अमृता सावंत

संपादकांचा निरोप अगदी सकाळी सकाळी आला. नीलेश केबिनमधे शिरला तेव्हा संपादक जरा गडबडीत होते. कागदपत्रे वर खाली करून बघणे सुरु होते. त्यांनी नीलेशकडे पाहिले पण तोंडाने बडबड चालू ठेवली कारण कानाशी फोन होता. 
    "नाही मिळाली? पाठवतो लगेच. अगदी लगेच. तरी, अर्धा तास लागेलच पाठवायला. ती मुलाखत?  हो, हो, पाठवतो कोणाला तरी. रंगीत चौकट करू. "  
     बोलता बोलता त्यांनी एक कागद ओढून त्यावर ''अमृता सावंत, परवा दुपारपर्यंत"" असे लिहिले व पुन्हा फोनवर बोलण्यात दंग होऊन गेले. संपादक फोनवर बोलत असतील तर ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची असेल त्या व्यक्तीचे नाव ते चिठोऱ्यावर लिहून देतात, हे नीलेशला दीड वर्षात कळले होते.  चिठ्ठी न पाहताच तो झटकन संपादकांच्या केबिनच्या बाहेर पडला.   
     स्वतःच्या खुर्चीवर जाऊन नीलेशने ती चिठ्ठी पाहिली आणि तो हरखलाच. "दोन वर्षांपूर्वी जिचे फोटो आपण पेपरमधे पाहायचो, हिच्याशी साधे बोलायला तरी मिळेल का असे वाटायचे, साक्षात तिची मुलाखत घ्यायला संपादक सांगत आहेत. नोकरीला लागल्यानंतर इतक्या लवकर असा लॉलीपॉप मिळेल असे वाटलेच नव्हते. ती भारतात परत आली आहे ? असणारच. त्याशिवाय संपादक मुलाखत घ्यायला सांगणार नाहीत." अमृता...क्या बात है...काय तो तिचा फोरहँड, काय ती तिची सर्विस, काय तो तिचा केशरी  जर्सी, तिच्या पावडरच्या जाहिरातीचा तो ग्लॅमरस लुक...नीलेशने एका मिनिटात जमेल तितकी रंगीत स्वप्ने पाहून घेतली.

