डिसेंबर २०१६

आना मारिआ इन नोव्हेला लँड - एक लोभसवाणी फँटसी

फँटसी ऊर्फ स्वप्नरंजन. खरे तर 'स्वप्नरंजन' हा शब्द म्हणजे तडजोड आहे. इंग्रजीतल्या 'फँटसी'ला मराठीत 'स्वप्नरंजन' म्हणणे हे  बाहात्तरावी कार्बन कॉपी वाटते. असो.
सर्व कलामाध्यमांमध्ये या 'फँटसी'ने बराच धुमाकूळ घातलेला आहे. विशेषतः नाट्य आणि चित्रपट यांत. चित्रपटांतल्या फँटसीला महत्त्वाची जोड मिळते ती चित्रपटमाध्यमाच्या ताकदीची. स्थल, काल, दृक, श्राव्य अशा चहूदिशांनी हे माध्यम तुम्हांला घेरते.
बहुतेक फँटसी या साय-फाय (ऊर्फ सायन्स फिक्शन) या किंवा राजा-राणी-राक्षस-चेटकीण या दिशांना भटकतात. अत्यल्प फँटसीज रोजच्या जीवनाशी जुळवून घेतात. सशक्त पटकथा, कथेत पुरेसे थर/पदर असणे, आणि नेटके दृष्यभान हे सर्व एकत्र एकावेळी असणे अप्राप्यच.
कुणीतरी व्यक्ती अदृश्य/अतिलहान/अतिभव्य होऊ शकणे वा त्या व्यक्तीला अमानवी ताकद मिळणे या संकल्पना घेऊन अनेक चित्रपट आले. 'अशक्य ते शक्य' करून दाखवणे एवढा(च) हेतू ठेवला की मग केळेवाल्याचा कोट्याधीश किंवा मोलकरणीची महाराणी केली की झाले. यात विनोद असतो, नाही असे नाही. शिशुवर्गातल्या, फार तर बालवर्गातल्या मंडळींना कळतील आणि आवडतील असे हे विनोद असतात.
या खड्ड्यात न पडलेला फँटसीपट अप्राप्यच. 'आना मारिआ इन नॉव्हेला लँड' हा असाच अप्राप्य श्रेणीतला चित्रपट. साधी, लक्षवेधक आणि अनेक पदर असलेली कथा, अत्यंत नेमकी पात्रयोजना आणि खिळवून ठेवणारे दृष्यात्मक सादरीकरण यांचा मोहक मिलाफ म्हणजे हा चित्रपट.
नॉव्हेला (टेलि-नोव्हेला) म्हणजे स्पॅनिश भाषेतल्या टेलिव्हिजन सीरियल्स. फक्त त्या काही हजार भाग न चालता काही डझनातच आटोपतात. कुठल्याही हिंदी/मराठी मालिकांत असते तशीच अतर्क्य प्रसंग, विवाहपूर्व/बाह्य संबंधांची रेलचेल, आणि 'आजच्या' जगाशी/जगण्याशी शून्य संबंध यांची खिचडी अशा नॉव्हेलांतूनही शिजवली जाते.
आना मारिआ ही विशीतली तरुणी. आईवडिलांबरोबर राहते. डेटिंग वगैरेच्या भानगडीत नाही. नोकरी करणे, 'पॅशन विदाऊट लिमिटस' नावाची नॉव्हेला पाहणे, त्यावर सतत नेट-अपडेट करत राहणे, या अपडेटच्या मार्गात आडवी आली तर नोकरी सोडणे हे तिचे आयुष्य. थोडक्यात, साठीच्या दशकातल्या हिप्पीमंडळींप्रमाणे ही 'स्वतःला शोधत' आहे. तिच्या आईवडिलांना तिची काळजी वाटते - ती 'इतर' 'नेहमीच्या' मुलींसारखी वागत नाही म्हणून. आईवडीलही 'पॅशन विदाऊट लिमिटस'चे खंदे चाहते.
एकदा नोकरी सोडून घरी बसलेली मुलगी नॉव्हेला पाहत पाहत तिच्या कमेंटस अपडेट करते आहे, घरी तणाव निर्माण होऊ घातला आहे, नॉव्हेलामधला तणाव वाढत चालला आहे. आणि नॉव्हेलामधल्या आरिआना व घरातल्या आना मारियाची अदलाबदल होते. फक्त मनाची नव्हे, देहाचीही. या दोघी सोडून कुणालाच त्याचा पत्ता लागत नाही.
आणि धमाल सुरू होते. याहून जास्त कथानक इथे उलगडणे म्हणजे हलकटपणा ठरेल. एवढे(च) सांगतो की शेवटल्या अर्ध्या तासात कथानकांत इतके चड-उतार-वळणे आहेत की त्यापुढे कोकणातले रस्ते रनवेसारखे सरळ भासावेत.
इतर फँटसीपटांपेक्षा यात वेगळे काय आहे?
सर्वप्रथम म्हणजे या चित्रपटाची पटकथा लिहिताना प्रेक्षकवर्गाचा आयक्यू हा अलास्कातल्या तापमानापेक्षा कमी असतो असे गृहीत धरलेले नाही. मुळात पटकथा 'लिहिणे' हीच आजकाल दुर्मिळ होत चाललेली गोष्ट. इथे तर नुसती लिहिलीच नाहीये, तर मन लावून उत्तम तऱ्हेने लिहिली आहे.
कथा अनेक पातळ्यांवरून अनेक पदर उलगडत पुढे सरकते. 'आप्पाने बाप्पाला हाणले म्हणून बाप्पाने आप्पाच्या मुलीला पळवले' अशी 'साधीसोपी' मांडणी करण्याचा मोह टाळला आहे. नॉव्हेलामधली पात्रे आणि 'खऱ्या' जगातली पात्रे यांची जेव्हा अदलाबदल होईल तेव्हा त्यांच्या जाणीवांमध्ये हे बदललेले बाह्य कसे उमटेल याचे अत्यंत सुंदर सूचन केले आहे. नवनीतच्या गायडासारखे पायरीपायरीने गणित सोडवून दाखवलेले नाही.
