सप्टेंबर २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (१३)

चिंता करी जो विश्वाची
श्री समर्थ रामदास स्वामीं चे समाजप्रबोधनाचे कार्य अहर्निश  सुरू होते. जनलोकांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म दुःख, वेदना आणि अडचणींबद्दल समर्थ विचार करीत होते. स्वतःचे ज्ञान, अनुभव आणि बुद्धी यांचा वापर करून त्यावर उपाययोजना शोधत होते. सर्वांना समजेल, कळेल अशा भाषेत उपदेशही करीत होते. 

चपळपण मनाचे मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनी करूणा हे बोलतों दीनवाचा ॥ 

समर्थांनी समस्तांच्या दुःखाचे मूळ अचूक शोधले होते. संसारी मोह मायेच्या अत्यंतिक आहारी जाऊन मनुष्य मनः शांती आणि समाधान गमावतो. सर्व नाती आणि मैत्रांच्या गुंत्यातून त्यास अलिप्त राहता येत नाही. मग एका पाठी दुसरा असे करीत गुंते वाढत जातात. त्यामुळे तो त्रस्त होतो, पण त्यांस सुटकेचा मार्ग काही दिसत नाही. अशा प्रकारे  भौतिक सुख आणि साधने हे सर्वस्व मानून, त्यांच्या प्राप्ती करिता डपडणाऱ्या लोकांना समर्थ सांगत होते, की हा चुकीचा मार्ग आहे. ती सुखलोलुपतेची परिणिती अखेर दुःख आणि पश्चातापामध्ये होते. प्रपंच आणि परमार्थ या दोहोंचा यथायोग्य तोल सांभाळून जीवनमार्ग आक्रमतो, त्याला मृत्यूचे भय ग्रासत नाही, शोक, संतापाने तो त्रासत नाही.

समर्थ आपल्या श्रोत्यांना विचारतात, ज्या जीवलगांसाठी तुम्ही इतके कष्ट करता, दुःखांना सामोरे जाता, त्यांना त्याचे  किती मूल्यं आहे?प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ प्रिय आहे. जो आपल्याला काही देऊ शकेल, त्याच्याच भोवती आप्तस्वकीय गर्दी करतात. पण जेव्हा तुम्ही संकटात, अडचणीमध्ये असाल, तेव्हा तुमचे सगे सोयरे तुमची साथ देतीलच याची खात्री नाही. 
वाल्या कोळीचे उदाहरण तर सर्वश्रुत आहे. जेव्हा वाल्या लूटमार करून, लोकांकडून अन्यायाने धन संपत्ती घेऊन घर चालवीत होता, तेव्हा त्याची पत्नी आणि मुले  त्यांच्यासमवेत आनंदात होती. पण जेव्हा त्याने पत्नी आणि मुलांना विचारले, की  पापमार्गाने मिळवलेल्या धनाचा सर्वांनी मनः पूत उपभोग घेतला आहे. आता केलेल्या पापात आणि त्या योगे घ्याव्या लागणाऱ्या प्रायश्चित्तात ते सहभागी होतील का?  तेव्हा सर्वांनी एकमुखाने नकार दिला. त्यांनी सांगितले, आमचे पालनपोषण, रक्षण  करणे तुझे कर्तव्य आहे. ते करण्याकरता तू जर पाप केलेस, तर त्याचे दायित्वं फक्तं तुझेच  आहे. 

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ।
विलगविषमकाळी सांडिती सर्व माळी ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी ॥ 

या नशिबाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळविण्यासाठी परमेश्वराचे स्मरण ठेवावे. संतसज्जनांच्या सहवासात राहावे, ज्यां योगे ज्ञानप्राप्ती होते आणि दैन्य दूर सरते.  दुःख आणि दुर्दैव या दोहोंना कुणीही टाळू शकत. नाही. त्यामुळे घाबरून त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न कधीच सफल होणारा नसतो. त्यापेक्षा त्यांस सामोरे जाणे श्रेयस्कर. संकटांशी सामना करताना, त्याचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती जाणून घेणे जरूरीचे आहे.  स्वार्थ आणि  परमार्थ यांचे संतुलन साधणे,   हा त्या तापत्रयांवरील  उतारा आहे. 

