नारखेडेची नखे

उजव्या हातात नेलकटर हल्ला करण्याच्या तयारीत तर्जनीच्या मधल्या भागात आणि अंगठ्यात पकडून नारखेडेने उलटा हात करून डाव्या हाताची तर्जनी अशी काही पुढे धरली, की तो जर मतदान केंद्रात असता, तर मागचा पुढचा विचार न करता तिथल्या क्लार्कने त्याच्या हातावर मतदान केल्याची शाई लावली असती.
त्या आधी नारखेडे नखाने नाक खाजवत होता. त्याच्या गोर्यापान चेहर्यावर असणार्या गोर्यापान नाकावर खाजविल्यामुळे लालिमा आला होता. त्यातच डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या जास्त न वाढलेल्या नखाने त्याच्या नाकावर एक ओरखडा पडला. निलिमा त्याच्यी मुलगी, समोर बसली होती ती ओरडली.
"नाना नाकाला नख नागलं"
निलिमा नारखेडेला नाना म्हणते. नारखेडेची बायकोही नारखेडेला नाना म्हणते. त्याचे नाव आता कुणालाच आठवत नसेल. नारखेडेलाही. नाना आणि नारखेडे इतकीच त्याची आता ओळख आहे. पूर्वी म्हणजे पत्र लिहिण्यावाचण्याच्या जमान्यात नारायण त्याला पत्र पाठवायचा आणि त्याचे नाव 'ना' वर तिसरा घात टाकून "रखेडे" असे लिहायचा. नारखेडे तरीही ते पत्र वाचायचा. आलेच आहे तर नाही कशाला म्हणा. कुणीतरी त्याला म्हणालेही होते की तू नाही म्हणूच नकोस. फक्त "ही" म्हण कारण तुज्याकडे "ना" तीन आहेत.
नाकाला नख लागल्यामुळे नेलकटरने नखे काढण्याखेरीज नाना नारखेडेकडे काहीही निवड नव्हती. सगळे म्हणायचेच की नानाला निवडच नाही. नानाला निवड नसली तरी सवड भरपूर आहे. त्यातूनच नानाला नाक खाजवायचा नवीनच नाद लागला. नखाने नाक खाजवत असताना नानाला नखाने ओरखडले समोर बसलेल्या निलिमाने ते पाहिले आणि ती ओरडली.
"नाना नाकाला नख नागलं"
नानाने निलिमाला नेलकटर द्यायला सांगितला पण निलिमाने नकार दिला.
नकार नानाला नवीन नाही.
पण नानाचा नेलकटर नवीन आहे. नाक्यावरून आणलेला. मग नाना नाईलाजाने स्वतःच ऊठला आणि नेलकटर घेऊन बसला. नाना तरीही नाराज नाही.
नानाने नेलकटर उघडला ऊजव्या हातात चाप पकडला आणि डाव्या हाताची तर्जनी पुढे केली. त्याकडे पाहिले मग अंगठा तिच्या टोकावरून फिरवला. अंगठ्याला नखाची थोडीशी धार लागली. नानानी नेलकटरने जितके वाढले होते तितके नख कापून टाकले आणि त्यच्यकडे कौतुकाने पाहिले. मग चटकन तर्जनी मागे घेऊन नानाने मधले बोट पुढे आणले पण तर्जनीही पुढे आली. येउदे. त्याचे नखाचे टोक वाढले होते. तेच तर नानाला खरचटले. नानाने ते तोक नेलकटरमध्ये पकडले आणि दात ओठ तोडून टाकले. तो इवलासा नखाचा तुकडा टचकन कुठेतरी उडून गेला. नानाने इकडे तिकडे शोधले पण त्याला तो काही दिसला नाही. त्याने मधल्या बोटाच्या नखावर अजून दोन चाप मारले. आणि पटकन ते बोट मिटवून घेतले जणू काही ते बोट नानावर चिडून हातातून निघून जाणार होते. तर्जनीही मागे गेली. जाउदे. ही बोटे मिटल्याबरोबर लगेच अनामिका आज्ञाधारकपणे पुढे आले. नानाने त्याच्याकडे पहिले, त्याचे नख कुठल्याही बाजूने पुढे आले नव्हते. नानाने नखाच्या टोकावरून अंगठा फिरवून पाहिला. अंगठ्याच्या त्वचेलाही ते गुळगुळीत लागले. नाना समाधानाने हसला. मग करंगळी पुढे आली. तिचे नख दोन तीन मिलिमीटर पुढे आले होते. त्याच्या दिशेने नानाने चाप नेला, पण ते कापण्याचा निर्णय नानाने रद्द केला. दहहपैकी एका बोटाला तरी नख हवे असे नानाला वाटले. कधी कधी विचारही करावा लागतो तेव्हा केसात बोट घालून नखाने डोके खाजवावे लागते. ह्याला सोदून देऊ. ते करंगळीचे बोट आपल्याकडे उपकृत नजेरेने पाहत आहे असे नानाला वाटले. मग हात उलटा करून नानाने सगळ्या बोटांकडे पाहिले. आता अंगठा. नानाने अंगठ्याकडे पाहिले. अंगठा