     ऑफिसमधे सर्व डेस्कवर बातमी पसरली.  नवीन उपसंपादक नीलेश शेंबेकर, मुलाखत -अमृता सावंत, क्रीडा पान चौकट अपेक्षित. क्रीडा पानाच्या संपादकांचा फोन आला,"जातच आहात तर नीट पत्ता माहीत करून घ्या. ग्रंथालयातून माहिती घ्या. ठरावीक स्टेडियममधे अशांचे येणे जाणे असते पण नीट ठावठिकाणा माहीत करून घ्या. त्यांच्या कोणत्यातरी स्पॉन्सरकडे ते उतरतात."
     नीलेश जेवून एक वाजता तडक ग्रंथालयात गेला. स्वतःच्या पेपरमधे  गेल्या आठवड्यात अमृता भारतात परत आल्याची बातमी आली आहे का, पाहिले. तशी आल्याची त्याला आठवत नव्हते. सावंत नावाच्या संदर्भाने नीलेशने गेल्या आठवड्याभराचे इंग्लिश पेपर्स दोन दिवसात चाळले. कोण परदेशातून परत आले आहे आणि कोण परदेशात गेले आहे, या असल्या बातम्या मोठ्या प्रमाणात इंग्लिश पेपर्समधे वाचायला मिळतात, असे त्याला वाटायचे. इंग्लिश पेपरमधे बातमी काही दिसली नाही. मग त्याने काही साईटसही पाहिल्या. सगळीकडे पश्चिम महाराष्ट्रात चालू असलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे फोटो अपलोड होत होते. या साईटवाल्यांना कुस्ती स्पर्धेशी काही देणेघेणे नव्हते. काही परदेशी लोक ती पाहायला येणार होते म्हणून फोटो टाकले जात होते. मामा उभे, दादा डावटाके, सीताराम मोहोळ...नव्वद टक्के उघड्या असलेल्या मल्लांचे फोटो येत होते. एका अंडरवेअऱ बनविणाऱ्या कंपनीने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून त्यांची चांगली जाहिरात होणार होती. लोकांच्या प्रतिक्रियांचा खच पडत होता. नीलेशच्या वर्तमानपत्रानेही या स्पर्धेच्या बातम्यांकरिता शेवटचे पूर्ण पान दिले होते. अमृता नावाने इंटरनेटवर शोधल्यावर लंडनचे घर आणि एका मुलीचे असंख्य फोटो समोर येत होते. एका तरूण मुलाचा गच्चीवरचा फोटोही समोर येत होता. 
मधेच अजून एक उपसंपादक "तुम्ही जाताय का अमृता सावंतच्या मुलाखतीला?" असे विचारून गेले.
आणखी थोड्या शोधाशोधीनंतर नीलेशला माहिती साधारण माहिती समजली. त्याने ती स्वतःच्या नोटपॅडमधे लिहून ठेवली आणि थोडी घोकूनही ठेवली - अमृता सावंत, प्रसिध्द बॅडमिंटनपटू,  एकूण करीअर आठ वर्षांचे, दोन वर्षांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली, दोन वर्षे लंडन राहून तिथल्या बॅडमिंटनचा अभ्यास, नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा विचार.  नीलेशला तिचा पत्ता साधारण माहीत होता तरीसुध्दा ग्रंथालयातल्या कॅटलॉगमधे पाहून नक्की करून घ्यावे म्हणून त्याने तो कॅटलॉग उघडला. कॅटलॉगमधे बरेच सावंत होते. अभिनेते, खेळाडू, नेते, उद्योगपती. काही जुने, काही नवे. एका ""सावंत"" वर गोल केलेला दिसला. शाई ताजी वाटत होती. कोणीतरी नुकतीच माहिती घेतली असावी. त्याच्या मनातल्या पत्त्याशी तो काही जुळेना. मनातल्या पत्त्यातला परिसर या पत्त्यात नव्हता. "वर्षभरापूर्वी सांगलीजवळच्या खेड्यातून आगमन" असे लिहिले होते. एवढी मोठी टेनिसपटू पूर्वी सांगलीजवळच्या खेड्यात होती? 
    असेल.  नीलेशने लायब्ररीतला पत्ता लिहून घेतला. नीलेशने अंगठा उंचावला - डन ! घरी जाऊन नाश्ता करावा आणि तिने दिला तर चहा घ्यावा तिच्या घरी. परवा कशाला, संपादकांना आजच देतो ना मुलाखत...नीलेश चीत्कारला.     
     सेकंड शिफ्टला आलेल्या राहुलला कुणकुण लागलीच होतीच. नीलेशजवळ येऊन पाठीवर थाप मारून तो म्हणाला-
      मजा आहे लेको. चांगलाच मटका लागलाय. जा, जा, मुलाखत घेऊन या आणि मुलाखतीतल्या गंमती जंमती आम्हालाही सांगा. 
     गंमती जमती कसल्या ? च्यायला, मी काही गंमत करायला जाणार नाहीये. यू नो, द जॉब इज सीरिअस. 
     
     संध्याकाळपर्यंत नीलेशने दोघा तिघा खेळाडू मित्रांना फोन लावले. रमेश कृष्णन, लिएंडर पेस, ज्वाला गुत्त्ताबदद्ल माहिती जमवली. सध्या टेनिसला वातावरण पोषक आहे की नाही, लाल फितीच्या रॅकेटमधे रॅकेट अडकली आहे का, कुणाच्या जाण्यामुळे टेनिसच्या विश्वात पोकळी निर्माण झाली आहे असे काही ""नवीन"" प्रश्न त्याने तयार करून ठेवले. नीलेशने राहुलच्या टेबलपाशी येत विचारले,     
    "काय रे, ती नक्की परत आली असेल ना ?"
     "असेलच. त्या शिवाय संपादक आपल्याला कामाला लावतील का?
     "मलाही तेच वाटतंय. अरे, बहुतेक घर बदललंय तिने. पण नो प्रॉब्लेम, नवा पत्ता मिळवलाय मी लायब्ररीतून.  पूर्ण नाहीये पण शोधेन मी. 
      "काही खरं नाही, निळ्या, पेटलायस तू." 
      "बघ कशी आग लावतो ते."
      "म्हणजे? 
      "बघ मुलाखत कशी आणतो ते. 
      "आपले चॅनलवालेही भेटतील बहुतेक तुला. हालचालसाठी तू मुलाखत घे. आपल्या चॅनलसाठी ते बोलतील तिच्याशी. " 
       
