गुरूः स्टोरीज ऑफ इंडियाज लीडिंग बाबाज

'गुरू' ही संकल्पना पौर्वात्य. पाश्चिमात्य संस्कृतीतल्या 'टीचर' किंवा 'मास्टर' या शब्दांच्या मधली, आणि त्यात 'माता-पिता' ही जोडी मिसळलेली अशी ही संकल्पना.
आणि ही संकल्पना तर आपली आहेच, पण ती प्रत्यक्षात उतरवताना तर आपण अगदी उत्साहाने फसफसायला लागतो. आपल्याकडे गुरूंचे ('बाबा' वा 'मा/अम्मा' हे शब्द गरजेप्रमाणे वापरावेत) प्रकार नि संख्या तरी किती?! आठवड्याला एक गुरू केला तरी शंभरी गाठेपर्यंत निम्मा स्टॉकदेखिल संपणार नाही!
गाव-शहर पातळीवरचे लोकल गुरूमंडळी सोडली तरी राज्य-राष्ट्र पातळीवर सुद्धा गुरूंची रेलचेल आहे. जागतिकीकरणामुळे तर हे पीक अजूनच जोमाने वाढताना दिसते आहे.
विचार करणे सोडून देऊन माणसे अशा गुरूंच्या मागे का बरे लागत असावीत? 'वाईट' (खरीखुरी 'वाईट' की वाईट असल्याची समजूत करून घेतलेली 'वाईट' हा एक भेद आहेच) परिस्थितीतून जाताना बहुतेक माणसे या गुरूंच्या चतुर मार्केटिंगला हळूच बळी पडतात. अनिर्बंध शहरीकरण, शिक्षणाचे निर्लज्ज बाजारीकरण, हवामान बदल नि त्यामागोमाग येणारे नवनवीन रोग, बाजारातील चढ-उतार, बदलती सरकारे, राजकीय/सामाजिक अशांतता, मूलभूत सुविधांची वानवा या सगळ्यांनी सर्वसाधारण नागरिकाचे आयुष्य म्हणजे एक वैतागवाडी झालेली आहे. आयुष्यमान वाढते आहे तसेच ताणतणावही वाढत आहेत. गुरूंच्या मार्केटिंगला बळी पडायला अगदी अगदी पोषक वातावरण.
एक सध्या फॉर्मात असलेले गुरू तर "तुमच्या चिंता, दुखणी, काळज्या, सगळे मला द्या, मी तुम्हांला शांती देतो" अशी मार्केटिंग लाईन वापरतात. अर्थातच सुभाषचंद्रांच्या अवास्तव मागणीपेक्षा या मागणीला गिऱ्हाईक दाबून मिळते. शेवटी ज्या समाजात 'गुरू'कडे जाण्याला एक प्रतिष्ठा लाभते आणि मानसोपचार तज्ञाकडे जाण्याला एक चोरट्या लज्जेचे आवरण घालावे लागते तिथे असल्या मार्केटिंगला यश लाभणारच.
पत्रकार भवदीप कांग यांनी गुरुंच्या माजलेल्या तणातून काही निवडक नमुने घेऊन त्यांचा तपशीलवार अभ्यास केला नि "गुरूज, स्टोरीज ऑफ इंडियाज लीडींग बाबाज" या पुस्तकात नीटसपणे मांडला.
यात गोळा केलेले नमुने - महेश योगी, धीरेंद्र ब्रह्मचारी, चंद्रास्वामी, माता अमृतानंदमयी, रविशंकर, मोरारी बापू, जग्गी वासुदेव, बाबा रामदेव नि भय्यूजी महाराज. थोडक्यात, पहिले तीन सोडले तर आजही तळपणारे तारे. या यादीत मोरारी बापूंना का सामील केले कळत नाही. रामकथेचे निरूपण एवढे आणि एवढेच कार्य (अवास्तव/वास्तव पैशाची मागणी न करता) करणारे हे बुवा बाकीच्या अट्टल आणि निर्ढावलेल्या 'गुरूं'च्या पंगतीला बसायला नालायकच.
महेश योगी नि धीरेंद्र ब्रह्मचारी आता शिल्लक नाहीत. पण त्यांना खऱ्या अर्थाने 'ट्रेंडसेटर' (मार्गविकसक?) म्हणायला हवे. त्यांच्याही आधी 'गुरू' होऊन गेले, नाही असे नाही. पण महेश योगी या माणसाने या धंद्यात किती अनिर्बंध कमाई करता येते हे दाखवून डोळे दिपवून टाकले. जगप्रसिद्ध 'बीटल्स' ज्याच्या आश्रमात येऊन महिना महिना राहत असा हा बाबा. धीरेंद्र ब्रह्मचारी या माणसाने योग्य राजकीय ओळखी असल्या तर कशी गगनाला गवसणी घालता येते (खरोखरची; धीरेंद्र ब्रह्मचारीच्या मालकीचे विमान होते) ते दाखवून दिले.
उरलेल्या सगळ्या (जिवंत) गुरूंनी आपापली कुरणे शिस्तीत आखून घेतली आहेत. काहींनी अफाट संपत्ती गोळा केली आहे (रामदेव), काहींनी राज्यकर्त्यांच्या गुरूपदी हळूच मांडी ठोकली आहे (रवीशंकर, भय्यूजी) तर एकजण गुरू की विज्ञानवादी विचारवंत या 'नो मॅन्स लँड' मध्ये बागडतो आहे (जग्गी वासुदेव).
हे पुस्तक म्हणजे नुसत्याच चविष्ट गप्पा/अफवांचे संकलन नाही, जरी यातल्या बऱ्याच कहाण्या चांगल्याच मसालेदार आहेत. रवीशंकरने महेश योगीचा शिष्य म्हणून सुरुवात करून मग कधी व का काडीमोड घेतला, आणि त्या काडीमोडाबद्दल उभय बाजू कायकाय बोलतात हे अगदी 'फिल्मी गप्पा' या सदरात खपण्यासारखे आहे.
पण एकंदरीत भवदीप कांग यांनी त्यांचा दृष्टीकोन निखळ पत्रकारितेचा (वार्ताहराचा नव्हे) ठेवल्याने हे पुस्तक वाचनीय झाले आहे. त्यांचा दृष्टीकोन अगदी योग्य प्रमाणात मांडला गेला आहे. थोडा कमी मांडला असता तर कातडीबचाऊपणाचा आरोप झाला असता, थोडा जास्त मांडला असता तर त्याला कार्यकर्त्यांच्या कंठाळी घोषणाबाजीचे स्वरूप आले असते.

गुरूज, स्टोरीज ऑफ इंडियाज लीडींग बाबाज
लेखिकाः भवदीप कांग
प्रकाशकः वेस्टलँड लिमिटेड
किंमतः रु २९५
प्रथमावृत्तीः २०१६