रोगियास औषध । सप्रचित आणि शुद्ध ।
तयांसी होये आनंद । आरोग्य होता ॥
तैसा संसार दुःखे दुःखवला । त्रिविधतापे पोळला । 
तोचि  येक अधिकारी जाला ।परमार्थासी  ॥ 

आयुष्यभर संसारामध्ये गुंतून राहून, सारे दुःख, त्रास सहन केल्यावर, जीवनाच्या दुःखद अंताकडे भयभीत होऊन पाहणाऱ्याला समर्थ समजावतात, यातून मुक्तीचा मार्ग आहे, आणि तो म्हणजे परमार्थ साधना. 
समर्थ  संसार तापत्रयांची विस्तारपूर्वक चर्चा करतात. त्यांची कारणे आणि परिणामांचे विश्लेषण करतात. 

येक ताप अध्यात्मिक । दूजा तो आदिभूतिक ।
तिसरा आदिदैविक । ताप जाणावा ॥ 

अशा प्रकारे तीन प्रकाराचे ताप, त्रास मानवाला भोगावे लागतात. या त्रासांना योग्य पद्धतीने सामोरे जाण्यासाठी अलिप्ततेने केलेली परमार्थसाधना कामी येते. ईश्वरौपासने बरोबरच संत सज्जनांच्या संगतीत जी ज्ञान प्राप्ती होते, त्यामुळे या तापत्रयांचा सामना करण्याचे बळ प्राप्तं होते.

देह इंद्रिय आणि प्राण । यांचेनि योगे आपण ।
सुखदुःखे सिणे जाण । यां नाव अध्यात्मिक ॥
देहामधून जे आले । इंद्रिये प्राणे दुःख जाले ।
तें अध्यात्मिक बोलिले । तापत्रई ॥ 

आपले अस्तित्व हे देहरूपे ओळखले जाते. आणि देहामध्ये जोवर प्राण आहे, तोवर त्याचा वावर, संचार असतो. देहातून प्राण निघून गेल्यास मनुष्याचे अस्तित्वही संपते. निष्प्राण देहास कसलीही संवेदना नसते. त्यामुळे कुठलेही दुःख आणि त्रासही नसतात.   जोवर देहामध्ये प्राण  आहे तोवर तो जिवित आहे आणि  तेव्हाच त्यांस सारे दुःख आणि आपदा भोगावे लागतात. देहास ज्या आधीव्याधी होतात, जे रोग आणि वेदना त्रस्त करतात त्याचा त्रास प्राणास होतो. याचाच उल्लेख समर्थ अध्यात्मिक असा करतात. 

नाना चिंतेची काजळी । नाना दुःखे चित्त पोळी । 
व्याधी वाचून तळमळी । या नाव अध्यात्मिक ॥
वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा । 
देह क्षीण सर्वदा । या नाव अध्यात्मिक ॥
नाना व्याधी नाना दुःखे । नाना भोग नाना खांडके । 
प्राणी तळमळी शोके । या नाव अध्यात्मिक ॥

अशा प्रकारे देहेयोगे प्राणांस जी पीडा होते, त्यास अध्यात्मिकताप म्हणले आहे. ज्याचे कारण अर्थात मनुष्याच्या पूर्वसंचितामध्येच आहे. अनिर्बंध, अतिरेकी आणि आविचारी जीवनपद्धती हेच त्या त्रासाचे मूळ आहे. नियमित आणि संतुलीत आहार आणि विहार हाच यावरील उपाय आहे. आणि हा उपाय करणे नक्कीच अशक्य नाही. पण तरीही अज्ञानी याकडे दुर्लक्ष करतात, आणि दुष्परिणाम दिसू लागल्यावर स्वतःच्या नशिबाला दोष देतात. 

