढस्य प्रथम ----

          (आषाढ शु॥ प्रतिपदा म्हणजे आजचा दिवस ही कालिदास जयंती आहे व तो दिवस संस्कृत दिन म्हणूनही साजरा होतो.)
      संस्कृत साहित्याचा परिचय नसला तरी "आषाढस्य प्रथम दिवसे --" ही कविकुलगुरू कालिदासाच्या :मेघदूतम " मधील काव्यपंक्ती आहे हे बहुतेकांना माहीत आहे.आकाश ढगांनी भरून आले की आषाढाचीच आठवण होते.तसा ७ जूनला येणारा मृग जेष्ठात येतो तरी पावसाळा म्हटले की आषाढच आठवतो.पूर्वी हवामानखात्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष न देता पाऊस बरोबर जेष्ठात हजेरी लावायचा तरी आषाढाशीच त्याचे अधिक घनिष्ट नाते आहे त्यामुळेच कालिदासालाही "आषाढस्य प्रथम दिवसे " दिसणाऱ्या मेघाचीच आठवण मेघदूत लिहिताना झाली आणि विरही यक्षाचा निरोप पाठवण्यासाठी त्याने त्याला नियुक्त केले. .आपली मानसिकता मात्र इंग्रजी कालगणनेशीच जोडलेली असल्यामुळे ७ जून म्हणजे मृग नक्षत्र निघणार म्हणजे पावसाळ्याचा प्रारंभ असा विचार आपण करू लागतो आणि त्यामुळे आषाढ केव्हां सुरू होतो याचे आपल्याला क्वचितच भान असते.मीही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही पण सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर ढगाळ आकाशाकडे पाहून अचानक कालिदासाच्य़ा मेघदूतातील पंक्ती आठवल्या व दिनदर्शिकेवर पहायला गेलो तर आज खरोखरच आषाढातला पहिला दिवस आहे हे ध्यानात आले..
    मराठी दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रजांवर बऱ्याच काळापूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेला कार्यक्रम "सह्याद्रीच्या पाउलखुणा "मध्ये पुन:प्रक्षेपित झालेला दैवयोगाने मला पहावयास मिळाला.दैवयोगाने म्हणायचे कारण इतर वाहिन्या आपल्या कार्यक्रमांची दर्शकांच्या कानीकपाळी ओरडून जशी घोषणा करत असतात तसे काही करणे म्हणजे दूरदर्शनला नामुष्कीचे वाटत असावे त्यामुळे त्यावेळी दूरदर्शनला भेट द्या आणि जे काय दिसेल ते पहा ही काही वर्षापूर्वी मराठी माणसाची जी वृत्ती होती ती दूरदर्शनने अधिकच आपुलकीने जतन केली आहे.त्यामुळे असा काही कार्यक्रम आपल्या भाग्याने लागला व त्याच वेळी दूरदर्शन सुरू करण्याची सद्बुद्धी झाली तर लगेच मी माझ्या अश्या कार्यक्रमात रस घेणाऱ्या मित्राला दुरभाष करून कळवतो व तोही तसेच करतो.
     सांगायचे कारण म्हणजे तात्यासाहेबांवरील त्या कार्यक्रमातील त्यांच्या मुलाखतीत त्यांच्या "मेघदूत" च्या रूपांतराविषयी झालेली चर्चा ऐकून त्यांच्या मेघदूताचे वाचन करावे असा विचार मनात आला.   "एकाद्या निर्जनबेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी "मेघदूत"या काव्याचीच निवड करीन 
असे तात्यासाहेबांनी म्हटले आहे. मूळ मेघदूत आणि त्याबरोबरच तात्यासाहेबांचे मेघदूत वाचले तर त्यांच्या "या काव्यानुवादाविषयी केलेल्या र्चेतील  उत्तराची यथातथ्यता पडताळून पहाता येईल या उद्देशाने दोन्ही मिळवण्याच्या मागे लागलो कारण तात्यासाहेबांनी हा शब्दशः अनुवाद नाही तर भावानुवाद आहे असे सांगितले होते आणि ते त्यांच्या कविमनास साजेसेच होते. आंतरजालावर मूळ संस्कृत "मेघदूत" सापडले पण तात्यासाहेबांचे मेघदूत नाही इतकेच काय पण ते मागवावे तर "त्याची प्रत उपलब्ध नाही"असे उत्तर मिळाले.
   "मेघदूतम्" या काव्याने अनेकांना मोहिनी घातली.त्यात H.H.Wilson हा इंग्रज कवी तसेच कुसुमाग्रजांसह,शान्ता शेळके या कवियित्रीचाही समावेश आहे.आश्चर्य म्हणजे जालावर विल्सनचा संस्कृत श्लोकांसह इंग्रजी काव्यानुवाद तसेच हिन्दीमधीलही संस्कृत श्लोकांसह "मेघदूतम्" चा गद्य अनुवाद आहे मात्र मराठीतील अनेक अनुवादांपैकी फक्त सी.डी.देशमुख यांनी केलेला समश्लोकी अनुवाद उपलब्ध झाला."मेघदूतम्" चे वृत्त "मन्दाक्रान्ता"आहे व सी.डी.देशमुख यांनी त्याच वृत्तात आणि सयमक रचना केली आहे हे विशेष.पण त्यामुळे हा काव्यानुवाद काही ठिकाणी मूळ संस्कृत श्लोकापेक्षाही समजायला कठिण झाला आहे.(हे कदाचित माझे वैय्यक्तिक मत असू शकेल) चिंतामणराव देशमुखांनीही मूळ काव्यातील एकही शब्द गळू दिला नाही.आश्चर्य म्हणजे चिंतामणराव अर्थमंत्री असताना संसदेत काम करत असताना एकाद्या चिटोऱ्यावर या अनुवादित काव्यपंक्ती लिहीत व ते कागद दुर्गाबाईंनी जपून ठेवले व ते पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित झाले असे त्यांच्या आठवणीत दुर्गाबाईंनी नमूद केले आहे.  
     मराठीमध्ये श्री.विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी पद्यानुवाद केलेला आहे पण तो साकी वृत्तात आहे.लक्ष्मणशास्त्री लेले यांचा मराठी काव्यानुवाद मूळ म्हणजे मंदाक्रान्ता वृत्तात आहे.तो सयमक आहे पण त्यात एका श्लोकासाठी एकाहून अधिक श्लोक वापरले आहेत.अर्थात हे दोन्हीही अनुवाद मला पहाण्यास मिळाले नाहीत पण डॉ.रा.शं.वाळींबे यांनी मेघदूतचा "विवेचक रसास्वाद"हे पुस्तक लिहिले आहे त्यातील टीपांमध्ये या अनुवादाच्या काही पंक्ती पहायला मिळाल्यावरून हे विधान केले आहे.कवी बा. भ. बोरकर यांनीही मेघदूताचा समश्लोकी अनुवाद केला आहे असे जालावरील उल्लेखातून आढळले.
     जालावरील संस्कृत,हिंदी व चिंतामणराव देशमुख यांनी केलेल्या मराठी समश्लोकी व सयमक अनुवादावरून मी स्वत:"चन्द्रकान्ता" या त्यामानाने मुक्त वाटणाऱ्या वृत्तात "मेघदूतम्" चा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील सुरवातीचे काही श्लोक काव्यविभागात मी समाविष्ट करत आहे. मनोगतींना भावल्यास उरलेले श्लोक टप्प्याटप्याने मनोगत वर लिहिण्यात येतील
    कालिदास जयंतीनिमित्त कालिदासास ही भावांजली !