शी इज फनी दॅट वे - एक चटपटीत अनुभव

अनेकांनी अनेक वेळेस बोलून नि लिहूनही सत्य राहिलेली गोष्ट म्हणजे चांगला विनोद करणे खूप अवघड आहे. एकवचनी. अनेकवचनी (एकापाठोपाठ एक चांगल्या विनोदांची माळ लावणे) तर अप्राप्य म्हणता येईल.
'शी इज फनी दॅट वे' हा चित्रपट अशी एक खमंग माळ लावतो.
दोन मुले असलेला चाळिशीपार केलेला एक ब्रॉडवेवरचा नाट्य दिग्दर्शक डेरेक. त्याच्या नवीन नाटकाची नायिका त्याची (खऱ्या जीवनातली खरी) बायको डेल्टा. त्या नाटकाचा नायक सेठ गिल्बर्ट हा एक बऱ्यापैकी नाव कमावलेला नट, आणि बऱ्याच वर्षांपासून डेल्टापाठी झुरणारा.
डेरेकबुवांना अजून एक छंद - 'एस्कॉर्ट सर्व्हिसेसमधून' मुली मागवणे, त्यांना जीवनाचे तत्त्वज्ञान पाजणे आणि भरपूरसे पैसे देऊन त्यांनी 'हे काम' सोडावे नि स्वतःला जे वाटते ते करावे अशी त्यांची मनधरणी करणे. एवढे पैसे (बायकोला न कळता) कुठून येतात ते सोडून देऊ.
ही सगळी कथा आकारते अजून एका नटीच्या दृष्टीकोनातून. ती 'स्ट्रगलिंग' करताना आर्थिक आधार म्हणून 'एस्कॉर्ट सर्व्हिस' मध्ये काम करणारी. त्यामार्गे डेरेकसायबाच्या संगतीत येत, तीन पेग तत्त्वज्ञान (आणि भरपूरसे पैसे) मारून एका नाटकाच्या ऑडिशनला जाते. बरोब्बर. डेरेकबुवा बसवत असलेले तेच ते नाटक.
मग जे व्हायचे ते (आणि बरेचसे होऊ नये ते) होते, अगदी फटाफट होते. आणि फार्समध्ये व्हायला हवी तशी आणि तितपत सगळ्यांची भंबेरी उडते. कुणी पोलिस स्टेशनला पोहोचते, कुणी कुणाच्या बाथरूममध्ये तर कुणी दुसऱ्याच कुणाच्या रूममध्ये.
शेवटी बऱ्याचशा गोष्टी निस्तरल्या जातात. काही निस्तरण्याच्या पलिकडे जातात. आणि डेरेकपंत जे तत्त्वज्ञान एकनाथांच्या उत्साहाने सगळ्यांना (म्हणजे सगळ्या स्त्रियांना) पाजत असतात त्या तत्त्वज्ञानाबद्दल एक गुगली टाकून दिग्दर्शक आपली विकेट काढतो नि चित्रपट संपतो.
याहून जास्त लिहायचे झाले तर सगळी कथा उलगडावी लागेल. आणि संवादही. आणि संवादांतील भावछटाही. थोडक्यात अख्खा चित्रपट इथे मांडावा लागेल. मग तुम्ही मंडळी काय पाहणार, कप्पाळ?
पात्रयोजना चपखल. जेनी ऍनिस्टन, कॅथरीन हान नि ओवेन विल्सन खाचेत पाचर बसावी तसे बसले आहेत. इमोजेन पूटस तरुण नटीच्या भूमिकेत अगदी योग्य. तशी या मुलीला विनोदाची चांगली जाण असल्याचे 'अ लाँग वे डाऊन'मध्ये कळले होतेच.
बाकीची पात्रेही, अगदी छोटेसे जजचे पात्रही (नट - ऑस्टिन पेंडलटन; 'माय कझिन विनी' मधला तोतरा वकील) भाव खाऊन जाते.
शेवटी दिग्दर्शक कोण? तर विल्यम फ्रिडकिन, ब्रायन डि पाल्मा, जॉर्ज ल्युकस, मार्टिन स्कोर्सेसी, फ्रान्सिक फोर्ड कपोला या प्रभावळीत स्थान पटकावून बसलेला पीटर बॉग्डनोविच. सिंह पंचाहत्तरीला पोहोचला तरी डरकाळीच मारणार, केकाटणार नाही...