हे हाताचे सर्वात जाड बोट आहे. नानाला हे माहित होते पण पुन्हा लक्षात आलें. नानाने तर्जनी अंगठ्याच्या नखाच्या टोकावरून फिरवली. पुन्हा फिरवली. तेव्हा त्याला नख जरासे टोचले. जरा घासणी फिरवली की काम होउन जाईल. नानाने नेलकटरचा चाप सफाईने उलटा फिरवला आणि घासणी फिरवून पुढे आणली. आता नखे घासण्याचा कार्यक्रम. या घासकामाची सुरुवात नानाने अंगठ्यापासून केली. अंगठा तर्जनीवर टेकवून नानाने अंगठ्याचे नख घासायला सुरुवात केली. तीन चार वेळा घासल्यावर त्याने घासणीकडे पाहिले. घासणीवर पांढरी पावडर जमा झाली होती. नानाने त्यावर फुंकर मारली. आणि अंगठ्यावर तर्जनी फिरवून पाहिली. नख छान गुळगुळीत झाले होते. असे वाटत होते की अंगठ्याला नख नाहीच आहे, नुसतीच त्वचा आहे, गोरीपान. नाना खूश झाला. त्याने उरलेल्या चार बोटांकडे पाहिले. आता नानाला निवड करायचा अधिकार होता. चारही बोटे त्याच्याकडे केविल्वाण्या नजरेने पाहत होती. आता कुणाचा नंबर? नानाने करंगळीची निवड केली. अतिशय हलक्या हाताने नानाने करंगळीचे नख घासले. हे नख राखायचे होते. फक्त बर काढायची. थोडे घासून त्याने करंगळीच्या टोकावरून अंगठा फिरवला आणि त्याच्या गुळगुळीतपणाची खात्री करून घेतली. आता मधले बोट. नानाला नाकाला आलेला लालिमा आणि त्यावर खरचटलेली रेघ आठवली. त्याची भिवई त्रासिकपणे वरती गेली. यच्यामुळेच नाक खाजवयच्या नादात व्यत्यय आला. त्या नखाचा आकार अर्ध्या अष्टकोनासारखा दिसत होता. आता त्याची टोके घालवून त्याला अर्धगोल करायचे. आणि त्वचेच्या खाली ठेवायचे. म्हणजे खाजवले तरी नख लागणार णही. या कामाला नानाने जास्तच वेळ घेतला. त्याने त्या नखाला अर्धगोल करून अर्धमेले करून त्वचेच्या आत गाडून टाकले. स्नूकर खेळणारा खेळाडू जसे स्टिकचे टोक गोल घासणीने घासतो आणि त्यावर दिमाखदार फुंकर मारतो, तशी नानाने या मधल्या बोटावर दिमाखदार फुंकर मारली. मग त्याने उजव्या हाताचा अख्खा पंजा त्या बोटावरून फिरवला. पुढची निवड नानाने तिसर्या बोटाची केली. ते एखाद्या हुशार आणि आज्ञाधारक मुलासारखे त्याच्याक्स्डे पाहत होते. यावर फार काम करायला लागणार नव्हते. नानाने त्या नखावरून तीन चार वेळा घासणी फिरवली. मग बोटावरून अंगठा फिरवला. याचे काम लवकर संपले. आता फक्त तर्जनी, त्यानंतर मग डाव्या हातात नेलकटर आणि उजव्या हाताच्या नखांचे काम. उजव्या हाताच्या करंगळीलाही नाना सोडणार नाही.
खूपच काम पडले आहे नानाला.
तशी दुसरीही एक मेथड आहे. एकमगोमाग एक प्रत्येक नख कापायचे, छाटायचे, तासायचे, तपासायचे. असुदे.
आपण काहीही प्रयत्न केले नाहीत तरी नखे आपसूक वाढतातच, वाढतच जातात, वाढतच राहतात.
आपल्या आयुष्यात खाजविण्याखेरीज त्यांचा काहीही उपयोग नाही. बरं, खार फाजवले तरी खरचटते. त्यामुळे  नखे ही फार मोठी समस्या होउन बसली आहे. आपण जे बसून खातो आणि त्यातून जे कॅल्शियम मिळते ते सगले नखांच्याच घशात जाते, ते ही काहीही काम न करता, आणि त्यांचा स्वतःला आणि इतराना काहीही उपयोग नसताना. तसा आणखी एक उपयोग नानाला माहित आहे. त्याची एक लांबची आजी, जी सतत काहीतरी काम उकरत बसलेली असायची, ती नेहमी म्हणायची
" नान्याच्या नरडीला न्हानपणीच नख लावाय हवुतं "
तर काहीही प्रयत्न न करता नानाची नखे आपसूक वाढतात.
मग नाक्यावरच्या नेलकटरने ती कापावी, छाटावी, तासावी आणि तपासावी लागतात.
नाना नारखेडेही त्याच्या नखान्सारखाच आपसूक वाढला आहे. नाना नारखेडेलाही वेळोवेळी कापले, छाटले, तासले आणि तपासले पाहिजे.
नाना नारखेडेसाठी नाक्यावरती नेलकटर निळेल??????????

शशांक देव