सजग नागरिक मंचाची दशकपूर्ती

'सजग नागरिक मंच' या संघटनेचे नाव सातत्याने वाचनात येत असते. पुण्यातील अनेक प्रश्नांवर या संघटनेने घेतलेली भूमिका कधी अभिनिवेशी वाटलेली नाही. विवेक वेलणकर आणि जुगल राठी ही दोन प्रमुख नावे या संघटनेशी निगडित आहेत. माहिती अधिकारात विविध माहिती बाहेर काढण्यात आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यात वेलणकरांचा हातखंडा.
वृत्तपत्रात 'आजचे कार्यक्रम'मध्ये सजग चा दशकपूर्ती सोहळ्याची माहिती होती. प्रमुख वक्ते निवृत्त सरकारी कर्मचारी माधव गोडबोले आणि अध्यक्ष अण्णा हजारे. वेलणकरांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन.
कार्यक्रम आयएमडीआरच्या सभागृहात म्हणजे नजिकच होता. दोनतीन मित्रमंडळींना विचारले. होकारार्थी प्रतिक्रिया आल्या.
संध्याकाळी पावणेपाचला एका मित्रासोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. दुसरे मित्रवर्य मागोमाग आले. तिसऱ्याने दांडी मारली.
सभागृह छोटेखानी आहे त्यामुळे पटापट भरू लागले होते. पाच वाजेपर्यंत पूर्ण भरले. निवेदिकेच्या मागच्या छोट्या मेजावर पंधरावीस सत्कारचिन्हांची गर्दी दिसली. आता सत्काराचा कार्यक्रम किती वेळ चालणार म्हणून माफक चिंता केली.
कार्यक्रम जवळपास पाचला सुरू झाला. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सायंकाळी पाच वाजता आयएमडीआरमध्ये सजगची मंडळी जमतात हे कळले.
एकंदरीत सजगबद्दल माहिती ऐकताना कार्यक्रमाला आल्याचा पश्चात्ताप अजिबात होणार नाही याची खात्री पटू लागली. स्टेजवर किंवा निवेदनात कुठे चमकधमक नव्हती. त्या 'घरगुती'पणामुळे एक वेगळीच आपुलकी वाटू लागली.
संस्थेला दहा वर्षे झाल्याबद्दल विविध मंडळींचा सत्कार झाला. आणि इतकी माणसे इतक्या वेगळाल्या पद्धतीने माहिती अधिकार आणि इतर तदनुषंगिक कामे मुकाटपणे करताहेत हे कळले आणि थोडा चटकाच बसला. पाच पैशाच्या कोंबडीला पंचाण्णव पैशांचा मसाला मारलेला पहायची सवय झालेली असल्याने असे काही बघितले की चटका बसणारच.
सत्कारमूर्तींना प्रेक्षागृहात ते जिथे बसले असतील तिथून बोलावून स्मृतीचिन्ह देऊन त्यांची पटापट परतपाठवणी केली जात होती. सत्कारमूर्ती रंगमंचावर येईस्तोवरच्या मिनिटाभरात त्या सत्कारमूर्तीची माहिती. त्यामुळे कुठेही लांबण वा फापटपसारा अजाबात नव्हता. एखाददुसऱ्या सत्कारमूर्तीने एकादे वाक्य बोलण्याची संधी घेतली, पण ते तेवढेच.
मग वेलणकरांच्या पुस्तकाचे प्रकाशन. 'ग्राहकराजा जागा हो' (किंवा अशाच काहीशा नावाचे) हे पुस्तक. त्याची पूर्वपीठिका वेलणकरांनी अगदी थोडक्यात सांगितली. संक्षिप्तपणा नि माफकपणा हे दोन गुण सजगवाल्यांचे फार आवडीचे दिसतात.
