नोव्हेंबर २० २०१६

व्हेंटिलेटर - गणपती बाप्पा मोरया!

मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत, मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे, मराठी चित्रपटांत नवनवे प्रयोग सुरू झाले आहेत, मराठी चित्रपट आता १०० कोटींचा उंबरा ओलांडायला सिद्ध झाले आहेत असा गोंगाट गेल्या काही वर्षांत वाढत चालला आहे. गेल्या वर्षी ओळीने पाचसहा मराठी चित्रपट पाहून मी खचलो आणि मुकाट बसलो. या वर्षी आतापर्यंत संयम बाळगला.
पण 'व्हेंटिलेटर' बघायला हवा अशी कुजबूज मित्रमंडळींच्या टोळक्यात व्हायला लागली नि माझा संयम डळमळायला सुरुवात झाली. अखेर सकाळी नऊ वाजताचा शो सस्त्यात आहे हे पाहून तो पकडला.
संयम बाळगणे ही चांगली गोष्ट असते आणि तो डळमळू न देणे हे प्रयत्नांती का होईना जमवलेले बरे हा धडा मिळाला.
गजानन कामेरकर नामक गृहस्थ व्हेंटिलेटरवर गेलेले आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या अर्ध-एकत्रिक कुटुंबात जी घुसळण होते त्याचा हा पट. अर्ध-एकत्रित यासाठी की या कुटुंबाच्या शाखा कोकण, मुंबई आणि (अर्थातच) अमेरिका इतक्या पसरलेल्या आहेत.
इथपासूनच भानगडीला सुरुवात होते. मुळात या कुटुंबाची वीण नक्की आहे कशी याचा कुठलाच सुगावा लागत नाही. दृष्यात्मकरीत्या कोकणातले घर आहे कसे तेही उमगत नाही. कोकणातले घर म्हणजे भाऊबंदकीतली भांडणे असा बाळबोध समज मनी धरून पटकथा पाडली की दृष्यात्मक मांडणी करायची गरज सरते.
हे कुटुंबही कसे, तर एक शाखा अस्सल ब्राह्मणी मराठी बोलणारी तर दुसरी कुणबी ठसका ("मिनी साप सांगलांव की मियां जमायचा नाय") दाखवणारी.
हे गाव कुठे, तर जिथली माणसे पाचसहा तासांत मुंबई गाठू शकतील अशा ठिकाणी. म्हणजे साधारण चिपळुणाच्या आसपास. फारतर संगमेश्वर. अगदी ओढूनच नेले तर रत्नागिरी. पण या गावातला गणपतीचा मूर्तीकार अस्सल मालवणी बोलणारा. असे का? तर मसाल्याची भरमार असलेल्या भाजीत जसे गरज असो वा नसो एक तमालपत्र नि दोन मसाल्याचे वेलदोडे घालायचे(च) असतात तसे मालवणी बोलणारे एक पात्र [मालवणी भाषा विनोदी असते असा समज] दिले खुपसून कथेत की बरे.
या गावातून मंडळी निघतात दोन गाड्यांतून. एक गाडी घाटातून नि एक गाडी 'खालून' अशी विभागणी करून. आता कोकणातून मुंबईला यायला कुठला घाट लागतो? कशेडी. पण कशेडी घाटाला 'बायपास' करणारा 'खालचा' रस्ता कुठून आला? कशेडीला बायपास करणारा रस्ता आहे तोही एक घाटच आहे. कशेडीपेक्षा छोटा, एवढेच. आणि शेवटी दोन्ही गाड्या घाटातूनच येतात. हे दाखवताना घाटरस्ता कुठला दाखवलाय, तर आरे-वारे किनाऱ्यावरून जाणारा रत्नागिरी-गणपतीपुळे-जयगड!
तपशीलातल्या चुका काढत बसले तर इथेच संध्याकाळ होईल.
कथेतला मूळ मुद्दा काय, तर बाप-मुलगा या नातेसंबंधांमधला ताणतणाव. सतीश आळेकर - आशुतोष गोवारीकर ही एक जोडी. त्यांच्यातले ताणतणाव नक्की काय नि कशामुळे आलेत याचे सूचन गोवारीकरांच्या फक्त एका संवादात, आणि तो संवादही चित्रपटाच्या शेवटाशेवटाला. तोवर आळेकर नुसते भयपटातल्या गूढ व्यक्तिरेखेसारखे संथ तिऱ्हाईतपणे चालताना दाखवले आहेत.