अध्यात्मिक पिडेमूळे शारीरिक आणि मानसिक वेदना होतात त्याची कारणे अंतस्थ असतात.  आदिभूतिकपिडा ही वेदनादायक असते परंतु या वेदना बाह्य कारणामूळे होतात. अन्य कुणामूळे होत असतात. समर्थ आदिभूतिकाचे विश्लेषण ग्रंथामध्ये  करतात.
आपल्या सभोतालच्या चराचरामध्ये पंचमहाभूतांचे अस्तित्व असते.  ही पंचमहाभूते म्हणजे -- पृथी, आप, तेज, वायू आणि जल. आणि त्यांच्यायोगेच जीवसृष्टीचेहीअस्तित्व असते. ही  पंचमहाभूते आणि त्यातील सजीव, निर्जीव सृष्टी यामुळे होणाऱ्या  त्रासाचे वर्णन समर्थ आदिभूतिक असा करतात. हा त्रास टाळणे सहसा मनुष्याच्या आवाक्याबाहेर असते. त्यांमुळे तो सहन करावाच लागतो. त्यांस उपाय नाही. तरीही विचक्षबुद्धीने आणि जागरूक वृत्तीने वावरल्यास त्याचे प्रमाकमी होऊ शकते. 

सर्व भूताचेनि संयोगे । सुखदुःख उपजो लागे ।
ताप होता मन भंगे । या नाव आदिभूतिक ॥ 

वाटेने चालताना पायी काटा मोडतो, दगडावर पाय आपटून ठेच लागते, कधी वृक्षाची फांदी मस्तकावर पडते, इंगळ, नाग, साप, डसतात, कुत्री, कोल्हे, लांडगे इ. श्वापदे बोचकारतात, ओरखाडतात, प्राणघातक इजा करतात, अथवा कुणी मनुष्यही शस्त्राने जखम करतो, लूटमार करून मनास यातना देतो, कुणी फसवतो, अपमान करतो, विविध प्रकारचे दुःख इतरांपायी भोगावे लागते.अशा प्रकारच्या सर्व दुःखांना आदिभूतिक म्हणले आहे. आदिभूतिक त्रास हे दुसऱ्या कुणापायी मनुष्याच्या वाटेला येतात. 

कोणी येकाचा श्राप जडे । कोणी येके केले चेडे ।
अधांतरी होती वेडे । या नांव आदिभूतिक ॥
कोणी येके चाळविलें । कोणी येके भ्रष्टविलें ।
कोणी येके धरून नेले । यां नांव आदिभूतिक ॥ 
कोणी येके दिले विष । कोणी येके लाविले दोष ।
कोणी येके घातले पाश । या नांव आदिभूतिक ॥ 

अशा प्रकारे बाह्य कारणाने होणाऱ्या शारीरिक अथवा मानसिक  त्रासास समर्थ आदिभूतिक असे म्हणतात. 

समर्थांनी सांसारिकांच्या तापत्रयाचे साद्यंत विश्लेषण केले आहे. अनेक प्रकारच्या आधीव्याधी आणि दुःखाने मनुष्य पिडीत असतो. अनेक वेळा त्यांस आपल्या दुःखाचे, त्रासाचे कारण समजत नाही. मग तो आपल्या नशोबाला दोष देतो. सांनिध्यातील लोकांवर आरोप करतो अथवा कुणास अपशकुनी ठरवतो. कारण त्याला हे कळत नसते की त्याच्या सर्व त्रासाचे मूळ तोच आहे. त्याच्या सवयी, वागणे, बोलणे, चालणे, गुण, अवगुण या सर्वांतूनच त्याच्या त्रासाचा, दुर्दैवाचा उगम होत असतो. म्हणून समर्थ मोठ्या कळकळीने उपदेश करतात, ज्या योगे लोकांनी सावध व्हावे. सकारात्मक आचार, विचार आणि जीवनशैली आत्मसात करावी. नियमित आणि संतुलित जीवनपद्धती स्वीकारावी. स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीचे अनुसरण स्थिर बुद्धीने करावे. असे केल्याने काही त्रासांपासून सुटका मिळू शकेल, तर काही त्रासांची दाहकता कमी होईल. मनुष्य जन्मासोबत मिळालेले भोग भोगणे क्रमप्राप्तं आहे. परंतु त्याची लक्षणे ओळखून त्यांनुसार वर्तन ठेवल्यास ते सुसह्यं तरी नक्कीच होतील.

आता तापत्रयातील शेवटचा भोग आहे तो म्ह णजे आदिदैविक. जो स्वकर्माने अथवा नशिबाने प्राप्तं होतो. ज्याचे  निराकरण करणे  मनुष्याच्या नियंत्रणात. नाही. स्वकर्मांवर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव उपाय. तरीही कर्मफल मिळणे दैवाधीनच. 