मग माधव गोडबोल्यांची चिमूटभर माहिती निवेदिकेने दिली नि गोडबोले बोलायला उभे राहिले. त्यांची एकंदर नोकरीची (आणि नंतरचीही) कारकीर्द बरीच प्रसिद्ध आणि वादळी आहे. त्याला साजेसेच ते बोलले. 'माहितीचा अधिकार' हा कायदा होण्यामागची पार्श्वभूमी आणि कायदा होऊनही शिल्लक असलेली आव्हाने यांचा त्यांनी सुरेख आढावा घेतला.
नंतर अण्णा हजाऱ्यांचा परिचय करून द्यायला उभे राहिलेल्या गृहस्थांनी "आजच्या कार्यक्रमातील सर्वात विनोदी भाग माझ्या वाट्याला आलेला आहे. अण्णांची ओळख ती काय करून द्यायची... " अशी आशादायक सुरुवात केली. आणि अण्णांबद्दलच्या माहितीचे चऱ्हाट लावून साफ निराशा केली. तोवर आटोपसूत असलेला कार्यक्रम बेंगरूळ झाला.
अण्णांचे भाषण अपेक्षेप्रमाणेच झाले. अण्णांचे विरोधक त्या भाषणाला 'प्रच्छन्न स्वस्तुती' म्हणतील आणि समर्थक 'निर्विवाद सत्य'. मी अण्णांचा विरोधक वा समर्थक कुणीच नाही. मला ते भाषण शेवटीशेवटी थोडे कंटाळवाणे वाटले एवढेच. बाकी भाषणाचे सूर नि शब्द अपेक्षेप्रमाणेच होते. नाही म्हणायला 'संपूर्ण दारूबंदी' हा कायदा करण्यासाठी आपण आता झटणार आहोत नि मुख्यमंत्र्यांनी असा कायदा करायला मान्यता दिली आहे असे जाहीर करून त्यांनी माझ्यासारख्या मंडळींची घाबरगुंडी उडवून दिली. अर्थात अण्णा कृतीशील असले तरी मुख्यमंत्री आरंभशूर असल्याने फारशी भीती वाटली नाही म्हणा.
दोनेक तासांत कार्यक्रम आटोपला. बाहेर कॉफीपानाची नि पुस्तक सवलतीच्या दरात विक्रीची सोय होती. मंडळी तिथे रेंगाळत होती.
मी दोन्ही मित्रांना घेऊन कोपऱ्यात जरा गप्पा छाटल्या नि घरी ताटाकडे यायला निघालो.
कार्यक्रमात जाणवलेल्या काही गोष्टी येणेप्रमाणे.
एक म्हणजे सगळ्या जनसमूहात तिशीखालच्या मंडळींचे मला तरी कुठे दर्शन झाले नाही. चाळिशी-पन्नाशीच्यापुढल्या मंडळींनी जर दशकपूर्ती कार्यक्रम साजरा केला तर रौप्यमहोत्सवी कार्यक्रम 'निवारा'त घ्यावा लागेल की काय अशी शंका दाटून आली.
दुसरे म्हणजे संस्थेचा जो वार्षिक ताळेबंद जुगलकिशोर राठींनी ('अगदी थोडक्यात; हेवेसांनले) मांडला त्यातून कळालेली माहिती अशी की संस्थेचे गेल्यावर्षाचे 'उत्पन्न' तब्बल पस्तीस हजार रुपये होते. पैशाबद्दल निरीच्छ असणे वेगळे आणि पैशाचा तिटकारा असणे वेगळे. पैशांमध्ये सगळ्या गोष्टींचे मूल्यमापन करू नये अगदी मान्य. पण पैसा वापरून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे, वेगवेगळे उपक्रम राबवणे हे जास्ती सोपे होते याबद्दल दुमत नसावे अशी आशा. पैसा कुणाकडून घ्यावा (नि कुणाकडून घेऊ नये) आणि कशासाठी खर्चावा हे स्वातंत्र्य अर्थातच संस्थेला आहेच.
या दोन्ही (आणि इतर काही) अर्ध्याकच्च्या आणि आढ्यताखोर कल्पना घेऊन मी लौकरच सजगच्या कार्यालयात जाईन नि तिथल्या मंडळींचे डोके खाईन. त्यामुळे इथे पिडत बसत नाही.