चिकुनगुनिआ - एक सोसणे

लहानपणी आजार-रोगादी मंडळी बरीचशी सरळ असत. सर्दी-पडसे-ताप ही प्राथमिक पायरी. एक पायरी वर चढल्यावर मलेरिया. हिंदी चित्रपटसृष्टीने 'लव्हेरिया' या निरर्थक शब्दाशी यमक जुळवून या रोगाची पारच हेटाळणी केली. पुढल्या पायरीवर एंफ्लुएंझा ऊर्फ फ्ल्यू. त्याहीवर टायफॉईड. या दोन पायऱ्यांना भिऊन असावे लागे. फ्ल्यू बराच काळ चाले म्हणून आणि जीवघेणा ठरू शके. टायफॉईड बऱ्याच वेळेस जीवघेणा ठरे. शिवाय टायफॉईडला (सापासारखी) उलटण्याची घातक सवय होती.
गोवर-कांजिण्या-देवी आदी मंडळीही होती. पण पन्नास वर्षांपूर्वीच्या निमशहरी भागात तरी त्यांची लस टोचून बरेचजण मोकळे होत.
अर्धशिशी, कोलायटिस, अपेंडिक्स, मधुमेह, स्पाँडिलायटिस, रक्तदाब ही इतर दुखणी मूठभर शहरी रुग्णांच्या आणि चिमूटभर डॉक्टरांच्या रिंगणात खूष असत.
या निवांत रोगजीवनपद्धतीला गेल्या दोनेक दशकांत चार टग्यांनी चांगलाच हादरा दिला. बर्ड फ्ल्यू, H1N1, डेंगी आणि चिकुनगुनिआ. यातल्या शेवटच्या दोघांना घाबरण्यात गेली काही वर्षे गेली. पुण्याच्या कुठल्याही रहिवाशाला दुसरा पर्याय नव्हताच.
आणि दोन वर्षांपूर्वी मला डेंगी झाला. पण सुदैवाने मला आडवा करणारा व्हायरस वेगळाच होता. काही जनुकीय बदल घडून त्या व्हायरसचे खच्चीकरण झाले होते. त्यामुळे डेंगीची चाचणी उत्तीर्ण झालो, पण खालावलेला प्लेटलेट काउंट, सणसणणारा ताप, हॉस्पिटलात आठवडे नि घरात महिने यातले मला काहीच झाले नाही. ताप आला, चाचणी केली, तिचा निकाल हाती पडेपर्यंत तापाला सुरुवात होऊन ३६ तासच झाले होते. तत्परतेने हॉस्पिटलात दाखल झालो. तेवढ्याच तत्परतेने ताप गायब झाला. प्लेटलेट काउंट हललाच नव्हता. दोन दिवस हॉस्पिटलात काढले नि घरी परतलो.
डेंगीची चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणताना महानगरपालिकेची माणसे घरी येऊन धूर करून गेली आणि आजारी नसलेल्या मंडळींना खोकल्याची ढास लागली तेवढेच.
पण चिकुनगुनिआने मात्र एवढे साधेसरळ वागण्याचे साफ नाकारले.
सुरुवात पत्नीने केली. तासाभरातच रोगाने भक्कम जम बसवला. संध्याकाळी साडेसातला तिला गुडघा दुखू लागला. आठ वाजता उभे राहताही येईना. कार्यालयातल्या दोन सहकाऱ्यांनी तिला रिक्षात घालून घरी आणून सोडले. साडेआठला तिने दिवाणखान्यातला सोफा काबीज केला तो पुढले बहात्तर तास सोडला नाही. तिचा उजवा गुडघा भप्प सुजला होता, चटका बसेल एवढा तापला होता आणि संपूर्ण असहकारितेचे तत्त्व घट्ट धरून बसला होता.
दुसऱ्या दिवशी तिच्या मातोश्रींनी अंथरूण धरले. म्हणजे आता मीच एकटा उरलो.
डॉक्टराने क्रोसिन, अँटॅसिड, वेदनाशामक आणि व्हिटॅमीन गोळ्या यांचा रतीब लावला. त्याच्याकडे एका आठवड्यातच डझनभर रुग्ण आले होते आणि त्याला आता अंदाज येऊ लागला होता. त्याने भाकित केल्याप्रमाणेच सर्व चाचण्या (फ्ल्यू, मलेरिया, टायफॉईड, डेंगी आणि चिकुनगुनिआ) 'निगेटिव्ह' आल्या. हा व्हायरस कुठल्याची चाचणीत न सापडता 'अंडर द रेडार' हल्ला करून धुमाकूळ घालत होता.