शुभाशुभ कर्माने जना । देहांती येमयातना ।
स्वर्ग नर्कं भोग नाना । या नांव आदिदैविक ॥

मनुष्य त्याच्या जीवनकाळात अनेक प्रकारांची कर्मे करतो. सतप्रवृत्त मनुष्याचा कल सत्कर्मे करण्याकडे असतो. तो नेहमीच नीती, नियमांचे पालन करण्याबाबत प्रयत्नशील असतो. दया, क्षमा आणि शांती ही त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्ये असतात. अशा मनुष्याच्या अस्तित्वाने संकटग्रस्तांना आधार आणि दुःखितांना सांत्वना मिळते. अशा मनुष्यास उत्तम कर्मफलप्राप्ती होते. 
याच्या विपरीत दुश्चरित व्यक्ती समाजाला घातक असतात. त्या अनेकांचे नुकसान करू शकतात. अशा व्यक्ती समाजात कलह निर्माण करू शकतात. अशा व्यक्ती तामसी, दुराग्रही आणि स्वार्थी असतात. अंततः त्यांना त्यांच्या कर्मफलस्वरूप यातना आणि दुःखाला सामोरे जावे लागते. 

नाना दोष नाना पातके । मदांधपणे अविवेके ।
केली, परी ते दुःखदायके । येमयातना भोगविती ॥
मातलेंपणे उन्मत्त । जीवघात कुटुंबघात ।
अप्रमाण क्रिया करीत । म्हणौन येमयातना ॥ 

काही वेळा मनुष्य स्वबळाने उन्मत्त होतो. आपणांस कुणी काहीच करू शकत नाही, म्हणून मनमानेल ते वर्तन करतो. दुर्बळांना, अंकीतांना त्रस्तं करतो. त्यासही अंती दैवीन्यायासमोर नतमस्तक व्हावे लागते. दैवानेच अशी उतरंड लावली आहे, की प्रत्येकांस जाब विचारणारा कुणीतरी वरिष्ठ असतोच. आणि त्याचा न्याय नेहमीच कठोर आणि निष्पक्ष असतो. त्यातून कुठलीही पळवाट मिळणे अशक्य असते. 

अनीतीने स्वार्थ पाहे । राजा पापी होऊन राहे ।
राज्याअंती नर्क आहे । म्हणौनिया ॥ 
राजा सांडिता राजनीती । तयास येम गांजिती ।
येम नीती सांडितां धावती । देवगण ॥ 
ऐसी मर्यादा लाविली देवे । म्हणौनि नीतीनें वर्तावे ।
निती न्याय सांडिता भोगावे । येमयातनेसी ॥ 

असा आहे हा दैवी न्याय. जगापासून कितीही लपवून तुम्ही दुष्कर्मे केलीत तरीही सर्वसाक्षी परमेश्वारांच्या नजरेतून काहीच निसटत नाही. आयुष्यभर भले तुम्ही मुखवटा घालून वावराल, जगापासून आपली कुकर्मे दडविण्यात यशस्वी व्हाल, परंतु त्या सर्वश्रेष्ठ न्यायाधीशाला कधीतरी सन्मुख व्हावेच लागते. त्याला फसवणे केवळ अशक्यच . 

देहदंड येमयातना । शास्त्री बोलिले प्रकार नाना ।
तो भोग कदापि चुकेना । या नाव आदिदैविक ॥
उठवेना बसवेना । रडवेना पडवेना ।
यातनेवरी यातना । या नांव आदिदैविक ॥ 

अशारीतीने  तापत्रयांना ओळख करून देऊन समर्थ संयमित आणि संतुलीत आचार आणि विचारांचे महत्त्व विषद करतात. आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट कृतीचे, वर्तनाचे दायीत्व आपणाकडेच असते. म्हणून  निती, नियमांच्या चौकटीत राहून जो आपले आयुष्य व्यतीत करेल त्याला अंती शारीरिक अथवा मानसिक यातनांना सामोरे जावे लागणार नाही. 

जयाचे तया चूकले प्राप्त नाही ।
गुणें गोविलें जाहले दुःख देही ।
गुणावेगळी वृत्ती तेही वळेना ।
जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥ 

(क्रमशः) 

Post to Feed
Typing help hide