उदाहरणार्थ.
नॉव्हेलामधले 'अ' हे स्त्रीपात्र 'खऱ्या' जगात येते. तिथे 'अ'ला कळते की आपल्याला एक बहीण आहे आणि तिचे लग्न होऊ घातले आहे. त्या बहिणीशी बोलताना 'अ'चा संवाद "ताई, मी एक चांगली बहीण होईन. मी तुझ्या नवऱ्याशी शरीरसंबंध अजिबात ठेवणार नाही, जरी बहुतेक बहिणी तसे करत असल्या तरी".
'ब' या नॉव्हेलातल्या पात्राला 'खऱ्या' जगात आल्यावर डॉक्टरांकडे नेले जाते आणि डॉक्टर तिला विस्मरण (ऍम्नेसिआ) असल्याचे निदान करतात. तेव्हा 'ब'चा अत्यंत निरागसपणे उच्चारलेला संवाद "ऍम्नेसिआ? आमच्याकडे सगळ्यांनाच केव्हा ना केव्हा होतो तो".
'क' हे पात्र 'खऱ्या' जगातून नॉव्हेलात जाते. तिथल्या एका पात्राशी संवाद साधताना मध्येच वर पाहून ओरडते "गप्प बसा. तुमच्या कल्लोळात मला विचारही सुचत नाहीयेत धड". मग आपल्या लक्षात येते की मागे नेहमीच्या सीरीअल्सला असते तसे अचकट-विचकट पार्श्वसंगीत चालू आहे.
कॅमेरा अत्यंत अलगदपणे फिरतो. कुठेही दिखाऊ चमकदारपणा, अति-लाँगशॉट वा अति-क्लोजप वा भलत्याच कोनातून भयाकारी मांडणी असे लक्षपूर्वक टाळले आहे. सीरीअल्समध्ये अशा गोष्टी असणे किती गरजेचे आहे ते पाहता हा मोह टाळणे किती थोर आहे हे जाणवते.
पात्रयोजना अत्यंत नेमकी. 'एडी गानेम' ही नटी मुख्य भूमिकेत. ती टेलिव्हिजनवरची नटी. काही फुटकळ भूमिका सोडता तिने आजवर चित्रपटांत कामे केलेली नाहीत. तसा हा तिचा 'पहिला' चित्रपट. तिचे काम केवळ लाजवाब. दुहेरी भूमिका करतानाचे वेगळेपण जे तिने दाखवले आहे ते अप्रतिम. भल्याभल्यांना हे जमताना महाकर्मकठीण जाते. मग डबल रोल म्हणजे पुरुषपात्राला मिशी असल्यास उडवणे, नसल्यास लावणे आणि स्त्रीपात्राची केशरचना/वेषभूषा बदलणे अशा मठ्ठ गोष्टी मांडल्या जातात. 'ती सगळा चित्रपट स्वतःच्या खांद्यावर तोलून धरते' असे लिहित नाही, कारण इतर पात्रेही तोलामोलाची आहेत, नुसतेच 'आणि इतर' नाहीयेत.
नेस्टर सेरानोने आनाच्या वडिलांची भूमिका अत्यंत सुंदर पार पाडली आहे. त्याच्या अभिनयाकडे फक्त पाहून आपल्याकडल्या (पडद्यावरच्या) सगळ्या बापमंडळींना झीट येईल. तसे काम करणे सोडाच.
मिकाईल स्टेगर हा अजून एक टीव्हीवरचा नट. त्याने त्याच्या दोन भूमिका व्यवस्थित सांभाळल्या आहेत. त्यात 'आर्मांदो'पेक्षा 'टोनी' म्हणून तो जास्त भावतो, कारण 'आर्मांदो' हे शेवटी नॉव्हेलातले पात्र, टोनी 'खऱ्या' जगातले.
लुई गझमन आतापर्यंत गुंड टोळीतला एक चिरकूट सदस्य म्हणून बऱ्याच चित्रपटांत पाहिला आहे ('द लास्ट स्टँड' चा अपवाद; तिथली भूमिका बऱ्यापैकी मोठी होती). इथे नॉव्हेलातल्या खलभूमिकेत त्याने धमाल उडवून दिली आहे.
जॅकी चॅनच्या 'रश अवर'मधली ख्रिस टकरची आशियाई दिसणारी गर्लफ्रेंड डिटेक्टिव्ह तानिआ जॉन्सन आठवते? एलिझाबेथ पेनाने ती भूमिका केली होती. इथे एलिझाबेथ आनाच्या आईच्या भूमिकेत आहे. नेस्टर सेरानोला इतकी समर्थ साथ देणारी दुसरी नटी सापडणे कठीण होते. दोघांनी मिळून साकार केलेले जोडपे केवळ अविश्वसनीय! दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झाल्यावर लगेच एलिझाबेथचे पंचावन्नाव्या वर्षी निधन झाले.
दोनेक दशकांपूर्वी 'प्लेझंटविल' या चित्रपटाने "टीव्हीवरच्या आभासी आणि प्रत्यक्षातल्या 'खऱ्या' जगात देवाणघेवाण झाले तर" या कल्पनेची खिडकी उघडली. 'आना मारिआ'ने तर तीन हत्ती एकावेळेस जातील असे महाद्वारच उघडले आहे!

Post to Feed



ओहो!
दी बकेट लिस्ट

Typing help hide