दुसरी जोडी जितेंद्र जोशी - एक कोमातली व्यक्ती. त्यातली शेवटी जितेंद्रने एक मोठा संवाद हाणून तो ताणतणाव नक्की काय नि कसा होता याबद्दल सांगितले म्हणून बरे झाले. पण तोवर जितूभाऊ बिचारे हुतात्म्याचा आविर्भाव बाळगत हिंडत राहतात.
आणि बाकी 'एकत्र' कुटुंबातली बाकीची पात्रे म्हणजे शुद्ध सावळागोंधळ आहे. गोवारीकर ज्याला 'दादा' म्हणतात आणि ज्याच्याबरोबर हॉस्पिटलमधली सगळी सव्यापसव्ये पार पाडतात त्या 'दादा'चे वडील कोकणात जाऊन राहिलेले. का? त्या बापलेकांत काय ताणतणाव आहेत? उत्तमरीत्या दडवलेले रहस्य.
गजानन कामेरकर याच्या नावाने काही मोठी मालमत्ता (जमीन आणिवा घरातला हिस्सा) आहे नि तिचे ते वाटप करून टाकणारेत असे कुठेतरी अंधुकरीत्या सुचवले आहे. आता आळेकर मोठे नि गजानन कामेरकर छोटे. या छोट्या भावाच्या नावे एकत्र कुटुंबात मोठी मालमत्ता कशी आली? गजाननबुवांची सांपत्तिक स्थिती तर अजिबात उच्चवर्गात मोडणारी नव्हे. घ्या अजून एक कोडे.
उरलेली मंडळी कोण? सख्खी की चुलत/चुलत-चुलत? मालमत्तेच्या वाटणीत त्यांचा नक्की काय हेतू वा सवाल? पत्ता नाही.
एकत्र कुटुंब, सामायिक मालमत्ता, भाऊबंदकीतले ताणतणाव या मी स्वतः माझ्या कुटुंबात अनुभवलेल्या नि अनुभवत असलेल्या गोष्टी. पण त्या प्रत्यक्षातल्या गोष्टींचा नि इथल्या बटबटीत मांडणीचा काहीएक संबंध नाही.
चित्रपटाचे पोस्टर इथे पाहिलेत तर भरपूर चेहरे (बरेच ओळखीचे) दिसतील. त्यांना एका कुटुंबात ढकलायचे नि म्हणायचे 'एकत्र कुटुंब'. अजागळ ढिसाळपणाचा कळस आहे.
नटमंडळींची कामे उत्तम झाली आहेत. विशेषतः जितेंद्र जोशीने जबरदस्त काम केले आहे. आळेकर-गोवारीकरांनीही बरी फटकेबाजी केली आहे. पण नुसता उत्तम तांदूळ, ताज्या भाज्या नि चांगले मसाले घातले की मसालेभात उत्तम होत नाही, त्यासाठी स्वयंपाक्याकडे अक्कल, कला नि कौशल्य असावे लागते.
चित्रपटाची लांबी हाही एक जीवघेणा विषय आहे. शेवटला किमान अर्धा तास आता चित्रपट कधी संपतोय याची वाट पाहण्यात जातो. तो कसा संपणार याचे कुतूहल मध्यंतराआधीच नाहीसे झालेले असते. एवढे तिकीट काढून बसलो आहे तर शेवटापर्यंत थांबणारच अशा बालिश हट्टापायी मी थांबून राहिलो एवढेच.
प्रियांका चोप्रा या महान विदुषींनी या चित्रपटाच्या निर्मीतीसाठी पैका मोजला आहे. त्यांनी तो वसूल करण्यासाठी अर्थातच मार्केटिंग व्यवस्थित केले आहे. या बाईंनी चित्रपटात एक गाणेही गायले आहे. तत्काळ विसरण्यायोग्य असे हे गाणे.
थोडक्यात काय? काही गणपती अंगची प्रतिष्ठा/प्रसिद्धी पावून असतात. बाकीचे 'बसवावे' लागतात. तसा हा भर्जरी मखरात बसवलेला गणपती आहे. सजावट उत्तम आहे. पण चित्रपटात वापरलेला एक संवाद वापरून म्हणायचे झाले तर "मूर्तीला तेज नाही".

Post to Feedतुम्ही फार विचार करता असे दिसते!
भारीये परीक्षण!
पाहिला

Typing help hide