ही गोष्ट सप्टेंबरच्या सुरुवातीची. सप्टेंबरच्या मध्यावर त्या व्हायरसला माझा पत्ता सापडला. पण तोही सरळपणे नव्हे. एका सकाळी उठल्यावर मनगटे आणि गुडघा दुखू लागला. दुपारी चांगलाच ताप भरला. एका क्रोसिनमध्ये साफ उतरला. पण मनगट-गुडघा प्रकरण चांगलेच ठणाणू लागले. दातांसाठी काही उपचार चालू होते त्यामुळे अँटिबायोटिक्सचा मारा सुरू झालेला होता.
या दोन आठवड्यांत डॉक्टरला अजून दोनेक डझन रुग्ण गावले होते आणि त्याची औषधयोजना अजूनच नेमकी झाली होती. चिकुनगुनिआला तसेही औषध नाही. ताप आला तर क्रोसिन, खूपच दुखायला लागले तर वेदनाशामक, यांनी ऍसिडिटी होऊ नये म्हणून अँटॅसिड आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन. माझी अँटीबायोटिक नि प्रोबायोटिक मिळून दिवसाला पंधरा गोळ्या झाल्या.
पुढचा दिवस महाकर्मकठीण गेला. सांधेदुखी किती तीव्र असू शकते याची पहिल्यांदा जाणीव झाली. फोनवर एसेमेस टाईप करणे जमेना. ठणका सहन होईना. 'ब्लँकेट' मोडमधल्या टॉप-लोडिंग वॉशिंग मशीनसारखा मी कण्हायला लागलो.
दशकापूर्वी एक हृदयविकाराचा झटका मी खाल्लेला आहे. त्याक्षणी चिकुनगुनियापेक्षाही हृदयविकार कितीतरी परवडला असा मनाचा कौल मिळाला. तीन आठवड्यांनंतरही कौल बदललेला नाही.
हृदयविकाराचा झटका आला की हॉस्पिटलात (सुरुवातीला CCU मध्ये) घालतात. ताप नसतो, अंगदुखी नसते. तुम्ही धोक्याची रेषा पार करेस्तोवर (आणि तुमच्याकडे पैसे असेस्तोवर) तुमच्यावर जागता पहारा ठेवतात.
पण चिकुनगुनियाने वेदना-संवेदना या जोडगोळीला जे अंतराळापार भिरकावले जाते ते कल्पनेच्याही पलिकडले. कॉफीचा कप हातात धरता येत नाही (मनगटात तेवढे 'बळ' नाही) हा एक वानवळा.
एवढे असहाय कधी वाटले नव्हते. शंभर किलो वजनाचा, नव्वदी ओलांडलेला, मधुमेही हृदयरुग्ण तुम्हांला 'खुर्ची ते दार चालणे' या स्पर्धेत सहज हरवेल ही जाणीव आवडत्या शर्टावरील शाईच्या डागासारखी मनात अनिर्बंध पसरत जाते.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून भीषण विनोदी वक्तव्ये करून रुग्ण्यांना कॉमिक रिलीफ देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. "डेंगीचे पुण्यात ५८ रुग्ण" अशा मथळ्याचे एक निवेदन वाचले. पुण्यात ५८ रुग्ण? तेवढे तर प्रभात रस्त्याच्या एका बाजूला सापडतील!
सगळ्यात भीतीदायक प्रकार म्हणजे चिकुनगुनियाला औषध नाही. ताप येत असेल तर क्रोसीन एवढेच. आणि सांधेदुखी बरी होण्यासाठी किती वेळ लागतो? डॉक्टर माझा मावसभाऊ असल्याने माझ्याशी खरे बोलतो. त्याचा सगळ्यात आशादायी अंदाज तीन महिने आहे. "सहा महिन्यात तुला फरक जाणवू शकेल" हे वाक्य पाठोपाठ.
मला डॉक्टर आणि (जी काही तुटपुंजी आहेत ती) औषधे सुदैवाने परवडताहेत. दुसरे म्हणजे मला झपाटणारा व्हायरस डेंगीसारखाच दुबळा आहे. अन्यथा दोन आठवड्यात घराबाहेर पडणे हे सर्वथैव अशक्य असे डॉक्टराचे मत आहे. आणि तिसरे म्हणजे विश्रांती घेण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि जागा दोन्ही आहे.
पण शेवटी दैववादी भारतीय मनाला योग्य असा हा आजार आहे. 'सोसणे' एवढेच हातात आहे!