        दिवसभर त्याला ऑफिसमधल्या कोणाचेही कुठलेही बोलणे ऐकू आले नाही. कानात फक्त सेट, मॅच, ड्यूस हे शब्द टप्पा घेत होते.नीलेश ऑफिसमधून सटकला. घरी गेला. परफ्यूम मारला. नवा टी शर्ट घातला.  न  प्यायलेल्या चहाची चव नीलेशच्या तोंडावर होती. त्याने बाईक लायब्ररीतून मिळालेल्या पत्त्याच्या दिशेने हाणली. सातपर्यंत त्याची बाईक त्या परिसरात पोचली. आपले चॅनलवाले त्याला दिसले नाहीत.  आपणच लवकर पोचलो, असे वाटून त्याला स्वतःचाच एक अभिमान वाटला. सकाळी दहाला निरोप, दुपारी तीनपर्यंत नेटवरून माहिती शोधली, पाचपर्यंत फोनवरून माहिती गोळा केली, सहा वाजता घरी, सातपर्यंत बाईक घरापाशी हजर, रात्री नऊपर्यंत मुलाखत तयार, उद्या सकाळी सहाला क्रीडापानावर चौकट !  नीलेशने वेळापत्रक तयार करून ठेवले. बाईक कडेला लावली व पत्त्यात दिलेल्या बंगल्याच्या अनुरोधाने जायला लागला. पांढरा शर्ट, पांढरी पँट घातलेल्या लोकांचा घोळका गप्पा मारत होता. दोन तीन भगवे झेंडेही दिसले. रस्त्यात गुलाल उधळलेला. तो आणखी पुढे गेला. एक फियाट, एक आय टेन दिसली. एका बंगल्यापाशी बरीच गर्दी दिसली. गेटमधून तो आत गेल. दोन तीन ठसठशीत कुंकू लावलेल्या बायका दारातून बाहेर पडल्या आणि तोंडाला पदर लावून आपापसात कुचकुचत बाहेर पडल्या. दोन माणसेही बाहेर पडली. त्यांच्या हातात उसाचे दांडके होते.  ""लई झेंगट हाये..""असे काहीतरी ती माणसे बोलत होती.
    नीलेश मुख्य दार उघडून आत गेला. 
    एक माणूस मान खाली घालून बसला होता. बहुतेक तो व्हॉटसअपचे संदेश वाचत होता. त्याने मान वर करून विचारले, कोन पायजे?
     "अमृता सावंत".
     "कुठून आलात ?"
       "दै.हालचाल" . 
      "आँ?" 
     "चॅनल "चाल" माहीत आहे ना, त्यांचाच पेपर हालचाल."
     असतील, आत असतील. भेटा. मला तुम्ही शेक्रेटरी म्हनू शकता. मी पण सावंतच बरं का पण इस्वास सावंत..हॅ हॅ हॅ.
     
     मनातल्या मनात त्या माणसाचा दुस्वास करत नीलेश आणखी एक दार ढकलून आत गेला. केशरी टी-शर्ट घालून एक उंच व अंगापिंडाने मजबूत माणूस सोफ्यावर बसला होता. त्याच्या बाजूला त्याचे दोन तेवढेच मजबूत मित्र.
    "बोला."
    "मला अमृता सावंतांची मुलाखत घ्यायची आहे. कुठे आहेत त्या?"
    "समोर कोऩ बसलंय? सकाळपासून चौथी मुलाखत. घ्या लिहून - नवोदित मल्ल अमृता सावंत. लहानपणी गावातच कुस्तीचा सराव. स्थानिक सपर्दा गाजविल्यानंतर सांगलीला आल्तो. राज्यस्तरीय कुस्ती सपर्देमधे नवीन आकरशन. बुवा माळवदे आमचे गुर्जी.उद्या भिडणार परेश गावडेला. येउंद्यात मस्तपैकी उद्यांच्याला... 

- केदार पाटणकर